आनंदवारी


दोन्ही डोळ्यांना बँडेज लावलेल्या अवस्थेत सीमा उदासवाणी बसली होती.” सीमा, चल, पोहे खाऊन घे गरम ” असे म्हणून रवीने तिला चमच्याने भरवायला सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली ” किती त्रास घेता हो तुम्ही माझ्यासाठी!”  ” वेडाबाई , नेहमी  तूच  करतेस ना आमच्यासाठी ! “रवीचे हे बोलणे ऐकून सीमाला भरून आले.

चार दिवसापूर्वी हॉलमधील फॅन साफ करताना डोळ्यात चिकट धूळ गेल्याचे निमित्त झाले . डोळे लालभडक होऊन खूपच दुखू लागले. डॉक्टरांनी व्हायरल इन्फेक्शन असे निदान करून आठ दिवसांसाठी डोळ्यांना बँडेज लावले.चाचपडत तिने काही काम करण्याचा प्रयत्न केला पण जमेनाच.रोजच्या हाताखालच्या वस्तू पण सापडेनात .डोळे असून आंधळेपणाचे  जीवन अनुभवले तिने .ती रवीला म्हणाली, “देवाने  दोन डोळे दिले हे सुंदर जग बघायला, म्हणून देवाविषयी कृतज्ञ असायला हवं ना !  पण असेल तेव्हा त्याची किंमत वाटत नाही. आता चार दिवस डोळ्यावर पट्टी आहे, तर जगणं अवघड होऊन बसलेय. खरंच अंध माणसे कशी हो जगत असतील? “यावर रवी म्हणाला,” हो ग, आपण पेपरमध्ये वाचतो, अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवले, कुणी सुंदर चित्र काढले. पण किती खडतर असेल त्यांच्यासाठी ते. “यावर सीमा म्हणाली, “मी ठरवलंय ,बरी झाल्यावर अंध मुलांसाठी काहीतरी करणार आहे .”      

डोळे बरे झाल्यावर ती सरस्वती अंध विद्यालयात जाऊन तिथल्या व्यवस्थापिका आशा मावशींना भेटली.  मानसशास्त्राची पदवीधर असल्याचे सांगून मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. आशा मावशींनी तिला विद्यालय व वसतिगृह फिरवून दाखवले. लहान-मोठ्या वयोगटातील पन्नास मुले होती तिथे .अंध म्हणून नाकारलेली, गरीब घरातील मुले होती  ती. राहण्याची व खाण्याची सोय, दोन शिक्षिका व  ब्रेल लिपीतील काही पुस्तके, एवढ्याच   सुविधा होत्या तिथे. एका वर्गात ती डोकावली तर बाई मुलांना बालकवींची कविता शिकवत होत्या. “श्रावण मासी हर्ष मानसी,  हिरवळ दाटे चोहिकडे” त्यांच्यापाठोपाठ मुले यांत्रिकपणे कविता म्हणत होती. पण त्यांच्या सुरात ना कुठला खेद  ना कुठला आनंद. सीमा म्हणाली ,”मावशी, या मुलांनी जर हे सुंदर जग पाहिले नाही,  तर त्यांना श्रावणाची जादू फक्त शब्दातून कळणार तरी कशी ? त्यांनी अनुभवायला हवी ही हिरवी सृष्टी. तुम्ही परवानगी दिलीत तर मुलांना सहलीला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी.”     
मावशींनी  होकार देताच ‌सीमा घरी आली ती उत्साहाचे पंख लावूनच. तिने स्वानंदी मंडळातील मैत्रिणींना  घरी बोलावले. . तिच्या अकरा सख्या  सुशिक्षित, सधन घरातील, मध्यमवयीन गृहिणी होत्या ‌. समाजाविषयी बांधिलकी मानत होत्या.

सीमा म्हणाली,” सख्यांनो,  डोळस मुले हे जग प्रत्यक्ष बघू शकतात.  उदाहरणार्थ, समुद्राचा निळा रंग, पाण्याचा थंडगार स्पर्श, अथांगपणा लाटांशी खेळत अनुभवू शकतात, याव्यतिरिक्त रंगीत चित्रे,  सीडीज,  चित्रपट, संगणक यातून  पाहू शकतात. मग ती संज्ञा अधिक पक्की होते त्यांच्या मनात. फक्त वाचन व श्रवणापेक्षा डोळ्याने पाहिलेले, कृतीतून घेतलेले शिक्षण किंवा एखादा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजतो. आणि मेंदूच्या पेशींमध्ये कायमस्वरूपी साठवला जातो. या उलट फक्त ऐकले की कालांतराने तो पुसट होतो. नुसती घोकंपट्टी केलेली प्रश्नोत्तरे, गणितातील सूत्रे समीकरणे आपण विसरतो .चित्रपटातील गाणी मात्र प्रत्यक्ष पाहिल्यामुळे सहजपणे लक्षात राहतात. म्हणूनच आपण सर्वजणी  या मुलांना वेगवेगळ्या सहलींना घेऊन जाऊ. विविध अनुभव घेण्याची संधी त्यांना देऊ. प्रत्येकीने माझ्यासोबत  एक  रविवार दिला तरी आपण हे सहजसाध्य करू शकतो. मग आहे का तयारी तुमची? ”         

सर्व मैत्रिणींनी मनापासून होकार दिला. पुढच्याच रविवारी सीमा तिची मैत्रीण वृषालीच्या पवना डॅम वरील फार्महाऊसवर मुलांना सहलीला घेऊन गेली. मस्त पाऊस रिमझिमत होता. पायाखाली हिरव्यागार गवताचा मखमली गालिचा पसरला होता. सीमाने “श्रावण मासी ” कविता म्हणायला सुरुवात केली.  तशी मुलांनी टाळ्या वाजवत गाण्यात आपला सूर मिसळला. कुणी गवतावर नाचू लागली. एकमेकांवर पाऊस रिंगणातले पाणी  उडवू लागली. त्या हिरव्यारंगी रंगून मुलं हिरवीकंच झाली. श्रावण झेलून श्रावणच झाली .आणि हे बघताना या सर्वजणींच्या डोळ्यात श्रावण दाटून आला.         
मग काय धडाकाच लावला या सर्वजणींनी. प्रत्येक रविवारी कधी बागेत,  मंदिरात, नदीकिनारी, कधी मंडई,कापड मार्केट, कारखाना, खेळाचा सामना पाहायला त्या  मुलांना घेऊन  जाऊ लागल्या . कितीतरी समृद्ध अनुभव दिले त्यांनी मुलांना. त्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचा किरण आणला. मुलांच्या विझलेल्या डोळ्यात आनंदज्योती उजळल्या.  अंधपणाच्या, घरच्यांपासून दुरावल्याच्या वेदनांमुळे मुले निराश झाली होती. हसूबोलू लागली , नाचूगाऊ लागली. त्यांचा आत्मविश्वास वाढला. अन मग अभ्यासातही खूप प्रगती दिसू लागली त्यांच्या. सुट्टीच्या दिवशी येऊन, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला आणि कितीतरी खेळ शिकवले स्वानंदी मंडळाने त्यांना. मुले त्यात मनापासून रस घेऊ लागली.          

एका रविवारी सीमा मुलांना प्रार्थना शिकवत होती.आकाशीचे तुम्हीच तारे,आनंदाचे झुळझुळ वारे पंखामध्ये बळ भरूनी, जा आयुष्याला सामोरे आत्मविश्वासे जगा रे, जीवनाची ज्योत उजळा रेनिश्चय हाच करुनी आता, जीवन बाग ही फुलवा रेहे पाहून आशा मावशी गहिवरून सीमाला म्हणाल्या, “पोरी, खऱ्या अर्थाने आनंदवारी घडवलीस तू या लेकरांना, विठुराया तुझं कल्याण करो” यावर सीमा म्हणाली, ” मावशी मी कोण हे घडवणारी, या  सावळ्या परब्रम्हानेच  ही आनंदवारी मुलांसोबत आम्हालाही घडवली. ही आनंदवारी आता चालूच राहणार, कधी न थांबण्यासाठी, आम्ही सर्वजणी या मानवतेच्या मंदिरात दर रविवारी  येतच राहू, या देवाघरच्या फुलांसाठी, माणसातल्या देवाला भेटण्यासाठी.

सौ. माधुरी शिवाजी विधाटे
 सांगवी, पुणे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: