नानाची टांग

डोंगराच्या पाण्याला बसलेली फणसेवाडी म्हंजी शंभर उंबऱ्यांची वस्ती, पण लईच करामती. तरी सुध्दा अशा वाडीत पवाराचा कोंडनाना अन् खालच्या आळीचा पांडतात्या हे जुनं कारभारी. गावातून तंटा कधी बाहेर गेला नाय. हे दोघं सांगतील तेच घडायचं. त्यांचा आदेश म्हंजी हायकोर्टाचा आदेश, अशी लोकं समजायची. हे दोघंबी गावकारभारी असल्यामुळं त्यांच्या पोरांनी गुमान शेती केली. पण त्यांचं नातू मात्र त्याचा वारसा चालवाया गावचं नवं पुढारी म्हणून मिरवाया लागलं.
कोंडनानाचा नातू संतूशेठ व पांडतात्याचा नातू जग्गू शेठ, लोकं तोंडावर जरा शेठ म्हणत असली तरी त्यांच्या मागं त्यांचा संत्या व जग्या म्हणून उद्धार करायची. त्यांचं वागणं बोलणं पाहून देवळात पथाऱ्या टाकून गप्पा मारणारं म्हातारं मंडळ नेहमीच म्हणायचं,
“काय ओ, मोळाच्या पोटी केरसुण्या जन्माला आल्यात.”
दोघांचंबी अडल्यानडल्याकडं बारीक लक्ष. कोणी एखादा पैशापाण्याला नडला की त्याच्याकडंचं कमी किमतीत कसं लुबाडता येईल याच्यावर त्यांचा डोळाच. कोणी काहीही खरं बोलला तरी यांचं तेच खरं असं समजून खोट मुद्दाबी रेटून खरं असल्याचं सांगायचं. शिवाय ‘लावायची का पैज?’ असं म्हणून टाळी घेण्यासाठी हात पुढं करायचा अन् बेचव हसायचं. शहाणा माणूस आपलाच मुद्दा सोडून काढतापाय घ्यायचा, तसं दोघबी एकमेकाला टाळी देवून हसत सुटायचं.
या दोघाचंबी लई पटत व्हतं असंबी नव्हतं. दोघंबी एकमेकांव कडी करायचे. पण तिसऱ्याला लुबाडायचा विषय असला की दोघांचीबी एकजूट व्हायची.
एकदा असंच झालं, रामा खोताची बायकु आजारी पडली. दवाखाण्याचा खर्च हाताबाहेर गेला. लोकं नुसतीच हळहळ करायची पण कोरडी सहानुभूती काय कामाची? या जोडीला म्हणजे संत्या व जग्याला या गोष्टीचा सुगावा लागला. तसं त्यांनी रामा खोताला भेटून हळहळ व्यक्त केली.जाता येता विचारपुस सुरूच होती.
एक दिवस यांच्या अंदाजाप्रमाणे रामाखोतानी त्यांच्याकडं पैसे मागितले.
“देवूकी, पण किती? कसं? हे ठरवाया नको का? स्पष्ट बोलून झाल्यालं बरं.”
खोत विचारात पडला, गरज तर हायेच, पण हे दोघंबी हातावं पैसे देणार नाय. हडप ठेवायाबी जवळ काहीच नाही. सांगून तर बघावा म्हणून खोत बोलला,
“जगूशेठ, उसाचा हप्ता बँकेत टाकलाय म्हणत्यात. आठ – पंधरा दिसात परत करीन, पण पंधरा हजाराची नड तेवढी सावरा एकवेळ!”
“विचार करून सांगतो!”, म्हणून जगूसेठ तिथून सटकला. त्यांनी संतूशेठला सांगताच संतूने खोताला गाठला.इकडच्या – तिकडच्या गप्पा मारून मूळ मुद्यावर आला,
“पैशाबद्दल जगूशेठला बोलला व्हता व्हय? आवं खोत, एवढी मोठी रक्कम कोण हातावर देतो काय? एखादी जिन्नस असेल तर विकून टाका.जगला गडी तर बांधील माडी.जिवापेक्षा काय आपरुक असतं व्हय?”
“तसं मोडाया घडायाबी काही बदल, नाहीतर ते बी केलं असतं.”
तसा संत्या गालात हसत बोलला,
“नाय कसं? मोटारसायकल कटवायची. एक्सचेंजवाले आज आणली की उद्या अर्धीच किंमत देतात. इथं तसं नाही, गाडी कोरी हाये म्हणून वीस हजार द्यायला सांगतो. एवढं कुठंच मिळायचं नाय.”
नाइलाज झाला म्हणून खोतांनी व्हय भरून नड सावरली.गाडी घेऊन संत्या थेट जग्याकडं गेला. खोताचं उसाचं पैसे चौथ्या दिवशीच जमा झालं,पण आता उपयोग नव्हता. वाघाच्या जबड्यात हात तरी कसा घालायचा?खोत कपाळाला हात लावून वट्यावर बसला होता. त्याला पाहून सातव नाना त्याच्याशेजारी येऊन टेकला. बोलता- बोलता मोटारसायकलची हकिकत त्याला समजली.नानालाबी वाईट वाटलं. नाना तसा गरीब कुटुंबातला, पण स्वाभिमानी. तसा करामतीबी !त्याचा एक पाय अधू होताच, पण डोळ्यातबी चकना होता. एखादी शक्कल तो असा लढवायचा की पुढच्याचा खिमाच. पुढच्या माणसाला असा अचूक शालजोडीतून मारायचा की चार माणसात तो इरामलाच म्हणून समजायचं.
थोडा वेळ इचार करून नाना बोलला,
“तुझी मोटारसायकल वीस हजारात नेली. मी पंधरा हजारात तुला परत आणून देतो. दे पंधरा हजार बघू.”
दुसऱ्या दिवशी बाबूरावच्या सलूनपुढं दहा-पंधराजण बाकड्यावर बसून पेपर वाचीत व्हते. संत्या अन् जग्या मोटर सायकलवर येऊन सलूनपुढच्या कंपूत सामील झाले. तेवढ्यात कवळा घातलेल्या घोंगड्यात नाना लंगडत आला.जगूला बघून बोलला,
“जगूशेठ, सकाळ-सकाळ खाऊ द्या की तुमच्या नावानी मिसळपाव”.
“का रं चकन्या, कशाबद्दल मिसळपाव ?”

“आवो, नवी कोरी गाडी घेतली नाय का तुम्ही!आम्हालाबी आनंद मिळू द्या की”.
“एवढा गाडीचा आनंद वाटतो तर घेऊन टाकायची ना!”
“द्यायची का तुमची, देतो पंधरा हजार!“
“मिसळपावाची भीक मागतो आन् गाडी घ्यायाला निघालाय काय?”
“काय हरकत हे घ्यायला? पैशाची काळजी कशाला करू?संतूशेठ हाये ना?”
“सकाळ-सकाळ शहाणपणा करतो! काढ बसल्या जागी इथंच! नायतर सगळ्या मंडळींसमोर सांगतोय सहा महिने माझ्या गोठ्यात शेण काढावं लागलं.”
“दहा मिनिटांचीच मुदत द्यायची! हा गेलो अन् लगेच येतो, पण मागं सरकायचं नाय आता. लगेच जाऊन येतो.”
जगूशेठला चेव आला,
“बघा मंडळी, आपलं काय ठरलंय जागा सोडायची नाय!इथं कुणाकडून घ्यायचं नाय. आन् रोख मोजायचं बैठकीत!नाय गाडी दिली तर दोन बापाचा व्हईल.”
नानानी जरा पडतं घेतलं,
“त्याचं काय हे, माणूस काय पैका घेऊन हिंडतोय व्हय?आता घरला जातो अन् दहा मिनिटातच येतो की, नाय आलो तर मंडळी म्हणत्याल तो दंड देईल तुम्हाला. मग तर झालं?”
संत्या अन् जग्याबद्दल कोणाचंच मत चांगलं नव्हतं. पण नानाला त्यांनी घेरला म्हणून बघे हवालदिल झाले, पण बाळूतात्याला विश्वास होता की, ही नानाची समजून-उमजून टाकलेली चाल हाये. नानाची आतली टांग याला काय घावायची राहिली व्हय? नानाची पडती बाजू घेत सांगितलं,
“जाऊ द्या जगूसेठ, टिंगल अशी मनावर घ्यायची नसती.”
हे, एकूण जगूला लईच फुरान चढलं. तावा तावानी त्यांनी बोलाया सुरुवात केली,
“ए चकण्या, बाप दाखव नायतर श्राध्द घाल. बसल्या जागेवर पंधरा हजार मोजायचं नाय तर सगळ्यांसमोर माझ्यासंगं शेण भराया यायचं. लई मिजाशीत बोलत व्हता नव्हं का? आता तुझी सुटका नाय.”
“आन् समजा मी बसल्या जागेवर पंधरा हजार काढलंत असतं तर खरंच गाडी दिली असती काय? व्हय मंडळी ? हा नाय म्हणून पडला असता मग? आन् माझ्यावं बाजू शेकली तर टापा टाकाया लागलाय बघा.”
“ते काय नाय ! जाग्याव पंधरा हजार काढलं असतं तर मला गाडी देणं भागच होतं. बोलून पुन्हा माघार घ्यायला मी दोन बापाचा नाय! आता त्यांनी जागा न सोडता पंधरा हजार मंडळीसमोर द्यावं, मी सुद्धा सगळ्या मंडळींसमोर गाडीचा ताबा देतो, नसंल तर त्यानं सगळ्या मंडळीसमोर सहा महिने माझ्या गोठ्यावर शेण भराया यायचं. पैसे काढायचं का शेण भरायचं! कोणतं पटतं ते बघ!”
नानानी थोडा विचार केल्यागत केलं,
“बघा मंडळी, मी अजून जागेवरून हललो नाय. तुमच्या समोर हे पंधरा हजार देतोय.”
नानानी कोऱ्या करकरीत पाचशेच्या तीस नोटा मंडळींसमोर ठेवल्या. आन् बोलला,
“आणा आता चाव्या अन् गाडी.”
पंधरा हजारांची रक्कम बगताच जगूच तोंड खेटर मारल्यागत झालं. त्यानं गुमान खिशात हात घालून चावी काढली अन् नानाच्या अंगावर फेकली. मोटरचा टायर फुटावा तसा जग्या खरखर उतरला. तोंडाचा चंबू करून बोलला,

“आयला आतल्या गाठीचं दिसतंय, हेकंण”.

सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: