वारी

उत्तर रात्र उलटून पहाटेची वेळ होत आली होती. आई उठली. गाई म्हशींना वैरण टाकले. दूधाची धार काढण्याच्या एक तास आधी आई वैरण टाकायची. तासाभराने दूधाची धार काढायची. वैरण धार काढण्यापूर्वी नाही टाकले तर दूधावर परीणाम व्हायचा. दूध कमी भरायचे. मग आई हा आळस न करता वैरण टाकायची.

आईने आजोबांसाठी गरम पाणी ही गिझर लावून काढून दिले. होय, आमच्याकडे गोबर गॅस प्लांट लावलेला होता. त्यामुळे स्वयंपाक गरम पाणी थोडक्यात कुटुंबाला आवश्यक तेवढा गॅस मिळत होता.

आजोबांनी स्नान उरकले व नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पाठासाठी बसले. ज्ञानेश्वरीच्या रोज एक अध्याय याप्रमाणे वर्षानुवर्षे त्यांचे पारायण सुरूच होते. त्यानंतर आरती व हरीपाठादी भजने व सरतेशेवटी नामस्मरण, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, आजोबा इतके तल्लिन व्हायचे की शेवटी तर ठ्ठल, ठ्ठल, ठ्ठल ऐकू यायचे.

मी झोपेतून उठली तशी आजोबांचे, ठ्ठल, ठ्ठल, ठ्ठल बोल कानी येत होते. भजन संपले व आजोबांनी आईला साद घातली. “लक्ष्मी, चहा आणतेस ना” होय बाबा, आणते” आई, आजोबांना बाबाचं म्हणायची. वडीलांप्रमाणेच मानायची. आजोबांनीही कधी तिला सून मानली नाही, मुलगीच आहे माझी म्हणायचे. लक्ष्मीच्या पाऊली माझी सून आली व घरात सुखाच्या राशि भरभरून आल्या, म्हणून आईला ते लक्ष्मीच म्हणायचे.

“बाबा, पुरे झाली विठ्ठलसेवा. 45 वर्षे झाली तुम्ही पायी वारी करीत आहात पंढरीची. पण आता तुमची तब्येत ठीक नसते. आता जास्त दगदग सोसवत नाही तुम्हांला. आराम करा तुम्ही.” “आरामचं तर करतो, प्रभाकर, सुधाकर सगळं सांभाळतात. शेती वाडी दुकान सगळंच पाहतात दोघे भाऊ मला काही पहावं लागत नाही, उलट मीच बसतो दुकानात वेळ जावा म्हणून”.

आजोबा विठ्ठल भक्त, माळकरी, दरवर्षी न चुकता वारी करणारे, एकादशी, संकष्टीव्रत जोपासणारे, कोणाच्या अडी अडचणीला धावून जाणारे, मदतीचा हात सतत पुढेच राहायचा. गावातील कोणताही भांडण, तंटा, खटला असो. आजोबांची हजेरी राहायचीच. कोणाची काहीही समस्या असो आजोबा बरोबर त्यातून मार्ग काढायचे, त्यामुळे गावकर्‍यांनाही आजोबांचा आधार वाटायचा.

आजोबा जुनाट रितीरिवाजांना धरुन बसणारे नव्हते तर जुन्यात नव्याची सांगड घालून सुवर्णमध्य नेहमी साधायचे, यामुळेच हुंडा निर्मुलन, स्त्रिभ्रूणहत्या विरोधात ही त्यांनी जनजागृृृृती, विचारजागृृृती तर केलीच, पण या प्रथा रोखण्याचे काम कायद्याची मदत घेऊन ही केले,.

“आजोबांना वेध लागायचे पंढरीच्या वारीचे. गेली पंचेचाळीस वर्षांपासून त्यांचा हा नित्यनियम होता. वटपौर्णिमेच्या दिवशी गावातून मुक्ताईची पालखी पंढरपूरसाठी रवाना व्हायची .पंचवीस दिवसाचा पायी प्रवास व पांच दिवस पंढरपूरात पालखीचा मुक्काम व नंतर परतीचा प्रवास. नारळी पौर्णिमेला पालखी गावात परत यायची. असा तब्बल दोन महिन्याचा प्रवास आजोबा करीत होते.

यावर्षीही मंदिरात पालखी प्रस्थानासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते .आजोबा तर प्रमुख पाच लोकांमध्ये होते .पण आताशा तब्येत साथ देत नव्हती .बी पी. , संधीवात , शारीरिक थकवा कमालीचा वाढला होता .एवढा पायी प्रवास शक्यच नव्हता .पण आजोबांचा हट्टच वारी चुकवायची नाही .

” बाबा नका चुकवू तुम्ही वारी . पण पायी नका जाऊ , रेल्वे वा एस. टी. ने जा .” मी म्हटले .(आजोबांना आम्ही सगळे बाबाच म्हणायचो. )तसे आजोबा उत्तरले. नाही ग माझी मुक्ताई , माझा दरवर्षीचा नियम मोडेल ना . आणि बेटा पायी वारीचं वैशिष्ट्य म्हणजे , पंढरपुरात तर पांडुरंगाचं दर्शन होतं , पण पायी वारीमध्ये पांडुरंग कळतो .त्याचं नामस्मरण करत करत , ओव्या , भजने , भारूडे गात गात , कीर्तन , प्रवचने ऐकत ऐकत वारकरी जणू पंढरीच्या नाही तर मोक्षाच्या मार्गाने चालला आहे असे वाटते .मी जाणारच बेटा , देवाच्या नावावर काहीही होणार नाही मला . तो पांडुरंग आहे ना माझ्या पाठीशी , काळजी कशाला करतेस . ” का नको काळजी करु . तुम्हांला नसेल काळजी , पण मला आहे ना . तुम्हांला काही झालं तर , नको नको , मला ती कल्पनाही सहन होत नाही .” ” अग वेडाबाई , खरंच मला काही होणार नाही , विश्वास ठेव माझ्यावर ” ” नाही ते काहीही नाही , एक तर तुम्ही वारीला जाऊ नका किंवा सोबतीला मी पण येईन ” ” वेडी कि खुळी बेटा तू . तुझं हे नववीचं वर्ष , दहावीचा पाया . शाळा सोडून तू वारीला येणार . दोन महिने शाळा बुडवणार “. ” असू देत ,मी सगळा back log भरून काढेन . ती चिंता करू नका बाबा तुम्ही “.

आजोबांचा वारीचा हट्ट व माझी जिद्द पाहून घरातील मंडळींनी आजोबा व माझ्यासोबत सुधाकर काका येतील असे ठरविण्यात आले.वारीला निघतांना आजोबासाठी शाल, स्वेटर, मफलर, ब्लँकेट, आवश्यक ती औषधे, एक दोन जोडी आम्हां तिघांचे कपडे घेऊन आम्ही वारीला निघालो .झांज , चिपळ्या , वारीचे झेंडे ,भालदार , चोपदार सह पालखीचे प्रस्थान झाले.

मजल दरमजल करीत दिंडी जात होती, आणि आजोबांचा आजारही बळावत होता. दिंडीसोबत दोन डाॅक्टर्स होते, चेकअप, औषधोपचार करीत होते.” आता तुम्ही प्रवास थांबवा , तुम्हांला विश्रांतीसोबतच हाॅस्पिटलायझेशनचीही गरज आहे , पण आजोबा ऐकेनात . ” नाही , तुम्हीच डाँक्टर औषध , पांडुरंग आहेच मदतीला “.

आणि तो दिवसही आला दिंडीने पंढरपूर नगरात प्रवेश केला ,ज्यासाठी एवढा अट्टाहास केला ते शहर आलं , देवस्थान आलं , भाविकांची तोबा गर्दी , चंद्रभागेत पाय ठेवायलाही जागा नाही , अशा वातावरणात दोन दिवसांपासुन स्वाईन फ्ल्यू ने कहर केला होता , दूषित पाण्याने डायरीया , तर डास मच्छरांनी डेंग्यूला निमंत्रण दिलं होतं . सगळी दवाखाने फुल होते . प्रशासनही मदत करीत होतं , पण ती मदत तोकडी पडत होती .दवाखान्यात खाटी अपूर्ण पडू लागल्या . काही पेशंट जमिनीवर झोपविले .

नेहमी मदतीला धावणारे आजोबा गप्प बसणारे नव्हते . रोग्यांची सेवा करु लागले . ” बाबा , थांबा ना , नका करु हे सगळं .पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि निघा” ” अग बेटा , असं काय बोलतेस . जनसेवा हीच ईशसेवा , हीच माझ्या पांडुरंगाची सेवा “.जवळ जवळ संपूर्ण एक वाॅर्ड आजोबांनी सांभाळला . रूग्णांची अतोनात सेवा केली . सगळ्यांनाच आजोबांच्या रूपात पांडुरंग गवसला होता . अनेक रूग्ण बरेही झाले , 

पण , सेवा करणारे आजोबाच आता रूग्ण झाले होते . अंगात सडकून ताप भरला होता .दम लागत होता , आणि बाबांची शुध्द हरपली , मी व सुधाकरकाकांनी डाॅक्टरांकडे धाव घेतली , डाॅक्टर आले , लगेच आॅक्सिजन मास्क लावला . आजोबा अगदी निपचित पडून होते , एखाद्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे मला ते भासले . मला फार गलबलून आले . डोळ्यातून अश्रूधारा वाहात होत्या . सुधाकरकाका खांद्यावर थोपटत मला धीर देत होते .

सकाळी सकाळी माझा डोळा लागला . आणि दुसर्‍याच क्षणी खाडकन उघडला .आजोबा खूप घाबरे झाले होते . डाँक्टर , नर्सची धावपळ सुरु झाली . मोठ्या डाॅक्टरांना बोलाविण्यात आले .फटाफट जीवन रक्षक औषधे , इंजेक्शने सुरू झाली . आणि आजोबांचा श्वास मंदावू लागला . ” मुक्ता , येतो ग मी आता ” अगदी क्षीण आवाजात आजोबा बोलले व त्यांनी मान टाकली . 

डाॅ. शैलजा करोडे,
नेरूळ, नवी मुंबई

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया