एक फुल, चार हाप

पुण्याच्या एस.टी. बसस्थानकावरून शिरूरकडे बस धावू लागली.बस माणसांनी खचाखच भरली होती.शहरातून काही खरेदी करून माणसे गावाकडे चालली असल्यानं एस.टी.बसमध्ये अधूनमधून काही बोचकी,पिशव्या,काही खोकी मांडून माणसं विसावली होती.उभे राहून प्रवास करणारे मात्र राजेशाही थाटात आसनस्थ झालेल्या व्यक्तिकडे बघून उगाचच नाक – डोळे मोडीत होते.
अशा उभ्या राहिलेल्या प्रवाशांमध्ये सुमारे सत्तर – पंच्चाहत्तरच्या वयाचा टप्पा पार केलेली एक म्हातारी होती.चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी चेहरा करारी व निर्भय वाटत होता. कपाळावर ठसठशीत कुंकू.हातात चांदीचे गोठ आणि बोलण्याच्या तालावर हेलकावणारा नाकात नथीचा भला मोठा आकडा.म्हातारी सोबत तीन ते दहा वयोगटातील चार नातवंडं.
गाडीत बसताच म्हातारी जागा कोठे मिळेल म्हणून शोधक नजरेने बघू लागली. दोन बाकड्याच्यामध्ये जाण्या-येण्याच्या मोकळ्या जागेत कोणी मोठ्या पिशव्या तर कोणी बोचकी मांडलेली होती. कावऱ्या-बावऱ्या नजरेने म्हातारी नातवाला हाताला धरून मागून पुढे तर पुढून मागे फिरत होती.हातात धरलेला नातू गर्दीमुळे रडकुंडीला आला होता.पाहता – पाहता म्हातारी एका सीटजवळ थबकली.
“ये बाबा,जरा सरकून बस.बसू दे लेकराला !”
आपल्या नातवाला हाताने ओढून सांगितलं,
“बाळा,बस हितं !आरं,भिऊ नको ! आपला संत्यामामा हाये.बस बस!”
पण त्या अनोळखी माणसांना बघून पोरानं भोकाड पसारलं.तसं म्हातारीनं दुसऱ्या नातवाला हाक मारली,
“बबन्या,ये बबन्या ! हे बघ मामा बोलावतोय.ये ये !”
बबन्या येताच तिनं त्या व्यक्तीचा होकार येण्याच्या आतच बबन्याला त्या तिघांच्या बाकड्यात कोंबला.मग तिनं तिसऱ्या नातवाला हाक मारून बोलावला.एका बाकड्यावर तीन महिला बसलेल्या होत्या.ती नातवाला म्हणाली,
“सुदाम्या,ये इकडं !आत्या बोलावती बघ.”
सुदाम्याला त्या तिघींच्या मध्ये बसविण्यासाठी ढकलाया सुरुवात केली.त्या महिलांची नाराजी दिसताच म्हातारी त्यांच्यावर डाफरली,
“अगं,पोटी लेकूरबाळ असलंच ना?बायामाणूस असून बी कळंना व्हय.म्हातारीचं बोलणं ऐकून त्यातल्या दोघीजणी अजून लग्नच न झाल्यामुळे पुऱ्या इरामल्या.तेवढ्यात म्हातारीनं त्याला उचलून त्या तिघींच्या बाकड्यात कोंबलाच.याच पद्धतीने तिसऱ्या नातवाला बसवून सगळ्यात छोट्या नातवाला म्हातारीनं मांडीवर घेऊन मध्येच बैठक मारली.कंडक्टर तिकीट देत येत होता,म्हातारीजवळ येताच बोलला,
“आजीबाई,तिकीट?”
आजीबाईंनी कमरेच्या पिशवीतली अनेक घड्या घालून ठेवलेली शंभराची नोट उलगडली.घड्या मोडायासाठी तिच्यावरून दोन – तीनदा हात फिरवला व शंभराचीच आहे याची पुन्हा खात्री करून कंडक्टरला दिली.अन् बोलली,
“द्या ! एक फुल चार हाप !”
तिकीट व उरलेले पैसे देताच कंडक्टर बोलला,
“आजीबाई,रस्त्यात काय बसलाय!लोकांनी जायचं कसं?”
कंडक्टरचं बोलणं आजीबाईला झोबलं.
“आरं,मी तुझ्या आईवानी हाये.माझी तुला दाटी झाली अन् मधीच ही बाचकी – बोचकी मांडल्यात ते काय सोयरं हायेत काय तुझं?”
कंडक्टर समंजस वाटला,कारण आजीबाईच्या बोलण्यावर तो हसत – हसत पुढं गेला.एस्.टी. चंदननगरचा बायपास ओलांडून पुढं गेली तेंव्हा कंडक्टरचं बुकींग उरकलं.तो खपलेल्या तिकीटाचा व गाडीतल्या प्रवाशांचा मेळ घालीत होता.बहुतेक हा मेळ बसला नसावा,कारण तो उभं गाडीतले प्रवासी मोजून विनातिकीट कोण राहायलय का असा आवाज देत होता.कोणाचाच प्रतिसाद येत मिळत नाही म्हटल्यावर पुन्हा खाली बसून आकडेमोड करू लागला.पण हिशोब काही जुळेना.आता मात्र कंडक्टरनेच तिकीट तपासायला सुरूवात केली.प्रत्येकाची वैयक्तिक विचारपूस करून तिकीट घेतल्याची खात्री करून घेतली.तरीही मेळ जमत नव्हता.हा सगळा प्रकार पाहून गाडीतल्या चार – सहा जणांना वैतागच आला.त्यांनीच कंडक्टरला सुनावले,
“तुमचंच गणित तपासा ! एखादा हातचा घ्यायचा राहिला असल.”
इतर प्रवाशांनीही त्यांना साथ दिली.अन् कंडक्टर एकटा व जागरुक प्रवासी गट असा वाद – विवाद रंगला.तेवढ्यात एक सद्गृहस्थ उभे राहून बोलले,
“अहो,आमचा प्रवास तरी शांततेत होऊ द्याना.पैसे देऊन गाडीत बसलोय आम्ही!एक प्रवासी जर विनातिकीट गेलाच तर महामंडळ काही डबघाईला यायचं नाही.अन् एरवी प्रवासी रस्त्याला हात दाखवतात.तेव्हा हे मोकळीच गाडी पळवतात.पण उभं रहायचं ज्यांना जमत नाही.त्यांनी एवढी काळजी करू नाय.”
त्यांचे हे वक्तव्य ऐकून गाडीत एकच हश्शा पिकला.अशी जुगलबंदी सुरू होती.पण ड्रायव्हर मात्र यापासून नामानिराळा होता.त्याची गाडी नेहमीप्रमाणे सुरू होती.एकामागून एक गावे मागे जात होती.असा कलकलाट सुरू असतानाच अचानक ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.
‘हॉटेल बगीचा’बघताच आपण कोरेगावच्या पुढे आलोय हे प्रवाशांनी ओळखले.पण गाडी का उभी राहिली याचं उत्तर शोधेपर्यंत एस.टी.च्या चार चेकरची तुकडी गाडीत दाखल झाली.अन् पुन्हा तिकीट तपासणीला सुरुवात झाली.प्रत्येकाने आपले तिकीट हातात ठेवले.चेकरने मागताना देऊन पुन्हा पंचिग करून घेतले.अशी तपासणी होत असताना आजीबाईंचा नंबर आला.सही सलामत तपासणी होऊन चेकर पुढे गेले शेवटच्या बाकावर एक आजोबा डोळ्याला काळा चष्मा लावून शांत बसले होते.तिकीट विचारताच त्यांनी सांगितले,
“मंडळींनी घेतलं असेल.”
कंडक्टर सहीत चेकरला सुद्धा विनातिकीट प्रवासी पकडल्याचा आनंद झाला.गाडीतली गर्दी म्हाताऱ्याकडं गुन्हेगाराच्या दृष्टीनं बघू लागली.गाडीत कुजबुज सुरू झाली.चेकरने आवाज काढला.
“अहो,उपस्थित मंडळी ! याचं तिकीट कोणी घेतलंय का?”
गाडीत पुन्हा हश्शा पिकला.
“आजोबा,तिकिटाचे पैसे आन् दंड भरा!”
दोघां – चौघांनी गराडा घातल्यामुळं आजोबा गांगारले.त्यांनी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला.
“माझं बिहाड तेवढं दाखवा ! मग तिकीट घेतो.”
त्यावर चेकर बोलले,
“पहिला दंड भरा.तिकीट घ्या.मग बिन्हाडाकडं जाण्यासाठी सोडू!” चाललेला प्रकार गर्दीमुळे दिसला नाही;पण आवाजावरून आजीबाईने ओळखला व मोठ्यानं आवाज दिला,
“म्हाताऱ्याचं तिकीट मी घेतलंय!”
सगळे प्रवासी आता म्हातारीकडं बघू लागले.चेकरने म्हातारीच्या तिकिटाची फेर तपासणी सुरू केली.
“एक फुल तिकीट आहे ते कुणाचं?”
“माझंच!”
“मग म्हाताऱ्याचं तिकीट कुठाय?”
“चार हाप हायेत ना ! त्याच्यातच!”
“म्हाताऱ्याचं हाप तिकीट घेतलंय?”
“हां त्यांचा पास आहे.त्यांना अर्धेच तिकीट पडतं.तशी सवलत हाये ना.”
“मग तुमचं का नाही अर्ध काढलं?”
“म्हाताऱ्याचा पास काढाया गेलो तेव्हाच मागितलं,पण नाय ना मेल्यांनी दिलं.म्हणाला अजून दोन वर्षे टाईम हाय म्हणून!”
“एक हाप म्हाताऱ्याचं ! उरलेली तीन हाप कुणाची?पोरं दाखवा बरं!”
म्हातारीनं जागा मिळेल तिथं पोरांना बसवलं होतं.तेव्हा दमदार आवाजात तिनं नातवांना साद घातली,
“बबन्या,वर हात कर!सुदाम्या तू बी वर हात करून दाखव!आन् तिसरा मार्ग बसलाय बघा,शंकऱ्या उभा राहून दाखव बर !”
म्हातारीच्या हुकूमा प्रमाणे पोरांनी असेल तिथून वर हात करून किंवा उभं राहून आपापली हजेरी दिली.
“आता जो मांडीवर बसलाय त्याचं तिकीट?”
म्हातारी मात्र आता चवताळली,
“आरं,माझ्या कर्मा!याचं व्हय.आहो, गेल्या पाडव्याला तर त्यो तीन वर्षांचा झालाय.त्याचं कुठं तिकीट असतं व्हय?पार सूसबाणेरपर्यंत लेकाकडं हमेशा घेऊन जाते.पण कधीच लारीवाला,जीपड्यावाला,डुगडुगीवाल,टेम्पोवाला मस तालेवार एक – एक भेटला;पण कव्हाच बिचाऱ्यांनी बारीक पोराचं पैसं मागितलं नाय आन् बारक्या पोराचं पैसं काय मागताय? माझ्या म्हाताऱ्यानी जणू लबाडीच केली असं समजून काय – काय बोलता रं ! आरं बाबा,फसवायचा धंदा सुटाबुटावाल्यांचा!आमचा नाय बरं का !का आम्ही आडाणी दिसतो म्हणून काही बी बोलायचं व्हयं?”
म्हातारीचा चेहरा रागानं लाल झालं.एस.टी. मधील सगळीच शांतपणे ऐकत व्हती.म्हातारी पुढं बोलली,
“कुठं बी जा,पळसाला पानं तीनच.दहा – पाच रुपये चाटायासाठीच सगळ्या बतावण्या!”

चेकर हसत – हसत खाली उत्तरले अन् कंडक्टरनी बेल दिली.

सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: