सय

बदली झाल्याची वार्ता ऐकली आणि मी सुन्न झाले. चांगल्या शहरातून छोट्या तालुक्याच्या गावाला बदली होण्याचे काय दुःख असते ते बदलीवाल्यांनाच ठाऊक !
एका रविवारी संध्याकाळी आम्ही त्या गावात दाखल झालो. आदिवासीच भाग. त्यांचेच छोटे छोटे घरं. रस्ते नाहीच. लहानशी बाजारपेठ. ह्यामुळे प्रथमदर्शनी तरी त्या गावाबद्दल मत वाईट झाले. शहरातील स्वच्छ मोठे रस्ते, उंच इमारती, आम्ही रहात असलेली सुरेख काॅलनी डोळ्यापुढे तरळून गेली.
आम्हाला घर मात्र खूपच छान मिळाले होते. गुजराथ हद्दीवर गाव असल्याने विशेषकरून गुजराथी लोकच जास्त! त्यामुळे त्यांचे पक्के बांधकामाचे, मोठमोठ्या खोल्या असलेले घर होते. गुजराथी भाषा तशी कळायला सोपी ; पण बोलता येईना ! अशा घरात आम्ही आमचा सामान आणून टाकला.
दुस-या दिवशी जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने ! कावळे, पोपट, चिमण्या यांच्या आवाजाबरोबर आणखीन एक फड् फड् फड् असा अपरिचित आवाज आला. रात्रभर नव्या घरात झोपही नीटशी आली नव्हती. झोपावसं वाटलं पण त्या फड् फड् ची हुकमतच अशी होती की, पांघरुण फेकून मी उठून बसले आणि मला जाग आणणारे स्वर नव्हेच…. मोठमोठ्याने आवाज करणारे कोण ? कुठून येतात म्हणून गॅलरीत येऊन उभी राहिली.. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात सारं स्वच्छ दिसत होतं.. घरासमोरच मोठमोठाले ओळीने तीन लिंबाचे वृक्ष होते आणि त्या वृक्षावर बगळे बसलेले होते …पण किती ? पूर्ण वृक्षराजी जणू काही पांढरीच .! हिरव्या पानांचा मागमूसही नव्हता …एवढ्यात पुन्हा तो फड् फड् असा जरब आणणारा आवाज ! आणि त्या जरबेतसुध्दा एक प्रकारचा गोडवा .!
त्या बगळ्यांना न्याहाळता न्याहाळता वर्षाॠतू असूनही वसंतॠतुच्या आगमनाची चाहूल नव्यानेच लागली आणि त्यादिवसापासून तो वृक्ष आणि बगळे तेथील वास्तव्याचा एक भाग बनले.
पहाटेची जाग त्यांच्या चैतन्यपूर्ण फड्फडीतून यायची. दिवसाची सुरुवात ते आपल्या सु-दर्शनाने करून द्यायचे. ते गाव डोंगराच्या कुशीत पहुडलेले असल्याने तेथे पाऊस भरपूर पडायचा. गॅलरीत उभे राहिले की, दूरवर पसरलेला हिरवागार डोंगर दिसायचा, नदी गावाला वळसा घालून जाताना दिसायची ; पण ह्या सर्वांपेक्षा अप्रूप होते ते बगळ्यांनी वस्ती केलेल्या लिंबराजाचे ! त्यामुळे प्रत्येक दृष्टिक्षेपाबरोबर नवं काहीतरी सुचायचं ,स्फुरायचं ! नव्या कल्पना पिंगा घालायच्या. नवीन गाव…ओळखी फारशा नाही …शेजारी बोलू म्हटले तर भाषेची अडचण ! अशा वेळेस माझ्या एकाकीपणावर उतारा मिळाला…. सुरुवातीचे माझे एकलेपण त्या बगळ्यांच्या सहवासात निवळत गेले .
हळूहळू गावात ओळखी होऊ लागल्या .मलापण तितकेसे रितेपण जाणवेनासे झाले. दरमहा नव्याने येणा-या नव्या वस्तूंनी नवतीचा संसार जसा भरून जावा तशी माझी गॅलरी फुलझाडांच्या रूपाने बहरून गेली.. हे सर्व त्यांच्याच साक्षीने ! त्यांची कितीतरी रूपं माझ्या मनावर कोरली गेली आहेत.
भर पावसात संततधार झेलत असलेले हे हिरवे वृक्ष म्हणजे हिरव्या शालूत मंगळागौर पूजणा-या नवोढेसारखे भासले ….आणि बगळे म्हणजे…पावसात खूप खेळल्याने हुडहुडी भरल्यावर काकडत बसलेल्या अवखळ मुलासारखे ! स्वच्छ सूर्यप्रकाशात दिसणारे त्यांचे लडिवाळ रूप ! संततधारेत शांतपणे पहुडलेले श्रांतरूप ….! ती सगळी रूपं मला परिचयाची झाली होती….शेजारी आलेली पाहुणी आपली जीवाभावाची सखी व्हावी तसा त्यांचा सहवास मला चांगला परिचयाचा झाला होता.
काळाच्या चाळणीतून दिवस, महिने गळून पडली अन् असाच एक दिवस उगवला….नेहमीपेक्षा वेगळा…मला चांगला परिचयाचा फड् फड् असा आवाज ऐकू आला नाही ….राजेमहाराजांना म्हणे ‘भाट’ उठवत ! मला त्यांच्या आवाजाने गेले तीनचार महिने जाग येते आहे. आणि ….आणि ….आजच काय झाले …..म्हणून झटकन उठून बाहेर गॅलरीत येऊन झाडाकडे पाहिले तर काय ? ….तेथे एकही बगळा नाही…. मन एकदम सैरभैर झाले …माझ्या भावविश्वाची नेटकी घडी पार विस्कटून , मोडून गेली .शेजारच्यांना विचारले तर त्या म्हणाल्या बगळे गेले म्हणजे पावसाळा संपला. आता ते परत पुढच्या पावसाळ्यातच येतील !
त्या अबोल सुहृदाच्या विरहाच्या कल्पनेने कमालीचं रडू फुटलं. निदान जातांना तरी निरोपाची किलबिल करायला हवी होती ! त्यांची ” सय ” ..अबोल सहवास आजही माझ्या मनात ताजा आहे.

निर्मला देशमुख

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: