सुफीयान

तोपर्यंत मी खुश होतो. सगळ्या पासुन दुर अगदी गहिऱ्या एकांतात. स्वतः भोवती कितीतरी आभामंडळ मिरवत. स्वयंप्रकाशी. चिंता, काळजी, माया, प्रेम, लोभ या सगळ्या विकारांपासून अलिप्त ………… स्वतःच्याच विश्वात रममाण ! 
आणि एक दिवस मी तुला पाहिलं. माझ्या गतस्मृती जागृत झाल्या. इतक्या दुरवर अगदी एकटा मी कुणाची वाट पहात होतो याच्या स्मृती एखाद्या मजकूराप्रमाणे माझ्या स्मृतीपटलावरून धावल्या. तुझ्या मोहक आणि निष्पाप अदांनी मला पुन्हा एकदा पृथ्वीचा मोह पडला. माझं तेज, माझा प्रकाश, माझं आयुष्य तुझ्या शिवाय किती अपुर्ण आहे याची मला पुन्हा एकदा जाणीव झाली. तुझ्या शिवाय माझं अस्तित्व किती फोल आहे याचं मला भान आलं. 
तुझं देहरुपी क्षणीक अस्तित्व नष्ट होण्याआधी तुला गाठण्यासाठी मी पुन्हा एकदा वेगाने पृथ्वीकडे निघालो. तुझ्या श्वासाचा गंध हृदयात भरून घेण्यासाठी मी पृथ्वीकडे निघालो. तुझ्या सोनसळी केसांत स्वतःला हरवण्यासाठी मी पृथ्वीकडे निघालो. तुझ्या आठवणीत आयुष्यभर रममाण होण्यासाठी मी पृथ्वीकडे निघालो. तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कितीतरी युगं माझ्या काळजात मिरवण्यासाठी मी पृथ्वीकडे निघालो. फक्त तुझ्या साठी मी कितीतरी तारका मंडल मागे टाकत लाखो योजनं प्रवास करुन पृथ्वीकडे निघालो. फक्त तुझ्या साठी मी स्वतःला पुन्हा एकदा खोल अंधाऱ्या गर्तेत ढकलून दिले होते. तुझ्या प्राप्तीच्या ओढीमुळे जो वेग मी पकडला होता त्यामुळे आकाशात चौफेर ठिणग्या उडत होत्या.
माझ्या आगमनामुळे सप्तरंगांची उधळण आकाश प्रदीप्त करत होती. माझ्यासाठी हा स्वतःला उध्वस्त करणारा वेदनादायी प्रवास नेहमीच सुखकारक होता कारण पृथ्वीवर तु पुन्हा एकदा चैतन्य रूपात मोगऱ्याची उधळण करत आपल्या पाऊलखुणा नकळतपणे माझ्या साठीच उमटवत होतीस. 
तुझ्या बरोबर व्यतित होणारे चार क्षण अनुभवण्यासाठी युगानुयुगे मी हा प्रवास पुन्हा पुन्हा करणार होतो. 
लोक मात्र वेडे आहेत. लोकांना वाटतं पुन्हा एकदा तारा कोसळला….!

तुषार दामुगडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: