मम्मी, तुस्सी ग्रेट हो !

निशा मैत्रिणीसोबत व्हाटसअॅपवर चॅटिंग करण्यात मग्न असतानाच तिच्या मम्मीन 'निशू s' म्हणून हाक मारली अन् ती 'आले गं' म्हणीत तडक किचनमध्ये आली. तिनं विचारलं, "आवरलं का गं तुझं, मम्मी?" "झालंच हं दोन मिनटात.. तुझंच काही राहिलं असेल तर बघ.. "डब्बा भरीत मम्मी म्हणाली. "माझं आवरलंय सगळं मघाशीच.. चल पटकन, ऊन चटकत आहे .." "हो, झालंच हं.. "मम्मी हसून म्हणाली अन् टिफीन बॅग घेऊन निघाली.तीदेखील स्कार्फ गुंडाळून निघाली. आज रविवारची सुट्टी असल्यानं निवांत मनानं सोफ्यावर पेपर वाचत बसलेल्या पपांना ती म्हणाली, "पपा,येतो आम्ही जाऊन.." "हो, त्या दोघांची जेवणं झाल्यावर या हं.."पपा म्हणाले." हो ना.. ताटं वगैरे घासून झाली की, परत येऊ मग आम्ही..."

दोघी मायलेकी बंगल्याबाहेर आल्या. निशानं स्कुटी बाहेर काढली. मम्मी जवळ येताच ती म्हणाली,
“मम्मी,मी घेते गं गाडी ..”
मम्मी काहीच बोलली नाही. फक्त तिच्याकडं बघून हसली.
“मम्मी, डोक्यावरुन पदर घे ना.. खूप ऊन पडलंय..” निशा म्हणाली.
“अगं, मे महिना आहे ना, मग ऊन तर असणारंच झालं ना ! ” मम्मी म्हणाली अन् तिनं डोक्यावरुन स्कार्फ गुंडाळून घेतला.
“आता जमलं बघ,चल बस” निशा म्हणाली अन् तिनं स्कुटी स्टार्ट केली. टिफीनची बॅग हातात घेऊन मागच्या सीटवर मम्मी बसली अन् दोघी निघाल्या.
अवघ्या पाच मिनिटातच ‘ममता कॉलनी’ तला छोटासा रस्ता पार करुन त्या दोघी मेनरोडला आल्या. स्कुटी मेन रोडला लागताच निशानं वेग वाढवला. अवघ्या आठ-दहा मिनिटातच त्या शहराच्या जुन्या भागात असलेल्या रविवारपेठेत आल्या. आता मात्र इथे अरुंद रस्ता होता अन् रस्त्यानं पायी जाणारेही होते.रस्त्यावर नळांसाठी केलेले खड्डेही होते. म्हणून निशा धिम्या गतीने सफाईदारपणे गाडी चालवत होती. पाच मिनिटातच त्या दोघी आपल्या जुन्या चिरेबंदी वाडयासमोर आल्या. निशानं स्कुटी हॅन्डललॉक केली अन् स्कार्फ सोडला. मम्मीनं वाड्याची कडी वाजवताच चष्मा परिधान करणाऱ्या सावळ्या रंगाच्या नारायणरावांनी स्वतः दार उघडलं अन् त्यांनी हसतच त्या दोघी मायलेकींचं स्वागत केलं. ‘आजोबा’ म्हणीत निशा पुढं झाली अन् आजोबांच्या पाया पडली. नारायणरावांनी तिला आशीर्वाद दिला अन् तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत तिला विचारलं,
” बेटा, ह्या साताठ दिवसात आली नाहीस, म्हणून मीच तुझ्या मम्मीला काल म्हटल-तुला घेऊन ये म्हणून..”
“हो ना आजोबा,आता पुढे बारावीचं वर्ष असल्यानं खूप अभ्यास असतो ना… ” निशा म्हणाली.
..आजोबा अन् नातीचं बोलणं ऐकत असलेली मम्मी मध्येच म्हणाली,
“अगं,त्यांना सावलीला बसू तर दे आधी… उन्हातंच सुरु झालं तुझं..”
..मग निशा व नारायणराव दोघंही हसतच ओसरीवर आले. नारायणराव खुर्चीवर बसताच इकडं -तिकडं बघत निशानं विचारलं,
“आजोबा, आजी कुठाय ? बाहेर गेलीय का कुठे ?”
“बाहेर कुठं जाणार ऊन्हाचं ? मागं परसात आहे..”
“आजोबा, आले हं आजीला घेऊन..” म्हणीत निशा उठली अन् घरामागच्या परसात आली. तिथं छोटया मोकळ्या पटांगणात कण्हेरी, गुलाब, जाई-जुई, सदाबहार, मोगरा अशी फुलझाडं होती. एका कोपऱ्यात पिंपळाचं झाडही होतं. राधाबाई मात्र फुलझाडांपाशी काहीतरी काम करीत होत्या. निशानं ‘आजी s’ म्हणून हाक मारली अन् त्यांच्याजवळ आली. राधाबाईंनी हातातलं खूरपं खाली टाकलं अन् बकेटमध्ये हात धुतले. हसून नातीकडं बघत त्या उठल्या. पदराला हात पुशीत त्या म्हणाल्या,
“निशू, किती दिवसांनी आलीस गं ?”
“हो गं, आजी.. वेळच नसतो ना बघ अभ्यासामुळं..” निशा म्हणाली.
राधाबाईंनी तिला मायेनं जवळ घेतलं अन् तिच्या गालावरून हात फिरवत विचारलं,
“मग करतेस ना खूप अभ्यास ?”
निशानं फक्त हुंकार दिला. मग राधाबाई तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाल्या,
“तुझा पपाही खूप अभ्यास करायचा बघ.. अगदी जेवायचंही भान नसायचं त्याला.. बरं, चल घरात, ऊन लागतंय खूप…. अगं, रोपं सुकून चालली म्हणून आळे करीत होते..”
त्या दोघीही घरात आल्या अन् ओसरीत येऊन नारायणरावांच्या शेजारी बसल्या. एवढ्यात स्वैपाकघरातून पाणी घेऊन मम्मी आली अन् म्हणाली,
“आई, पाणी घ्या, तोवर करते ताटं “
“यायला उशीर कसा झाला गं तुला आज ? “राधाबाईंनी कडवटपणे विचारलं. अशा अनपेक्षित प्रश्नानं मम्मी गोंधळूनच गेली. तिचा चेहरा पांढराफट् पडला.ती काहीएक न बोलता थेट स्वैपाकघरात गेली. निशाही मनातल्या मनात खट्टू झाली; पण तसं काही न दाखवता ती म्हणाली,
“आजी, अगं, आज रविवार असल्यानं पपा घरीच आहेत ना.. त्यांचा नाश्ता,स्नान वगैरे करण्यात झाला थोडा उशीर … चल उठ बरं,बसा लगेच जेवायला तुम्ही आता..”
.. निशा उठली अन् तिनं राधाबाईना पाणी दिलं. मग त्यांचा पाट नारायणरावांच्या बाजूला टाकला. राधाबाई हात धुऊन पाटावर बसताच निशा आतमध्ये ताटं करायला गेली. मग अचानकच राधाबाईनी मोठया करारी आवाजात ‘सरिता s’ म्हणून हाक मारली. त्या हाकेसरशी मम्मी स्वैपाकघरातून बाहेर येताच राधाबाई म्हणाल्या,
“आजपासून आम्ही माळवदावर झोपायला जाणार आहोत, तर तेवढी गच्ची झाडून काढ बरं आत्ता.. खूप धूळ आहे वर..”
‘बरं’ मम्मी म्हणाली अन् आतमध्ये गेली.
“आजी, ऊन आहे ना आत्ता खूप.. नंतर झाडता येईल ना ! “निशाच म्हणाली.

“नंतर कधी झाडणार आहात गं ? तुम्ही आता गेल्यावर उद्याच येणार ना…. ते काही नाही, सरिता, तू जा वर अन् ये झाडून.. निशू आहे आम्हाला वाढायला.. “राधाबाई निर्वाणीचं बोलल्या.
“निशू, आईंचंच बरोबर आहे.. येते मी गच्ची झाडून.. तू घे ताटं, चल “मम्मी म्हणाली अन् झाडू घेऊन ती माळवदावर गेली.
निशानं लगबगीनं दोघांची ताटं केली अन् राधाबाई व नारायणरावांसमोर आणून ठेवली अन् ती त्यांच्या बाजूलाच अस्वस्थ मनानं बसून राहिली…. आजी मम्मीशी असं का वागते, हाच प्रश्न तिला पडला अन् वेळोवेळी आजीनं मम्मीच्या केलेल्या मानहाणीचे, अवहेलनेचे व अपमानाचे प्रसंग तिला आठवू लागले… आजी मम्मीला कधीच सरळ बोलत नाही अन् कायमच तिचा दुःस्वास करत असते. मम्मी मात्र एकही शब्द माघारी न बोलता हे सारं सहन करते. कशासाठी पण ? ते काही नाही, आज मम्मीला विचारायचंच ती हे सारं का सहन करते ते.. निशानं मनाशी ठरवलं.
..दोघांची जेवणे झाल्यावर निशानं ताटं उचलले अन् पाच मिनिटात घासूनदेखील ठेवले. एवढयात मम्मी आली अन् बाहेर ओसरीवर राधाबाईंशेजारी जाऊन बसली. निशाही आजी-आजोबांचं रात्रीचं जेवण फ्रीजमध्ये ठेवून फ्रेश झाली अन् बाहेर आली. थोडा वेळ तिनं राधाबाई नि नारायणरावांसोबत गप्पा मारल्या. बारा वाजता ती म्हणाली,
“आजी, येतो गं आम्ही, नाहीतर मला क्लासला उशीर होईल दुपारी..”
‘या मग अन् रस्त्यानं सावकाश जा.. ऊनही झालंय खूप..” नारायणराव म्हणाले.
निशानं त्या दोघांनाही ‘बाय’ केलं अन् मम्मी टिफीनबॅग घेऊन येताच दोघी मायलेकी स्कार्फ बांधून वाडयाबाहेर पडल्या. निशानं स्कुटी स्टार्ट केली अन् मम्मी बसताच ती निघाली…
आता ऊन मी म्हणीत होतं. स्त्यावर गर्दी नव्हती. दहा=बारा मिनिटातच त्या घरी पोहोचल्या. निशानं स्कुटी बंद केली अन् बंगल्यात घेतली. कंम्पाउंडचं गेट बंद करून ती मम्मीजवळ आली अन् म्हणाली,
“मम्मी, मला तुला काही विचारायचं आहे.. “
“काय विचारायचंय गं ?”
“आजी नेहमी तुझा एवढा दुःस्वास का करते ? अन् तरीही तू गप्प का राहतेस ?”
मम्मीनं चमकून तिच्याकडं पाहिलं अन् तिच्या डोळ्यात दुःखी भाव साकळून गेले. तरीही ती खोटंच म्हणाली,
“काहीतरी काय म्हणतेस, निशू ? असं काही नाही गं..”
मम्मीचा कंठ दाटून आल्याचं निशाला जाणवलं अन् ती काही तरी लपवत असल्याचं तिनं ओळखलं. तिनं विचारलं,
“मम्मी, माझी शप्पथ गं ?”
मम्मीनं क्षणभर तिच्याकडं डोळे रोखून पाहिलं अन् मनाशी काहीतरी विचार करून ती म्हणाली,
“घरात चल, मग सांगते तुला..”
मग दोघीही घरात आल्या. पपा त्यांची वाट बघतच होते. त्यांना बघुन ते म्हणाले,
“बरं झालं लवकर आलात ते, माझे डोळे झाकत होते. चला, झोपतो हं मी जरा”
पपा बेडरुममध्ये गेल्यावर मग निशाला तसं बरंच वाटलं. तिनं स्कार्फ काढून ठेवला. कपडे बदलून ती फ्रेश झाली अन् मग हॉलमध्ये आली. मम्मी चेंज करुन आधीच आली होती. मग दोघी माय-लेकी कूलरच्या हवेला निवांत बसल्या. मग निशाच म्हणाली,
“हं सांग मम्मी, काय म्हणतेस ?”
मम्मीनं एकदा अवती -भवती पाहिलं अन् म्हणाली,
“निशू, मुळात मला सून म्हणून स्वीकारायचीच तुझ्या आजीची इच्छा नव्हती.. “
“कशामुळे पण ?”
“अगं त्यांना त्यांच्या भावाची मुलगी सून करुन घ्यायची होती पण ती मुलगी काही तुझ्या पपांना पसंत नव्हती..”
“का पसंत नव्हती ?”
“अगं ती दिसायलाही काही विशेष नव्हती अन् फक्त दहावीच होती. उलट मी बीए होते. शिवाय रंगा-रुपालाही तिच्याहून उजवी होते. त्यासाठी तुझ्या आजीनं दहा-बारा वर्षे असाच माझा छळ केला…”
“हे झालं मागचं, पण सध्याही आजी तुझ्याशी तसं का वागते ?”
“ऐक ना.. दहा वर्षांपूर्वी हा प्लॉट मी तुझ्या पपांना घ्यायला लावला अन् तुझ्या आजीचं डोकंच फिरलं. त्यांचं म्हणणं – एवढं मोठं माळवदाचं घर असताना प्लॉट काय करायचाय ? त्यांना न विचारता प्लॉट घेतल्यानं त्यांचा अहंकार दुखावला गेला ना ! हा प्लॉट एक निमित्त झालं. पुढं हे बांधकाम सुरू केलं तेंव्हाही त्यांनी गोंधळ केला. ‘कशाला बांधतो रे तिकडं ‘ म्हणू लागल्या. तुझे पपा म्हणाले ‘अगं, किरायानं देऊ कुणाला.’मग त्या गप्प झाल्या.पुन्हा जेंव्हा बांधकाम पुर्ण झालं तेंव्हा तुझे पपा त्यांना म्हणाले – बंगल्यावर चला राहायला, तर त्या म्हणाल्या – आम्हाला नाही यायचं तिकडं, आम्ही हे घर सोडणार नाहीत .. “
” मग काय झालं ? “
” मग काय होणार ? आपण इकडे राहायला आलोत अन् त्यामुळं त्यांचा अहंकार मग अधिकच दुखावला गेला. मीच त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडलं, असं त्या उघडपणे लोकांपाशी म्हणू लागल्या. पण मी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांनी इथं यायला नकार दिल्यावर आम्ही त्यांना रोज डब्बा नेऊन द्यायचं ठरवलं.. .. “
” पण मम्मी, ते इकडं का येऊन राहात नाहीत ? ” निशानं तिच्या मनातला प्रश्न विचारला.
” अगं,त्यांचं सारं आयुष्य त्या घरात गेलंय ना. म्हणून त्यांना ते घर सोडावं वाटत नाही अन् तुझ्या पपांच्या प्रोफेसरच्या स्टेटसला तसलं बोळीतलं जुनं घर चांगलं वाटलं नाही, म्हणून आपण हा बंगला बांधला. शेवटी तुला सांगते, जनरेशन गॅप पडणारंच ! काय करणार ? आत्ता तुझ्या मनातला शेवटचा प्रश्न की, मी तुझ्या आजीकडून होणारा अपमान,bछळ का सहन करते ? तर ऐक निशू,मी जर त्यांना काही बोलून दुखावलं तर त्या दुःखी होणार, चिडणार आणि सारा राग तुझ्या पपांवर काढणार. मग तुझे पपाही कष्टी होणार अन् मनाची शांती गमावणार.. तुझे पपा सुखी -समाधानी नसतील तर मग मीही कष्टी होणार .. म्हणजे इतकं सारं असूनही घरात सुख -समाधान लाभणार नाही. मला ते नको होतं.bशिवाय मी जशास तसं वागले तर तुझ्या आजीलाही या वयात आधार संपल्यासारखं वाटणार … अन् तसं झालं तर त्या किती दिवस तग धरुन राहणार आहेत ? त्यांच्याविना मग तुझे आजोबाही कोलमडून पडणार. म्हणून मी गप्प राहून सहन करते बघ. ” एवढं मम्मी एका दमात बोलली अन् थांबून तिनं निःश्वास सोडला.
“पण आपण तर त्यांचं सारं करतो ना, तरीही आजी असं कसं वागू शकते, हेच मला कळत नाही, मम्मी .. “
“निशू, अगं,असतो स्वभाव एखाद्या माणसाचा अन् स्वभावाला काही औषध नसतं म्हणतात. अन् निशू, तुला सांगते एखादी व्यक्ती आपल्याशी जशी वागली, तसंच आपणदेखील त्या व्यक्तीसोबत वागावं, असं काही नसतं गं.. शिवाय माझ्यासारख्या एका सुशिक्षित अन् सुसंस्कृत स्त्रीनं जर तसं वागलं तर मग माझ्या त्या शिक्षणाचा, सुसंस्कृतपणाचा उपयोगच काय झाला ? सांग ना.. त्यांच्यात बदल होईल तेंव्हा होईल,तोवर गुपचूप सहन करायचं एवढंच माझ्या हातात आहे, निशू .. “मम्मी एवढं बोलून थांबली अन् कष्टी होऊन निशाकडं बघू लागली. मम्मीचं हे सारं बोलणं ऐकून मम्मीविषयीच्या अभिमानानं निशाचा उर भरुन आला. ती भारावलेल्या मनःस्थितीतच उठली अन् मम्मीला कडकडून मिठी मारून म्हणाली,
“मम्मी, तुस्सी ग्रेट हो !”


उमेश मोहिते,
माजलगाव, बीड

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: