रथ

            आप्पासाहेब बिल्डिंगच्या खालच्या कट्यावर रथाची वाट पहात बसले होते. आज ते आणि त्यांचा मित्र वसंता त्यांच्या लाडक्या नानाला भेटायला जाणार होते. या सर्व मित्रांना ‘रथ’ ही पर्वणीच ठरली होती. खरंतर आप्पांच्या घरी दोन मर्सिडीज होत्या. लोक त्यांना म्हणतही ‘घरच्या एवढ्या गाड्या सोडून तुम्ही तुमच्या रथातून काय सगळीकडे फिरता ? ‘पण आप्पासाहेबांना रथच आवडत होता. छान, डौलदार…. त्यांना कुठेही आदबशीर घेऊन जाणारा….  त्यांच्या गतीने जाणारा, कोणत्याही रस्त्याने नेणारा ! हा रथ सजवलाही अगदी छान होता. रस्त्यानं रथ जेव्हा जाई, तेव्हा येणारे-जाणारे त्याकडे वळून वळून पाहत असत. काय नव्हतं त्यात ! बसण्याची शाही व्यवस्था, शिवाय छत्रचामरा सारखं डेकोरेशन. आप्पासाहेबांना आवडणाऱ्या संगीताची साथही या रथात होती. सैगल, तलत, रफी, मुकेशची गीतं; तर कधी नाट्यसंगीत.. तर कधी उत्तम जुन्या बंदिशी तर कधी गझल. त्यामुळे सर्व मंडळींना रथाचा प्रवास आरामदायी, सुखकर व हवाहवासा वाटे.
   आप्पासाहेब वाट पाहता पाहता विचार करू लागले. आपल्या जेष्ठ नागरिक संघाची मिटिंग असो, कधी रमी खेळण्याचा बार असो, कधी अनाथालयात जायचे असो, तर कधी मित्रांना भेटायचं असो आपला रथ नेहमी तयार असतो.  
   त्यांना आठवलं पावसाळ्याचे दिवस नसूनही एकदा अचानक आलेल्या वळवाच्या पावसात आपण अडकलो. घरी काही केल्या संपर्क होईना; पण त्या वेळी या रथानंच आपल्याला सोबत केली आणि घरी सुखरूप पोहोचवलं. रथाची पुन्हा एकदा आठवण काढताच त्यांना रथाच्या सारथ्याची म्हणजेच संजयची आठवण झाली. संजय अतिशय मायाळू, सेवाभावी, विनम्र. तो आणि  रथ या दोन्ही गोष्टी आता अप्पासाहेबांच्या जीवनाच्या अविभाज्य घटक झाल्या होत्या. 
    त्या वळवाच्या पावसातच संजय आणि आपली पहिली भेट झाली होती. त्या दिवसापासून जे ऋणानुबंध जुळले ते आजतागायत. आप्पासाहेब विचारात गढून गेले. संजय खरं तर शिकलेला, घरची सांपत्तिक स्थितीही चांगली. आप्पासाहेबांनी त्याला बर्‍याचदा विचारलं, “तू एवढा शिकलेला मग नोकरी न करता हा रथ कसा काय चालवतो?” यावर संजय उत्तर द्यायचा टाळत असे पण परवा आप्पांनी त्याला शपथच घातली तेव्हा त्याने सांगितलं, “आप्पासाहेब मी खरंच कोणाला सांगत नाही पण आज तुम्ही मला शपथ घातलीत. मी तुम्हाला वडिलांच्या जागी मानतो म्हणून सांगतो. माझं शिक्षण झालयं. शिक्षण संपल्यावर मला नोकरीही मिळाली असती पण माझे बाबा खूप आजारी होते. अंथरुणाला खिळूनच होते. त्यावेळी आमची सांपत्तिक स्थिती खूपच वाईट होती. एकदा रात्री अचानक बाबांची तब्येत खालावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं पण आम्हाला कोणत्याच वाहनाची व्यवस्था करता आली नाही. दवाखान्याची गाडी येई पर्यंत बाबांनी प्राण सोडले. केवळ योग्य वेळी दवाखान्यात नेता न आल्याने माझ्या वडिलांनी आपले प्राण गमावले. माझ्या डोळ्यांसमोर मी त्यांचा मृत्यू पाहिला. त्याच क्षणी मी ठरवलं, या पुढे मी नोकरीधंदा काहीच करणार नाही. दीनदुबळे, वृद्ध, अपंग यांच्या मदतीला धावून जाईन. म्हणून माझ्या ऐपती प्रमाणे मी हा ‘रथ’ म्हणजेच रिक्षा कर्ज काढून घेतली आणि तुमच्या सारख्या जेष्ठांना त्याचा उपयोग होतोय यातच मला समाधान आहे. देवानं मला काही कमी केलं नाही. आणखी तीन रिक्षा घेतल्या आणि चालवायला दिल्या पण माझा ‘रथ’ मीच चालवतो. तुमच्यासारखे आशीर्वाद देतात आणि भरभरून मदतही करतात त्यामुळे मी समाधानी आहे.”                   
 आप्पासाहेबांना संजयचं ते बोलणं आठवलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तेवढ्यात त्यांना लांबून डौलदार रथ येताना दिसला. संजय नेहमीप्रमाणं हसत-हसत सारथ्य करण्यासाठी सज्ज होता.                      

कल्पना देशपांडे,
 कर्वेनगर, पुणे ५२

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: