व्यथा

 “अवं बाई घ्या की कायतरी माझ्याकडनं! आज सकाळपासनं भवानी बी झाली नाही. दोन लहानग्यांना काय दिऊ खायाला?” भाजी विकणारी रखमा भाजीची टोपली डोक्यावर वागवत भाजी विकत होती.”चीनमधनं ह्यो करूना का काय रोग आला नं माझ्या धंद्याला टाळं लागलं.कोण बी भाजी घीना झालंय. काय खावावं गरीबानं”. “ही मोठी माणसं नियम काढत्यात आन आमा गरीबाच्या पोटावर पाय! जराबी इचार करत न्हाईत की गरीब लोकं काय खात्याल”!. सरकारनं एका महिन्याचं राशन द्यायचं कबूल केलंय पण हे लॉकडाऊन का काय तीन महिन्यापसनं आहे. मग आम्ही पोटात काटं कसं  भरावं?” हे उद्गार ऐकून माझी तंद्री मोडली. मी तरी काय करणार! गरीब रडू शकतो, श्रीमंत पैसा मोजतो. आम्ही मध्यमवर्गीय मनाशीच कुढणार !
             सरकारकडं तक्रार कोण करणार? ना रडू शकत, ना तोंडावर हासू फुलत!अशी आमची अवस्था झालीय. तरीही मी रखमाची समजूत घातली आणि तिच्याकडून थोडीशी भाजी खरेदी केली. तशी रखमानं तोंड भरून आशीर्वाद दिला,”बाई, तुम्हांवाणी दयाळू माणसं आजून बी हैती म्हून आम्ही गरीब हाय! न्हायतर मागंच इख खाऊन नायतर उपासमारीनं मेलो आसतो”. रखमाच्या या शब्दांनी पुन्हा मला विचारात गुंतवलं, “खराय, आणखी अशा कितीतरी रखमा दारोदार हिंडून भाज्या, फळे नि आणखी काही काही विकत असतील! कसा सावरणार  त्या आपला फाटका संसार! काय देणार त्या आपल्या इवल्या लेकरांच्या पोटाला! आपणास किमान महिन्याचा फिक्स्ड पगार तरी आहे, पण हातावर पोट असणारे कितीतरी लोक आज बेरोजगार झालेत. गावात शेत, घर नाही म्हणून मुंबईचा रस्ता पकडला. रेल्वे रूळाशेजारी झोपडे बांधून कसेतरी गुजराण करणारे हे दरिद्री लोक या महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना कसा करणार ! असा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्यात गुंता झाला होता.
        आता गाव शीव सोडून आलेले हे रोजगारी लोक कुणी महानगरपालिकेत कंत्राटी सफाई कामगार झालेत तर कुणी गटार नाले स्वच्छ करतंय.तोंडाला मास्क लावूनही सुटी न घेता किंवा घरात बसा म्हणुन सरकार सांगतंय तरी रस्ते,परिसर साफ करून आपले कर्तव्य निभावत आहेत.
       सरकार सांगतंय घरात बसा पण त्यांना समजायला हवं, घरात बसून पोट कसं भरणार? रोज कमाई करणारे हे लोक किती दिवस घरात बसणार? बोलणे वेगळे नि जगणे वेगळे! सरकारला का समजत नाही? त्या गरिबांचा काय दोष! त्यांना का ही शिक्षा? संसर्ग टाळा, सॅनिटायझरने हात धुवा, तोंडाला मास्क लावा पण या वस्तू घ्यायलाही पैसा लागतो. तिकडे एका वेळच्या जेवणाची भ्रांत ते लोक सॅनिटायझर नि मास्क लावून घरात बसले तर पोट कसे भरणार!
अशा हजार शंका मनाला कुरतडू लागल्या. आपण या पृथ्वीतलावर राहतो.
हा निसर्ग,सुर्य,चंद्र,तारे आपणांस कितीतरी गोष्टी बहाल करतात. वृक्ष, लतिका आपणाला सहस्त्र करांनी त्यांच्याजवळील सर्वकाही निरपेक्षपणे वाटत असतात.इतकेच नव्हे तर झाडावरील फळे खाली पाडण्यासाठी आपण त्यावर दगडांचा मारा ही करतो. तरीही झाडे आपल्यावर नाराज न होता आपणांस मधुर फळे देतात.
         सृष्टीवरील सर्व प्राणीमात्र आपल्याला कोणत्या न् कोणत्या प्रकारे साह्यास येतात.त्यांचे हे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही.फक्त मानवी एकमेव बुद्धीवान असा प्राणी आहे. निसर्गातील सर्व गोष्टींचा तो फायदा घेतो नि बदल्यात त्यांना दु: ख नि त्रासच देतो. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा वापर तो आपल्या स्वार्थापायी करून घेतो.उपयोग संपला की तो त्याला फेकून देतो. कृतघ्नासारखे वागतो. त्यांचे आपल्यावर शतशः ऋण आहेत.ते कधीच फिटू शकणार नाही.पण माणसाला माणूसकीच्या नात्याने तरी वागवू शकतो.
        आज संध्याकाळी सुधीर घरी येतील तेव्हा त्यांच्याशी बोलायचे. आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची. ऑफिसमधील आपल्या मित्रमंडळींना आवाहन करून अशा गरीब लोकांना मदत मिळवून द्यायची. कारण “ज्याचे जळते त्यालाच कळते” या उक्तीप्रमाणे बंगल्यात राहणाऱ्यांना झोपडीत राहून भुकेकंगाल राहणाऱ्या लोकांकडे पहायची  काय गरज! अशीच  वृत्ती सगळीकडे फोफावत आहे. पण नाही! ही वृत्ती बदलायला लावायची.” देवाजीची आम्ही सारे लेकरे” “सारे भारतवासी बंधू-भगिनी” हे का फक्त प्रतिज्ञा करण्यापुरतेच का? ते प्रत्यक्षात उतरवून दाखवायचे.रखमासारख्या सर्व गरिबांना होईल तितकी मदत करायची. तर बंधू-भगिनी म्हणून राहायला पात्र ठरू. मनाशी पक्का निर्धार करून मी माझ्या कामाकडे वळले.

भारती सावंत
मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: