तहान

     करुणा निकेतन क्रेशच्या पायर्‍या उतरून जस्मीन खाली आली आणि पाठोपाठ क्रेशमधील सारी जणही आली. गेटपर्यंत. तिला निरोप द्यायला. गेटच्या बाहेर सुनीता केव्हाची टॅक्सी थांबवून उभी होती. जस्मीनचे पाय मात्र तिथून निघता निघत नव्हते. पावले काशी जडशीळ झाली होती. क्रेशच्या दृष्टीने आत्ताचा क्षण ऐतिहासिक महत्वाचा होता. पंचवीस वर्षापूर्वी क्रेशने आपल्यात सामावून घेतलेली छोटी चिमखडी बघता बघता एम.बी.बी. एस. झाली होती आणि आता पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला निघाली होती. क्रेशमधल्या सगळ्यांनी तिला निरोप दिला. निरोप आणि हार्दिक शुभेच्छा. तिच्या शिक्षणासाठी… तिच्या भावी आयुष्यासाठी… तिच्या लोककल्याणकारी ध्येयासाठी…. त्या सार्‍यांच्या आत्मीयतेचं, सदीच्छांचं आपल्यावर खूप दडपण आलय, त्या दडपणाखाली आपण गुदमरत चाललोय, असं जस्मीनला वाटू लागलं. त्या सार्‍यांच्यामधून लवकर बाहेर पडावं, असं एकीकडे तिला वाटत असतानाच, दुसरीकडे पाय आणि मन मात्र त्यांच्यातच घोटाळत होतं. जितका वेळ त्यांच्या सहवासात राहता येईल, तेवढं बरं, असही तिला वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेने ती भांबावून गेली होती. आज सकाळपासून क्रेशमधील प्रत्येक व्यक्ती तिच्याशी काही ना काही बोलावं म्हणून धडपडत होती. वेळ थोडा होता. बोलणं संपत नव्हतं. सर्वांनाच गहिवरून आलं होतं.    

‘आज सिस्टर नॅन्सी हवी होती.’ सिस्टर मारियाच्या मनात आलं. जस्मीनला शिकवायचं, उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवायचं हे सिस्टर नॅन्सीचं स्वप्न… अनेकांना अनेक वेळा तिने बोलून दाखवलेलं… तिला खूप आनंद झाला असता. धन्यता वाटली असती. तिला आणि फादर फिलिपला. ‘गॉडस् ग्रेस’ ते म्हणाले असते.     

क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली जस्मीन ही पहिलीच मुलगी. तीन साडे तीन वर्षांची असेल तेव्हा ती. आज क्रेशचा परिवार खूपच वाढलाय. तीनशे, साडे तीनशे मुली आहेत. वेगवेगळ्या वयाच्या. वेगवेगळ्या इयत्तेतल्या. कुणी पोरक्या, कुणी टाकून दिलेल्या. कुणी आई-वडलांना परिस्थितीमुळे सांभाळणं अशक्य असलल्या, आणि म्हणून त्यांनी इथे आणून सोडलेल्या. कुणी गुन्हेगार, रिमांड होममधून पाठवलेल्या, कुणी घरातून पळून आलेल्या, इथे-तिथे भरकटत असलेल्या. क्रेशने सर्वांवर मायेचं छ्प्पर घातलय. त्यांना जीवन दिलय. संरक्षण दिलय. त्यांच्या शिक्षणाची सोय केलीय. जिच्या तिच्या कुवतीप्रमाणे. शहरातील अत्यंत मागास वस्ती असलेल्या ठिकाणी रेड टेंपल चर्च आहे. चर्चला जर्मन मिशनची मदत आहे. फादर फिलिप जर्मनीहून या चर्चचे मुखी बिशप म्हणून आले. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे प्रभू येशूचेच कार्य होय, या श्रद्धेने इथे काम करत राहिले. आस-पासच्या लोकांना मदत करत राहिले. दारीद्र्याने, लोकभ्रमाने अकाली खुडून नष्ट पावणार्‍या कळ्यांना जीवन द्यावं, कृतीने प्रभू येशूचा संदेश लोकांपर्यंत पोचवावा, या हेतूने चर्चची सिस्टर इन्स्टिट्यूशन म्हणून त्यांनी करुणा निकेतन क्रेश सुरू केले. मग सिस्टर नॅन्सी, सिस्टर मारीया , सिस्टर ज्युथिका जर्मनीहून आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. आणखीही कुणी कुणी स्थानिक ख्रिश्चनांनी मदतीचा हात पुढे केला.  करुणा निकेतन क्रेश नावा-रूपाला आलं.     

फादर फिलिपनी क्रेश सुरू करायचं ठरवल्यावर एका लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याकडून त्यांची साडे-तीन, चार वर्षाची मुलगी दत्तक घेतली.    ‘आम्ही तिचा नीट सांभाळ करू. तिला खूप शिकवू. पुढचं शिकायला जर्मनीला पाठवू. पण एकच अट आहे. तुम्ही तिला आजिबात भेटायचं नाही. ओळख द्यायची नाही. पुन्हा क्रेशाकडे फिरकायचच नाही.’  भिकारी जोडप्याने ते मान्य केलं. ‘मुलीच्या आयुष्याचं तरी कल्याण होईल’, असा त्यांनी विचार केला असावा. फादरनी डॉ. थॉमसना मुलीचं कंप्लीट चेकअप करायला सांगितलं. मुलीला महारोगाचा संसर्ग झालेला नव्हता. ‘प्रभूची लीला… ‘ हाताने छातीवर क्रॉस करत ते म्हणाले. नंतर तिचा बाप्तिस्मा झाला. सिस्टर नॅन्सीने नाव सुचवले, ’जस्मीन’ … प्रसन्न, सुंदर, टवटवीत… आपल्या अस्तित्वाने सारे वातावरण सुगंधित करणारं फूल, जस्मीन.  जस्मीन…. क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली पहिली मुलगी. सुरूवातीला रस्त्यावर वाढणारी जस्मीन त्या बंदिस्त वातावरणात इतकी भेदरून जायची, कुणीही अंगाला हात लावला, नुसतं जवळ जरी आलं, तरी आपलं अंग आक्रसून घ्यायची. पुढे ती तिथे रुळली.  जस्मीनने वेळोवेळी, क्रेशमधील इतरांच्या बोलण्यातून आपल्या जीवनासंबंधीचे गोळा केलेले हे तुकडे. एकटी असली की ते मांडून आपला जीवनपट जुळवण्याचा तिच्या मनाला छंदच लागून गेला होता. प्रत्यक्षात मात्र कुणाला काहे विचारायची तिची कधीच हिंमत झाली नाही. अगदी सशासारखी भित्री आणि बुजरी होती ती. जसजशी ती मोठी होत गेली, तसतसे तिच्या मनात विचार येऊ लागले, कोण असतील बरं आपले आई-वडील. फादरनी आल्याला प्रथम केव्हा, कुठे पाह्यलं असेल? त्यांच्या मनात केव्हा, कसं आलं असेल, आपल्याला अ‍ॅडॉप्ट करावं म्हणून? त्यांच्या मनात तसं आलंच नसतं तर? किंवा आई-वडलांनी आपल्याला द्यायचं नाकारलं असतं तर? आज आपण कुठे असतो? आपलं आयूष्य कसं जगत राहिलो असतो?   कल्पनेनेही तिच्या अंगावर शहारे येत. कदाचित् या समोरच्या भिकार्‍यांसारखाच आपलाही देह नासून गेला असता. कदाचित का, नक्कीच! त्यांच्यासारखीच लकतरे लेवून नासका देह फरफटत जगलो असतो आपण. काय वाटलं असतं त्या स्थितीत आपल्याला? की जीवन तसंच आहे, तेच जगणं स्वाभाविक आहे असं वाटलं असतं आपल्याला? कुणाच्या तरी दयेला, करुणेला आणि बर्‍याच वेळा घृणेला आवाहन करत जगत राहिलो असतो का आपण?अनेक प्रश्न… प्रश्न… प्रश्नांचं चक्रव्यूह. प्रत्येक प्रश्न चक्रावून टाकणारा… ती आपल्या मनाशी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक वेळी वेगळं उत्तर. त्या स्थितीतलं आपलं रूप ती नजरेसमोर आणून पाही आणि तिच्या अंगावर शहारा उठे.   शाळेत जाता- येता रस्त्यात दिसणारे भिकारी, रेड टेंपल चर्चच्या आसपास वावरणारे महारोगी ती आसासून पाहत राही. चपटी नाकं, थोटकी बोटं, सुजून धप्प झालेले हात-पाय, धूळ माखलेले विटके कपडे… कधी कुणी चाकाच्या गाडीवर, दुसरं कुणी गाडी ओढणारं… किंवा बसूनच फरफटणारे महारोगी, त्या प्रत्येकाचे चेहरे ती लक्षपूर्वक न्याहाळी. त्यांच्यापैकी कुणात आपलं साम्य आहे का, हे शोधायचा प्रयत्न करी. कुणाचे डोळे तिला आपल्यासारखे वाटत. कुणाची हनुवटी, कुणाचा रंग. यापैकी कोण असतील आपले आई-बाप. विचाराने तिचा थरकाप होई. अंगावरची सारी लव ताठ उभी राही.  शाळेत जाताना ती त्यांच्याकडे पाहत, थबकत, रेंगाळत जाई. तिचे त्यांच्याकडे लक्ष जाताच सारे भिकारी कलकलाट करू लागत, काही तरी मिळेल, या आशेने.   ‘ताई, गरिबाला दोन पैसे द्या. देव तुम्हाला श्रीमंत करेल. सुखी ठेवेल. ‘ तिला त्यांच्या या बोलण्याचं हसू येई. त्यांना पैसे दिले, तर देव श्रीमंत करणार म्हणे. मग देव सरळ त्यांनाच का पैसे देत नाही, तिला वाटे. पण असं असलं, तरी प्रभू येशूच्या उपदेशाचे संस्कार तिच्या मनावर होत होते. ‘दीन-दलितांचे दू:ख निवारण करा…. तुम्ही केवळ स्वत:साठी जगू नका. इतरांसाठी जगा. प्रभू येशू जन्मभर तेच करत राहिला. चर्चचे फादर आणि सिस्टर्स तेच करताहेत.फादर फिलीपनी रसाळ भाषेत केलेलं सर्मन तिला आठवे. मग तिला वाटे, त्यांच्या पसरलेल्या हातावर काही नाणी टाकावी. यांच्यातच कुणी माझे आई-बाप असतील. त्यांना घोटभर चहा घेता येईल. पाव-बटर खाता येईल. क्षणभर तरी त्यांच्या दु:खी-कष्टी चहर्‍यावर आनंदाची छटा उजळून जाईल, पण तिच्याकडे पैसे नसत. क्रेशमधून तिला आवश्यक ते सगळं मिळे. पुस्तकं, वह्या, शैक्षणिक साहित्य, कपडे. सगळं काही मिळे. पैशाची तिला कधी गरजच नसे. नाताळ, ईस्टर आशा काही प्रसंगी क्रेशच्या वतीने तिथे जमलेल्या भिकार्‍यांना मिठाई वाटली जाई. जसमीन ते वाटण्यात पुढाकार घेई.  ती मनातल्या मनात म्हणे, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो, तुम्ही मिठाई खा. तृप्त व्हा. रोज जेवताना जस्मीन प्रार्थना म्हणे, ‘प्रभू मला जसे सुग्रास भोजन मिळाले, तसे माझ्या आई-वडिलांना मिळो. तसेच इतरांनाही मिळो. आमेन…’    

आई-वडिलांचा उल्लेख ती आवर्जून का करायची, कुणास ठाऊक? पण तसा होत असे. सहवासाने प्रेम, आपुलकी निर्माण होते म्हणतात. तिला काही त्यांचा सहवास लाभलेला नव्हता. तरीही आपल मन त्यांच्या भोवतीच का घुटमळत राहतं. सतत त्यांचाच विचार का करतं, तिला काळत नसे. की त्यामागेही काही ईश्वरी संकेत आहे? तिला वाटे. आपली आणि त्यांची पुन्हा भेट होणार आहे का?  क्रेशमधील सारी जण तिच्यावर प्रेम करत. पण आपण इथे उपर्‍या आहोत, आपण मुळच्या त्या भिकार्‍यांमधल्या… ही भावना आपली जीवनकहाणी ऐकल्यापासून तिच्या मनात जी रूजली, ती तिला कधी उपटून टाकताच आली नाही.   जस्मीनला निरोप देण्यासाठी आज चार वाजता क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये एक छोटासा कार्यक्रम झाला. तिच्या अभ्यासू वृत्तीचं, नम्र, गोड वागणुकीचं सिस्टर मारीयानं खूप कौतुक केलं. ‘क्रेशाच्या सार्‍यांना तिचा अभिमान वाटला पाहिजे. शाळेतल्या सार्‍यांनी तिचा अनुकरण केलं पाहिजे…’ असा खूप काही काही बोलल्या त्या. जस्मीनलाही भरून आल्यासारखं झालं. कुठल्या कोण आपण? यांनी किती केलं आपल्यासाठी आणि आपल्यासारख्या अनेकांसाठी…. केवळ आपल्याला त्यांच्या कळपात ओढण्यासाठी? लोकं टीका करतात. इथल्या लोकांना बाटवण्यासाठी सारा उपद्व्याप आहे म्हणतात. पण, टीका करणार्‍यांनी, नावं ठेवणार्‍यांनी काय केलाय आमच्यासारख्या मुलींना आसरा, निवारा, सुरक्षितता लाभावी म्हणून? केवळ धर्मप्रसार करणं, एवढाच त्यांचा आंतरिक हेतू नाही, हे नक्की. निखळ माणुसकीचा झरा त्यांच्या हृदयात पाझरतो. प्रभू येशूच्या त्या देवदूताच्या संदेशावर, उपदेशावर त्यांची अपार श्रद्धा आहे. तो संदेश इतरांपर्यंत पोचवणं, म्हणजेच कळपात ओढणं की काय? आपल्या मातृभूमीपासून किती तरी लांब येऊन ते इथे राहिले. इथल्या लोकांची जमेल तशी सेवा केली. सार्‍यांना कुठे त्यांनी आपल्या कळपात ओढलय. आपण तर त्यांचे जन्माचे ऋणी….  फादर फिलीप आणि सिस्टर मारीया यांच्याविषयी अपार कृतज्ञतेची भावना तिच्या मनात उचंबळून आली. आपल्या भावना व्यक्त करायला जस्मीन उठली. पण आज तिला बोलायला शब्द सापडेनात. ती इतकच म्हणाली,’ या क्रेशनं मला घडवले. या क्रेशबद्दल माझंही काही कर्तव्य आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी इथेच येईन. इथे राहूनच मी लोकसेवेचं कार्य करीन. लेप्रसीवर अधीक संशोधन करायचा आपला मानसही तिने बोलून दाखविला. पुन्हा विचारांच्या उदंड लाटा तिच्या मनात उसळल्या. ती दिवास्वप्न बघू लागली.  

आपण परत आल्यावर एक छोटसं निकेतन निर्माण करायचं. महारोग्यांसाठी स्वच्छ नेटकी वसाहत आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी एक अद्ययावत हॉस्पिटल. क्रेशाच्या आसपास कुणी ‘लेपर’ असता कामा नये. कुणी भीक मागता कामा नये. प्रत्येकाने आपल्या वसाहतीत काम करावं आणि पोटभर जेवावं.  प्रभू येशू आपल्या निश्चयावर दृढ राहण्याचं सामर्थ्य देवो. पण आपण येईपर्यंत चार-पाच वर्षे तरी जाणार. तोपर्यंत इथली कोण कोण जीवंत असतील. त्यात आपले आई -वडील असतील का?  आपल्या हातून त्यांची थोडी तरी सेवा घडेल का?  

जस्मीनशी कुणी कुणी बोलत होतं. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी… तिच्या शाळेतल्या चिमखडया… सिस्टर्स, रूम पार्टनर … पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. हॉलमध्ये  समोर एक मोठं तैलचित्र लावलेलं होतं. त्या चित्रात प्रभू येशू कुणा स्त्रीला पाणी देत होता. खाली लिहिलेलं होतं, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.   तिला फादर फिलीपचं सरमन आठवलं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा. त्या पापी स्त्रीला प्रभूने दर्शन दिलं. आपले आई-वडीलही पापी होते का? त्यांना पाणी कोण देणार? येशूने त्या पापी स्त्रीला जवळ केले…. जीवंत पाणी दिले. आध्यात्मिक पाणी… तिची तहान कायमची भागली. आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यात डुंबत असतो. आकंठ. फादरनी  आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरतोय, इतकी तहान….   

क्रेशच्या बाहेर पडताना जस्मीनच्या मनावर या सार्‍या विचारांची गडद छाया होती. सुनीता तिला पुन्हा पुन्हा लवकर येण्याविषयी सांगत होती. ती जस्मीनबरोबर मुंबईपर्यंत जाणार आहे. जस्मीन टॅक्सीपर्यंत येते आणि बाकी सारे गेटजवळ. टॅक्सीचं दार उघडता उघडता तिला समोरच्या फुटपाथवर परिचित भिकारी दिसतात. आपले थोटे हात कपाळाशी नेऊन येणार्‍या–जाणार्‍यांची करुणा भाकणारे भिकारी. जस्मीन भिकार्‍यांपाशी येते. पर्समधल्या काही नोटा-नाणी ती प्रत्येकाच्या थाळ्यात, वाडग्यात टाकते आणि मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, माझ्या कार्यात यश यावं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’   जस्मीन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. ती हात हलवते क्रेशच्या गेटच्याजवळ उभे असलेल्यांच्या दिशेने आणि त्याविरुद्ध फुटपाथवर बसलेल्या भिकार्‍यांच्या दिशेनेसुद्धा.    

चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पाहत राहतात.

उज्ज्वला केळकर
वसंत दादा साखर 
कामगारभवन जवळ,
सांगली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: