ऋतूची कार्यतत्परता

   आज ऑफिसला उशीर झाला होता. सीमा घाईने स्वतःची नि मुलांच्या शाळेची तयारी करत होती. आनंद नेहमीप्रमाणे टूरवर गेला होता. महिन्यातून पंधरा दिवस तो टूरवरच असायचा. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सीमालाच सांभाळावी लागत होती. मुले लहान असल्याने त्यांची शाळेची तयारी, गृहपाठ, प्रकल्प तीच पहात असे. शिवाय हल्ली तिच्या ऑफिसचे कामही खूप वाढले होते. बॉसने गेल्या आठवड्यात सक्त ताकीद दिली होती, “कोणीही उशीरा याल तर अर्ध्या दिवसाचाच पगार मिळेल” सीमाच्या कामवाल्या गंगुमावशी रोज कामाला वेळेवर  येत. त्या सुट्टीही फार क्वचितच करत. परंतू, आज खूप वेळ झाला तरी त्यांचा पत्ता नव्हता. सीमाची कुतरओढ होत होती. अशात तिचा फोन वाजला. थोड्याशा त्राग्यानेच तिने फोन उचलला. फोन गंगुमावशींचा होता. तिला क्षणभर त्यांचा राग आला. “इथे मी वाट पाहतेय नि या फोन काय करत आहेत?” पण तरीही संयम राखून तिने विचारले, “कुठे आहात मावशी? मला उशीर होतोय. लवकर याल का जरा?” तशा गंगु मावशी बोलल्या,” माफ करा ताई, माझ्या गावाकडनं माझी आई मयत झाल्याचा फोन आला आणि मी लगेच गावाच्या गाडीत बसले. आता गाडीत बसूनच तुम्हाला फोन करतेय” आता मात्र सीमावर रडायची पाळी आली होती. तरीही कष्टाने तिने विचारले, “मावशी किती दिवसांत परत याल? कोणी बदली बाई तरी द्यायची! तुम्हाला माहित आहे माझी गरज!”  मावशी बोलल्या,” ताई मी मघापासुन बऱ्याच जणांना फोन लावले पण अजूनही कोणीच होय बोलले नाही.”
                सीमाच्या कपाळाची शीर थाड थाड उडू लागली. घरातली सगळी कामे, पसारा टाकून ती ऑफिसला जात असे. जाता जाता ती मुलांनाही शाळेत सोडायची नि तशीच पुढे ऑफिस गाठायची. आताही तिने मुलांची तयारी केली होती. पण घरातील सारे काम बाकी होते आणि आज सुट्टी घेणे तिला मुळीच शक्य नव्हते. ती रडकुंडीला आली, तेव्हा मुले थोडी बिथरली. तरीही सात वर्षांची ऋतू बोलली, “ममा, तू काही काळजी करू नकोस. मावशी नसतील तरी मी शाळेतून चिरागला सांभाळून घेऊन येईन. जा ऑफिसला निवांत. आपल्या छकुलीचे असे बोल ऐकताच सीमाचा ऊर दाटून आला. तिने दोन्ही बाळांना जवळ घेतले नि म्हणाली, “आजच्या दिवस रहा बाळांनो दोघेच मी वॉचमनला एकदा येऊन तुम्हांवर नजर ठेवायला सांगीन”. एवढे बोलून सर्वजण घराबाहेर आले. दरवाजा ओढून घेतला नि चावी ऋतूकडे दिली. खाली उतरल्यावर वॉचमनला योग्य त्या सूचना दिल्या नि मुलांकडे लक्ष ठेवायला सांगितले. आज वॉचमन नव्यानेच रूजू झालेला वाटला. पण एवढा विचार करायला सीमाला होताच कुठे! वॉचमन बोलला, “हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका! जा तुम्ही ऑफिसला! मी सांभाळतो या दोघांना”.
                 थोड्याशा साशंकतेने सीमाने मुलांना स्कूलबसमध्ये चढवले आणि रिक्षा पकडून ऑफिस गाठले. मुले घरी येण्याच्या वेळेला एकदा वॉचमनला फोन करून मुले घरी आल्याची खात्री पटवली नि थोडी निर्धास्त झाली. ती मनात विचार करू लागली, “तशी माझी ऋतू खूप समजदार आहे, सांभाळेल चिरागला नीट! पण रात्री मावशींना फोन करून बाईचा बंदोबस्त करून घ्यायचाच”. आता सीमा जरा कामात व्यस्त झाली आणि तिला थोडा वेळ घरचा, मुलांचा विसर पडला. थोड्या वेळाने तिने वॉचमनला फोन केला परंतु वॉचमनने फोन उचलला नाही. म्हणून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. करू जरा वेळाने पुन्हा फोन म्हणत पुन्हा कामात व्यग्र झाली. इतक्यात तिला शेजारच्या पाटीलकाकूंचा फोन आला. घाईनेच तिने तो उचलला तर त्या घाबऱ्याघुबऱ्या आवाजात बोलल्या, “सीमा जरा लवकर घरी येतेस का? सीमाला काय झालेय ते काहीच कळेना. तिने विचारले,” काकू काय झालेय? जरा आमच्या घरी मुलांना भेटता का? मावशी नाहीत म्हणून ऋतुच्या जीवावर घर सोडून ऑफिसला आले आहे”. तशी पाटीलकाकू म्हणाल्या, “सीमा, तू मुलांची काळजी करू नकोस, मुले माझ्या घरी मजेत आहेत. फक्त तू जरा लवकर ये” आता मात्र सीमाचा धीर सुटत चालला. तिने बॉसना कळकळीने विनंती केली नि  घरी जाण्याची परवानगी मागितली. आज बॉसही थोडे खुशीत होते. त्यांनी जास्त प्रश्न न विचारता तिला परवानगी दिली.
      तशीच सीमाने पळतच रिक्षा गाठली. घरात परतुन पाहते तो बिल्डींगखाली पोलीस नि सोसायटीचे चेअरमन पाटील काका उभे होते. सीमाच्या काळजात चर्र झाले. तिने लिफ्टचे बटन दाबून घर गाठले.पाटीलकाकुंचे दार उघडेच होते.  सीमाने विचारले, “काय झाले काकू? पोलीस का आलेत बिल्डिंगमध्ये?” तेव्हा काकु बोलल्या,” अगं तुझ्या ऋतूमुळे!”
“ऋतूमुळे? काय झालेय तिला? तेव्हा पाटीलकाकु म्हणाल्या,”तिला काही झाले नाही, पण तिने आज बहादुरी दाखवली आहे. वॉचमन तुझ्या घरात गेला. तो तुझ्या बेडरूममध्ये जाऊन ऋतूची कपडे काढू लागला. ऋतू अबोध होती पण मुलगी होती. तिच्या सिक्सथ सेन्सने तिच्या मनात धोक्याची घंटी वाजवली. वॉचमनच्या चाळ्यांनी ती इवलीशी पोर घाबरली. पण घाबरून ती ओरडली नाही. ती वॉचमनला हळूच बोलली, “मी पाणी पिऊन येते”. चिरागला सोबत घेऊन ती बेडरूमच्या बाहेर आली आणि बेडरूम बाहेरून लॉक केली”.
           काकु बोलतच होत्या, “अगं ती पळतच माझ्याकडे आली. ती घाबरली होती, परंतु  तिने सर्व वृत्तान्त सांगितला. पाटील काकांनी पोलिसांना बोलावलं. पण बेडरूमची चावी तुझ्याकडे असेल म्हणून तुझी वाट पाहत थांबलोय. तुझ्या चिमुकलीने किती हुशारी दाखवलीय. तिच्या अतिंद्रिय शक्तीने जी स्त्रियांच्यात उपजतच असते, तिला वाचवलेय. खरंच तू भाग्यवान म्हणून तुला अशी पोरं लाभली”. सीमा मुलांना छातीशी लावून डोळ्यातुन आपोआप ओघळणारे पाणी टिपत होती.

सौ.भारती सावंत
मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: