धनी

गुहागर-विजापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरवात झाली होती. शेकडो वर्षांपासून मायेची सावली देणार्‍या मोठ-मोठ्या वडांच्या झाडांची जणू कत्तलच सुरू होती. मुळापासून तोडलेले झाड रस्त्यावर पडल्यानंतर होणारा कडऽऽ कडऽऽ आवाज मन अस्वस्थ करत होता. झाडांची तोड जवळच असलेल्या नागांवमध्ये सुरू होती.
गावातली बरीचशी कुटुंब रस्त्याकडेला आपआपल्या शेतात राहत होती. असंच जिजाआक्काच कुटुंब रस्त्याकडेला स्थिरावलेलं. जिजाक्का साठ वर्षांपूर्वी इथं नांदायला आली. सुख-दुःखानं भरलेला संसार. आपला मळा, आपल घर, घराला लागून असलेला रस्ता, रस्त्याकडेला असलेली मोठी वडाची झाडं, रात्र न् दिवस वाहनांची वर्दळ हा जिजाक्काच्या जगण्याचा भाग झाला होता. रोज सकाळी सुर्यनारायणा बरोबर त्या वटवृक्षांचही दर्शन व्हायचं. वडपौर्णिमेला मोठ्या भक्तीभावान याच वडांना पूजायची. वडाभोवची फेर्‍या घालताना ते झाड तिला आपल्या धन्यासारखं वाटायचं.
सार्‍यांना सावली देणार, वाटसरूंच्या, मूक जनावरांचा आधार, चिमण्या-पाखरांच घर. ती मनोभावे पूजा करायची.
मागल्या वर्षी जिजाक्काच्या कुंकवाचा धनी, तिचा म्हातारा ही वारला. आयुष्यभर संसार केला. सुख-दुःखं अनुभवली तो तिचा धनी… तिचा म्हातारा. आता रोज जिजाक्का त्या वडाच्या झाडांत पाहायची, असाच होता सार्‍यांना आधार देणारा…
‘‘आई ऊठ कि… रात्रं-दिवस त्या वडाच्या झाडाकडं का पाहत राहतीस.’’
म्हातारी पदरानं डोळं पुसायची.
रस्त्यावरची वर्दळ आता जास्तच वाढली होती. मोठ-मोठ्या जेसीबी मशीन रस्त्याकडेची माती ढकलत होत्या. दगड मुरुमाचे डंपर भराभर पळत होते. झाडांच्या कत्तलीच्या कटरचा सुई-सुई आवाज परिसरात घुमत होता. 
त्या आवाजान जिजाक्का बाहेर आली सुनेला आवाज दिला.
‘‘ए ए सुनिता कशाचा गं सुई-सुई आवाज येतूय?’’
‘‘आवो आत्या काय न्हाय रस्ता हायवे हुणार हाय. झाड तोडल्याचा आवाज येतूय.’’
‘‘होवुदे होवुदे वाहन लै वाढलीती गं… रस्ता मोठा व्हायलाच पाहिजे.’’
हातात आधाराची काठी घेवून म्हातारी रस्त्याकड निघाली.
वडाच्या झाडाखाली आली… नजर तासगांवच्या दिशेला गेली.
‘‘आर पार सुफडा-साफ केला का काय?’’ ती एकटीच बडबडत होती. पुन्हा माघारी फिरली. लेकाला आवाज दिला. 
‘‘व्हंर र संभा रस्ता लै मोठा हुतुय वाटत?’’
‘‘होय आई.’’
‘‘पर झाड तोडल्याल काय बर वाटत न्हाय बघ.’’
‘‘अगं त्याला नाईलाज हाय. सारी मध्यम झाड काढलिती आता वडाची झाड तेवढी राहयलिती.’’
‘‘वडाची झाड?’’ तिच अंग थरथरांय लागंल.
‘‘काय सांगतुयास वडाच झाड बी काढणार?’’
‘‘होय आई!’’
‘‘पर वायस बाजून न्या कि म्हणावं, शे-चारशे वर्षांच झाड, मी न्हाय तोडू द्यायची.’’
वडाची झाड तोडणार या विचारानं म्हातारी रात्रभर तळमळत हुती. तिला तीची लग्नानंतरची पहिली ‘वटपौर्णिमा’ आठवली. याच वडाला आपून धागा बांधला, तिची पूजा केली, मागली कित्येक वर्ष आपून यालाच पूजलं… आन ह्याला तोडायचा… कितीतरी आया, बाया, बापय समदी या झाडाखाली बसून इसावा घ्यायची. न्हान-न्हान पोरं वडाच्या पारंब्याला बिनदक्कल लोंबकळायची… वडाच्या पारंब्याला खालच्या टोकाला गाठ मारून झोका खेळणारा तिचा ल्यीक… त्याच लेकीच न्हानपण सारं-सारं आठवलं. रोज पहाटपास्न वडावरच्या चिमण्यांचा कालवा… उन्हाळ्याच्या दिवसात वडाखाली शांतपणे झोपणारा तिचा म्हातारा…
‘‘आवं उठा की चला घरला…’’
‘‘आलो आलो चर… व्हो पुढं. इथं लै गार वाटतंय.’’
सारं सारं आठवलं.
गेली साठ-पासस्ट वर्षाचा तिच्या संसाराचा सोबती. खरंच झाड तोडतीली. झाड न तोडता रस्ता न्हाय हुयाचा… न्हाय न्हाय मी न्हाय तोडू देणार… वडाला हाथ न्हाय लावू देणार. ती रात्रभर बडबडत होती. तळमळत होती.
सकाळी आठ-नौच्या पुढ कटरच्या सुईऽऽ सुईऽऽ आवाजान ती रस्त्याकड चालली. दोन ट्रॅक्टर, एक ट्रक, तीन चार कटरवाली पोरं, आठ-दहा माणसं आन एक भलं मोठं पोकलॅन्ड मशीन वडाच्या झाडाखाली उभ हुत… दोन लाल रंगाचे झेंडे घेवून पोरं वाहन अडवत होती. आता वड तोडला जाणार हुता… म्हातारीचं अंग जास्तच थरथरायला लागल हुतं… काठी टेकत टेकत ती रस्त्यावर वडाच्या झाडाखाली आली.
‘‘वडाच झाड तोडायच न्हाय…’’
‘‘वो आज्जी उठा इथन…’’
‘‘न्हाय न्हाय रस्ता वायसी पड्यालन घ्या, पर झाड तोडायचं न्हाय, मी इथन उठणार न्हाय.’’
इंजिनिअर, ठेकेदार वैतागले.
‘‘ओ आजी उठा इथून…’’
‘‘ही नुस्त वडाचं झाड नव्ह, ह्यो माझा धनी हाय… न्हाय हात लावू द्यायची.’’
‘‘सरकारी कामात अडचण आणू नका.’’
‘‘न्हाय न्हाय झाडाला हात न्हाय लावायचा…’’ तिच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहू लागल्या.
आई वडाच झाड तोडू देईना ही बातमी संभाला कळाली. तो पळतच आला.
‘‘ऊठ आई असं न्हाय चालत… ही सरकारी काम हाय… रस्त्यावर मधीच झाड कसं चालल…’’
‘‘न्हाय र लेका पर किती वर्षाच झाड तोडायचं..’’
‘‘ऊठ आई असं न्हाय चालत… त्यान आईच्या हाताला धरल… चल घरला सरकारी काम हाय…’’
म्हातारीनं पदरान डोळ पुसलं.
‘‘थांबा वायसी…. म्या घराकडनं यिती तवर दम धरा.’’
जड अंतःकरणानं घराकडं गेली. सूनला आवाज दिला…
‘‘सुनिता पूजच ताट तयार कर आन चल माझ्याबरोबर…
सासू-सून परत वडाच्या झाडाखाली आल्या.
थरथरत्या हातानं वडाच्या झाडाला हात लावून म्हातारी पाया पडली…
‘‘लाव हळदी-कुंकू आन संभा फोड  नारुयुळ….
आता तुमची मर्जी… संभा ह्येचा एक खुट काढ आन घराम्होर बांधाकडला पूर…’’
सार्‍याचंच डोळं पाण्यानं भरलं हुत…
कटरचा सुईऽऽ सुईऽऽ आवाज वाढला हुता. जिजाआक्का पाठमोरी झाली होती…..

– रवि राजमाने

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: