मूठ माती

ओबड-धोबड खाचखळग्याचा रस्ता कापत गाडी पुढे धावत व्हंती. गाडीत निपचिप शरीराची
वळकुंडी करून पडलेल्या पमानं डोळे गच्च मिटले असले तरी गाडीच्या प्रत्येक गचक्यासरशी तिच्या आयुष्यातला एक एक गचका त्या गाडी सारखाच डोळ्यासमोर हेलकावे घीत व्हंता. खड्ड्यांनीच भरलेल्या आपल्या आयुष्याचा रस्ता आता तुडवायला नकं झालंय… पण ही माणसं का घीऊन चालले असतील? जगानं अव्हेरलेल्या जीवाला जवळ करणारी माणसं देवमाणूस असावीत‌. देव त्यांचं भलं करो.. त्यांच्यामुळेच माझ्या लेकराला.. तिला हुंदका दाटून आला. श्यामची कितीतरी रूप पिक्चरच्या रीळसारखी पुढे सरकू लागली…. तो तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला… आणि मागील काही काळाची उलथापालथीही… “आए …आए .” शामने तिला लाडीगोडीत हाक मारली.
“कारं बाळा ? तिने इस्टोंमधे रॉकेल भरता भरता थांबत विचारलं.
“आए, आपण येथे किती दिवस असच राहायचं? मला लय कंटाळा यीतुया बघ” तो त्वांड इवलेसे करत म्हणाला .तसं तिने त्यांच्याकडे चमकून बघितलं. “मरूपातुर” हे जीभेवर आलेले उत्तर तिनं तिथच अडविल. दैवाने सूड उगवलाय तो उगवलाय आपण वंगाळ बोलून ह्या जीवाला नकं दुखवायला. असं वाटून भरलेल्या पोत्याचे त्वांड शिवायला जसं दाबून धान्य दाबतात, तसं तिनं भरून आलेले दुःख तिथेच दाबलं. पण या पोराला आपण किती दिस दाबणार हाय? त्याच्या प्रश्नानांना किती खुटी उत्तर द्यायची ?
“आपण गावात का राहत नाही ?” तो
“गावातलं घर पडायला झालय” ती
“मला शाळत का घालत नाहीस?” तो
“आपण गरीब हाय, काय करायचं शिकून?” ती
“दादू, तात्या, काकी, सुमी कोण का येत नाहीत आपल्याकडं?” तो
“त्यांना लय काम हायती” ती
“आपण मामाकडे पण गेलो नाही किती दिस झालं!” तो
“तू बरा झालास की जाऊ” ती
त्याचा तो प्रश्न अणिक भडकलेल्या स्टोव्हचा भडका तिला भाजून करपून गेला. काय सांगायचं याला? तुला लय मोठा आजार झालाय… तुझा बाबा मेला.. म्या मारणार, तू पण मारणार… हे त्वंडात आलेलं शबुद ईस्टोचा पंप दाबत दाबत पार आत दाबला. एक दुःखाचा आलेला कढ गिळला. नुकत्याच उमलू लागलेल्या कोबांला सूर्याच्या आगीने खाक करावे तसं या पोराचं झालय. कोंबाचा तरु, तरुचं झाड व्हावं. फुले, फळे यावीत. जगायचा आनंद भरभरून घ्यावा. तर हा कोंब कवा कोमजतोय हीच पोटात भीती. ताडमाड बाप गेला. त्याच्यापुढे आम्ही काय? पालापाचोळा! कधी वावटीळ उठल मरणाचं, काय पण भरोसा नाय. आणि त्या वावटळीत होत्याचं नव्हतं व्हईल! देवानं असं का करावं? असला कसला ह रोग? माणसाला खातो तो खातो बायकापोरांना ही खातो! एवढं जहाल आहे का? माणसांनी आपल्याला इंथ वाळीत टाकलय… गावाभाईर.. इडस झालाय, इडस झालाय गावभर बातमी वार्‍यासारखी पसरली. तशी संमधी माणसं ऐगळ्याच नजरेने बघूनशान लागली कि ! परवा पातुर समद्यांच्या त्वंडी असणारे आमी, आम्हासनी बघून लोक त्वांड फिरवू लागली. कुजबुज करायची.. लांब लांब राहायची….. हळूहळू समद्यानीं संबंधच तोडलं. इचारांच्या तंद्रीतच चूलीवर पाणी ठेवलं. शामला उकळून थंड केलेले पाणीच द्यायची. त्वो सतत आजारी पडायचा म्हणूनशान.
‌”आए.. म्या नाय ऊन केलेले पाणी पिणार” म्हणत त्यानं माठातलं गार पाणी तांब्याभर घेतलं आणि गटागटा पिला. त्याला अडवायला ती उठली तेव्हा तो बाहेरच पळाला. दिवसेदिवस पोरगं हट्टी व्हायला लागलय. एक तर आजारी त्यात हा वनवास ! समद्यांनी कुसाभाईर काढलंय. काय व्हतं? काय झालं? कुठून यीऊन कुठं पडलो? सुखाची चादर फाटली आणि दुःखाच्या लक्तारात यीऊन पडलो…अणिक समदं चितारच पालटलं. नशीब !आणखी काय ? का जगायचं? कशासाठी जगायचं ? मराण यीपातुर जगायचं म्हणून जगायचं ! म्हणून रोज मरत जगायचं. मेलेले मन घीऊन कुठंपर्यंत वढायचं?
‌”पोरगा हाय तो पातुर” तिच्याच आतून कुठनतरी मग उत्तर यायचं… नाय असा ईचार करायचा. त्वो हाय तोपातुर तर नाय.
‌ आपल्या जीवाला त्याच्यासाठी जगवायला पाहिजल. आपल्यापरीनं करता यील तितकं करायचं त्याचं.समद्या जगानं पाठ फिरवली तर बेहत्तर ! पण जिवात जीव असुस्तर पोराला जपायचं.
‌ किती जपतुया तरी आजारी पडतूया सारखं! त्याला काही झालं की जीव तुटतोय तीळ तीळ! देवाला ईनवावं वाटतं माझं समद्यं आयुष्य त्याच्या वाट्यात घाल. मला उचल पण त्याला जगव.म्हणत तिने गणपतीच्या फुटुला हात जोडला.
“आए म्या नदीवर जाऊ?
“नक”
“म्या जाणार”
“नदीवर कशाला?”
“अंघोळ कराया”
“नकं तुला हिव भरतो मग”
“नाय म्या जाणारच, लई पोरं अंघोळीला असत्यात.. ती शाळेला सुट्टी आहे.
“नको.. तू नको जाऊ…” तिनं विचार केला पोरं याला जवळ नाही घ्यायची आणि पाण्यात भिजवून आजाराला सांगावा नको, तसा शामा रडायला लागला. ती हळूच जावून त्याला जवळ घ्याया लागली. तसा हाताला हिसका देत तो लांब पळत म्हणाला “हे नकं, ते नकं… इथं जाऊ नकं तिथं नाय जायचं… आता तुझं काय ऐकणार नाही.”
म्हणत तो धूम पळाला. हताशपणे ती डोस्काला हात लावून बसली. त्याची तर काय चूक? ह्या वयात खेळावं, हुंदडाव वाटणारच की! पण नशिबानच आमच्या बरोबर खेळ केलाय ! आता पोरांनी ह्याला नाय घेतलं तर लय जीवाला लावून घील. त्या काळजीतच ती घरातील कामे उरकू लागली.
चांगला सूर्य माथ्यावर आला तरीही श्यामा आला नाय तसा तिचा जीव टांगणीला लागला. दोन-तीनदा बाहेर जाऊन बघून आली. तरीही त्याची चाहूल लागना तवा पायात चप्पल सरकवून ती नदीकाठची वाट चालू लागली.
‌ मनात रस्ताभर वंगाळ विचार सुरुच व्हते. झपाझप पावले टाकत ती नदीवर पोचली. चिट्पाखरू पण नव्हतं. एक दोन म्हशी नदीकाठ चरत होत्या. तिचा जीव घाबराघुबरा झाला. कुठे गेला ह्यो?.. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट? परत कायमच त्याच्या मरणाची असलेली धास्ती दाटून आली. तसं तिने जोरात ‘शामा शामा’ म्हणून हाक मारली. पण कायच उत्तर नाय. भयाण सुनसान दुपारच्या रणरणत्या उन्हात जमीन तापलेली. झाडं-झुडपं म्हणून झाल्याली. पाखरं झाडामध्ये इसावली व्हती काय दखल आवाज पण नाय. नदीचं पाणी गपगार पुढं चाललं व्हतं. घामाने डबडबलेल्या त्वांड पुसत ती नदीकाठच्या वडाच्या झाडाखाली आली. तिथच बसकन बसली. तिथनं. समदा परिसर दिसायचा. श्यामला कुणी पाहिलं का ईचारावं म्हणून कुणी दिसण्याची वाट पाहू लागली. दूरवर दोन म्हशी चरत होत्या. पण बाकी कोणच नजरेला पडेना. नदीच्या पल्याड दोन बाया धुणी बडवत व्हंत्या. पण तिथपातुर आवाज पोहोचणार नाय वाटून ती परत सगळीकडे कानोसा घीऊ लागली. तसा तिच्या कानाने एक बारीक मूसमूसण्याचा आवाज टिपला जो झाडाच्या बुंध्याचा पलीकडून येत होता. त्या जीवघेण्या शांतीतील हा मुसमुसण्याचा आवाज आपल्या शामाचा हाय हे तिच्या माय काळजानं अचूक हेरलं आणि चित्त्यासारखी ती पलीकडे झेपावली. व्हंय तिचा शामच मुसमुसत व्हंता. त्याला समोर पाहताच तिच्या जीवात जीव आला.
शामा इथं का बसून राहिला? आणि रडत का हाईस? तिने त्याच्या जवळ बसत विचारलं. तसं तिच्या ध्यानात आलं त्याची कपडे वल्लीचिंब हायती. वल्ल्या कपड्यांनिशीच हा बसून राहिलाय. तिने लगबगीने बटन काढायला सुरू केलं.
“वल्ली कपडे काढ बघू आधी आणि बोल की काय तर! कपडं काढून तरी पाण्यात उतरायचं” तिचं त्वांड आणि हात एक सारखा सुरू व्हतं. समदी कपडे तिने काढली तसा तो तिला बिलगला. तिनं पदरानं त्याचं डोकं घसा घसा पुसलं.
“आय, मला पोरांनी त्यांच्यात नाय घेतलं पवायला” त्वो रडत रडत बोलला.
“तुला नगं म्हटलं होतं नव्हं म्या” ती त्याला कुरवाळत म्हणाली. “व्हंय” म्हणत त्यानं मान हलवली. ” मग तू वल्ला कसा झालास? “तिनं शंकेने इचारलं. “समद्यांनी मला वतातल्या डबक्यात टाकलं. नदीत नको इथं डबक्यात पाहून म्हणाले, तुला रोग झालाय.” त्यांचं बोलणं ऐकून तिच्या अंगाला कंप आला. डोस्क्यात ज्वालामुखी पेटला. त्याला छातीशी धरत हळूच उठवलं आणि रस्ता चालू लागली.
कला घासभर खाऊनशान झोपलाय बाराला. सांज व्हायला आली, अजुन उठला नाय. पोरांनं मनाला लई लावून घेतलेलं दिसतया. ऊठू दे आताच्या तरी पील ऊन ऊन. तिने दोन-तीन हाका दिल्या. पण तो काही उठला नाय. तशी ती जवळ गिली आणिक चादर वढली ‘उठ’ म्हणत. तरीही उठंना तवा तिनं घाबरून त्याच्या गालाला हलवायला हात लावला. आणि त्या चटक्याने चट्दिशी हात मागं घेतला. त्याचं अंग विस्तवा सारखं तापलेलं. गालाचा चटका थेट मनाला चटका लावून गेला. जी भीती पोटात व्हंती तेच झालं म्हणायचं. आता हे दुखणं किती दमवतया देवाला माहीत ! ती तशीच लगबगीने खुट्टीच्या पिशवीकडे गेली. तिथं अडकविलेल्या पिशवीतून पांढऱ्या गोळ्याचं पाकीट काढलं. एक गोळी जी डॉक्टरांनी ताप आल्यावर दवाखान्यात येईलपातुर द्यायला सांगितली होती ती काढून घेतली. पेल्यात च्या घेतला आणि शामाला उठून बसविला. चूळ भरायला लावून च्याबरबर गोळी दिली. आणि परत त्याला झोपवलं. ‌ह्याला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजं. हा विचार करत झंपरातून बारकं पाकीट काढलं. दहा दहाच्या तीनच नोटा. अजून ईधवा पेंशन मिळायला दोन दिवस हायती. जाण्‍या येण्या पुरतं तरी पैसे पायजेत. उद्या एक दिवस हाय. या गोळी वरच काढावा लागल. जीवनाच्या चुकलेल्या हिशोबाचं गणित, ताळमेळ ती आपल्या परीने घालीत होती. रातच्याला तिनं मउ मउ भात शिजवला श्यामसाठी. त्याला उठवून दोन घास चारले. पण त्याला उलटी येऊ लागली. तसे त्यांनं ताटली बाजूला सारली. घोटभर पाणी पिऊन त्यांन परत मुस्काट घातलं. कितीतर येळ ती त्याला थोपटत राहिली. डोळ्यातलं पाणी सांडत राहिली. दोन घास भात खायची पण तिला इच्छा राहिली नाय. तशीच त्याच्या शेजारी पडून व्हती… पैशाच्या इचारात. गावात जाऊन कोणाला मागावं का? नकच मागिंद्या एकदा अशीच नड व्हंती. कुणी नाय दिलं. लईच नड व्हती तवा. त्या कडू आठवणीनं परत तिला भरून आलं. नवऱ्याचा शेवट आठविला. काय काय केलं! हास्पिटलात नेलं.. पण काय उपेग नाय झाला. चार दिवसात संपलं समद्यं. तिथेच मशीनमध्ये त्याचं मडं जाळलं व्हतं. तिचं लक्ष कुडाला लावलेल्या तिच्या फुटुकडे गेलं. ती, नवरा आणि शामचा फोटु. फोटु काढू पातुर समद्यं कसं चांगलं होतं. तिथनं पुढे उभा टाकला दुःखाचा डुंगरच. समुद्राच्या लाटे सारखी ती ईड्सची लाट आमच्या घरात शिरली आणि वाळूचे घर वाहून जातं तसं माझं घर गेलं. हट्टाकट्टा नवरा बघता बघता कापूर हवेत उडावा तसा विरळत गेला. पण आजारापरीस लोकांच्या वागणुकीच्या ईषानच त्वो लवकर मेला असावा. लोकांना पै-पाहुण्यांना जवा माहित झालं तवा समजद्यांनी संबंधच तोडलं. गावपंचायतीने गावाबाहेर उचलबांगडी केली. रोगाच्या दुखण्यापेक्षा दिलेल्या डागण्या भयंकर व्हंत्या. त्याच्या विखारी नजरांनी चार दिवसांनी येणारं मरण आत्ताच्या यावा वाटायचे. गावाबाहेर राहायला धाडून समद्यानी संबंध तोडलं. कुणीही यायचं नाय. कुठे जायचं नाय, काय द्यायचं नाय. काहीच न्यायचं नाय‌ इतके दिवस ज्याच्या बिगर गावाचे पान हलत नव्हतं. त्यालाच झाडानं वाळकं पान गाळावं तसं गाळलं. समद्यी नाती असून बेवार्षी झालो. शेजारीपाजारी दुरावली. त्यांचं नाय काय वाटलं.. पण रक्ताच्या माणसांनी पण संबंध तोडावा? रक्त दूषित झाले म्हणून ! कवा कवा परश्न पडतो हा इडसचा किडा जास्त विखारी का समाजाचा ? आपण रेडिओवर टीव्हीवर ऐकलं, पाहिलं व्हंतं. एकामुळे दुसऱ्याला व्हणार हा रोग नाय. डॉक्टरांनी पण सांगितलेले. तरी लोकांनी असं वंगाळ वागावं! आपलं एक असू दे भोगू कसंतरी. ह्या नहानग्या जीवाचं मातेरं झालं. आमच्यासारख्या रोगीष्ठांच्या वठ्याला जन्माला येणं हाच त्याचा दोष. कवापण कायपण घडल या धास्तीने एक शिरशिरी अंगभर सळसळली.
तिनं त्याच्या केसातून हळूच हात फिरवला. त्याला पोटाशी घट्ट धरून त्याच्या मिठीच्या इळख्यात ती झोपी गेली. स्वप्नातल्या जगात पूर्ण ऐगळ्या जगात पुहचली व्हती. तिचं बाळ खंरच पोटात व्हंत. ती आनंदाच्या पावसात न्हाउन निघाली व्हंती. सगळीकडे माणसेच माणसे आणि तिचं कोडकौतिक. घर, गल्ली, गाव जिकडे तिकडे तोरण लावलेली. समद्यी जण येत व्हती, जात व्हंती. कुणी खायला, कुणी साडी, कुणी वटी घालत व्हतं. ती हौसेने घेत व्हंती.. लगबग.. वर्दळ… आनंद.. हसंणं.. बोलणं याला ऊत आलेला. ती झोपायात बसून उंच झोका चढवत चढवत वर गेली आणखी एकदम झोक्याची दोरी टुटली… तशी ती धपकन जमिनीवर आपटली. एकदम तिला दचकून जाग आली. तर सूर्यनारायण पांढरा सदरा घालून घरभर पसरला होता. आपण इतका येळ झोपलो ! तिचं तिलाच वाटलं. तिनं त्याच्या कपाळावर हात ठेवला ताप नव्हता. मंद-मंद स्वास सुरु व्हंता. तिला हायसं वाटलं. झोप लागली आहे उठवू सावकाशीने हा विचार करून ती उठली. झाडलोट, अंघोळ, पूजा पाणी आणायचं बरीच कामे तिने आवरली. तरी श्याम उठला नव्हता. चहा प्यायचं मनात असूनही शाम उठल्यावरच पिऊ या इचारानं तिने बाकी काम आवरली. तरी त्वो उठायचं चिन्ह दिसेना तेव्हा मात्र तीनं अंथरूणाची घडी घालत त्याला हाका मारल्या “श्याम उठ आता ‘च्या’ करतो.” पण दोन-तीन येळा हाक दीऊनही त्वो उठला नाय. तवा ती जवळ गीली. हा अजूनही निपचिप! काय बी हालचाल नाय. हालवलं तरी उठंना. परतेकयेळी सारखं घाबरऱ्याघुबऱ्या मनात हजार शंका नाचू लागल्या. तिनं नाकाजवळ ब्वांट नेलं…स्वास काहीच लागना. मग पांघरू काढून न शरट् बाजूला केला. छाती पण हलत नव्हती. समद्य शांत शांत. तिचा धीर चेपत चालला व
व्हता. धीर एकवटून तिनं कान लावला… पण काहीच ऐकू येत नव्हतं. छातीला हात धरून ती येड्यासारखं त्याला गदागदा हलवू लागली. पण कायच हालचाल नाय. सारं थंडगार… तिने हंबरडा फोडत त्याला पाठीपासून उचलले तर मान एका बाजूला कलंडली. तशी तिला खात्री पटली समद्य संपलय. आभाळाला भिडणारी किंकाळी रानात घुमली. “धावा… पळा… माझ्या बाळाला काय झालं बघा…कुणी तरी या हो…बघा हो.. शामा.. शामा” ती जिवाच्या आकांताने आर्त किंकाळ्या मारत व्हंती. पण ऐकायला कुणी कुणी नव्हतं. तिचा आरडाओरडा हवेत तसाच इरत व्हता. अडविलेला प्रचंड पाण्याचा बंधारा फुटावा तसा दुःखाचा पाणलोट येगाणं वाहणाऱ्या पाण्यासारखा वहात होता. कितीतरी येळ हा पाणलोट सुरू व्हंता. शेवटी थकूनशान तिनं रडं थांबविले. माणसाला किती संकट कुसळली तरी करतव्याचा इसर पडत नसतो… हेच खरं असावं. आभाळभर दुःख पोटात घालून पुढचं काय तर बघाया पायजल हे कळत व्हतं पण कसं? कायच उमजत नव्हतं. त्याच्या आजान त्वांडाकडे बघून तिला वाटलं बरं झालं गेला या जगातून. असं जगण्यापरीस सुटला एकदाचा. पण आपल्या अंधाऱ्या आयुष्यातील एकच उजेडी तारा होता तो पण निखळला. त्वो व्हता म्हणून जगलो ‌आता काय ह्याच्या शेवटच्या करतव्यातून पार पडू म्हणजे कवापण कुठेही जीव द्यायला पण रिकामं.
या विचारासरशी ती डोळे पुसत झट्दिशी उठली आणि गावाकडे चालू लागली. लोकांनी जरी तरी अशा टायमाला मदत करतील. पोराला अग्नी मिळल. या येड्या आशेने तिनं गाव गाठलं. जाताना रस्त्यात बऱ्याच वळखीच्या बायाबापड्या व व्हत्या… पण वळख नसल्यासारखी बघत होती. तिनं मोठमोठ्यानं वरडून हाका मारल्या. कुणी दार उघडलं की मदतीच्या अशेने आशाळभूत नजरेने बघायची. तोपर्यंत दार बंद व्हायचं. कोण बघून न बघितल्यासारखं करत व्हंतं. कुणी ऐकून तसेच पुढे निघून जात होतं. “माझं पोरगं गेलं हो मला सोडून… शेवटची मदत करा. त्याला मुठ माती द्यायला”. म्हणत ती गल्लीभर भिकाऱ्यासारखी पदर पसरून मुलासाठी भीक मागत होती. एक दोघी पाणावल्‍या पण मदतीला यायचा त्यांना धीर नाही झाला. सगळे जण जणू दगड झाली होती.
सदा गुरुजींना जरा पुढे यायचे धाडस दाखवलं तसं पोरांनं हाताला धरुन घरात वढलं आणि दरवाजा बंद केला. ही समद्या दरवाजाकडं लाचार व्हून हात पसरत व्हंती पण समस्यांनी मनाची दारे बंद केली व्हती. त्यात लाकडाच्या दाराचं काय? पसलेला पदर तसाच घीऊन ती हताश होऊन घराकडे वळली. बरं झालं असल्या जगातनं पोरगं गेले ते. आपण पण लवकरच निरोप घीऊ या जगातून../पण पोराला मुठमाती देऊनच.
‌लटपटत्या पायांनी, थरथरत्या अंगाने, भरलेल्या डोळ्यांनी, तिने घरात पाऊल टाकलं, समोर पाहते तर शामाच्या अंगावर मुंग्यां आणि माश्याच माशा श बघून सुद्ध हरपून दारातच कोसळली. किती येळ बेसुद्ध होती तिलाच कळले नाय. खूप येळानं गाडीच्या हार्नच्या आवाजाने खडबडून जागी झाली..मुंगी आणि माशांनी झाखोळलेल्या शामला बघून ती भराभर हुसकावू लागली. गाडी दारात थांबली .तसं तिनं आशाळभूत नजरेने बघितलं. गाडीतून दोन तीन माणसं आणि एक बाई उतरल्या. हे काय .. ही आपल्याकडेच येत हाईत! बघता बघता ती आत आली. आपल्या घरात कोणी पण येत नाही ही माणसा आली! आपण सपनात तर नाय?तिला वाटुन गेलं. ती आत आल्यावर हुंदके देत “तुम्ही कोण?” या नजरेने बघत राहिली. “आम्ही तालुक्याच्या ठिकाणाहून आलोय. “मदतीचा हात” या संस्थेकडून. आम्हाला कोणीतरी फोन केला होता तुम्हाला मदतीची गरज आहे म्हणून. “त्यांच्यातील एकाने आपणहूनच माहिती पुरविली. त्याचे शब्द ती जीव ओतून ऐकत होती. किती दिवसानंतर माणसं बघतोय असं तिला वाटलं. आशेचा एक पण दरवाजा उघडा नसताना या उघड्या दरवाजातून आलेली ही माणसं तिला देव वाटली. काहीच न बोलता गणपतीच्या फोटोला हात जोडलं आणि तशीच पुढे वाकून लांबूनच त्या माणसांच्या पाया पडू लागली. तसे त्यांच्यातील त्या बाई पुढे आल्या तिच्या खांद्याला पकडत उठवू लागल्या. तशी ती मागे सरू लागली “मला नका शिवू ..मला नक शिवू” इतकं दिवस मनात भरलेलं शिवाशिवीचं भय परत मनात तरळल. त्या बाईंनी मायने दोन्ही खांद्याना पकडून “मला काही होणार नाही, तुम्ही चला जागा दाखवा. आम्ही सामान घेऊन आलोय, तुमच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी” म्हणत श्यामच्या अंगावरचे कपडे काढायला सुरूही केले. दुसऱ्याने पाणी गरम करायला ठेवले. शामकडं आणि त्यांच्या धावपळीकडे ती आसवं गाळत मूकपणे बघत राहिली. पण डोस्क्यात विचारांचं थैमान सुरू व्हतं. आपण जितं असून पोराची ही गत झाली. आपलं काय व्हईल? किडे पडून मरू! आपण मेलेलं कुणाला कळल का? गावापासून दूर असणाऱ्या या घरात किडे मुंग्या अळ्या लागतील… आपल्या मढ्याला. कुजून सडल ते इथं.. रानभर वास पसरल. मग कवातर कुणाला तर कळल. मिळल का मढ्याला मूठमाती? का शिरतील गिधडं, घारी, कोल्हं लचकं तोडाया! का ती पण पाठ फिरवतील? काय दाखल ! इड्स झालेल्या शरीराला ते तरी जवळ करतील का नाय? का ते पण पाठ फिरवतील या समाजासारखंच… दूर लुटतील.. नाय नाय त्यापरीस आपण दोन दिवसानं पेनशन आल्यावर लांब समुद्राच्या गावाला जायचं… समुदरात संपवायचं जीवाला. इथं कुठं नकंच् .दोर …नदी ….. हीर या इचारांनं मात्र तिला तशा स्थितीत ही समाधान वाटलं. लवकर जगातून जाण्याचा पण आनंद असतो का काय माहित ?
‌गाडीतून आलेल्या सामान ओळखलं हळूहळू रचलं. लाकडाच्या गराड्यात तो बालजीव काढला गेला. लोक, भावकी, गणगोत, समाज मंत्र, फुलं ,उदबत्ती कसलेही कर्मकांड न करता एका सामाजिक जाणीवीतून एका संस्थेच्या हातून मोठं पुण्याचं काम सुरू व्हतं.
पेटलेली चिता जळून खाक होत चाललेली. पोराचं धडधडतं धड बघून काही छाणाआधी समुदरामधी जीव द्यायचा केलेला इचार मागं पडला आणिक त्या बाईंना हिसका देऊन त्या आगीत सवताला लोटू लागली. तशी त्यांनी तिला पकडून ठेवली. आग वाढत वाढत आभाळाला भिडली आणि सगळे जाळून हळूहळू शांत शांत गेली. तसा तिच्या काळजात उसलेला डोंब वाढून परत परिस्थितीपुढे शरण जात शांत व्हंत गेला त्या चौघांच्या गराड्यात !
तिला सावकाश घीऊन सगळी घराकडे परतली. तवा त्या बाईनी तिला सांगितलं “ताई आम्ही तुम्हाला बरोबरच घेऊन जाणार आहोत. इंथ तुम्ही एकटं नाही राहायचे” नाय नाय म्या कशी यीऊ तुमच्या बरोबर म्या पोराकडे जाणार” ती मागं सरत म्हणाली. तसा तिला आधार देत त्या म्हणाल्या “घाबरू नका, तुम्हाला काही त्रास कोणी देणार नाही देणार. धीर नका सोडू. औषधपाणी केलं की तुम्ही बरे व्हाल”.
“मला नाही बरं व्हायचं… मला नाही जगायचं…. असल्या जगात” ती तोंडाने, हुंदका देत भीताडाला डोकं आपटत म्हणाली. तसा त्यांच्यातला एक जण म्हणाला “आम्हाला कल्पना आहे तुमच्या मनस्थितीची. तुम्हाला काय त्रास झालाय याची. तुमच्या दुःखाची पण आम्ही हे सर्व तुमच्यासाठीच करत आहोत. नाहीतर काय गरज होती आम्हाला इथे येण्याची? तसं तिने एकदम उपकाराच्या नजरेने त्याच्याकडं बघत परत हात जोडलं. “तुम्ही आम्हाला हात जोडण्यापेक्षा, आम्ही हात जोडून सांगतो विश्वास ठेवा आणि एवीतेवी असंच आयुष्य संपवणार आहातच.‌… की नाही? मग तुमचा आयुष्य संस्थेच्या कामात घालवा. तुमच्यासारखे खूप जण आहेत.”
खरं आहे ही सांगतात ते पण ! त्यांना इथे यायचं काय काम होतं ? गावानं अवेहरलं… पण ही धावून आली. ती म्हणत्याती ते पण खर हाय. या शरीराला असंच संपवण्या परीस कोणाला उपयोग झाला तर बरं व्हईल. तिला शांत बघून त्या बायानी परत इचारलं “फार विचार नका करू, चला आमच्याबरोबर, इथं एकटं नाही राहायचं” ती काहीच बोलली नाही. तेव्हा तिची मूकसंन्मती गृहीत धरून चार कपडे, किरकोळ सामान गाडीत टाकलं. तिनं कुडाला अडकलेला त्यांच्या तिघांचा फुटू आणि गणपतीचा फूटू तेवढा काढून घेतला. आणि सावकाशीने त्याच्याबरोबर गाडी कडे गेली. गाडीत ती एका बाजूला बाकड्यावर बसली. गाडी तिथून बाहेर पडून गावाकडे धावू लागली. गावातून जाताना तिने खिडकीतून भाईर बघितलं. एक घर मागे पडत व्हतं…. हे आपलं सवताच गाव. ज्यानं गावा भाईर हकल़ंल आणि वळख नसलेल्या लोकांनी जवळ केलया. त्यांच्या शबुदासाठी जायचं. ती म्हणतात तसं घडलं तर जीव तोडून काम करायचं.
मेलेल्या, विझलेल्या डोळ्यात, आशेचा एक किरण सपष्ट दिसत होता. मनातच गावाला राम राम करत, ती बाकावर आडवी झाली. गाडी पुढे पळत व्हंती गाव पहात व्हंता. ती गाडीत निपचिप झोपली व्हती.

डॉ. राजश्री पाटील
मु/पो-खिद्रापूर,
तालुका -शिरोळ,
जिल्हा- कोल्हापूर

One thought on “मूठ माती

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: