मुडदा

     दत्ता, प्रकाश आणि सुलभा वडिलांना आण्णा म्हणायचे. पितृपंधरवडा सुरु असल्याने आण्णा गावातील सर्वांचे आमंत्रण बेतवायचे. जमलं तर घरी यायचे नायतर तिथंच टापा हाणीत मुक्काम ठोकायचे. मात्र हा त्यांचा बेफिकीरपणा घरच्यांना चांगलाच नडला.       नवमीच्या दिवशी आण्णा लेकीकडे निघाले. लांबून गाडीनं वळसा घालुन जाण्यापेक्षा एवढं टेकाड पालथं घातलं की दऱ्यात पहिल्यांदा लेकीचंच घर ! म्हणूनच कोणालाच काहीही न सांगता काठीचा आधार घेत पाऊलवाटेने  चालले होते. पण जाताना काय घडलं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक ! ते सुलभाच्या घरी पोचलेच नव्हते.  प्रकाशला वाटले, आण्णा दोन दिवसांनीच माघारी येणार. म्हणून त्याने सुलभा कडे चौकशी केली नाही. सुलभाला वाटले वय झाल्याने या वर्षी आण्णांनी टाळले असावे. गडबडीत तिनेही विचारपूस केली नाही. मात्र दोन दिवस उलटुनही आण्णा परतले नाहीत म्हणून प्रकाशने सुलभाला फोन केला. सुलभा म्हणाली, “मीच तुला विचारणार होते, आण्णांना यंदा का नाही पाठवलं ? “त्याच्या मनात पाल चुकचुकली.” अगं यडी का खुळी ! आण्णा तुझ्याकडे आले नाय म्हटल्यावर तू लगेच फोन करायला नको का ?… आता तु हातातंलं काम टाकून लगेच निघून ये.” प्रकाश रागाने बोलला व फोन कट केला, आणि लगेच दत्ता ला फोन केला. “दादा, तु आसशील तिथुन ताबडतोब गावाला निघुन ये…. ! “प्रकाश चं टेन्शनमधील बोलंणं ऐकूण दत्ताची पळापळ सुरु झाली. प्रकाशने इतर पै- पाहुण्यांना फोन केला पण आण्णांचा थांग पत्ता नव्हता. तेव्हा मात्र सर्वांचीच घाबरगुंडी उडाली अन् शोधाशोध सुरु झाली.           

आण्णा गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. नातलग, शेजारी, जूनी जाणकार मंडळी प्रकाशच्या घराजवळ जमले. सर्वजण सुतकी चेहरा करुन चिंतातूर दिसत होते. तेवढयात मोठयाने हंबरडा फोडत सुलभा आली. “आण्णा, तुम्ही बाभळीचं वावर माझ्या नावावर करणार होते. आता त्याचं कसं व्हणार … ! ” जाणतेपणाने गणपा पुढे जात म्हणाला, “सुलभा लगेच रडू नको. आण्णा भलतीकडे भरकटले असतील ! आपण पोलिसांत तक्रार देऊ. “त्याने लगेच पोरांना फर्मान सोडलं. तेंव्हा सुलभा एकदम गप झाली.           

चंदर आणि तुकाराम लगेच पोलिस स्टेशनात गेले. आण्णा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सवडीनुसार शोधमोहीम सुरू केली. पण आण्णांचा कुठेच मागमुस न०हता. दत्ता बिऱ्हाडासह मुंबईहून आला. घरामोऱ्हं गर्दी पाहून तो हबकला. आण्णाचं काहीतरी बरं – वाईट झालं म्हणून त्याने गळा काढला. त्याचं पाहून बायकांनी आरडा – ओरडा सुरु केला . तो आवाज ऐकूण मेंढरं वळता- वळता शेकू धनगर तिथं आला व म्हणाला, “काय बला आली म्हणायची गावावंर ! तिकडं ढवळीच्या माळावरील पडक्या, कोरडया हिरीत बी एक मुडदा हाय. बकऱ्यांना पाला काढता -काढता झुडपाआड गवतात दिसला म्हणून तसाच आलोय ! ”         

ते ऐकल्याबरोबर दत्ता, प्रकाश, सुलभा सहीत सर्व अबाल वृद्ध मंडळी ढवळीच्या माळाकडे धावली. पवाराचा बाळू अन् कदमाचा पप्पू तरातरा विहिरीत उतरले. त्यांनी मुडद्याला सुलटे केले तर ते आण्णाच होते ! काहीच हालचाल होत नसल्याने पप्पूने खालुनच ‘आण्णा गेले’ असे खूणावले .  “तुम्ही एकटेच कसे काय गेले ? मला का नाय नेलं ? ” असं ओरडत इतका वेळ हुंदका दाबून धरलेली आण्णांची बायको ऊर बडवीत विहीरीत ऊडी टाकायला निघाली पण वेळीच दोघा-तिघांनी तिला पकडलं म्हणून पुढचा अनर्थ टळला.  सुलभा, दत्ता, प्रकाश यांनी हंबरडा फोडला. सूना, नातवंडे, जावई, शेजारी पाजारी व इतर नातलग धुसफुसु लागले. “परवाच माझ्या इथून दोन वाटया कढी पिऊन गेला होता… म्होरं आसं व्हणार हे काय ठाऊक ? नायतर आणखी एखादी वाटी कढी दिली असती… ” असं ओरडत सोनाबायनं डोळयांना पदर लावला अन् ती धाय मोकलून रडू लागली.  रामभाऊंनी तात्काळ फोन करून त्यांचं भजनी मंडळ बोलावून झाडाच्या सावलीत बसून ‘आम्ही जातो आमच्या गावा…’ सुरू केलं होतं.         

“आरं, पण गाडी – घोडयाची सोय असताना हा हिकडं कशाला तडफडला ?” धोंडीबानं मनातला राग ओतला. “तो पहिल्यापासूनच एक कलमी होता ! ” गणपानं खुलासा केला . “मला तं वाटतं भावकीतल्याच कोणीतरी घातपात केला असावा… !” वसंतानं शंका उपस्थित केली. “आता तुम्ही का त्याची ऊणी – दुणी काढणार हाय का ? सदाभाऊ त्या दोघा-तिघांवरही कातावला. “तसं नाय सदाभाऊ पण आण्णांनी आठ दिवसांपूर्वीच माझ्याकडून हजार रुपये हात ऊसणे घेतले होते. ते बुडालेच की आता ! “गणपा म्हणाला. ते ऐकूण धोंडीबा खुदकन हसला. “तुला रं काय झालं हसायला ? “सदाभाऊने डोळे वटारले.”… काय नाय, पण आण्णांचे दोन हजार रुपये माझ्याकडे हाय,  ते कोणालाच माहीत नाय !” धोंडीबा उत्तरला.       

“अरे इथं प्रसंग काय अन् तुम्ही बोलताय काय ? तो बिचारा जीवानिशी गेलाय. किती दिवस झालेत नि किती नाय ? व्हा पुढच्या तयारीला लागा.” सदाभाऊने पून्हा सगळ्यांना दरडावले. तसं धोंडिबा, गणपा अन् वसंत आठ -दहा पोरांना घेऊन सरणाची तयारी करु लागले. नदीवर गोवऱ्या, सरपण नेले. तुकारामने तिरडी बनवली. घरी प्रेताला अंघोळ घालण्याची तयारी झाली होती. जावय बापूंनी  तालुक्याला जाऊन नवीन कपडे आणली. पोलिसांना खबर लागण्याच्या आत प्रेताची विल्हेवाट लावली पाहीजे म्हणून गंगाराम पाटलांची घाई सुरु होती. तरीपण आण्णा गेल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्याने काही माणसे परस्पर स्मशानभूमी जवळ पोहोचली होती.     

 विहीरी भोवती माणसांचा गराडा होता. बाळू आणि पप्पू आण्णाला विहीरीतून बाहेर काढण्याच्या तयारीतच होते. तेवढ्यात दुरटूर करीत बुलेटवर दोघे पोलिस आले. गर्दीत घुसून एक पोलिस ओरडला, “थांबा, तसं कुणीही प्रेताला हात लावू नका. हे कशानं झालंय ? कसं झालंय ?त्याचा खुलासा होईल. पंचनामा करावा लागेल. नंतर पोस्टमार्टम होईल. मगच प्रेत ताब्यात मिळेल. “दुसऱ्या पोलिसाने कागदावर काहीतरी खरडले.  चार चौघांच्या सह्या घेतल्या. इकडून- तिकडून फोटो काढले व त्यांना म्हणाला, ” ए उचला रे प्रेत अन् काढा वरती. “बाळू व पप्पूने लगेच आण्णांना उचलले.       

तेवढयात आण्णांचे डोळे लुकलुकल्यासारखे पप्पूला जाणवले. तो म्हणाला, “आरं आण्णा जिवंत हाय !” ‘ये मुस्काड फोडू का तुझं ? तिकडं लाकडं नदीवर गेलीत, घराम्होरं तिरडी सजवलीय. अन् तू म्हणतो… ‘. बाळू त्याच्यावर रागावला खरा पण लगेच त्यालाही आणणांच्या ओठांची पुसटशी हालचाल जाणवली. बाळूचा विश्वासच बसेना. तरीही डोळे फाडून बघत त्याने पाणी मागितले आणि अण्णांच्या चेहऱ्यावर शिंपडले. आण्णांच्या ओठांची पुन्हा अस्पष्ट हालचाल जाणवली. डोळे लुकलुकले. “अरे खरंच आण्णा मेले नाय, जिवंत हाय ! “बाळू आनंदाने चेकाळला. आण्णांना वरती काढले. दोन्- तीन दिवस उपवास घडल्याने ते बेशुद्ध होते. ताबडतोब त्यांना दवाखान्यात हलवले. सर्वांना आनंद झाला. पोलिसही माघारी फिरले. मात्र तिकडे नदीवर प्रेत कधी येतंय याची वाट बघत बरीच मंडळी बसली होती.   


 मनोहर दुलाजी मोहरे

मु. पो. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: