खिडकी

दर महिन्याच्या बावीस तारखेला मासिक उपक्रमाअंतर्गत शब्दवेल साहित्य समुहात मी बिल्लोरीकिरण या शीर्षकाअंतर्गत मी कथा लिहायला सुरूवात केली . माझे स्नेही श्री. प्रवीणजी बोपुलकर शब्दवेल समूह प्रमुख यांना मी माझा मनोदय सांगितला तसे त्यांनी लगेच ” ताई , लिहा ना समूहासाठी , दैनिक , साप्ताहिक , मासिक तुम्हांला जसे जमेल तसे कथा , कविता , ललित , म्हणी , वाक् प्रचार जे आवडेल ते लिहा . आपण लिहिणार्‍या सदराला छानसं शीर्षक द्या व एक पासपोर्ट साइज फोटो पाठवा . मी शब्दवेलचा लोगो तयार करून देतो .” आणि अशाप्रकारे बिल्लोरी किरणचा जन्म झाला . माझी गाडी धावू लागली .

या महिन्याची बावीस तारीख परवा वर येऊन ठेपली तरी माझे लेखन झालेच नाही . मनात असंख्य विचार कल्पना होत्या . पण प्रत्यक्ष कागदावर मात्र उतरत नव्हत्या . घरातली सगळी कामं स्वयंपाक ,झाडलोट , कपडी , भांडी विसळणं यातच दुपार केव्हा झाली कळायचंही नाही . कोरोना संकटामुळे सगळ्याच मोलकरणी बंद झालेल्या . दुपारी थोडा निवांत वेळ मिळाला तरी थकव्यामुळे मोबाईल घेऊन टाईप करायला शक्तिच राहात नव्हती .

आता करायचं काय ? थांबून तर चालणार नव्हतं . दिलेला शब्द पाळायलाच हवा .यासाठी काय करावं . इच्छाशक्ती , मनोबल वाढवावं लागेल.तरच साहित्य शारदेची उपासना फलद्रूप होईल . थोडा त्रास हा होणारच पण यातून मिळणारा आनंदच एक नवा ऊर्जास्त्रोत निर्माण करील जो मला प्रेरणा देत राहील .

मनाची मशागत चांगल्या प्रकारे झाली .आता कथाबीज पेरायला हरकत नाही .कथेला शीर्षक काय बरे द्यावं .? माझी विचारशृृंखला सुरू झालेली .आणि एकदम वीज चमकावी व त्या प्रखर प्रकाशात काहीतरी गवसावं तसं मला गवसलं . ” खिडकी ” होय , खिडकीच , ज्या खिडकीत बसुन मी विचार करीत होते ती खिडकीच , माझी जीवाभावाची सखी , माझी निवांतपणातील मैत्रीण .

निवांत दुपार आणि खिडकी , हे माझं जणू समीकरणच ठरलेलं .माझ्या घराच्या , अर्थात खिडकीच्या समोरच शंभर फूटी रस्ता आहे . दोन्ही बाजूला विविध दुकाने व वर निवासी फ्लॅटची रचना .आमच्या खिडकीच्या समोरच दोन्ही बाजुला बसथांबे . त्यामुळे येणार्‍या जाणार्‍यांची वर्दळ मी खिडकीत बसुन न्याहाळत असते .समोरील दुकानात येणारे विविध ग्राहक , त्यांची खरेदी , सामानाने भरलेल्या पिशव्या , फुटपाथवरून फिरायला जाणारी मंडळी , बस थांब्यावर तरूण तरूणींचा किलबिलाट , हास्याचे फवारे ,मला एक नवीनच ऊर्जा देऊन जातात , मला पुन्हा माझ्या विद्यार्थी दशेत घेऊन जातात .अशी ही माझी मैत्रीण खिडकी मला नित्य नवनवीन भावविश्वात घेऊन जाते , मला चांगली सफर घडवून आणते . आजही बघाना , कथालेखनाची प्रेरणा तिनेच तर मला दिली ,चला तर मग घेऊया मोबाईल हाती आणि करूया कथा टाईप.

मनाचा निश्चय होताच दुपारच्या वामकुक्षीसाठी माझ्या जडावलेल्या पापण्या एकदम उघडल्या , मनावरची मरगळ जाऊन उत्साह वाटू लागला . आज एक नवनिर्मिती माझ्या लेखणीतून झरणार होती .

विचाराच्या श्रृंखलेत गर्क मी भूत भविष्याचा विचार करीत होते . बँडबाजाच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली होती .मी खिडकीतून डोकावले . एका नवरदेवाची वरात होती .माझी नात भाग्यश्रीही येऊन म्हणाली , आजी मला खिडकीवर घेना ” मी तिला वर उचलून खिडकीत बसविले .” ” आजी काय आहे हे ” ” अग , नवरदेवाची वरात आहे , नवरदेव निघालाय लग्नाघरी जाण्यासाठी ” ” कोठे आहे नवरदेव ” “अग , तो बघ घोड्यावर बसलेला ” ” तो घोड्यावर कशाला बसलाय ? ” नवरदेव घोड्यावरच बसतो लग्नाला जातांना ” ” मग , मी ही बसेन घोड्यावर माझ्या लग्नात ” ” अं हं , नवरी नाही बसत बरं का घोड्यावर , फक्त नवरदेवचं बसतो .” कशाला कशाला , फक्त नवरदेवच कशाला ? ” होय बेटा , नवरदेव घोड्यावर बसतो व नवरी लग्नानंतर डोलीत बसते ” ” डोली काय असते ” ” डोली म्हणजे पालखी ” ” पालखी काय असते ” अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणं मला शक्यही होत नसतं. 

याच श्रृृृंखलेत मला आठवला मोर्चाविषयी भाग्यश्रीने प्रश्न विचारुन मला बेजार केलेला प्रसंग .

“आमच्या मागण्या पूर्ण करा ” ” पगारवाढ झालीच पाहिजे. सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे . भाववाढीला आळा घाला , नाहीतर खुर्ची सोडा “संपकर्‍यांचा मोर्चा रस्त्यावरून चालला होता .मी खिडकीतून पाहू लागले .त्यांच्या हातातील फलक वाचण्या प्रयत्न करू लागले .माझी नातवंडे नचिकेत व भाग्यश्रीही माझ्याजवळ येऊन बसले . ” आजी काय पाहातेस .” भाग्यश्रीचा कुतुहूलपूर्ण प्रश्न ” मोर्चा पहातेय बेटा .” ” मोर्चा म्हणजे काय आजी ” ” आपल्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून सगळ्यांनी एकत्रपणे येऊन दिलेला लढा ” ” ही माणसे घोषणा का देतात आजी ” ” त्यांच्या मागणीची प्रखरता वाढावी म्हणून ” ” प्रखरता म्हणजे काय आजी ” ” प्रखरता म्हणजे तीव्रता , जोर लावणे ” ” जोर लावल्याने काय होतं आजी ” ” आपल्या मागण्या पूर्ण होतात ” ” मागण्या पूर्ण झाल्यावर काय होतं आजी ” ” अगबाई तुझे प्रश्न कधी संपतात काय ? चल, भूक लागलीय ना तुला . सातूचे लाडू देते  ” म्हणत खिडकी सोडून मला किचनकडे आमचा मोर्चा वळवावा लागला होता .

या खिडकीतून गणपतीची मिरवणूक , साईबाबाची मिरवणूक ,गुढी पाडव्याला नववर्ष मिरवणूक ,तर निवडणुक काळात निघालेल्या विविध पक्ष्यांच्या प्रचार मिरवणूकी मी पाहात असते .

पण सद्या , चार महिन्यांपासून माझ्या खिडकीतून ही वर्दळ नाही पाहायला मिळत , खिडकी कशी शांतशांत वाटतेय .निवांत वाटतेय . पेंगुळलेल्या दुपारसारखी .लाॅकडाऊनमुळे सारी दुकाने बंद आहेत , बस ,आँटोरिक्षा व इतर वाहनेही बंद . सर्वत्र शांतता , पण ह्या शांततेचा भेद करीत आहेत पक्ष्यांचे मंजुळ स्वर कानी पडतात ,परवा तर समोरच्या वीजेच्या तारेवर  मला ” पोपटाची जोडी दिसली . मी त्यांच्या खाण्यासाठी ताटात दाणे ठेवले , तशी ही जोडी भुssssर्रकन दाणे टिपायला आली व माझ्याशी जणू हितगुज करुन गेली .” लाॅकडाऊनमुळे तुम्ही घरात . आम्ही बाहेर .आता उपभोगतोय आम्ही स्वातंत्र्य “

आज खिडकीतून डोकावले तर नगरपालिका कर्मचारी सगळ्या बिल्डिंग दुकाने सॅनिटाईज करीत होते .धुराची फवारणी होत होती . सफाई कर्मचारी दिवसातून दोनवेळेस रस्ता साफ करीत होते .

माझ्या घराच्या समोरच शिवसेनेची शाखा आहे .त्यांनी लाॅकडाऊनमुळे भाजीमार्केट बंद असल्याने थेट शेतकर्‍यांकडून भाजी विकत घेऊन ना नफा ना तोटा तत्वावर जनसामान्यांना उपलब्ध करून दिल्याने माझीही चूल पेटत राहिली .

घरोघरी मास्क वाटून जनजागृृृृती करणारे स्वयंसेवक मी याच खिडकीतून पाहिले .

माझ्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने पूर्वाभिमुख असणार्‍या माझ्या या खिडकीत कोवळ्या सोनेरी किरणात मी बसते . नेहमी समोरच्या बिल्डिंगमधून सासुसूनांची तूतू मीमी च ऐकू येत होती , पण ती बंद होऊन दोघीत जणू सलोखा झालाय . सुनेची प्रेग्नंसी व लाॅकडाऊन , मग सासुबाईंशी समझोता करावाच लागला . पप्पा घरी असल्याने मुलांना सहवास , पती पत्नितील सलोखा , एकंदर हसरी कुटुंब आता खिडकीतून दृृृग्गोचर होत आहेत

माझ्या खिडकीतून रोज माणुसकीचं दर्शन होतंय . माझ्या खिडकीनं माणुसकी जपलीय .माझ्या लेखणीला एक नवं बळ दिलंय .

डाॅ. शैलजा करोडे

नेरूळ नवी मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: