संवाद

“खरंच माझी आई पण काँलेजमधे जाणार का टिचर?…मी सांभाळेन लहान भावंडाना, संध्याकाळचा स्वयंपाक पण करेन टिचर… आईला नक्की काँलेजमधे शिकवा…” बारा वर्षांच्या अंशुचा उत्साह बघुन मुनासोबत टिचरचेही डोळे भरुन आले. 
पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातुन कुटुंबासोबत तिशीतली मुना पुण्यात रहायला आली होती. शिक्षण काहीच नव्हतं. नवरा बांधकामावर मजुर, सहा मुलं, साधारण 3 वर्षे ते 12 वर्षे वयाची. सगळं सांभाळुन स्वत:साठी वेळच मिळत नसे. मुलांनी खुप शिकावं, शिकुन मोठं व्हावं म्हणजे आपल्या सारखं झोपडीत रहावं लागणार नाही हेच एक स्वप्न होते तिचे. त्यासाठी मात्र ती खुप कष्ट घेत होती. मुलांना शिस्तीने शाळेत पाठवायची.
त्यातच एक छान गोष्ट घडली, ती रहात असणारया कामगारांच्या वस्तीमधे आम्ही शाळा सुरु केली.मुलांसोबत महिला पण शिकु लागल्या. मुनाला खुप आनंद झाला. ती पण शाळेत येऊन शिकायचा प्रयत्न करु लागली. तिच्यासाठी अक्षर गिरवणे म्हणजे मेहंदीची डिझाईन काढण्यासारखेच होते. पण दोन महिन्यात जराशी अक्षरओळख होऊन ती स्वत:ची सहीसुध्दा करु लागली.
मुलांना पण तिचा अभिमान वाटु लागला. मुलं पण तिला वेळ मिळेल तेव्हा लिहायला वाचायला शिकवत असतं. त्यातच एक दिवस मी सांगितले की मुना तुला एका मोठ्या काँलेजमधे तीन महिन्याचा प्रौढांना सांभाळायचा कोर्स करायचाय व त्या नंतर तुला छान बारा-पंधरा हजाराची नोकरी लागु शकते. मुना एकदम खुष झाली. मोठ्या शहरात येऊन काही तरी शिकलो व नोकरी मिळवली हे एक स्वप्नच होते तिच्यासाठी.आणि एक दिवस सगळीकडची जुळवाजुळव करुन मुना काँलेजला जाण्यासाठी निघाली. मुलांच्या डोळ्यात अभिमान दिसत होता. छान साडी नेसुन डोक्यावरुन पदर घेऊन तिने काँलेजमधे प्रवेश घेतला. युनिव्ह्रसिटीची एवढी मोठ्ठी चकाचक इमारत बघुन मुनाचे तर डोळेच फिरले. इतक्या मोठ्या काँलेजमधे शिकणार ह्या विचाराने तिला भरुन आले.काँलेजचा पहिलाच दिवस. सगळ्याच विद्यार्थीनी मुनासारख्याच. परिस्थितीने, शिक्षणाने थोड्याफार कमी जास्त पण झोपडीतच रहाणारया. एकमेकांचा परिचय झाल्यावर काँलेजच्या टिचरने सांगितले की आता आपण संवाद कसा साधायचा ह्यापासुन सुरुवात करुयात. संवाद हा शब्द मुनासाठी अतिशय नवा होता. तिने प्रश्नार्थक नजरेने टिचरकडे पाहिले. शेजारी बसलेल्या एका वर्गमैत्रिणीला विचारले, 

“ये संवाद याने क्या होता है?”

तिने सांगितले की, “संवाद याने हम एकदुसरेके साथ जो बातचीत करते है, पती पत्नीमे, माँ बच्चेमे या किसीके साथ मे जो बाते होती है… कल आपने क्या बाते की वो बताना है…”

तिचे उत्तर ऐकुन मुना खुष झाली. इतका सोपा असतो होय संवाद असे तिला वाटले. मग प्रत्येकीने काही ना काही संवाद उदाहरणादाखल सांगितला. मग मुनाची वेळ आली. डोक्यावर पदर घेऊन मुना उठली व तिने संवाद सांगायला सुरु केला, 

“कल रात को ये… मेरा मरद दारु पिके आया… मैने उसे बोला की तुझे ऐसेही जिना है तो घरमे आने का नही…बच्चे यही देखते है… वो बोला की तु कोण होती है मुझे बोलनेवाली… और मारने लगा… मैने भी गाली दिया आैर उसे धक्का दिया… बोला पुलिस को बुलाउंगी…”

मुनाचा हा अनपेक्षित संवाद ऐकुन वर्गात एकच हसा पिकला व टाळ्या वाजु लागल्या. एवढ्या मोठ्या काँलेजमधे पहिल्यांदाच जाऊन टाळ्या मिळवणारया मुनाला कळले नाही की ह्यात काय विशेष होत की लोकांनी हसत टाळ्या वाजवल्या.

दुसरया दिवशी जेव्हा तिने मला पाठशाळेत येऊन हा किस्सा सांगितला तेव्हा मला हसु का रडु हे कळत नव्हते. पण एकच वाटले की तिच्या रोजच्या आयुष्यात हाच संवाद घडत असेल तर ती तेच सांगणार ना… आणि हा तिचा निष्पापपणा होता की तो संवाद ती सगळ्यांसमोर सांगु शकली…जे तिच्यासोबत घडत तेच ती सांगणार हे खरं होत पण आपल्यातही कित्येक जोडप्यात अश्याप्रकारचे संवाद होत असतीलच, पण आपण लोकांसमोर इतक्या सहजतेने बोलु शकलो असतो का? लोक काय म्हणतील,लोक नाव ठेवतील ह्या नावाखाली आपण खोटा बुरखा तर पांघरत असतो…

आपल्यातही खुपदा असे काही घडले की आपण नाराज असतो पण असा मनमोकळा संवाद आपल्या जवळच्या मैत्रिणीला तरी सांगु शकतो का?… पण म्हणुन मुनाच्या ह्या खऱ्या मनमोकळ्या संवादाला मी पटकन हसावे का?…एक ना अनेक विचार येत होते डोक्यात. पण मुनाने माझी तंद्री मोडली,

“कुछ गलत बोला क्या मैने टिचर?” क्षणभर कळले नाही की काय सांगावे… हे चुक आहे की बरोबर, पण असे काहीही न बोलता मी हसुन म्हणले, ” तुझा संवाद चुकीचा कोणीच ठरवणार नाही ग मुना,जे तु जगत आहेस तेच सांगितलेस… त्यात नाटकीपणा आणला नाहिस… खुप दाद देते तुझ्या आत्मविश्वासाची..” असे म्हणत मी तिच्या पाठीवर थाप दिली. माझी शाबासकी मिळवुन मुना खुष झाली. मी मात्र अजुनही विचारातच होते… संवादाच्या…


प्राजक्ता रुद्रवार, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: