खुमखुमी

ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. तसं आमच्या डोंगरवाडीचं वातावरण नेहमीसारखं तापू लागलं. भावकी, आळी, नातंगोतं अन् खाजगी देणघेणं अशा संबंधातून सरळ सरळ गावाचं दोन तुकडं झालं. शेतात खुरपणीला जाणाऱ्या बायकाही आपल्याच पार्टीच्या माणसाकडं जावू लागल्या.
गावातला नासका नारळ म्हंजी सदा काळतोंडे. तसं गावात काळतोंड्याचं एकच घर, पण त्याच्या घरचा एक मेंबर ठरलेलाच असायचा. प्रत्येक निवणुकीत दोनच पॅनल. भिकूशेठचा एक तर दुसरा असायचा तुकानानाचा. नेहमीसारखं दोन्ही बाजूच्या उभे उमेदवारांनी फॉर्म भरलं, चार दोन दिवसात त्यांना निवडणूक चिन्हही मिळालं, अन् घरोघरी जाहिराती व पोस्टर झळकाया लागलं. तशी सदा काळ तोंड्याची उलाघाल सुरू झाली. गावात काळतोंड्याचं एकच घर होतं, पण सदा काळतोंड्याची तिन्हीही पोरं वेगळी राहू लागल्याने यावर्षी चार घरं दिसू लागली. पण यावर्षी गंमतच झाली. दोन्ही पॅनलवाल्यांनी सदा काळतोंड्याला वगळूनच पॅनल बनवला. तशी त्याच्या जीवाची नुसती लाही लाही झाली. त्याला राजकारणाचं भलतंच वेड, पण पक्ष आणि पार्टीचं मात्र त्याला काहीच सोयरसुतक नसायचं. जिकडं खोबरं तिकडं चांगभले म्हणायची सवय. सुरुवातीला एकाचा प्रचार जीव खाऊन करायचा. दुसऱ्याचा जोर दिसला की मधीच पलटी हाणायचा. निवडून तिसराच आला तर त्याचाच गुलाल उधळून मिरवणुकीत नाचत सुटायचा. तसा राजकारणाचा त्याचा बऱ्यापैकी अभ्यास नसला तरी तो तसा भास निर्माण करायचा. प्रादेशिक सगळ्या राजकीय पक्षप्रमुख, मंत्री व आमदार खासदाराचे वाढदिवस त्याला माहीत असायचे. अशा बड्या व्यक्तीच्या वाढदिवसाचा होर्डिंग तयार करून त्याचा ऐटबाज फोटो त्या बड्या व्यक्तीच्या बरोबर पाहताना सामान्य माणूस हबकून जायचा. त्याच्याकडे पक्षभेदही नव्हता, भले तो कोणत्या का पक्षाचा असो त्याला फक्त त्या व्यक्तीच्या शेजारी आपली छबी दिसली की तो खूष असायचा.
तशी आमची डोंगरवाडी म्हणजे जेमतेम दीडदोनशे उंबरा, पण प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र असायचेच. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या गावपातळीवरील अध्यक्षांची मोजदाद केली तर आमच्या एकट्या वाडीत बत्तीस अध्यक्ष होते. महाराष्ट्रात नसलेल्या पण इतर राज्यात असलेल्या प्रादेशिक पक्षाचाही आमच्या गावात अध्यक्ष असायचा. मग त्या त्या नेत्याच्या वाढदिवशी सदा काळतोंडे त्या अध्यक्षाकडून बिदागी वसूल करायचा. नेत्याशेजारी स्वत: चा फोटो काढून घ्यायचा आणि वर्गणीदारांची नावे सौजन्य म्हणून सर्वात खाली ओळीने लिहायचा. असा नेत्याशेजारी स्वत : चा फोटो असलेलं होर्डिंग बघून मनातून खूष व्हायचा. त्यामुळे सदा काळतोंडे नेमका कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे हे गेल्या पंचवीस वर्षांत कोणालाच समजले नव्हते.
त्याची ही राजकीय चाल आता नवीन पिढीच्या लक्षात आल्याने दोन्ही पॅनलवाल्यांनी त्याला सोडून दिले, पण त्याची राजकीय खुमखुमी त्याला स्वस्थ बसू देईना. निवडणूक लागली तसा खादीचा ड्रेस व खादीची चोचवाज कडक टोपी घालून सदा काळतोंडे वाडीत फिरू लागला. निवडणूक रंगात आली तसा भिकूशेठच्या पॅनलचं होर्डिंग गावात झळकू लागलं. पॅनल प्रमुख म्हणून भिकूशेठचा फोटो अन् त्याखाली सात उमेदवाराचे फोटो. त्यात सदा काळतोंडनं आपला फोटो नाही हे पाहिल्यावर तो हातपाय आपटीतच भिकूशेठला विरोध म्हणून तुकानानाच्या कचेरीत पोहचला.
निवडणूक कचेरीसमोर तुकानानानेही मोठ होर्डिंग लावलं होतं. त्यातही तुकानाना व सात उमेदवारांचेच फोटो पाहता सदा काळतोंड्याच्या अंगाचा भडका झाला. जाणून बुजून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला डावलंय हे ध्यानी घेऊन पुन्हा हातपाय आपटतच घराकडे फिरला. दोन्ही पॅनलमधले कार्यकर्ते सदा काळतोंडेकडे पाहून फिदी फिदी हसत. याला काही तरी उत्तर कृतीनेच द्यायला हवे म्हणून काळतोंडेची झोप गुल झाली अन् एक सुपीक कल्पना त्याच्या डोक्यातून प्रसवली.
बघता बघता आठ दहा दिवस सरले. निवडणूक झाली. निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानन्यासाठी मुख्य चौकातच पुन्हा नव्याने होर्डिंग लावले. तुकानानाच्या पॅनलचा बोर्ड मारुतीच्या देवळापुढं उजव्या बाजूला तर भिकूशेठच्या पॅनलाचा डाव्या बाजूला.दुसऱ्या दिवशी सकाळी लोकं घाईघाईतच मारुतीच्या देवळापुढून थेट वेसीपर्यंत जायची अन् तिथंच घुटमळायची.दोन्ही पॅनलच्या बोर्डाकडे कुणीही डंकूनदेखील पाहिना. तुकानानाला जसा हा प्रश्न पडला तसा भिकूशेठलाही. मग दोघेही वेशीतल्या गर्दीत जावून डोकावून बघताच त्यांनाही जबरदस्त धक्का बसला.
वेशीसमोर मोठं होर्डिंग लावलं होतं. त्यावर लिहिलं होतं…
“आमचे मित्र श्री.बराक ओबामा यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.”
एका बाजूला ओबामांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला सदा काळतोंड्याचा फोटो. सदा काळतोंडेच्या फोटोखाली लिहिले होते,
“सदाभाई काळतोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य. डोंगरवाडी.” असं हे चमत्कारीक मजकुराचं होर्डिंग बघून दोघांनी आश्चर्याने तोंडात बोट घालण्याऐवजी किती तरी वेळ ते नुसता अंगठाच तोंडात घालून एकमेकाकडे नुसते पहातच राहिले.

सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: