हळदीकुंकू

दरवर्षी चातुर्मास आला की छोटीशी यात्रा भरायची. तो उत्साह वर्णनातीत असायचा. दिवसभर फराळाची रेलचेल असायची. करत करत सुमी थकून जायची; पण ते सगळे ती मनापासून करायची. हळूच हसरा, नाचरा, जरासा लाजरा असा श्रावण यायचा. त्याच्या रिमझिम बरसातीत सुमी चिंब भिजलेली असायची. अशाच एका श्रावणमासी तिच्या जीवनवेलीवर प्रेमतुषारांचे सिंचन करत हर्षद आला होता.भादवा आला की सुमी हरखून जायची. गौरी गणपती तिचे आवडते सण. सणांच्या खूप आधीपासून तिची कंबर कसली जायची. देवाधर्माचे तिला आधीपासूनच वेड होते.कसली कमालीची फुलवेडी होती ती! हिरवा निसर्ग डोळे भरून न्याहाळला, की तिचा दिवस सुरू व्हायचा. तिचा मुलगा सोहमपण असाच निसर्गवेडा होता. दोघांचा आवडता छंद म्हणजे बागकाम करणे हा होता. रविवार बागेतच हरवायचा. मग हर्षदकडे स्वयंपाकघराचा चार्ज असायचा.          

“आई, यावर्षी मोठा गणपती बाप्पा आणायचा” , सोहम म्हणायचा आणि मग सगळे घर नव्याने नटायचे. सुमी मग गौरीचे मुखवटे उजळायला घ्यायची. यंदा तिला ते दुकानात नेऊन उजळायचे होते; पण या सर्व उत्साहावर कोरोनाने विरजण पाडले. लॉकडाउन झाले. सगळे भयभीत झाले. माणूस घराच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला. शरीराला सुखद स्पर्श करून जाणारी हवेची झुळूक शरीरावर काटा आणू लागली. नसलेल्या आजारांच्या शंका मनाला झाकोळू लागल्या. घराचे अंगण परके वाटू लागले. अन्न बेचव झाले.  वयोवृद्ध मृत्यूच्या छायेत वावरत असल्यासारखे राहू लागले. आजारी भीतीने मरू लागले. कोरोनाचा राक्षस जीवन संपवण्यासाठी उतावीळ झाला. त्यातच वादळ आले. सृष्टीला हादरवून गेले.         

सुमी आपल्या चिमुकल्या घरकुलात भेदरलेल्या अवस्थेत राहू लागली. काढे, सॅनिटायझर, साबण आणि औषधांमध्ये ती धडपडू लागली.  बागकाम करणे गरजेचे होते; पण नळीने पाणी टाकून घरात बसून राहायची. ऑनलाईन अभ्यासात अनेक अडचणी यायच्या. मग ती सोहमला मदत करत त्याच्याजवळ बसून राहायची.काही महिन्यांनी हे जीवन अंगवळणी पडले. लॉकडाउन काही प्रमाणात कमी झाले.      

काहीसे घाबरत काही प्रमाणात चाचपडत लोक घराबाहेर पडू लागले. सुमीपण आता जरा बाहेर ‌डोकावू लागली. दक्षता घेत बाहेर जाऊ लागली. घरातल्या घरात मुले खेळू लागली. पेशंट बरा होतो हे पटल्यावर लोक थोडे मोकळे झाले. देवाण-घेवाण वाढली. एक दिवस हर्षद म्हणाला,”सुमी, यादी करून दे. वस्तू घेऊन येतो. काळजी करू नकोस. दक्षता घेईल.” सुमी ने यादी  केली.‌”जरा जपून जाशील”, सुमी म्हणाली.     

हर्षद घरी आला. तो तणावात आहे हे जाणवल्यावर तिने त्याला खोदून खोदून विचारले.”अगं, ज्यांच्या दुकानात सकाळी गेलो होतो ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आता कळले. त्यांचे वडील आज दुकानात होते. मला वाटले ते बाहेर माल‌ घ्यायला गेले असतील. काय होईल गं सुमे आता?”पाणावल्या डोळ्यांनी तो विचारत होता. “अहो, तो स्वतः नव्हता ना सकाळी? मग नका घाबरू”, उसनं अवसान आणून सुमी म्हणाली. दुसऱ्या दिवशी रात्री हर्षदचा घसा दुखू लागला. रात्र कशीबशी काढत सकाळीच तो वैद्याकडे जाऊन ‌आला.  “इन्फेक्शन झाले आहे. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. घाबरू नका. तुम्ही ठणठणीत आहात!”, वैद्य हसत म्हणाले. हर्षद निर्धास्तपणे घरी आला; पण सुमीच्या मनात मात्र  भीती घर करून बसली.        दिवस असे तणावात जात होते. केव्हा काय उद्भवेल‌ काहीच सांगता येत नव्हते. मीडिया तर वेडे करून टाकत होता. मग सुमीने निर्णय घेतला की टीव्ही रिचार्ज करायचा नाही. वर्तमानपत्र तर बंदच होते. तो वेळ ती सोहमच्या अभ्यासात घालवू लागली. शिवणकाम हा तिचा छंद होता. जीवनोपयोगी वस्तू ती तयार करू लागली. त्या वस्तू विकून संसाराला हातभार लागेल असा विचार करून ती व्यस्त राहू लागली.        

नेहमीप्रमाणे श्रावण आला. सुमी त्यात गुंतून गेली. एक दिवस गौरी गणपतीचा विषय निघाला. सोहम म्हणाला,”मी मातीचा गणपती बनविणार आहे.तो पर्यावरणपूरक आहे. आमच्या मॅडम आम्हाला  ऑनलाईन शिकवणार आहेत.” हर्षद म्हणाला, “मी तुला चांगली माती आणून देईल.” सुमी म्हणाली,”मी घर आवरायला घेतले आहे. मलापण मदत करा.” “हो नक्की!” दोघेही एका सुरात म्हणाले.         

भाद्रपद आला. गणपती बाप्पाची स्थापना झाली.         “आई, यावेळी हळदीकुंकूचे आमंत्रण द्यायला मी जाणार नाही.” सोहम ने घोषणा केली. “बरं! मी यावेळी स्वत:च‌ हळदीकुंकूचे आमंत्रण ‌देईल.” हर्षद शांतपणे ऐकत होता. तो काहीच बोलला नाही. सुमीची लगबग सुरू झाली. रात्री सर्व कामे संपल्यावर जेव्हा ती अंथरुणावर पडली तेव्हा हर्षद म्हणाला,”सुमी, यावेळी हळदीकुंकू समारंभ रद्द कर.” 

“का?” सुमीने दचकून विचारले. 

“अगं, कसा आजार‌ पसरला आहे. काळजी घ्यायला हवी.” 

“अहो, पण म्हणून हळदीकुंकू? अहो ते तर सौभाग्याचे लेणे! ते कसे करायचे नाही. रमाने यावेळी नवसाच्या साड्या आणल्या आहेत. तिच्या घरचे सगळे येतील. सगळ्यांनाच यावेसे वाटते. गल्लीतल्या सगळ्या जणी येतात. तीन दिवस आनंदात जातात. सगळेजण किती उत्साहाने दर्शन घ्यायला येतात. काही जणी रांगोळी काढतात. काही रंग भरतात. काही जागरण करतात. भजनीमंडळ किती उत्साहाने सहभागी होतात.” 

“तुझे सगळे बरोबर आहे; पण कोण कुणाच्या संसर्गामधे आला आहे हे कसे कळेल? कोणीतरी कोरोनाबाधित असेल तर? नको सुमी, रिस्क नको घ्यायला आपण.” 

तेवढ्यात सोहम म्हणाला,”मी सॅनिटायझर घेऊन बसेल ना!” “हो, आणि मी प्रसादाचे पॅकिंग करून ठेवेल. म्हणजे प्रश्नच नाही.”सुमी म्हणाली.”अरे! खरा प्रश्न तर पुढेच आहे. हळदीकुंकू समारंभ कसा करशील? तुम्ही एकमेकांच्या कपाळाला कुंकू लावल्यामुळे संसर्ग होतो ना? तो कसा टाळाल?  तो तर रद्द करावा लागेल ना? सोशल डिस्टंन्सिंग कसा पाळाल? शंभरच्या वर बाया तुझ्याकडे येतात! लग्नातपण पन्नास च्यावर अलाउड‌ नाहीये. पोलिसगाडी ‌फिरत असते. कोणी ऑब्जेक्शन घेतले तर? परमिशन काढावी लागेल. नकोच ते. सांग तुझ्या ‌मैत्रिणींना की यावर्षी  हळदीकुंकू नाहीये म्हणून; आणि आता यावर चर्चा नको. झोप रे सोहम तू पण.” हर्षदचा चिडका सूर ऐकून सोहम जरा नाराजीनेच झोपला. सुमीची मात्र झोपच उडाली. “हळदीकुंकू नाहीये म्हणजे काय! त्यापाशी तर स्त्रीचे जीवन येऊन थांबले आहे ना? तेच नाकारले तर सर्व संपले नाही का? हे असे अभद्र काय बोलतात? देवा यांना माफ कर. माझे  सौभाग्य अखंड राहू दे”, अपराधीपणाची भावना मनात घेऊन सुमी झोपेची आराधना करू लागली.         सकाळपासून सुमीचा नाराज चेहरा पाहून हर्षदलाफार वाईट वाटत होते. आज सोहमचा अभ्यास करून घ्यायला तो हजर होता. त्याचा ऑनलाईन पीरियड सुरू असताना अचानक हर्षदच्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि तो सुमीला हाका मारू लागला. सुमी येताच तो म्हणाला,”अग बघ. तुझे हळदीकुंकू आपण ऑनलाईन करू या. तुझ्या सगळ्या मैत्रिणींना मोबाईलवर मीटिंगमध्ये घ्यायचे. आणि मग खूपशा गप्पा आणि झकास हळदीकुंकू. कशी वाटली आयडिया?” सुमी हर्षदकडे पाहतच राहिली. आपला इतका विचार करून मार्ग शोधणारा नवरा, त्याचा तिला खूप अभिमान वाटत होता. हळदीकुंकवावर पडलेले कोरोनाचे सावट आज मिटलेले होते.


भावना मुळे

पारोळा, जळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: