हा माझा मार्ग एकला

बाकीच्या शिष्यमंडळींसोबत भानूदास पण चालत होता, चालता चालता त्याला ओळखीचं गाव दिसलं. खरंतर या गावात त्याला अजिबात जायचं नव्हतं, बाकीच्या शिष्यबंधूंना त्यांनी तसं सांगून पण पाहिलं, पण त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं जाताना त्या गावातून जाणं गरजेचंच होतं, दुसरा मार्ग नव्हता. अखेर नाईलाजाने तो त्या गावात शिरला.

गावात शिरताच त्याला सर्व आठवणी आल्या. दुपारी जेवणाची सोय एका धर्मशाळेत केलेली होती. सर्व शिष्यमंडळी थकून, भागून बसली असता भानूदासला राहवेना. त्याने हातात झोळी घेतली आणि आलोच म्हणून सांगून तो निघाला. गावातला रस्तानरस्ता त्याला पाठ होता. थोडेफार बदल झाले होते तसे. 20 वर्षांत तेवढे बदल होणारच ना? आपल्यातच किती बदल झालेत, आता आपल्याला कोणीही ओळखू शकणार नाही. आपल्या घरचे तरी ओळखतील का आपल्याला? जाऊन बघूच म्हणून तो धर्मशाळेतून बाहेर पडला.
घराच्या आसपास आल्यावर त्याला खरेतर भरते येत होते. जावे सरळ घरात आणि पण आता कोणत्या तोंडाने जायचं?
‘‘ओम भवती भिक्षां देही’’
त्याने जोरात आरोळी ठोकली आणि तीच हो तीच घरातून बाहेर आली होती. हातात भांड्यातून तांदूळ, सुट्टे पैसे. तिच्या मागोमाग एक छोटा मुलगाही बाहेर आला. आता वयोमानानुसार तिच्या केसात रूपेरी केस आले होते. पाचवारी साडी, थोडीशी स्थूल, मध्यम उंचीची, गोरीपान अशी ती तेव्हा किती तेजस्वी दिसत होती आता नाही म्हटलं तरी वयानुसार आणि कसल्यातरी काळजीत असल्यासारखी वाटत होती. कपाळावर भलं मोठं कुंकू पाहून त्याला आनंद झाला आणि तो खजीलही झाला. मनात थोडा संशय आला, पण त्या संशयाला त्याने झुगारून लावलं त्याची त्यालाच लाज वाटली.
‘‘ए बाबा, कसल्या विचारात हरवलास? घे हे लवकर झोळीत, मला कामं आहेत.’’ तिच्या आवाजात जरब होती. आता हिला काय म्हणू? त्याने विचार केला, थोडा वेळ अजून थांबलं तर निरीक्षण करता येईल.
‘‘माय, हे तांदूळ घेऊन कुठं शिजवू? आम्ही दारोदार भटकणारी भक्तमंडळी, त्यापेक्षा कपभर चहा किंवा भाकरतुकडा दिलास तर चालेल.’’ त्याने शक्य तितका आवाज बदलायचा प्रयत्न केला. तरी ती एकटक त्याच्याकडे बघत बसली. तिला शंका येतेय हे कळताच त्याने तिथून पोबारा करायचा विचार केला, तेवढ्यात ती म्हणाली.
‘‘बस तिथं झाडाजवळ, चहा देते घोटभर.’’
तो दारातून डोकावून बघत होता,
‘‘आता काय घरात येतोस का?’’ तिनं रागानं विचारलं.
‘‘नाही ते आपलं. चोरी-मारी करायचा विचार असेल तर माझ्यासारखीच्या घरात ते शक्य नाही आधीच सांगून ठेवते.’’
‘‘माय, तुला मी तसा दिसतो का? नको तुझा चहा मला.’’ तो जरा खालच्या आवाजात म्हणाला.
‘‘तसं नव्हे, वाकून बघतोयस म्हणून म्हटलं. बस आता तिकडे झाडापाशी दुपारच्या जेवणाच्या वेळी आलायस चहा मागतोयस दिला नाही तर मला पाप लागेल. बस पाच मिनिटं.’’ ती चहा द्यायला आत वळली, तोवर छोटा नातू बाहेर आला होता.
‘‘आज्जे, हे कोण आहेत ग?’’ त्याने विचारले.
‘‘तू आत चल मग सांगते.’’ तिने त्याला दटावले.
खरंतर त्या मुलाला बघायचं होतं, कसा दिसतो, कुणाचा असेल? पण तोही आज्ञाधारक तिच्या मागोमाग आत गेला.
पाच मिनिटांनी ती चहा घेऊन आली.
‘‘माई, तो नातू काय तुमचा?’’ त्याने विचारले. तो आवाज ऐकून तिला कससंच होत होतं, त्याची चौकशी कितीही बदलून काढलेला आवाज तिला चिरपरचित वाटत होता. पण तिने थोडं दुर्लक्ष केलं. कारण असा भास तर तिला नेहमीच होत असे, कोणीही परका माणूस जरी आला तरी तोच असेल का? असं तिला सतत वाटत असे. घराबाहेर बसूनच त्याने चहा घेतला, तीही त्याचं निरीक्षण करीत होती, पण घरात मुलगा-सून नव्हती त्यामुळे तिने जास्त धाडस दाखवलं नाही, पण धाडस करून विचारलं,
‘‘तुम्ही कुठचे?’’
‘‘आम्हाला नाव-गाव काही नाही, आम्ही फक्त शिष्य सद्गुरू स्वामींचे.’’
‘‘तरी पण आत्ता कुठून आलात.’’
‘‘धर्मशाळेत उतरलोय, संध्याकाळी दुसर्‍या गावाला जाणार.’’ गावाचे नाव सांगायचे त्याने टाळले.
परक्या माणसाला जास्त प्रश्‍न विचारणे पण तिला सोईचे वाटेना. तिनेही विषय तिथंच थांबवला. त्यानेही आता जास्त वेळ इथं थांबलो तर आपलं मत पालटेल हे जाणले आणि तो तिथून निघाला.
धर्मशाळेत आला आणि त्याला आठवू लागला पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ. सरस्वती आणि आपलं लग्नं झालं. आता दिसत होती त्यापेक्षाही सुंदर दिसायची सरस्वती. लग्नानंतर किती छान दिवस होते, एक मुलगा झाला त्याचं नाव गजानन. त्याचाच तो मुलगा असावा बहुतेक. भानूदासला वाटलं. आपलं खरं नाव सीताराम, पण आता या महाराजांनी ठेवलेलं नाव भानूदास.
चांगला सुखाचा संसार चालला होता, जवळच्या गावात एक दुकान टाकलं होतं, दुकानही छान चाललं होतं, एक दिवस दुपारची वेळ होती. शहरातून एक बाई आली होती, ती दुकानात शिरली. भराभरा सर्व वस्तू घेऊ लागली. त्याचं दुकान होतंच तसं छान. टिकल्या, बांगड्या, नेलपेंट, मेंदी सर्व वस्तू भरपूर भरलेल्या. त्याला वाटलं चांगलं मोठं गिर्‍हाईक पटलंय. कारण दिसत तर होती सुस्थितीत.
‘‘ताई, हे घ्या, ते घ्या.’ म्हणत त्यानेही भरपूर वस्तू दाखवल्या. दुकानातला कामगारही त्या दिवशी रजेवर होता. हा एकटाच दुकानात.
वस्तू घेतल्या आणि आता पैसे देण्याची वेळ येताच ती म्हणाली,
‘‘दादा, जरा माझ्या हातात बांगडी चढवा.’’ त्याने बांगडी चढवायला घेताच तिने हात घट्ट धरला. आणि आरडाओरडा केला,
‘‘याने माझा हात धरला.’’ लगेच शेजारपाजारच्या दुकानातील लोक धावत आले. खरंतर सीतारामला सर्वच ओळखत होते, ती बाई नवखी होती, पण त्याचं नशीब खराब होतं, लोकांनी काही विचार न करता त्याला मारलं. सीतारामच्या मनावर परिणाम झाला आणि तो तिथून पळून गेला तो कायमचा.
मार खाऊन जखमी झालेला तो एका पायरीवर झोपला होता, ती पायरी नेमकी एका मठाची होती. स्वामीसमर्थांचा मोठा आश्रम तिथे होता. तिथल्या गुरूंनी रात्री त्याला पाहिलं त्याला आत आणलं. त्यांनी थोडाफार प्रकार जाणला आणि थोडे दिवस काळजी घेतली, त्याला बरं वाटल्यावर ‘घरी परत जा’ असा सल्लाही दिला, पण आश्रमातल्या वातावरणाने आणि त्याच्यासोबत झालेल्या प्रकाराने त्याला विरक्ती आली होती. तो जो गेला तो कायमचा आणि आज इतक्या वर्षानंतर परत आपल्या घराजवळ यायची त्याची वेळ आली होती.


इकडे भानूदास चहा पिऊन गेल्यानंतर सरस्वतीच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहू लागल्या. खरंच सीताराम असावेत का ते? तिला सारखं वाटत होतं, तेच असावेत. थोडेशी वयोमानानुसार तब्येत वाढली असेल, पण दाढीमिशा आणि वाढलेले केस यामुळे चेहराही दिसत नव्हता. असा कसा निघून गेला हा माणूस?
आणि तिला जुनं सर्व आठवू लागलं. थोड्याच वेळात तिला सर्व हकिकत कळल्यावर ती दुकानाशी गेली, तर सर्व वस्तू इतस्तत: पडल्या होत्या. लोकांनी त्याला मारलं होतं त्यामुळे तो तिथून निघून गेला होता, तिनं सर्व दुकान आवरून कुलूप घातलं. मुलगा 7-8 वर्षांचा होता, आज येईल-उद्या येईल म्हणून वाट बघत महिना घालवला आणि शेवटी महिन्याभराने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने दुकान सुरू केलं.
दुकान परत चांगलं चालू लागलं. तिचा उदरनिर्वाह होत होता, पण सीताराम मात्र परत घरी आला नाही. आता मुलगाही मोठा होऊन दुकान चालवत होता त्याचाच लहान मुलगा घरात होता. दुपारी जेवायला मुलगा घरी आल्यावर सरस्वतीने त्याला सर्व कहाणी सांगितली. मुलाला खरंतर वडिलांबद्दल राग होता, की आपल्याला असे वार्‍यावर टाकून गेले, तरी मनात कणवही होती, की त्यांचा दोष नसताना त्यांच्यावर अशी वेळ आली.
‘‘आई, चल आपण बघून येऊया.’’ म्हणून ती दोघं न जेवताच त्याने सांगितलेल्या धर्मशाळेत गेली.
तिथे बाकी सर्व शिष्यमंडळी होती, पण भानूदास दिसत नव्हता. तिने त्याचे वर्णन सांगून चौकशी केली असता तो पुढे निघून गेल्याचं कळलं. मग सरस्वतीची खात्रीच झाली की, नक्की तो सीतारामच असावा. तिचा मुलगा आणि ती तो निघालेल्या दिशेने गाडीवरून निघाले. दूरवर चालणारा सीताराम त्यांना दिसला.
गाडी आडवी लावून त्यांनी त्याला थांबवलं त्याबरोबर सीताराम आणि सरस्वती दोघांचाही बांध फुटला. मुलगा एकटक त्यांच्याकडे बघत बसला. थोडा वेग ओसरल्यावर सीतारामने मुलालाही जवळ घेतलं. त्या दोघांनी त्याला घरी चलण्याविषयी खूप आग्रह केला, एक क्षण सीतारामलाही मोह झाला, पण तो म्हणाला,
‘‘आता मला परत या मोहात अडकवू नका. तुमचा माझा मार्ग वेगळा, मला वाटलंच होतं की तू मला ओळखशील आणि माझा शोध घेत येशील म्हणून मी तिथून निघालो होतो, पण तरीही वेडी आशा होती, की तुम्ही माझा शोध घेत याल.’’
‘‘झाली तेवढी ताटातूट पुरे नाही का झाली? तुमची काही चूक नसताना तुम्ही प्रायश्‍चित्त भोगत आहात, आता घरी चला.’’ सरस्वतीने पदर पसरला.
‘‘सरस्वती, मी घरी आलो ही खरंतर माझी दुसरी चूक आहे, पण तुला आणि गजाननाला बघण्याचा मोह मला आवरला नाही, मी चुकलो, पण आता मला परत या संसारात अडकवू नका, मी माझा मार्ग स्वीकारला आहे.’’ असं म्हणून तो आपल्या मार्गाने पुढे निघून गेला.
सरस्वती आणि गजानन त्यांच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे पाहातच राहिले.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: