गंध मैत्रीचा

घाडगे आजोबा रोज सकाळी पूजेसाठी परसबागेतील फुलं काढायचे. मुखी हरिनाम आणि दुसरीकडे पटापट फुलं काढून तबकात ठेवायचे. रंगीबेरंगी, नाजूक अशी उमललेली टवटवीत फुलं पाहूनच कसं तजेलदार वाटायचं. आजोबा रोज फुलं काढून त्यांच्यावर पाण्याचा हबका मारून ठेवायचे आणि थोड्या वेळाने पूजा करायचे. पण त्या दिवशी काही तरी वेगळं घडलं. काय झालं कळायला काहीच मार्ग नव्हता. पण म्हटलं ना काही तरी वेगळंच घडलं त्या दिवशी.

आज सकाळी सकाळी परसबागेतील सगळी फुलं तबकात जमलेली होती. आजोबा चुकून तबक अंगणात च विसरून गेले होते. इकडे या फुलांची चर्चा सुरू झाली. तबकात खूप फुलं जमलेली. तगर, कर्दळी, गुलाब, गोकर्णी,जास्वन्द, जुई, बिट्टी, सदाफुली, प्राजक्त, तेरडा , लिली इत्यादी. एखाद्याच्या डोळ्यात जणू या फुलांचं प्रतिबिंब म्हणून इंद्रधनुष्य च दिसावं असं हे दृश्य.
देवाच्या चरणांवर जायचा दिनक्रम सोडून आज मात्र,फुलांची चर्चा रंगायला लागली होती.

तगर म्हणाली,”किती दिवसांनी असे सगळे एकत्र भेटतोय,नाही का? रोज आपलं आजोबा थेट आत घेऊन जातात. कोण कुठे आहे ,कसा आहे काहीच बघता येत नाही.” तिच्या म्हणण्याचा सूर लगेचच पुढे नेत प्राजक्त म्हणाला,”अगदी खरं, मी तर खूप वेळा इकडेच राहतो जमिनीवर, अगदी एकटा”. तेरडा म्हणाला ,”मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय, हल्ली आमचे भाऊबंद(विविध रंगांचे तेरडे)शेजारी आल्यामुळे इतर कोणाकडे बघताच येत नाही, ना कोणाशी बोलता येतं”. यावर लगेचच गुलाब म्हणाला,”खरंय रे तुझं, आपण एवढे शेजारी पण कधी भरभरून बोलताच येत नाही, मी कायम माणसांमध्येच रमलेला, सगळेच येतात मला बघायला”. गोकर्णी म्हणाली,”मी तरी काय सांगू? मी बाहेर राहिले एकटी माझ्या जवळ तरी आहे च कोण बोलायला , सारखं वाटतं; पूर्वी लिली च्या बाजूला होते तेव्हा किती मजा यायची. वादळ आलेलं ,तेव्हा सुद्धा एकमेकींना सावरून होतो आम्ही ,मोठीमोठी झाडं उपळली ,पण आम्ही मात्र एकमेकींच्या आधाराने होतो, लढा देत. आता त्याच आठवणींमध्ये जगते मी.” डोळ्यात पाणी आणत लिली म्हणाली,”गोकर्णी, रडवलस बघ. मला आता नवीन शेजारी मिळाला आहे ,पण आपण सोबत असतानाचे आपल्या मैत्रीचे दिवस सतत लक्षात राहतात आणि उभारी देतात. मागे साफसफाई झाली, त्यात मला खूप दुखापत झाली.तुझ्या आठवणीने आणि तू शिकावलेल्या धीराने पुन्हा उभी राहिले बघ.” जास्वन्द म्हणाली,” वानर मला खूप त्रास देतात, पण माझा सगळा त्रास घालवायला ही कर्दळी असते. तिला कोणी पाणी घातलं की थोडं पाणी ती मला देखील देते आणि माझ्या अंगावर असलेली तिची मोठी पानं ,तिला आधार म्हणून मी झेलते”. इतक्यात जुई म्हणाली, “आधी तर मी कुंडीत होते , सर सर वाढत गेले आणि थेट कुड्याशी ओळख झाली. बिचाऱ्याला कायम दुःख होतं .उंच असल्यामुळे देवाच्या पायावर जाण्याची संधी त्याला कमी मिळते.आजोबा उंच फुलं काढू शकत नाही ना त्यामुळे. सदा दुःखी असायचा. पण वानरांनी उड्या मारून काही फांद्या खाली आणल्यामुळे आता रोज असतो देवाच्या जवळ.आमची मैत्री सुद्धा छान झाली आहे.”

सगळ्याची चर्चा ऐकून बिट्टी म्हणाली,” किती छान आहात तुम्ही सगळे, मी नवीन असून सुद्धा मला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घेतलंत. परसबागेच्या कोपऱ्यात असलेली मी तबकात येऊन तुम्हा सगळ्यांमध्ये मिसळले. आता मला सुद्धा एकटं वाटत नाही.” “आपण किती कमी भेटतो असे, तरी सुध्दा आपल्यामध्ये हा जो एकोपा आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो”, लिली म्हणाली.

“अरेच्चा!! काय योगायोग पहा बरं, कालच मी आजोबांच्या नातवाकडून ऐकलं की उद्या म्हणजेच आज मैत्री दिन आहे.” जास्वन्द म्हणाली. “अरे क्या बात है! आपण सगळे किती नशीबवान आहोत की आजच बरोबर आजोबा आपल्याला इथे बाहेर सोडून गेले ,त्यामुळे आपण बोलू शकलो ते सुद्धा इतक्या दिवसांनी!”,तगर म्हणाली.

आपणसुद्धा हा दिवस साजराच केला की एक प्रकारे. सगळे कसे बहारदार दिसतायत. गुलाब तर अभिमानाने उठून उभा राहिला म्हणाला ,”चला आपण सगळे एकमेकांना शुभेछा देऊ आणि आपली मैत्री अशीच राहूदे म्हणून देवाकडे प्रार्थना करू.”
सगळी फुलं तबकात उभी राहिली ,उड्या मारू लागली.
प्राजक्त म्हणाला,”चला चला लवकर एक फोटो घेऊया आणि मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवूया”. “पण फोटो घेणार कसा? आपल्याकडे तर फोटो घ्यायचं साधन नाही,” गुलाब म्हणाला.
इतक्यात त्याला थांबवत गोकर्णी म्हणाली,” काळजी करू नका आपण सगळे एकत्र एकमेकांना प्रतिबिंबाच्या रूपात या खालच्या पाण्यात पाहू ना! आपल्याला काय सगळ्यांना एकत्रच तर पाहायचं आहे”. तबक जिथे ठेवलं होतं तिथेच खाली एक पाण्याचा साठा असलेलं पसरट भांडं होतं ,जे आता उपयोगाला आलं.

गोकर्णी च्या सांगण्याप्रमाणे सगळी फुलं एकत्र आली,जणू हातात हात गुंफून उभी होती.त्यांनी स्वतःचं आणि इतरांचं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं आणि आनंद व्यक्त केला. प्राजक्त मात्र वजनाने कमी असल्यामुळे पटकन पाण्यात पडला.” अरे अरे, पडलो रे पडलो,”असा ओरडायचा आवाज आला. सगळी फुलं इकडे तिकडे बघायला लागली आणि लक्षात आलं प्राजक्त खाली पाणयात पडला आहे. कर्दळी म्हणाली ,” अरे त्याला वाचवा रे ! आता काय करायचं?”तिचा जीव घाबरला. इवलासा तो प्राजक्त, रडू लागला.पण सगळे इतके जिवाभावाचे त्यांनी आपसातच काही तरी ठरवलं आणि …..इतक्यात कर्दळी पाण्यात पडली. मागून ओरडतच तगर खाली आली. हळू हळू करत सगळेच पाण्यात झेपावले.शेवटी गुलाब म्हणाला,”अरे आलो रे आलो मी पण “आणि ऐटीत त्यानेही स्वत:ला पाण्यात झोकून दिले. झालं!! सगळेच आले की म्हणून प्राजक्त एकदम आनंदाने ओरडला.आता तो एकदम हसत होता. त्याला त्याच्या मैत्री ची प्रचिती आलेली होती. सगळे जण त्याच्यासाठी पाण्यात पडले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता.

पाण्याच्या लहरी तयार होत होत्या. सगळी फुलं त्या लहरींवर डोलत होती. छान तरंगत होती. मैत्रीदिन त्यांनी असा साजरा केला होता. एकमेकांना अजूनही शुभेच्छा देत होते आणि अशीच साथ द्या म्हणून सांगत होते. “आपण भेटलो नाही तरी आपल्यातला हा परोपकारी स्वभाव मात्र असाच टिकवू “,अशी गुलाब आणि अन्य तबक-सदस्यांनी घोषणा केली.

आता सकाळचे दहा वाजत आलेले. तिकडून ऑफिस टाइम,चिनी गुलाबाची फुलं देखील नुकतीच उठून ,किलकिले डोळे करून हा सगळं गजबजाट पाहायला आली होती. या सगळ्या फुलांमधली ही शेंडेफळं लवकर उठली नाहीत म्हणून नाही तर ती पण आली असती पाण्यात मज्जा करायला.तरी त्यांनी आपण किती खूष आहोत हे दाखवायला वाऱ्याची मदत घेत डोलून दाखवलं. या सगळ्या फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळत होता.

एवढ्यात घाडगे आजी जोरजोरात ओरडत आल्या, “अहो हल्ली अगदीच विसारभोळे झालात हो तुम्ही, हे फुलांचं तबक इथे कशाला ठेवलेलं? मी आत मध्ये शोधत बसलेले दुर्वा ठेवायच्या म्हणून.काय ना ह्यांना काही बोलायची सोय च राहिलेली नाही हल्ली.” आजोबा बिचारे आतूनच म्हणाले ,”अहो तुमच्या कन्येचा फोन आला म्हणून तसंच तबक ठेऊन आत आलो,नाही तर ती पण कावली असती,तुमच्यासारखी.” आजींनी लगेच हम्मम्म्म!! असा आवाज काढत पुन्हा एकदा बोंब मारली,” अहो इकडे या बघा या काय झालं ते”, आजोबा हजर झाले .पाहतात तर काय सगळी फुलं पाण्यात पडलेली, जणू काही हसून आणि चिडवून दाखवत होती आजी-आजोबांना.
“बघा काय झालं ते तुमच्यामुळे सगळी पाण्यात पडली फुलं. वारा आला असणार जोराचा”. असं- तसं बोलत बोलत आजी आजोबा भांडत राहिले आणि फुलं मात्र मजा घेत राहिली.

मैत्री दिन असा साजरा झाला. आज तर पाण्यालाही भाग्यवान असल्यासारखं वाटतं होतं. ही अबोल फुलं प्रेमळपणे हातात हात गुंफून स्वतःबरोबर इतरांनाही सामावून घेत मैत्रीदिन साजरा करत होती.आता सगळी फुलं एकमेकांना म्हणाली ,”पुढच्या वर्षी असं काही ना काही कारण काढून भेटूच, पण तोवर मैत्रीचा असाच सुगंध पसरवत राहूया आणि इतरांनाही आनंद देऊया”.

अदिती घाणेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: