स्वामीनिष्ठा

एक छोटेसे खेडेगाव असते.” रुकडी’ त्याचे नाव “कोल्हापूर'” जिल्हा. खेडेगाव म्हणजे अगदी खेडेगाव. तिथे हातावर मोजण्या इतपत ब्राह्मणांची घरे होते. बाकी सर्व बाराबलुतेदार. सर्वजण सुखाने नांदत होती. अजून तरी सर्वांच्यात एकी होती. लांड्यालबाड्या नव्हत्या. म्हणूनच सर्वजण वेगवेगळे असूनही एकत्र सुखाने नांदत होते.इथे एक बापूराव रुकडीकर म्हणून सावकार राहत होते. ते सावकारकी  करायचे म्हणून सावकार नाव पडले. त्यांचे या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत ऐसपैस घर होते. आठ एकर जमीन होती. त्यात धनधान्य छान होते. त्यांची मोठी गिरणी होती. गिरणी म्हणजे पिठाची गिरणी. यात सर्व धान्य दळून मिळायची. शिवाय तांदळाची गिरणी वेगळी, हरभरा डाळीची वेगळी, हळद, शिकेकाई यांची ही वेगळी, शिवाय तेलाची पण होती, पोह्याची होती. तिखटाचा डंक होता. एवढे असूनही बापू रावांना गर्व, अहंकार, अहंभाव नव्हता, शिष्टता नव्हती. पण प्रेम म्हणजे आपुलकी ओतप्रोत भरली होती. आपुलकी बरोबर माणुसकी जास्त होती.

त्यांना तीन भाऊ होते. त्यातील एक फौजदार होते आणि बाकी दोन भाऊ पुण्यात चांगल्या नोकरीला होते. बापू रावांना गावातील लोक कोणी बापू, बापूराव, बापू आजोबा, बापूसाहेब, बापूकाका अशा नावाने हाका आता मारीत. इतकी नावे का तर ते गावकऱ्यांमध्ये सामावून जायचे. आपण एक सावकार म्हणून वेगळी वागणूकच नव्हती. त्यांच्या माणुसकीचे एक उदाहरण सांगते.रुकडी गावातच एक” शिवा शेलार “राहत होता. हा शिवा तांबट होता, म्हणजे तांब्या पितळेच्या भांड्यांना टाकी मारणे, त्याचा उद्योग होता त्याची कमाई किती असणार ? ही गोष्ट साधारण 1900/ 1920 यादरम्यान ची. त्याच्या मुलीचे लग्न ठरते. शिवा आला बाबूरावांकडे व म्हणाला,” बापूराव लेकीचे लगीन काढलया, जरा वाईच पैका, पाण्याची सोय कराल काय ?”बापू म्हणाले,” अरे शिवा, किती हवेत? तुझं बजेट काय हाय?”शिवा म्हणाला,” बापूराव ,काही नाही, एक पाच हजार दिले तरी बास.”बापू म्हणाले,” हे बघ लेकीचे लगीन हाय, कमी-जास्त इकडे तिकडं होतया, तू आपलं 7000 घेऊन जा, लगीन वगैरे सर्व व्यवस्थित पार पडू दे. काय लागेल तो खर्च कर. राहिलेले पैसे परत आण. मग आपण तुझा कागद करू. तु पैसे परत कसे देणार ते बघू.”असे हे बापूराव सावकार. मग काय म्हणजे दोघांचाही एकमेकांवर विश्वास जबरदस्त म्हणूनच हे घडू शकते. असेच गावातील सर्व लोकांबद्दल व्हायचे. म्हणून बापूराव सर्वांना आपलेसे वाटायचे. त्यामुळे माणसेसुद्धा ठरलेल्या वेळेत पैसे परत करायची. बापूरावांनी कोणाच्याही माना मुरगळून पैसे वसूल केले नाहीत त्यामुळे गावात त्यांना मोठा मान होता.घराण्याचे संस्कारही एवढे चांगले होते की गावातील लोक कोणत्याही कामाला चाललेले असु दे, म्हणजे शुभ कामाला म्हणा, नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी, शेतात नवीन बियाणे पेरायचे, गाय, म्हैस, बैल विकत घ्यायचं तर पहिले बापूरावांच्या उंबरठ्यावर डोके ठेवणार. नमस्कार करणार. मग कामासाठी पुढे जाणार ही अंधश्रद्धा नाही, ही तर बापूरावांवरील श्रद्धा होती. फक्त त्यांच्यावरच नाही तर घरातील सर्वांच्यावर संपूर्ण गावाचा प्रचंड विश्वास.बापूराव यांना चार मुले. त्या काळात बापूरावांकडे बंदुकीचा परवाना होता. शेतासाठी बंदूक लागायची. नाहीतर रात्रीच्या वेळेत रानडुक्कर येऊन शेत् पार उद्ध्वस्त करून जायचे.

बापूराव यांचा मोठा मुलगा “शिरीष” इंजिनिअर झाला. नोकरीसाठी ठिक ठिकाणी अर्ज केले. मुंबईतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. हे सांगण्यासाठी शिरीष वडिलांकडे रूकडीला आला. वडिलांना नमस्कार करून नोकरी संदर्भात सर्व व्यवस्थित सांगितले. वडिलांनीही शांतपणे सर्व ऐकून घेतले. पगार किती? राहण्याची जेवणाची व्यवस्था काय? सगळ्यांची उत्तरे व्यवस्थित दिली. शेवट बापूराव म्हणाले, हा जो रूकडी मध्ये आम्ही घाट घातला आहे तो कोणी पाहायचा? आम्ही काय आज आहे उद्या नाही. आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही समजून घेतलेत तर आपल्यापेक्षा गावाला फायदा जास्त होणार आहे”. हे ऐकल्याबरोबर शिरीषने मुंबईच्या नोकरीवर पाणी सोडले व रूकडी मध्येच राहिला. पण शिकलेले वाया जात नाही हेच खरे.शिरीषने शेतीमध्ये खूप बदल केला. राहते घर सर्व सोयींनी सुसज्ज करून घेतले. गिरणीमध्ये ही लक्ष घातले. गिरणी सकाळी सात वाजता जी सुरू व्हायची ती संपायला किती वाजायचे सांगता येत नाही. डोके लढवून गिरणीवर डायनोमा बसविला व त्यावर वीजनिर्मिती करून संपूर्ण घरात बल्ब बसवले. जोपर्यंत गिरणी सुरू आहे  तोपर्यंत रुकडीकर यांच्या घरात लाईट सुरु. मग काय घरातील बायका खुश. मिक्सर नव्हते पर्यंत दिव्याच्या उजेडात चूल शेगडी दगडी खलबत्ता पाटा-वरवंटा यावर भराभर कामे उरकत. रात्रीची जेवणे ही बल्बच्या उजेडात करायची घाई दांडगी म्हणजे काय केलेले सर्व प्रकार व्यवस्थित दिसायचे ना !नाहीतर गिरणी बंद झाली की आहेतच कंदील! या लाईट मुळे बापूराव आणखीन श्रीमंत झाले.

बापू रावांचा शांताराम नावाचा भाऊ फौजदार होता. त्याची नोकरीच अशी होती की वरकमाई भरपूर. मूळचे रुकडी करांचे संस्कार असल्यामुळे शांताराम चे वागणे म्हणजे आपण लाच मागायची नाही, कोणी स्वखुशीने दिली तर नाही म्हणायचे नाही. शांताराम लग्न केले नव्हते त्यामुळे येईल तो पैसा शेतीच्या कामासाठी द्यायचा, राहिलेल्या पैशाचे सोने घ्यायचा. हे सर्व सोने त्याने एका पितळी डब्यात ठेवले होते. तेव्हा काही बँका नव्हत्या व लॉकर्स नव्हते. असेल ते सर्व घरात शेतात दडवून ठेवण्याची पद्धत होती.

बाबुरावांच्या घरात एक “तानी” नावाची मुलगी होती. मोलकरीण कसली घरातील सदस्य होती, कारण तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी रुकडीकरांकडे कामाला लागली. लहान असल्यामुळे घरातील शेतातील सर्व कामे चुटूचुटू करायची. तोंडाने बडबड हाताने काम व पायाने पुटूपुटू पळणे. अखंड आनंदी व हासरी होती. घरातील सर्वांची मने जिंकून घेतली होती. सर्वांच्या तोंडात ताने हे कर, ताने ते कर, असे असायचे. हळूहळू तानी मोठी झाली. रुकडी करांनी तिला राहायला वेगळ्या 2 खोल्या बांधल्या. तिचे लग्न करून दिले. तिचा नवरा “आत्माराम”, तोही रुकडीकर यांच्या शेतात काम करायचा. तानीचा संसार सुरळीत चालला होता. तिला दोन मुले झाली. सर्व काही आलबेल. कपडालत्ता खाणे पिणे व पगार.इकडे सर्वांची वय वाढली. बापू रावांना सुना, जावई, नातवंडे, आली. दोन भाऊ पुण्यात नोकरीला असल्यामुळे नातवंडे शिक्षणासाठी पुण्यात राहू लागली. नातवंडे ही मोठी होऊ लागली. तिकडे शांताराम फौजदार यांनी काय केले, आपल्याजवळील सोन्याच्या डबा तानीकडे ठेवण्यास दिला, व तिला सांगितले,” हा डबा व्यवस्थित सांभाळ जेव्हा केव्हा बापूराव किंवा त्यांच्या माघारी घरच्यांना गरज पडेल तेव्हा हा डबा त्यांना दे कारण माझी तब्येत अशी मी तेव्हा असेन नसेन, माझे आता वय झाले आहे, मला हळूहळू आठवत नाही असे होत आहे, थोडक्यात मला अल्झायमर होऊ लागला आहे. तानी ने ते सर्व ऐकून घेतले व घरी गेली.घरात गेल्यावर तानी विचार करू लागली की आपल्याही घरात नवरा मुले आहेत. कोणाची बुद्धी फिरली तर काय करायचे ?आपण हा डबा कसा सांभाळायचा! कारण पैसाच शेवट भांडणासाठी कारणीभूत होतो. नकोच ते, असे म्हणून तिने काय केले बापूरावांच्या बैठकीच्या खोलीत मोठी दत्ताची तसबीर आहे,भिंतीला लाकडी पट्ट्यांवर, म्हणजे एक पट्टी खाली आडवी, एक उभी व एक तिरकी, ९० अंशाच्या कोनामध्ये, अशांवर दत्ताची तसबीर विराजमान होती. लाकडी पट्ट्या एवढ्या मोठ्या होत्या की छोटे मुल आरामात मागे लपून बसेल. अशा या तिरप्या कोनामध्ये तानी ने सोने असलेला पितळी डबा ठेवून दिला. हळूहळू शांताराम फौजदारांचे आजारपण वाढत गेले. पण म्हणतात ना, सगळे आयुष्य चांगले गेले तरी कुठेतरी गालबोट लागते,तसेच झाले, एक हणमा नावाची व्यक्ती शांतारामा च्या वाईटावर उठली. शांतारामने पूर्वी काय काय केले त्यावर आक्षेप घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलिस कंप्लेंट केली. आता तर फौजदारांना अल्झायमर झाल्यामुळे काहीच आठवत नव्हते.  काहींना वाईटसवय असते जुनी मढी उकरून काढायची. त्यांना अर्थ ना परमार्थ, पण खाजवुन खरुज काढायची ची सवय. शांताराम फौजदाराने म्हणे त्या माणसाकडून लांडीलबाडी करून पैसा उकळला होता. आधीच हे फौजदार हे पद त्यामुळे कोणीही त्यावर विश्वास ठेवेल. पण गावात काही चांगले लोक होतेच की. त्यांनी पोलिसांना सांगितले की,” तुम्ही या हणम्याचे काहीही ऐकू नका, अहो फौजदार दादा किती चांगले आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी आपल्या पदाचा कधीही दुरुपयोग केला नाही. उलट सर्वांना मदतच करायचे. रात्री-अपरात्री मदतीसाठी धावून जायचे .अशा माणसावर तुम्ही कसल्ये आरोप करताय, आणि तेही या दारुड्या हणम्याचे ऐकून!” पण पोलिसांना त्यांचे काम करणे भागच आहे ना .त्यांनी चौकशीसाठी शांताराम चे घर गाठले. शांताराम ला घरात दादा म्हणायचे.दादांना पोलिसांनी  काहीही विचारले ,की ते फक्त ‘मला काही माहीत नाही’ हे एवढे एकच वाक्य म्हणायचे.पोलीस म्हणाले,” तुम्ही काय केले पैशाचे”? हणमा म्हणाला,” विचारा, विचारा, चांगले हाडसून  खडसून विचारा.”दादा म्हणाले,” मला काही माहीत नाही.”पोलीस म्हणाले ,”कोणाला पैसे दिलेत का तुम्ही दादा?”दादा म्हणाले,” मला काहीच माहिती नाही.”पोलीस म्हणाले ,”त्या पैशाचे सोने घेतलेत का दादा तुम्ही!”दादा म्हणाले,” हो.”पोलिस म्हणाले,” कुठे ठेवले आहे ते सोने.”दादा म्हणाले ,”मला माहित नाही.”दादांचे उत्तर एकच मला माहित नाही. सोने घेतले का याला फक्त ते कसे काय हो म्हणाले याचा उलगडा झालेला नाही. झाले पोलीसांनी तेवढ्या आधारावर रूकडी करांच्या घराची झडती घ्यायला सुरुवात केली. परंतु पोलिसांना काहीही सापडले नाही. तेवढ्यात कोणीतरी चुगली केली की बहुतेक मोलकरीण तानीच्या घरी ठेवले असेल, कारण तिच्यावर घरच्या सगळ्यांचा विश्वास.मग काय, तिच्या घराची झडती सुरू झाली. पण तिकडेही काहीही सापडले नाही. मग पोलिस फौज निघून गेली. सर्व शांत झाले. बापूराव अस्वस्थ होते. त्यांनी तानी ला बोलावून घेतले, तानी ला म्हणाले ,”काय ग ताने आता पोलीस निघून गेले आहेत, पण मला म्हणून तू सांग की खरंच शांताराम ने तुझ्याकडे सोने दिले होते का ठेवायला? आता त्याला तर काहीच आठवत नाही. पण तू खरे काय ते सांग मला.तानीम्हणाली,” बापू ,मी तुम्हाला खरं काय ते सांगते, पण मी जे काही केले ते सर्व तुमच्या नाही नाही आपल्या घरात घरच्या चांगल्यासाठी केले, कारण मी लहान असल्यापासून येथे आहे, माझे सर्व काही तुम्ही केलेत, माझा एवढा संसार झाला ,नाहीतर कोण कोणासाठी करते आहे, तुम्ही मला तुमच्या घासातला घास दिला, मग एवढ्या सोन्यासाठी मी कृतघ्न कशी होईन?आता सांगते  दादांनी एका डब्यात सर्व सोने घातले व तो डबा माझ्याकडे दिला व सांगितले ही सर्व माझी स्वकष्टार्जित कमाई आहे माझं लग्न झाले नाही मला संसार नाही हे सर्व मी बापूंना दिले तर त्यांना वाटेल मी फौजदार ,मी हाणामाऱ्या करून गैरमार्गाने हे सोने जमा केले आहे. मी कितीही सांगितले तरी माझे पद हे असे आहे  की कोणाचा विश्वास बसणार नाही. तर तू हा डबा तुझ्याकडे ठेव व योग्य वेळी बापूंना दे. मी विचार केला मी माझ्या घरात जर हे सोने ठेवले तर माझा नवरा, मुले त्याची कधी विल्हेवाट लावतील कळायचे सुद्धा नाही त्यापेक्षा तुमचे सोने तुमच्या घरात ठेवले.”बापूराव म्हणाले,” अगं पण कुठे ठेवलेस? पोलिसांनी एवढी घराची झडती घेतली तरी कुठे सापडला नाही डबा!”तानीम्हणाली,” हे बघा, हा बैठकीतील दत्तांचा फोटो, तुम्ही सर्वजण दत्तभक्त आहातच हे मला माहित आहे म्हणून मी दत्तांच्या फोटोच्या मागे हा डबा ठेवला आहे.” असे म्हणून डबा काढून दिला. बापूरावांकडे सर्व सोने व्यवस्थित रित्या आलेले बघून दादा सुद्धा गहिवरला त्याच्या डोळ्यात चमक आली कारण त्यांच्या मनासारखे झाले. जेथील वस्तू तिथे रुजू झाली म्हणजे बरे असते ना!
बापू रावांनी दादांना घट्ट मिठी मारली दोघांनाही अश्रू आवरेना हे बघून तानीला कृतकृत्य वाटले.

सुतेजा सुभाष दांडेकर
 मंगळवार पेठ, सातारा.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया