करार

     आजचा दिवस माझ्यासाठी अर्थात प्रसिद्ध लेखिका केतकीच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात यावा असाच खरंच खास दिवस. एका अलिखित करारानुसार मी दारिद्र्याच्या गलिच्छ नाल्यातून सोय़ीस्करपणे अलगद बाहेर आले.व्यवहारी जगात गरीबांना आपल्या मनातील भावनांना तिलांजली द्यावी लागते.गरिबीतील ते जगणं केवळ जीव जगवण…..माझा नाल्यातून जीवन प्रवास….. तिथूनच नदीला कडकडून भेटले. शेवटच्या टप्प्यात अथांग सागराची ओढ होतीच…पोहोचले अथांग सागरात.केतकीच्या जीवनाचे हे तीन टप्पे.म्हणजेच “पुनर्जन्म” ‘कादंबरीचा प्रकाशन सोहळा.       

उच्चभ्रु समाजातील माणसांनी हाॅल गच्च‌ भरून गेला होता. आणि का नाही भरणार? एका प्रथितयश उद्योगपतीच्या सुनेच्या कादंबरीचा म्हणजे माझ्याच ‘पुनर्जन्म’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा होता. प्रथितयश लेखिका म्हणून नावारूपास आणल गेलं हो मला.. हे फार महत्त्वाचे. माझ्या साहित्यिक प्रतिभेपेक्षा मी एका उद्योगपतीच्या एकुलत्या मुलाची बायको….. ही ओळख खुप महत्वाची होती. भले मग तो मुलगा ओवाळून टाकलेला का असेना?? व्यावसायिकाच्या घरचा वारस पुढे माझ्याच तर कुशीत जन्माला येणार होता. किती दुरदृष्टी होती. साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.त्या उपस्थिती मागे प्रत्येकाचा काही ना काही मनसुबा होता…. तो नेहमीच गुलदस्त्यात, तसेच आजही. प्रकाशन सोहळ्यात माझी उपस्थिती नाममात्र…  भलेही मी उत्सवमूर्ती असेनही… व्यावसायिकांच्या घरची परिस्थितीने ओढवलेल्या त्या क्षणाने का होईना त्या घरची सुनबाई होते. अलिखित करार माझ्या आणि या परिवारात होता… या सर्वच गोष्टी अनाकलनीय… विचार करण्या पलिकडच्या. बडे लोग..बडी बातें..,.  सगळंच भव्यदिव्य… कुणाची‌ उघड करण्याची काय बिशाद?? गरीबांना ना स्वाभिमान ना मन… कुणीही टपली मारावी… करार केला परिस्थिती मुळे. सगळच गुलदस्त्यात….

गरीबीमुळे करावा लागलेला करार. सिनेक्षेत्रातील एका बड्या निर्मात्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन…. खरंच सामान्य नव्हतंच काही. असामान्य. आज मी तरी कुठे सामान्य होते? समाजात माझं विशिष्ट स्थान निर्माण झालं होतं. भारी सिल्कच्या साडीवर मोजक्या हिऱ्यांच्या दागिन्यांत मी सर्वांच्याच नजरेत भरत होते. सर्वाच्या नजरा आज माझ्याकडे होत्या. असुया, सहानुभूती, तिरस्कार यांनी युक्त नजरा माझ्या वर रोखल्या होत्या. गर्व होता मला माझ्या सौंदर्याचा.. सौंदर्यानेच उद्योगपतीच्या घरात मला पोहचवलं होतं… त्या साठी केला गेला अलिखित करार….

होय… करार…. अठरा विश्व दारिद्र्य हे शब्द ही कमी पडतील, त्यात बाप नावाच्या प्राण्याचे दारूचे पराकोटीचे व्यसन… आकंठ दारूत बुडालेला बाप आणि परिस्थिती ने पिचलेली आई नावाची गरीब गाय, पाठोपाठ जन्माला आलेल्या तीन बहिणी… हाच काय तो आदरणीय पिताश्रींचा पुरूषार्थ.. यासर्वांभोवती फिरणार, अनुभवलेल आयुष्य म्हणजे माझ ‘पुर्नजन्म’ .. कादंबरीची मुख्य पात्र केतकी.,. किती गोड नाव.. नावासारखच सौंदर्य लाभलेली, दारिद्र्याच्या कोळशात जन्माला आलेला हिरा. चुकुन त्या घरात जन्मला… चार घरी धुणी भांडी करायला आई जायची मागच्या भावंडांना सांभाळणे केतकी करायची. कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ काही बसेना. शेवटी युद्धभूमीवर केतकीला उतरावं लागलं. आईने अजुन काम वाढवली, लहान असताना केतकी हट्टाने आईसोबत जायची…ते श्रीमंत डौल पाहून तिच्या डोळ्यांत पुर यायचा….. मालकीण बाईंच्या डोळ्यात साठवून ठेवलेल्या तिरस्करणीय नजरेची तिला खुप भीती वाटायची. तिला तिथे खायला नको असायचं…. जात्याच बुद्धीचा सरस्वती चा आशीर्वाद असलेल्या केतकीची नजर जरा आईला मदत करून काही वाचायला मिळेल का? यासाठी तळमळत होती. मालक दयाळू… केतकीची भुक लक्षात येताच त्यांनी जुन्या पुस्तकांची ती अनमोल संपत्ती केतकी च्या स्वाधीन केली. अधाशासारखी केतकी त्यावर तुटून पडत होती. मध्येच मालकीण बाईंचे टोमणे तिच्या काळजाला जखमी करत होते. दारिद्रयाने केतकीच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला होता. गरीबाला स्वाभीमान नाही हेच खरं…. अशी मनाची समजूत घालत केतकीची जगण्यासाठी एक जीवघेणी धडपड चालू होती. बाल वयात बाल्य कोमेजून गेले, करपले. पदोपदी मनाला नैराश्याचा विळखा पडायचा.

सकाळी लवकर उठून आवरून शाळा, मग आईच्या कामाला… मग घर… पोटातील आग विझवून बाप नावाच्या कसायाचा घरात प्रवेश होण्याआधी, त्याच ते रोजच नाटक सुरू होण्यापूर्वी भावंडांसह झोपी जायची. घर शांत झाल की पहाटे उठून थोडा अभ्यास…. मग दैनंदिन दिनक्रम सुरू. गरीबीच ग्रहण बुद्धीला लागले नाही, हीच खरी जमेची बाजू. दिवसामासान केतकी मोठी मोठी होत होती… शाळेतील प्रगती वाखाणण्याजोगी. निबंध लिहिले की पूर्ण शाळेत वाचून दाखवले जात होते. मोत्या सारखं ते सुंदर अक्षर… सगळया शिक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे गोड केतकी. श्रीमंतीत ऐशोआरामात लोळणाऱ्या मुलांना तिचा तिरस्कार वाटायचा कारण तिचं उदाहरण ऐकायला लागण हेच मोठ दु:ख होत.. शाळा, घर, वाचन, बालवयात करावी लागली ती कंटाळवाणी घरकाम यांत बारीकसारीक गोष्टींचा विचार करायला वेळच नव्हता. काळ नाही थांबत कुणासाठी…

निसर्ग आपल काम चोख करत होता. केतकी १०वीला पोहोचली. वाचनासोबत लेखनाचा छंद केतकीला जडला होता. जे वाचेल त्यावर विचार करून आपले विचार मांडण्याची कला विकसित होत होती. या खडतर प्रवासात तिच्या मराठीच्या दामले बाईंची तिला साथ होती. केतकी वयात येताना असंख्य समस्या सोबत होत्या. आईच्या डोक्यात एकच विचार… परमेश्वराने पदरात टाकलेल्या ह्या हिऱ्याला कुठे लपवून ठेवू. मागची भावंडे अभ्यासात यथातथाच…. त्याना एक एक विश्वासू मालक शोधून निरनिराळ्या शहरांत ती अशी पोहोचली की काही वर्षांत कुणाला कुणाची खबरबात नाही. एका प्रचंड वादळात हे पाचही ओंडके वेगवेगळ्या दिशेने फेकले गेले. एक दिवस अचानक बाप नावाच्या त्या भयानक प्राण्याने नशेत आईच्या वर्मावर असा घाव मारला…. आई तिथेच निपचित पडली…. ती परत ऊठलीच नाही. नशेत असलेल्या त्या राक्षसाला याचं सोयरसुतक नव्हतंच…. त्या स्थितीत तो बाहेर पडला… परत कुणालाच दिसला नाही. पाठच्या बहिणींना त्यांच्या त्यांच्या मालकांनी सांभाळून घेतलं… कुणी कुणाला पुढे पाहिलं ही नाही.. शेजारी पाजारी होते त्यांनी पुढील संस्कार आटोपले….. एकाकी घरात एकटीच केतकी. वय वर्ष १६ …ऐन तारुण्यात… बहरलेल्या केतकीसाठी अनेक लांडगे तत्पर होते.

शाळेत खबर पोहोचताच वाऱ्यासारख्या दामले बाई धाऊन आल्या. केतकीला घट्ट मिठीत घेतलं…. झोपडीला कुलुप ठोकून केतकी दामले बाईंच्या सोबत त्यांच्या घरात पोहोचली. मानसकन्या म्हणुनच. एक दामले बाई सोडल्यास त्या घरात इतरांच्या नजरेत आश्रित… तिरस्करणीय. जमेल तेवढं जास्तीत जास्त काम करायचं, अभ्यास, वाचन, लेखन सुरूच होत यासोबत पदोपदी होणारे अपमान ही मुक गिळून सोसत होती. अभ्यासातील प्रगती, लेखन कार्यरत होते. अशा कडूगोड वातावरणात पाच वर्षे कधीच निघून गेली. आधार मानसिक बळ, प्रेम मिळत होत ते फक्त आणि फक्त दामले बाईंकडून. त्या तरी किती पुरे पडणार??

निवृत्तीनंतर मुळात असलेल्या दम्याच्या आजारान जरा जास्तच डोक वर काढलेले. मुलगी सासरी नांदायला गेली. मुलाचा धड एक असा व्यवसाय नव्हता. बाप लेकात सदोदित भांडण सुरूच होती. केतकीला वाटायचं भांडण मारामारी गरीब श्रीमंती पहात नाही. कारण वेगवेगळे असेल… कुटुंबातील तणाव तसाच. केतकी बीए ऊत्तीर्ण झाली. लेखनास प्रसिद्धी मिळत होती. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कारांनी तिला सन्मानित केले होते. हे सगळं कौतुक दामले बाईंच्या चरणी अर्पण करून त्यांच्या थरथरत्या हातांनी आशीर्वाद घेऊन उसन बळ आणत होती. आपल्या ओळखीत दामले बाईंनी केतकीला प्रेसमध्ये छोटीशी नोकरी मिळवून दिली. तुला योग्य माणसांच्या हाती सुपूर्द केले की डोळे मिटायला मोकळी.. असंच काहीतरी दामले बाई बोलायच्या. केतकी मांडीवर डोकं ठेवून मुक्त रडायची. पुन्हा नको असं बोलू… आर्जव करायची.

केतकीच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. मधल्या पाच सहा वर्षांत वेग मंदावला होता एवढंच. रोजच्या प्रमाणेच दिवसभराच्या गप्पा मारून रात्री शांत झोपी गेलेल्या दामले बाई दुसऱ्या दिवशी ऊठल्याच नाहीत. केतकीवर दु:खाचा डोंगर कोसळला. जरा कुठे सुखाचा आभास होतो न होतो नियती त्यापासून दूर करतं होती. नशीबात काय वाढून ठेवलंय??बया विचाराने ती अस्वस्थ होत होती. जमेची मनाला उभारी देणारी बाजू एकच…. तिची प्रेस मधील ती नोकरी, लेखन सेवा लेखनस्पर्धांनमधुन मिळत गेलेल यश… हेच फक्त सत्य…. बाकी सगळे सुखाचे आभास. दामले बाईंच्या अचानक जाण्याने आता केतकीच्या रहाण्याचा प्रश्न निर्माण झाला. घरात तरुण मुलीच रहाणं संयुक्तिक नव्हतंच. दामलेबाईंचा मुलगा आता रंग उधळत चाललेला. दामले बाईंच्या पतीमहाशयानी दुसऱ्या ठिकाणी कुठे सोय होईपर्यंत घरात राहायला परवानगी दिली होती. ही एक जमेची बाजू. दुसर एवढ्या वर्षात केतकी त्या घरात बरीचशी एकरुप झाल्यामुळे जवाबदारी पण सांभाळत होती. दिवसकार्य संपले मुलगी सासरी निघाली. घरातील काम केतकीच्या वाट्याला. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय. हा प्रश्र्न सतत सतावत होता.

एक दिवस माझा असेल अशी खोटी समजुत घालुन दिवस सगळं सांभाळून लेखन कार्य करीत लेखन क्षेत्रात आपल नाव निर्माण करतं होती. साहित्य क्षेत्रात स्वत:च एक नाव होतं न होत तोच पुन्हा एकदा केतकीच्या जीवनात भयानक वादळ निर्माण झालं. ज्या वादळातील भयानक लाटेसोबत ती एका उद्योगपतीच्या घरात पोहोचली. सहज पोहोचली असती तर खरोखरच भाग्यवान ठरली असती. पण एका कराराने…. आपल संपूर्ण आयुष्य दामले बाईंसाठी समर्पित करून तिनं उद्योगपतीच्या व्यसनी मुलाला स्वीकारल. कदाचित नियतीच्या मनात हेच असावे.. नेहमी प्रमाणेच मनाची खोटी समजुत.. कदाचित या समर्पणातून काही चांगले निघेल ही एक वेडी आशा… दामले बाईंच्या मुलानं मोठा पराक्रम केला. अनेक व्यवसाय…..धड लक्ष कशातच नाही. वडीलांनी तुझ्या नशिबात जे काही असेल ते असे सांगून अध्यात्माची कास धरली. पोरावर कुणाचही कंट्रोल नाही. परिणाम..विनाश.. पण काहीही दोष नसताना आहूती द्यावी लागली मात्र केतकीलाच. ही सुद्धा नियतीची ईच्छा समजून आव्हान स्वीकारले.

दामले बाईंचा मुलगा कर्जबाजारी झाला. त्यात त्याला जुगाराचा नाद… अट्टल जुगारी मित्र सेठ कांतीलाल जी.. शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती यांचे चिरंजीव एकुलते एक वारसदार मुन्नालाल यांचा घरात प्रवेश झाला. त्याच्याकडून पैसे घेऊन परस्पर केतकीच्या आयुष्याचा सौदा झाला…. एवढ्या पैशांची अफरातफर कांतीलालजींच्या लक्षात आली. ते घरापर्यंत पोहोचले. केतकीच सौंदर्य पहाताच त्यांच्यातील व्यावसायिक जागा झाला. पोर वाया गेलेला आहेच. माझा भुतकाळ विस्मरणात गेलाय. सध्यातरी मी कै. दामलेबाईंची मानसकन्या तर परिचित होते. किमान सुन म्हणुन घरात ही मुलगी आली तर पोरगं सुधारण्यासाठी आणि वंशाचे बीज मात्र या सुपिक मातीत निश्चितच रूजेल.. बहरेल. करार झाला..

माझ्या समर्पणातून दामले बाईंच्या ऊपकारातून थोडी ऊतराई झाले याचं समाधान… आणि दुसर गरीबांना मन कुठे असतं..? त्यांचे निर्णय परस्पर कोणी ही घ्यावेत…. अत्यंत साधेपणाने विवाह होऊन मी एका प्रतिष्ठित व्यावसायिकांची पत्नी झाले. एका प्रेसचीही मालकीण झाले. लेखनकार्य तर आता बहरत होत कारण मी आता कुणी गरीब केतकी नव्हते. व्यावसायिकाची सुन होते. भुतकाळ फक्त माझ्या कडे बंद कुपित होता. मी गरीबीच्या गटारगंगेतून दामले बाईंच्या आधाराने मध्यम वर्गीय पवित्र गंगेच्या प्रवाहात मोकळा श्वास घेता घेता जीवननौका  पार करताना श्रीमंत व्यावसायिकांच्या त्या अथांग सागरात पोहोचले. निसर्ग नियमच आहे हो शेवटी.. नदीला सागराची ओढ असतेच. खेद एवढाच की गरीबीमुळे केला गेलेला करार खरंच नको होता.. त्याच तरी दु:ख का?? वर्तमान समोर आहे…. मी व्यावसायिकांची सुन आहे. मी प्रसिद्ध लेखिका आहे … भविष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवुन मार्गक्रमण करणारच आहे. आज पुस्तक प्रकाशित झालंय…

भविष्यात चित्रपट ही निघेल..पण त्यासाठी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील मध्यमवर्गीयांने केलेला करार मात्र गुलदस्त्यात ठेवूनच… 

आभारप्रदर्शनाने त्या देखण्या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. मी आता कौतुकाच्या वर्षावात चिंब न्हावून निघाले होते..कारण आता मी कुणी गरीब केतकी नव्हते हात पसरत बसायला… ना मध्यम वर्गीय दामले बाईंची मानस कन्या होते… मन मारुन जगायला… आता फक्त आणि फक्त मी एका प्रतिष्ठित व्यावसायिकांची एकुलती एक सुन होते… तिच्याच सावधपणे झालेल्या करारानुसार तिचाच हा पुर्नजन्म  होता.     ‌‌

संप्रवी शंकर कशाळीकर,
प्रलना, विद्यानगर काॅलनी, 
कोलगाव,‌ सावंतवाडी, सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: