स्मृतिगंध

       आज महाविद्यालयात जाण्यास जरा जास्तच उशीर झाला होता. सकाळची पावणे नऊची बस सुटली आणि वेळेचं सगळं गणितच चुकलं. निशा तिच्या मैत्रीणींसोबत घाईघाईने बसमधून उतरली. गडबडीत तिची ओढणी बसच्या दाराला अडकली. ओढणी कशीबशी सोडवून ती पुढे निघाली. इतक्यात एका मुलाने तिचे पाय धरले. त्याचे वय जेमतेम दहा वर्षाचे असेल. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती पुरती गोंधळून गेली. काय करावे ते तिला समजेना. तिच्या मैत्रिणीही गोंधळून गेल्या.  निशाने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण तो अगदी केविलवाणा चेहरा करून तिच्याकडे पाहू लागला. तिला त्याची  दया आली. त्याचा तो अस्वच्छ, घाणेरडा परंतु निरागस चेहरा पाहून निशाचे हृदय हेलावून गेले. तिच्या हाताचे बोट धरून तो तिच्याकडे भीक मागू लागला. 
“ओ ताई, एक रुपया तरी द्या न हो. लई दिस झाले, म्या काईच खाल्लं नाय.  दे ना व माय. तुले लई पुण्य लागील. तुले चांगला मास्तर नवरा भेटीन”, त्याच्या या बोलण्यावर बसमधून आत्ताच उतरलेले सर्व तिच्या सोबतचे डि.एड. महाविद्यालयातील मुले हसू लागली. 
निशाला खूप राग आला. तिने एक जळजळीत कटाक्ष त्या मुलांच्या टोळक्यावर टाकला, तसे ते तिथून सटकले. तिच्या नजरेला सर्वजण घाबरायचे परंतु हा मुलगा काही केल्या तिला सोडेना. मैत्रिणीही तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. निशाने पुरते ओळखले की पैसे दिल्याशिवाय काही हा आपल्याला सोडणार नाही. ती पर्सच्या खाण्यात चिल्लर पैसे शोधू लागली. सगळी पर्स शोधून झाली. शेवटी एका कप्प्यात तिला एक रुपयाचे नाणे सापडले. तिने ते नाणे त्या मुलाच्या हातावर ठेवले आणि ती मैत्रीणींसोबत लगबगीने तिथून निघाली. जणू काही ती मोठ्या कैदेतून सुटली होती. 
थोडे पुढे गेल्यावर निशाने एक सुटकेचा श्वास टाकला. इतक्या वेळ दिपाने हसू आवरून ठेवले होते. पण तिला ते आता आवरेना. मधेच थांबून ती पोट धरून जोरात हसू लागली. तशा बाकीच्या मैत्रीणीही थांबल्या आणि हसू लागल्या. त्या सर्वजणी निशाची चांगलीच फिरकी घेऊ लागल्या. त्यांना सापडलेली संधी त्या थोडीच सोडणार होत्या. निशा मात्र खूप चिडली. तिने दिपाला चांगलेच बदडून काढले. 
दुसऱ्या दिवशीही बसस्थानकावर तो मुलगा पुन्हा आला आणि तिच्या समोर भीक मागू लागला. तिसऱ्याही दिवशी तोच प्रकार. ती बसमधून उतरली की तो मुलगा तिच्या समोर दत्त म्हणून उभा राहायचा. इतक्या मैत्रीणींच्या घोळक्यात तो फक्त तिच्याकडेच पैसे मागायचा. तीन दिवस झाले, ती न बोलता त्याला रोज एक रुपया देत होती. 
त्या मुलापासून लवकर सुटका व्हावी व महाविद्यालयात लवकर पोहचता यावं म्हणून सर्वजणी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागल्या. आज निशाने त्याला पैसे देता देता त्याचे चांगलेच निरीक्षण केले. भीक मागण्याची कला त्याला चांगलीच अवगत झाल्याचे तिला दिसून आले. ती रस्त्याने झपझप चालत होती, पण डोक्यात सारखे त्या मुलाचेच विचार चालू होते. वर्गातही तिचे फारसे लक्ष लागले नाही. तिने मनात काहीतरी पक्के ठरवले होते.
पुढच्या  दोन दिवसात तो मुलगा काही तिला दिसला नाही. बसमधून उतरताच सवयीप्रमाणे सर्वांच्या नजरा त्याला शोधायच्या. पण तो कुठेच दिसला नाही. 
एके दिवशी नेहमी प्रमाणे संध्याकाळी महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी  सर्वजणी बसस्थानकावर आल्या. बस येण्यास अवकाश होता. महाविद्यालयात जाण्यासाठी त्या सर्वजणी जवळच्या तालुक्याच्या गावातून जिल्ह्याचा ठिकाणी दररोज येणे जाणे करायच्या. मुख्य अकोला म्हणजे बाजारपेठचे ठिकाण. त्यामुळे बसमध्ये फार गर्दी असायची. गर्दीतून वाट काढून जागा मिळवणे म्हणजे फार जिकरीचे काम होते. बस येताच सर्वांनी धावत जाऊन जागा मिळवली. 
निशा बाकावर बसण्यासाठी पाठीवरची बॅग काढू लागली, तितक्यात तो मुलगा आला व तिच्या समोर हात पसरवून भीक मागू लागला. निशा त्याच्यावर  रागातच डाफरली, ‘रोज रोज का रे भीक मागून खातोस? अरे शाळा का शिकत नाहीस? निदान मेहनत करून तरी पोट भर नं ! देवाने चांगले हात पाय दिलेयत, त्यांचा उपयोग कर. स्वतःच्या मेहनतीने पोट भर आणि सन्मानाने जग.”
तिने पर्समधून पन्नास रुपयाची नोट काढून रागाने त्याच्या हातात कोंबली आणि ती त्याला निक्षून म्हणाली, “या पैशात काहीतरी समान विकत घे आणि एखाद्या छोटासा व्यवसाय सुरू कर. आणि हो, हे पैसे परत केल्याअखेरीज पुन्हा माझ्यासमोर येऊन तुझं तोंडही दाखवू नकोस.” 
त्यानंतर महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो मुलगा निशाला पुन्हा कधी दिसला नाही. तिला कधी कधी वाटायचे, आपण त्या दिवशी त्याला इतकं बोलायला नको होतं. जसजसे दिवस सरत गेले, तसे निशा त्या मुलाला विसरूनही गेली.
एके दिलशी निशा तिच्या बाबांसोबत अकोल्यात आली होती. बाबांना दवाखान्यात तपासून झाल्यावर काही गरजेच्या वस्तू घेऊन ते दोघे घराकडे जाण्यासाठी बसस्थानकावर आले. अचानक वाटेत निशाच्या चप्पलच्या अंगठा तुटला. तिने आशेने आजूबाजूला पाहीले. कोपऱ्यावरच तिला एका छत्रीखाली चांभारकाम करत बसलेला एक युवक दिसला. ती पाय घासत कसेबसे त्याच्या छत्रीपाशी पोहोचली. तिने चप्पल काढून त्या युवकाकडे शिवायला दिली. 
निशाला त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता. हातातले काम बाजूला ठेवून दोन मिनिटात त्याने तिच्या चप्पलचा तुटलेला अंगठा शिवून दिला. निशाने पैसे देण्यासाठी पर्स उघडताच तो म्हणाला, “नको ताई, तुम्ही त्या दिवशी दिलेल्या पैशाची अजून मी परतफेड केली नाहीये.”
“ताई, तुम्ही दिलेल्या पैशातून मी चप्पल शिवायचे सामान विकत घेतले. मी आता भीक मागत नाही, मेहनतीने कमावून पोट भरतो.” निशा त्याचे बोलणे ऐकून अवाक झाली. आता तिला कळलं की त्या युवकाचा चेहरा तिला ओळखीचा का वाटत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत समाधानाचे भाव उमटले. तिला मनोमन त्याचा अभिमान वाटला. 
गाडी आल्याने निशा तिथून निघाली. दुसऱ्या दिवशी ती मुद्दाम त्याला भेटण्यासाठी तिथे गेली. तिने त्याला आपल्या सोबत एका शाळेत नेले. त्या शाळेत तिने डी. एड ला असताना पाठ घेतले होते. तिचे काका त्या शाळेत शिक्षक होते. रात्री आठ ते दहा या रात्रपाळीच्या वर्गात तिने त्या मुलाचे नाव दाखल केले. जी मुलं  दिवसभर शिकू शकत नाहीत किंवा नाईलाजाने ज्यांना कमी वयात कष्ट करून पोट भरावे लागते, अशा मुलांसाठी ती शाळा होती. 
निशा अधूनमधून जावून त्याची चौकशी करायची. ती तिला जमेल तसे त्याला लागणाऱ्या आवश्यक त्या शालेय वस्तू काकांजवळ नेऊन देत होती. कालांतराने निशाला नोकरी लागली. त्या मुलाचेही बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. नंतर तो कुठे गेला काही कळले नाही. परंतु आजही निशाला त्याच्या निरागस चेहऱ्यावर आलेला आत्मविश्वास आठवला की तिच्या मनाला समाधानाची अनुभूती होते.  

निशा डांगे,
पुसद, जि. अकोला.

One thought on “स्मृतिगंध

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: