संध्या आयुष्याची

 पावसाची रिपरिप चालू होती पण अचानक वाढली. छत्री होती हातात..  पण जरा जोरातच पाऊस आला म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेड च्या आडोशाला थांबलो… छत्री मिटवली. छत्री घेऊन सुध्दा थोडं डोकं भिजलं होतं.. तसं मी डोकं हाताने झाडाले. केसातलं पाण्याचं तुषार उडालं. तिन्ही सांज झाली होती. चिलटं चावत होती. त्यामुळे पावसाचं सर्वाट कमी आल्या आल्या इथून निसटायच्या बेतात होतो. पत्र्याच्या शेडच्या बाहेर हात काढून पाऊस किती आहे हे वारंवार तपासत होतो…. किणकिण वाटत होतं. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. बहुतेक पावसामुळे प्रत्येकजण स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊन बसला होता… पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता… आणि मलाही जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते.. डासांचा उपद्रव वाढत होता. हातावर बसलेली चार दोन चिलटं मारली.. आता पावसाचं लई झालं होतं.. त्यामुळे मी आता पावसातूनच सटकायचं म्हणून छत्री उघडत होतो..पण छत्री काही केल्यास उघडेना.              

इतक्यात शेडच्या कोपऱ्यातून आवाज आला. “खोकायला लागलीयास? औषध घे. आणि हो रात्री झोपताना अंगावर उबदार रग (ब्लॅंकेट) घेत जा. पावसाचं दिवस आहेत. गारठा आहे. “पहिल्यांदा मला काही समजलं नाही. कोण बोलताय हे मला समजेना.. म्हणून मी अंधारात थोडासा कानोसा घेत बघू लागलो. पुन्हा आवाज आला. 
“धाप लागायची कमी आहे नव्ह? ” माझ्या लक्षात आलं की एखादं म्हातारं जोडपं पावसामुळं या शेडात आडोशाला आलंय की काय? आपण थोडी विचारपूस करावी म्हणून मी थोडा अंधारात पुढे सरकलो.. आणि बघतो तर काय.. एक आजोबा मोबाईल वर बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. क्षणात काळजी वाटायची पण पुन्हा अगदी मस्त संवाद साधत होते. आजोबांचा रोमँटिक मूड मला हिरावून घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी हलक्याच पावलांनी मागे सरकलो… आणि न राहून आजोबांचे मोबाईलवरील संभाषण चोरून ऐकू लागलो. आजोबांचा संवाद चालू होता.. 
“आणि होय गं! तिकडं जाऊन राहिलियास.. गंमतय का तुला? “मोबाईल मधून येणारा आवाज फक्त आजोबाना ऐकू येत होता.. माझी मनोमन इच्छा होती.. तो आवाज ऐकण्याचा.. पण ते शक्य होत नव्हते. अशा खाजगीतल्या गप्पा ऐकणं बरं नव्ह.. पण मनाला समजूत घातली म्हाताऱ्या जोडप्याचे बोलणे काय खाजगी असणार?          छत्री उघडायचा प्रयत्न मी थांबवला. तसा पाऊस सुध्दा थांबला होता…पण त्या शेडातून पाय बाहेर निघत नव्हता. का कुणास ठाऊक त्या आजोबांचे बोलणे ऐकायला मन आतुर होते.. “अगं, मला इथं फारच कंटाळा येतोय. तुला माहिती होतं की मला तुझी सवयी आहे. तुझ्याशिवाय माझा जीव करमत नाही. तरीसुद्धा गेलीस.”आजोबा आता क्षणभर थांबले होते. बहुतेक पलीकडून आजी आजोबांची समजूत काढत असाव्यात…. थरथरत्या हाताने आजोबा.. या कानाचा मोबाईल त्या कानाला लावत होते. त्यांना आजीचा एकही शब्द मिस करायचा नव्हता..  मध्ये मध्ये म्हणायचे,  “काय म्हणालीस? हा हा.. बर..  बर.. ” असं काहीतरी म्हणायचे..  
           “जेवत जा वेळेवर.. आणि हो उरलं म्हणून घरातलं शीळ खाऊ नकोस. तुझी ती जुनी सवयी आहे. “आजोबा बोलत होते.. माझ्या डोक्यात काहीच विचार नव्हते. मी फक्त त्यांचे या वयातील एकमेकांच्यावर असलेलं प्रेम अनुभवत होतो…  आजोबा मधेच चिडून  म्हणाले,  “तिच्या बापाचं घर आहे का?  मी बांधलंय..  घाम गाळलाय या पट्ट्याने.” पलीकडून आजींचा समजुतीचा आवाज आला असावा..  तसें आजोबा म्हणाले,  “नाही..  नाही मी चिडत..  मी कशाला डोकीत राख घालून घेऊ?” आता आजोबा शून्य भाव चेहऱ्याने आजीचे बोलणे ऐकत होते… हा..  हा.. बर.. बर.. सुरु होतं. “अगं पण ती तुला घरातून जा म्हणत असताना ह्यो भडवा गप्प का बसला? ” समोरून पुन्हा समजुतीपर काहीतरी आजीनं सांगितले असावं..  “नाही.. नाही.. मी शिव्या देत नाही. नाही नाही मी चिडत नाही…” आजोबानी मोबाईल वर आजीला कमिटमेंट केली होती..  न चिडण्याची….पण  ते वास्तवात खूप चिडले होते. परंतु त्यांनी त्यांच्या थरथरणाऱ्या असह्य शरीराकडे बघितले आणि हळूहळू शांत झाले. “झोपताना बेडरूमच्या दाराला आतून कडी लावत जाऊ नकोस. काय वाटलं तर माधवला हाक मार.” आजोबांच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरुन काळजी लपली जात नव्हती. कानाला मोबाईल लावून पलीकडून आजींचे अगदी आज्ञाधारक पणे ऐकत होते…  अचानक लाईट आली. डांबावरील दिवे लागले..  सगळीकडे लख्ख प्रकाश पडला होता..  आता पाऊस पूर्णपणे थांबला होता… धोती मळकट पांढऱ्या रंगाची.. पायात एक जुनं चप्पल, हातात नाडीच्या ठोक्यावर चालणारे मनगटावर बांधलेलं स्टीलच्या पट्ट्याचे घड्याळ..  अंगात तीन बटणी शर्ट.. पिकलेली दाढी, थोडी वाढलेली..  चेहऱ्यावर झोळण्या  पडल्या होत्या. डोक्याला मफलर गुंडाळलेला होता. हातात काठी होती…  आधार म्हणून चालण्यासाठी..           

आजोबानी मला बघितलं आणि आजोबा चपापले. त्यांनी आपला फोन शर्टाच्या खिशात ठेवला. माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांना…  त्यांचं बोलणं ऐकलं असं भासू दिलं नाही. मी माझ्याच नादात असल्याचे भासवले. तसें ते थोडे रिलॅक्स झाले. “अरे बाळ, पाऊस गेला का रे? ” मी म्हणालो,  “हो आजोबा. ” रस्त्यावर आता लाईट आली होती.  पाऊस थांबला होता तशी रस्त्यावर पुन्हा वाहने सुरु झाली. 
आजोबा.. आणि मी ही घरी जायला निघालो..  रस्त्याच्या पलीकडे आजोबांचे घर असावे..म्हणून आजोबा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते पण वाहनधारकांच्या घाईमुळं त्यांना ते शक्य होईना.  तसा मी पुढे झालो आणि आजोबाना म्हणालो,  “आजोबा मी सोडू का पलीकडे? ” असं म्हणताच आजोबानी माझा हात धरला. मी वाहनांना हाताचे इशारे करत रस्त्याच्या पलीकडे आजोबाना घेऊन गेलो.          

काही क्षणाचा संवाद ऐकल्यामुळं मला आजोबांच्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. अंतर्मन वारंवार सांगत होतं..  म्हणत होतं..  की आजोबांना जाणून घे..  या भावनेपोटी मी आजोबांच्याबरोबर चालू लागलो.  “आजोबा तुम्हाला मुलं किती? “त्यावर आजोबा म्हणाले,” दोन, धाकटा पुण्याला असतोय..इंजिनियर आहे.  आणि थोरला सदा, इथं एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे.”आता माझ्या लक्षात आलं होतं की आजोबांना दोन मुले..  एक प्राध्यापक तर दुसरा इंजिनिअर..सदाशिव राव प्राध्यापक असावेत.. त्यांच्या बायकोने आजीसोबत भांडण केले असावे.  त्यामुळे आजी आपल्या लहान मुलाकडे पुण्याला गेल्या असाव्यात. थोडंफार मला समजलं होतं.. त्यामुळे आजींची चोकशी केली नाही. विनाकारण आजोबांचे मन दुखावण्याची माझी इच्छा नव्हती… 
          “ते  बघ..माझं घर..  अंधारात मला कमी दिसतंय.  जरा घरापर्यंत सोडतोस का बाळ?” आजोबा म्हणाले. “चला ना आजोबा.. चला सोडतो.” असं म्हणून मी आजोबांचा एक हात धरून त्यांना त्यांच्या घराकडे घेऊन गेलो… दारावरील बेल वाजवली.. दरवाजा उघडला..  आजोबा चाचपडत चाचपडत घरात गेले.. मागे वळणार इतक्यात समोरच्या भिंतीवर एका आजींचा फोटो पाहिला. आजोबांना थांबवत मी विचारले,  “आजोबा, या फोटोतील आजी कोण? ” त्यावर अस्पस्ट आवाजात आजोबा म्हणाले,  “आमची मालकीण, गेली सोडून मला…  एकट्याला मागे… आता उगाच जगायचं म्हणून जगायचं.. “असं पुटपुटत आजोबा आत गेले. 
           पुन्हा मागे न वळता मी घराकडे चालू लागलो.  हृदयात कालवाकालव सुरु झाली. विचारांचं वादळ मनावर आपटू लागलं…भावनांचे वृक्ष कोलमडणार..याची चाहूल लागली. डोळ्यासमोर काही दिसेना..म्हणून डोळे पुसले..  पापनीमध्ये अडकलेल्या आसवाना वाट मोकळी करून दिली…. तसें पुन्हा आजोबा नजरेसमोर उभे राहिले…  आयुष्याच्या संध्येला जोडीदार जर सोडून गेला…तर त्याचे दुःख अतीव असतें…याची जाणीव क्षणाक्षणाला होत होती…                  

प्रभाकर कमळकर                  

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: