व्हेंटिलेटर

रात्री अडीच वाजता दारावरची बेल सारखी सारखी वाजल्याने काहीशा त्रासिक स्वरात मारिया उठली, कारण ती व कुंजा ( कुंजात्ता ) बारा वाजता हॉस्पिटल मधून सेंकड शिफ्ट करून घरी परतल्या होत्या. तर कार्तिकी व रिया ह्या नाईटशिफ्ट साठी हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या.

दारात शेजारील फ्लॅट मधील देसाई काकू काहीशा काळजीच्या स्वरात बोलल्या….
“मारिया सिस्टर… रेवतीला खूप त्रास होतो आहे, तिला अचानक कळा पण सुरु झाल्या आहे. प्लीज जरा बघा ना.. एक तासापासून हॉस्पिटल व अॅमब्युलन्सला फोन लावते आहे पण अॅमब्युलन्स अजून आली नाही. तोपर्यंत काही करता येईल का बघा ना प्लीज.”

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोरोनाची साथ असतानाही मारिया मदत करायला तयार झाली. तिने रेवतीला तपासले, वेळ खरंच खूप नाजूक होती. तिनेही हॉस्पिटला अॅमब्युलन्स साठी फोन लावला, पण कोविडं मुळे अॅमब्युलन्स इमर्जन्सी मध्ये बाहेर असल्याने येण्यास उशीर होत होता.

“आता काय करणार?” देसाई काकूंचा प्रश्न

“Don’t worry I am here… If ambulance is not reaching in time,.. will manage. Don’t get panic.”

मारिया आपल्या फ्लॅट मध्ये गेली, तिने कुंजाला उठवून सारी परिस्थिती सांगितली. दोघीही पी पीइ किट, मास्क, सर्जिकल हॅंड ग्लोवज् घालून पूर्ण तयारीनिशी घारातील बी पी चेकिंग किट, इतर उपलब्ध मेडिकल इंस्ट्रुमेंट्स व काही उपयुक्त औषधे घेऊन देसाई काकूंकडे पोहचल्या. तोपर्यंत रेवतीच्या कळा ज्यास्तच वाढल्या होत्या आणि अॅमब्युलन्सचा पत्ता नव्हता.

“देसाई काकू आपल्याला आता घरीच डिलिव्हरी करावी लागेल, घाबरू नका. सॅनिटाइझर, गरम पाणी, आणि काही स्वच्छ कपड्यांची व्यवस्था करा लवकर. वेळ जवळ आली आहे.”

मारिया सिस्टर ने कुंजाच्या मदतीने पूर्ण काळजी घेत रेवतीला पहाटे चार वाजता मोकळे केले. रेवतीने एका गोंडस मुलास जन्म दिला होता. सर्वाचे चेहरे आनंदाने एकदम फुलले होते. देसाई काकूंचा आनंद गगनात मावत नव्हता. साडेचार वाजता अॅमब्युलन्स आली पण आली तशी ती रिकामीच परत गेली.

मारिया आणि कुंजा आता दोघीही थकल्या होत्या आणि त्यांना झोपेची नितांत गरज वाटू लागली.
त्यांनी देसाई काकूंना सकाळी दहा-अकरा वाजता परत येतो असे सांगत त्यांचा निरोप घेतला. देसाई काकू चहासाठी वारंवार आग्रहा बरोबर धन्यवाद प्रगट करत होत्या.

मारिया व कुंजा दोघींनी छान पैकी आंघोळ केली आणि त्या अलगत निद्रिस्त झाल्या. जागरणा मुळे त्यांना इतकी गाढ झोप लागली होती की कार्तिकी व रिया नाईट ड्युटी करून सकाळी आठ वाजता केव्हा येऊन झोपल्या ह्याचीही शुद्ध त्यांना नव्हती.

देसाई काकूंनी कार्तिकी व रियाला दारातच सर्व हकीकत सांगून चहा, पाणी दिले व त्या दोघींना झोपू द्या आता उठवू नका असा सल्ला दिला. त्यामुळे कार्तिकी आणि रिया गुपचूप आपल्या जागेवर जाऊन झोपल्या.

सकाळी अकरा वाजता हळू हळू सर्वजणी जागे होत रात्रीच्या प्रसंगावर चर्चा करू लागल्या तेव्हा परत दारावर बेल वाजली. देसाई काकू चौघींसाठी चहा बरोबर नाश्ताही घेऊन आल्या होत्या. त्यांनी तोंड भरून सर्वांचे कौतुक केले. काल जर तुम्ही नसता तर काय परिस्थिती झाली असती हा विचार करून देसाई काकूंच्या अंगावर काटा आला.

“मला तुम्हा सर्वांची मनःपूर्वक माफीपण मागायची आहे. खरंच आता मला माझीच लाज वाटते आहे. कळत नाही मी कशी क्षमा मागू ते.’ असे म्हणत देसाई काकू खूप ओशाळल्या.
मागील महिन्यात सोसायटीच्या सर्व सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ह्या चौघीना राहण्यास हरकत घेतली होती, कारण त्यांच्या मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता होती. मिस्टर देसाईच सेक्रेटरी असल्या मुळे त्यांनी ज्यास्त आग्रह धरला होता. तसे एक पत्र त्यांनी घरमालक मॉंथ्यूज ह्यांनापण लिहले होते, पण मिस्टर मॉंथ्यूज मारियाचा भाऊ असल्याने त्यांची डाळ काही शिजली नाही. आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांनी रेवतीला सिझरीयन करावे लागेल असे सांगितले होते, पण तुम्हीतर नॉर्मल डिलिव्हरी केली. किती आभार आणि कैतुक करू तुमचे.

“Oh ho… Come on mrs Desai… forget it.…. we don’t mind it. असे म्हणत मारियाने देसाई बाईंच्या खांद्यावर हात ठेवला. ह्यात तुमचे काही चुकले नाही. बाहेर परिस्थिती खूप खराब आहे त्यामुळे तुमच्या जागी आम्ही असतो तर कदाचित असेच वागलो असतो. So.. forget it… Now how is baby & Revati? मारिया बोलली.
Come on.. let’s go see cute baby & Revati म्हणत मारियाने विषय बदला व सर्वजणी देसाईकडे निघाल्या.

दिवसभरात काल रात्री देसाईंकडे घडलेल्या प्रकारची माहिती संपूर्ण सोसायटीमध्ये हा हा म्हणता पसरली, आणि सोसायटी मधील लोकांनाही त्यांनी ह्या चौघींवर राहण्यासाठी घेतलेल्या आक्षेपाची चूक लक्षात आली. त्याच दिवशी संध्याकाळी सोसायटी मेंबर्सची टेरेसवर सोशल डिस्टन्स पाळून मीटिंग बोलावण्यात आली व त्यात ह्या चौघींना सुद्धा आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी मिस्टर देसाईंनी सर्व सोसायटी तर्फे ह्या चौघींची झाल्या चुकी बद्दल माफी मागितली, आणि त्यांचा गौरव करण्यात आला.

सिस्टर मारिया ह्या प्रसंगी बोलतांना म्हणाली चुका सर्वांकडूनच होतात, पण झालेल्या चुका लक्षात आल्यानंतर त्या जो स्वीकारतो, दुरुस्त करतो हेच त्याचे प्रायश्चित असते, आणि संकट समयी जो धावून जातो तो खरा मानवधर्म असतो.आम्ही स्वीकारलेले काम हा जरी आमचा पोटापाण्याचा व्यवसाय असला तरी त्यात आम्ही स्वार्था बरोबर परमार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. ते काम आम्ही डेडिकेशने करतो. त्यामुळे देसाईंकडे जे आम्ही केले ते काही फार वेगळे केले नाही,फक्त ते वेगळ्या पध्दतीने केले, त्यात आम्ही आमची प्रसंगावधान राखले एव्हढेच …. असो ह्या पुढे सोसायटी मध्ये कधी आमची गरज लागली तर आम्हाला हक्काने बोलवा. बाहेरची परिस्थिती पहाता आम्ही आमच्या आणि पेशंटच्या सुरक्षिततेसाठी लागणारे सर्व साहित्याची व्यवस्था घरांत करून ठेवली आहे त्याचप्रमाणे सामान्यपणे जी औषधे व इंजेक्शनस् गरज भासते ती सर्व घरी उपलब्ध आहे त्यामुळे निःसंकोचपणे आम्हाला सेवेची संधी द्या.

मिस्टर माहेश्वरी जरा दबक्या स्वरात देसाईशी काही बोलत असल्याचे पाहून मारिया म्हणाली…. जरा आम्हालाही समजेल का तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा करता अहात ते?

तेव्हा देसाई म्हणाले… ” मी सांगण्या पेक्षा तुम्हीच सांगा माहेशवरी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे ती.”

“सिस्टर मारिया …. तुम्ही हे काम करतात तुम्हाला भीती नाही वाटत कोरोना लागण होण्याची?”

Good question मिस्टर माहेश्वरी… मला सांगा मुंबईत रोज रेल्वे, रोड ऍक्सिडंट मध्ये किती लोक आपला प्राण गमावतात? तरी रोज लोक प्रवास करतात ना?
लोकल मध्ये किती वेळेस बॉम्ब ब्लास्ट झालेत… तरी तुम्ही लोकलने आजही प्रवास करतात ना?
पावसाळ्यात किती वेळा पाणी तुंबून लोक दगावलीत? मुंबई थांबली का?
मिस्टर माहेश्वरी जीवन आणि मुंबई दोघे सारखेच आहे, ते कधीच कुणासाठी थांबत नाही.
त्यामुळे हे सामाजिक सत्कार्य करताना मला दुर्दैवाने मृत्यू आलाच तर ते मी हौतात्म्य म्हणून स्वीकारेल. कदाचित माझ्या भाग्यात हे ही लिहले असेल.”

“You are simply great sister Mariya”… माहेश्वरी म्हणाले.
तुम्ही तुमच्यापरीने समाजकार्य करत आहात पण आम्ही सर्व मंडळी लॉकडाऊन मुळे घरीच बसलो आहे. ह्यावेळेचा काही सदउपयोग समाज कार्यासाठी आम्हाला करता येईल का? आम्ही काय मदत करू शकतो तुम्हाला?”

नक्की मिस्टर माहेश्वरी……
सोसायटीच्या लोकांची इच्छा असेल तर समाज उपयोगी कार्य तुम्ही घरी बसून करू शकता. बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही.”

ह्यावर सर्वानी होकार भरला आम्ही नक्की करू सिस्टर तुम्ही फक्त काय आणि कसे करायचे ते सांगा.

ओके… ऐका तर मग… इथून जवळच एक अनाथ विद्यार्थी वस्तिगृह आहे. तिथला स्वयंपाकी परराज्यातील होता तो अचानक आपल्या कुटुंबीयांसह आपल्या राज्यात निघून गेला आहे. त्यामुळे तेथील मुलांचे जेवणाचे गेल्या चार दिवसा पासून खूप हाल होत आहे. मी आमच्या एन जी ओ ला सांगून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्या मुलांना जेवण पुरविण्याची व्यवस्था केली आहे, पण आपण जर ही जबाबदारी घेतली तर ऐन जी ओ ला त्यांच्या दुसऱ्या कामात लक्ष घालता येईल. मान्य असेल तर प्लॅन सांगते…. मारिया म्हणाली

“नक्की… नक्की .. सांगा तुम्ही काय प्लॅन आहे तो”…… सर्वजण बोलले..

प्लॅन असा आहे ….. त्या अनाथ वस्तिगृहात वीस मुले राहतात. आपल्या सोसायटी मध्ये पंचवीस कुटुंब रहातात. त्यातील बारा – बारा कुटुंबांच्या दोन टीम करू. प्रत्येक टीम एकदिवसा आड काम करेल म्हणजे कामाचा जास्त ताण न येता सर्वजण आनंदाने हे काम पारपाडू शकाल.
दरदिवशी सकाळी बारा कुटुंबाने प्रत्येकी फक्त पाच पोळ्या आपपल्या घरून करून आणायच्या. आपल्या सोसायटी मध्ये एक फ्लॅट रिकामा आहे त्याचा आपण किचन म्हणून वापर करू.काही दिवसासाठी आपण दोन, तीन मोठी पातेले, मोठी गॅस शेगडी भाड्याने आणू, तेथे स्वयंपाक करता येईल, व किराणा, धान्य ठेवण्याची व्यवस्था पण होईल. संध्याकाळी फक्त वरण भात, खिचडी किंवा व्हेज पुलाव करायचा. अन्न घेण्यासाठी त्यांची गाडी येईल व घेऊन जाईल, भांडी स्वच्छ घासून परत पाठवली जातील, त्यासाठी आपल्याला वेगळे काही करण्याची गरज नाही.

ह्यावर बोलण्यासाठी पाटील उभे राहिले … सिस्टर ह्यात मी थोडी दुरुस्ती सुचवतो … सकाळी बारा घरातून प्रत्येकी पाच पोळ्या येतील. त्या बारा घरातील बारा पुरुष मंडळी भाजी आणतील, निवडतील, चिरतील त्या मुळे बायकांना तेव्हढीच मदत होईल, आणि संध्याकाळची भात, खिचडी, पुलाव हे बारा पुरुष मंडळीच करतील म्हणजे स्रियांना संध्याकाळी आराम. सगळ्यांना प्लॅन आवडला….. ह्या लॉकडाउनच्या काळात आमच्या वेळेचा सदुपयोग होईल आणि सत्कार्य केल्याचे समाधानपण मिळेल.
ह्यासाठी आर्थिक मदतीची पण लगेच व्यवस्था झाली..प्रत्येक कुटुंबा कडून पाच पाच हजार घेण्याचे ठरले व ह्या मोहिमेचे “अन्नपूर्णा मोहीम” असे नामकरण करण्यात आले ह्याची सुरवात परवा पासून लगेच सुरु होईल असेही ठरले.

“मिस्टर माहेश्वरी… बाय द वे … तुमचे वडील कसे आहे आता? मागच्या महिन्यात त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता ना?”….. मारिया सिस्टर

“आता बरे आहेत सिस्टर पण ह्या लॉकडाऊन परिस्थिती मुळे फिजीओथेरफिस्ट घरी येत नसल्याने अडचण होत आहे.”….. माहेश्वरी म्हणाले

“अरे तो हम किस मर्ज की दवा है… मिस्टर माहेश्वरी?
Don’t worry… We will look after him.”

मिस्टर देसाई… आपण अजून एक काम करू शकतो…

“बोला सिस्टर.”….

“आपल्या सोसायटीच्या वॉचमनची रूम सध्या रिकामी आहे, तिला आपण स्वच्छ करून
तेथे फ्री मेडिकल फॅसिलिटी सेंटर करू शकतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी असे केले आहे. त्या रूमचा दरवाजा सोसायटीच्या बाहेर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचा सोसाटीला काही अपायपण होणार नाही. आमच्या हॉस्पिटलचे एक डॉक्टर रोज सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत येथे उपलब्ध असतील त्यांच्या जोडीला आमच्या चौघीं पैकी जी घरी असेल ती मदतीला येत जाईल. सोसायटीच्या बाहेर एक होर्डिंग लावा म्हणजे ह्या संपूर्ण परिसरातील लोक ह्या हेल्प सेंटरचा फायदा घेवू शकतील. त्यामुळे नेहमीच्या किरकोळ दुखापती, आजारापणाचे उपचार नियमित होत जातील.त्यांना लांब जावे लागणार नाही. डायबेटीस पेशंटला त्यांची ब्लड शुगर वारंवार चेक करावी लागते,त्यांचे सॅम्पल घेतले जाईल व हॉस्पिटल मध्ये चेक करून त्यांना व्हॉटस् अॅपवर त्यांचा रिपोर्ट पाठवला जाईल. बी पी पेशंटचे वरचेवर चेकअप, ECG येथे काढले जाईल. त्यामुळे ह्या कॉमन आजारांवर येथे मदत मिळू शकेल.”

ह्या दुसऱ्या प्रस्तावाला सुद्धा सोसायटी कडून लगेच संमती मिळाली.

एक छोटेसे केलेले कर्तव्य किती मोठी भूमिका पार पाडू शकते ह्याचा प्रत्यय मारियाला कायम येत होता. हे सर्व ती फक्त ज्या ऐन जी ओ मध्ये काम करत होती त्यामुळेच शक्य झाले असे मारियाला कायम वाटत असते. आपण करणारे कुणी नसतो, करणारी शक्ती ही अदृश्य असते, फक्त त्यासाठी ती तुम्हाला निवडते.

आज सकाळी सकाळीच जोसेफचा फोन आला…
“Good morning mumma… How r u?”

“fine Jo how is Aarina?”… मारिया

“Every thing is fine & Sonography report of Aarina is quite normal don’t worry… .. What about your resignation?

“जो… मी राजीनामा सादर केला आहे तीस मार्चला माला रिलिव्ह पण करणार होते पण मुंबईत परिस्थिती खूप खराब आहे आणि माझे पाच अप्रिलचे तिकीटपण काढलेले होते, आता सर्व फ्लाईटस् रद्दच झाल्या त्याला मी तरी काय करू? मी येणारच होते ना दुबईला कायम स्वरूपी?
परत परत तेच प्रश्न नको विचारात जावू. ओके… Will call later. I am on the way to hospital. Bye…. म्हणत मारियाने फोन ठेवला आणि तिच्या डोळ्या समोरून भूतकाळ सरसर पुढे सरकला….

मारिया थॉमस… कोचीला एका हॉस्पिटल मध्ये नर्स होती तर तिचा नवरा मर्चंट नेव्ही मध्ये सर्व्हिसला होता.. एकदा जहाजावर गेला की दोन चार महिने तो परतत नसे…. घरी फक्त मारिया आणि मुलगा जोसेफ ज्याला ती लाडाने “जो” म्हणायची… थॉमस एकदा यु एस ट्रिपवर असताना समुद्रात भयंकर वादळ आले आणि झालेल्या अपघातात थॉमस गेला तो परत आलाच नाही. जोसेफ तेव्हा दहा वर्षांच्या होता…

मारियाचा भाऊ मॉंथ्यूज मुंबईत होता त्याने मारियाला बऱ्याच वेळा मुंबईला शिफ्ट होण्याची विनंती केली पण मारियाने कोचीलाच राहणे पसंत केले. जोसेफ बारावी पर्यंत कोचीलाच शिकला त्याचे ड्रॉईंग खूप छान होते आणि त्याला आर्किटेक्ट होण्याची खूप इच्छा होती म्हणून मारिया व जोसेफ पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाले. मॉंथ्यूजचा वन बी एच के चा एक जुना फ्लॅट त्यांची वाट पहात होता.

मुंबईत आल्यावर जोसेफ आपल्या आर्किटेक्टचर कॉलेजमध्ये रमला तर मारियाला मुंबईत एका कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये मेटर्न नर्स म्हणून सहज नोकरी लागली. जोसेफ आर्किटेक्ट झाल्यानंतर त्याला एका नामांकित फर्म मध्ये चांगली नोकरी लागली तेथिलच एक सहाकरी आर्किटेक्ट आरिना ह्या मैत्रिणी बरोबर त्याचे प्रेमसबंध जुळले आणि त्यांचा विवाह देखील झाला. दोन वर्षापूर्वी त्यांच्या फर्मला दुबईत मोठे प्रोजेक्ट मिळाले आणि जोसेफ आणि आरिना दुबईला शिफ्ट झाले. तेव्हा पासून तो मारियाच्या मागे सारखा तगादा लावत होता, नोकरी सोडून ये आता दुबईला. आरिना आता प्रेग्रन्ट होती त्यामुळे मागणीने आणखीच जोर धरला होता. पण काही ना काही कारण सांगून ती टाळत होती.

जोसेफ व आरिना दुबईत गेल्यामुळे ती आता एकटीच होतो, तिला रिकाम्यावेळात घर खायला उठायचे त्यामुळे तिने तिच्या हॉस्पिटल मधील तीन मुलींना फ्लॅट मध्ये पेइंग गेस्ट म्हणून ठेवले होते त्यामुळे तिला भावाला फ्लॅटचे उत्पन्न मिळवून देता येऊ शकले व तिला ही सोबत मिळाली.

आता पन्नाशी पार करत असलेल्या मारियाला थोडे थकायला होताय. तिची दुबईला जाण्याची खरं तर मुळीच इच्छा नाही, ती आता रमली होती मुंबईत त्याच बरोबर एका ऐन जी ओ बरोबर जोडल्या गेल्या मुळे तिच्या सामाजिक कार्यात कोची सुटल्या नंतर देखील कुठेही खंड पडला नव्हता, पण जोच्या आग्रहा पुढे ती आता हारली होती. त्यात अचानक जागतिक लॉकडाऊनचे संकट ओढवल्याने तिचे पाच एप्रिला दुबईला जाणे रद्द करावे लागले आणि ती हॉस्पिटलशी पूर्ववत जोडली गेल्या मुळे ती मनोमन सुखावली होती. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत तिने ऐन जी ओ च्या कामात ज्यास्त लक्ष घातले होते व तिने हॉस्पिटलच्या परवांगीने आठवड्यातील तीन दिवस ती पूर्ण वेळ धारावी येथील झोपडपट्टीत ऐन जी ओ चे काम करत होती. त्यामुळे एक सामाजिक ऋण निर्देशाची उतराई होण्याची संधी ती गेल्या दोन महिन्या पासून आनंदाने उपभोगत होती, आणि ह्याच तिच्या कामामुळे जोसेफ खूप चिंताग्रस्त होता, की आईला कोरोनाची लागण झाली तर? … म्हणून दिवसातून एकदातरी तो तिला दुबईला येण्यासाठी आग्रह करत होता पण फ्लाईट बंद असल्याने त्याची खूप मोठी कोंडी झाली होती.

मराठीत एक म्हण आहे, “मन चिंती ते वैरी ना चिंती” आणि ते अगदी खरे झाले. जोसेफची चिंता खरी ठरली. हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर येताना व घरी जाताना रोज पूर्ण चेकअप केले जात होते.एकदिवस मारियाच्या चेकअप मध्ये शंका आली आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्येच कॉरंटाइन करण्यात आले. तिच्या मदतीला तिचा सर्व स्टॅफ होताच त्याच बरोबर मारिया सिस्टरचा भाऊ मॉंथ्यूज, आणि आता तिच्या सोसायटीत सर्व मेंबरपण तिच्या बरोबर होती. ही सर्व मंडळी तिची लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्या शिवाय ज्यास्त काही करू शकत नव्हते. ना ते हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची सेवा करू शकत होते ना तिला सोबत करू शकत होते. ही लढाई मारियाला एकटीलाच लढायची होती.

तिकडे जोसेफ पण अडकून पडला होता व त्याला आरिनाला ह्या अवस्थेत ऐकटीलापण सोडता येत नव्हते. तो इंटर नॅशनल फ्लाईटस् सुरु होण्याची प्रार्थना करत होता.

इकडे मारियाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. तिला I C U मध्ये दाखल केले होते. तरीही औषधांचा काही उपयोग होत नव्हता म्हणून तिला शेवटी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिला मरणाची भीती वाटत नव्हती, तिला फक्त जाण्याआधी एकदा तिच्या “जो” ला डोळेभरून पाहायचे होते. ह्या साठी ती सारखी डॉक्टरांकडे विचारणा करत होती.

“डॉक्टर कसेही करून जोसेफला बोलवा.. तो पर्यंत मी व्हेंटिलेटरवर तग धरते.. तो आला की मी ह्या जगाचा निरोप आनंदाने घेईल.”

सर्वांचे प्रयत्न जोसेफला आण्यासाठी सुरूच होते. तेव्हढयात एक आनंदाची बातमी टी व्हीवर झळकली…. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत येण्यासाठी “वंदे भारत” अभियान सुरु होते आहे. सर्वांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. ही बातमी सर्वप्रथम मारियाला सांगण्यात आली. तिच्या जगण्याला बळ मिळाले.आता डॉक्टरांची खरी परीक्षा आहे. जोसेफ येईपर्यंत मारियाला त्यांना मृत्यू पासून दूर ठेवायचे होते.

जोसेफने लगेच त्याचे व आरिनाचे पेपर सबमिट केले, त्याला मारियाच्या आजारपणाचे रिपोर्ट जोडले व “Most Urgent” ह्या अंतर्गत दाखल केले. त्याची पूर्तता होऊन त्याला पहिल्या फ्लाईटचे तिकीट मिळाले.

17 मेला जोसेफचे फ्लाईट मुंबईत दाखल होणार होते. त्या घडीची मारियासह सर्वजण आतुरतेने वाटपहात होते. जोसेफची जीवाची घालमेल चेहऱ्यावर दिसत होती. त्याला पीकअप करण्यासाठी त्याचा मामा मॉंथुज एअरपोर्टवर गेला होता.

रात्री अकरा वाजता फ्लाईट लॅण्ड होऊन स्क्रिनिंग करून जोसेफ व आरीना पळतच गाडीत बसले…. कुणी एकमेकांशी बोलत नव्हते… गाडी सुसाट हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती. अर्ध्यातासात गाडी हॉस्पिटलमध्ये पोहचली. तसे चालू गाडीचे दार उघडून जोसेफ I C U कडे धावत सुटला.. ..
मारिया डोळ्यात प्राण आणून “जो” ची वाट पाहात होती.

काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्दैव एव्हढे की ते इच्छा असूनही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू शकत नव्हते.
फक्त समाधान एव्हढेच की जाता जाता मायलेकरांची किमान नजरभेट तरी झाली. रात्रभर ती एकमेकांकडे फक्त बघत होती.
गेले आठदिवस रोखून ठेवलेला अखेरचा श्वास, शेवटी मारियाने सकाळी सोडला.

येणे जाणे इथले निरंतर, एका श्वासाचे तर अंतर. नश्वरात ही शोधू रे ईश्वर, ह्या जगण्याचे करूया अत्तर.

नंदकिशोर ठोंबरे, नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: