गाभुळ

आजही सुनेला गाभुळलेली चिंच देताना मास्तरांना चंदी ची सय आली आणि त्यांचा हात थरथरला..

पटकन स्वतःला सावरत मास्तर माजघरातून ओटीवर आले.समोर अंगण्यात उभी चिंच त्यांना जणू आठवणींची पालवी देत असावी असे ते गतकाळात हरवून गेले. मास्तर नुकतेच अकरावी मॅट्रिक नंतर डिएड ची परीक्षा पास झाले होते. राजापूरच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजूही झाले होते. वर्गात एक दोन बामणाची पोरं सोडली तर सारा वर्ग कुळवाडी आणि कातकरांच्या पोरांनी भरलेला.त्यातही पोरींची संख्या बोटांवर मोजण्याईतकी. मास्तर घाटावरचे आणि नोकरी कोकणात.. मग काय वातावरणाशी अजून जुळवून घेणंच चालले होते. शाळेशेजारी राहणाऱ्या बंड्या खोताच्या वाडीतच मास्तरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एकटा जीव असं कितीसं लागणार? या विचाराने खोतानेच मास्तरांच्या जेवणाची जबाबदारी घेतली.. एकंदर ऐकलेल्या गोष्टींपेक्षा कोकणी माणसाचे वेगळे अनुभव आल्याने मास्तर सुखावले होते. कोकणी माणसं चेंगट नाही तर व्यवहारी आणि काटकसरी असतात हे त्यांना उमगले होते.

आज गणितं शिकवणं चालू होतं दोन ची उजळणी अगदी रंगात आली होती. एवढ्यात,”मास्तर, आमी यावं का आत?” असा प्रश्न दारातून आला आणि शिकवण्यात गुंगलेल्या मास्तरांनी त्या बायकी आवाजाकडे चमकून पाहिले तर, सुंद्री कोल्हाटीण वर्गाच्या दारात उभी होती आणि तिच्या सोबत एक बारा-पंधरा वर्षांची सावळी पण नाकी डोळी निटस् पोर उभी होती. “बोला बाई. काय आहे?”मास्तरांनी विचारताच, “मास्तर, ही माजी पोर चंदी. आमी गावोगाव फिरून कोल्हाट्याचे खेळ करतूया. जे मिळल त्याच्यावं जिंदगी गुजारतोया.bकवाकवा तोडणी-फिडणीची कामं करतूया. पर लिवाय वाचाय येत न्हाई तं त्ये कामावरले मुकादम.. फशीवतया बगा. रोज्ची मजुरी बी कमी देतया.. मस्नी कळतयं पन किती पैशे त्ये मुकादम लाटतयं त्ये काय कळत न्हाई तवा ह्या चंदीला जरा यिल त्येवडं लिवायला वाचाया शिकीवलसां तर लय उपकार व्हतील गरीबावर.. म्या त्या मुक्य गुर्जींस्ना सांगिटलं तं त्यांनी तुमाकड पाटीवलयं. तवा या चंदीला घ्या तुमच्या वर्गात बसवून. आमी हित हावं तवर शिकलं तं कायतर.” एवढं बोलून सुंद्री चंदीला तिथेच सोडून निघून गेली. कुजबुजणाऱ्या वर्गाला गप्प करत मास्तरांनी चंदीला वर्गात बसवून घेतले आणि ते पुन्हा दोनाच्या उजळणीकडे वळले. बुजलेली चंदी आता मात्र दोनची उजळणी मनापासून ऐकत होती.

“मास्तरांनू, जल्ला त्या चंदीला कायबी येत नाय. मला नाय बसायच तिच्याशेजारी. “मास्तर वर्गात येताच सुमी कुरकुरली. “अग सुमे, चंदी नवीन आहे. तिला येत नाही तर तू सांग की थोडं समजावून तिला. शिकेल ती. काय ग चंदे शिकशील ना? “मास्तरांनी असे विचारल्यावर चंदी ने न बोलता मान हलवली आणि सुमीशेजारी जाऊन बसली. सुमीने जरा नाक मुरडतच चंदीला शेजारी बसवून घेतलं.. पण चंदी तल्लख होती. आठवडाभरातच ती मोडकंतोडकं वाचायला आणि उजळणी गिरवायला शिकली. बोटांवर आकडे मोजून हिशेब करायचा प्रयत्न करू लागली. सुमीबरोबर पण तिची गट्टी जमली. इतक्या दिवसांत मास्तरांनी चंदीला वर्गात कधीच विनाकारण बडबडताना पाहीलं नाही. ती नेहमीच खालमानेने पाटीवर आकडेमोड करताना दिसत असे.

एकदिवस शाळा सुटल्यावर मास्तर घरी जाण्याच्या तयारीत असताना चंदी सुमीला सोबत घेऊन परत वर्गात आली. “मास्तर, आयने तुमाला द्यायला सांगिटलयं.” असं म्हणून एक बोचकं टेबलवर ठेवून दोघी पळून गेल्या. त्या बोचक्यात पायरीचे आंबे होते. त्यानंतर अधून मधून चंदी अधून मधून मास्तरांसाठी काहीबाही आणून देवू लागली.. तिच्या वागण्यातला बदल जाणवून मास्तर अस्वस्थ होवू लागले. सतत मास्तरांच्या जवळपास भिरभिरणे, त्यांच्याकडे चोरून बघणे, मास्तर वर्गात यायच्या आधी त्यांचे टेबलखुर्ची स्वच्छ करणे, फळा पुसणे या गोष्टी चंदी आपसूकच करू लागली.. काहीतरी कारण काढून ती मास्तरांशी जवळ जायची.

मास्तरांच मनसुद्धा हळूहळू चंदिकडे ओढ घेऊ लागलं होतं. तिचं असं आपल्याभोवती भिरभिरणं, तिचा नकळत होणारा स्पर्श मास्तरांना सुखावू लागला होता.. चंदी होतीच तशी लाघवी. कोणीही तिच्या प्रेमात पडण्यासारखी. तिचे कुरळे केस, काजळ माखलेले भोकरासारखे डोळे आणि जन्मजात लवचिकपणा यामुळं चंदी चारचौघीत उठून दिसायची. अशीच सौध्याकाळची वेळ होती. मास्तर आपल्या खोलीत काहितरी लिहीत बसले होते, इतक्यात दरवाजावर कोणी थाप मारली. मास्तरांनी दार उघडलं तरं समोर चंदी भाकरीचं गठूळं घेऊन उभी. “काय ग चंदे ? यावेळी तू इथं?” मास्तरांनी आश्चर्याने विचारले आणि साडी नेसून आलेल्या चंदीकडे ते एकटक पहात राहीले. तशी गोरीमोरी होत मास्तरांना बाजूला सारत चंदी आत आली अन जमिनीवर बसकण मारत,”मायनं जेवान पाटीवलंय. त्येवडं खाऊन घ्या मंग मी जायन.” मास्तरांकडे नजरेच्या कोपऱ्यातून बघत ती बोलली. मास्तर आत आले तसं तीनं मास्तरांच ताट वाढलं आणि जेवणाऱ्या मास्तरांकडे एखाद्या गरत्या बाईसारखी ती बघू लागली. जेवताना तिच्याकडे चोरून बघताना मास्तरही रोमांचित होत होते.
जेवल्यानंतर हात धुवून पुसण्यासाठी धाबळा शोधणाऱ्या मास्तरांच्या हातात हात पुसण्यासाठी चंदीने पदराचे टोक दिले आणि खालमानेने ती जमिन उकरू लागली.. आपल्या हातात जणू सावरीचे तुरे आले असावेत असं मास्तरांना वाटत होतं त्यांचा हात तिच्या पदराशी रेंगाळला. एवढ्यात मागून कोणीतरी खाकरल्याने दोघे भानावर आले. तो मास्तरांना जेवायला चला म्हणून सांगायला आलेला बंड्या खोत होता.

त्याला बघून कावरीबावरी झालेली चंदी सर्रकन तिथून निघाली. तिला जाताना तिच्या वाटेकडे काही क्षण बघणारा बंड्या खोत सावकाश मास्तरांकडे वळला. “काय मास्तरांनू लवकर जेवलासा काय? जेवणं मसालेदार होतं वाटतं. एक डोळा बारीक करत बंड्याने विचारले. तसे मास्तर गडबडले. तसा “मास्तरांनू येक फुकटचा सल्ला देऊ काय?” पलंगावर ऐसपैस बसत बंड्या विचारता झाला आणि मास्तरांची परवानगी गृहीत धरून पुढे बोलता झाला.” मास्तर, जल्ला तुमका सांगूक लागतय.. पन मास्तराची आबरू पन जल्ली बाईवानीच कचकड्याची. एकदा तडा गेला की जल्ला जन्माचा ईस्कोट. ही कैटाड्याची पोर नाचवतंय तुमका तिच्या बोटावर. समदा गाव गजाली करताव तुमची. सांभाळून ऱ्हावा. माका जे वाटला ता मी तुमका सांगितला हा. काय कराचा ते तुमका ठरवूक आसा. निजा आता बिनघोर.” असे म्हणून बंड्या निघून गेला पण जाताना मास्तरांची तारू वादळात ढकलून गेला.

कोणीतरी पाण्याचा शिपकारा तोडांवर मारून जागं करावं तसं बंड्या खोताचं बोलणं मास्तरांच मन घुसळत होतं.. मास्तराची अब्रू म्हणजेपण काचेचं भांड. तडा गेला की न सांधणारं.. मास्तर मनातल्या मनात स्वतःला भरडत राहिले..”नाही नाही..मी मास्तर आहे. शिक्षक, गुरू. मीच जर माझ्या विद्यार्थीनीशी असं वागलो तर साऱ्या शिक्षकी पेशाला बट्टा लागेल. आज आपल्या भरोशावर मुलींना शाळा शिकू देणारे पालक आपल्या मुलींची शाळा बंद करतील. त्यांना शिक्षणापासून लांब ठेवतील ते आपल्या क्षणिक मोहाच्या पायात.. छी ! हे काय करणार होतो आपण? देवा, त्या बंड्या खोताच्या रुपानं तूच धावून आलास मला वाचवायला. ठरल!! आता या मोहाला बळी पडायचं नाही. चंदीपासून लांब रहायच.”मंथनाच्या शेवटचे हलाहल संपल्यानंतर मास्तर थोडे शांत झाले व त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यागेल्या त्यांनी चंदीला स्टाफरूममधे बोलावून घेतले. इथूनपुढे तिने एकटीने मास्तरांच्या खोलीकडे येवू नये असे तिला बजावून सांगितले आणि उठसूट सतत घरातून कोणतीही वस्त, पदार्थ तिने मास्तरांसाठी आणू नये हे ही सांगितले.
पण त्यानंतरही चंदी मास्तरांसाठी काहीना काही आणत राहीली आणि मास्तर वर्गात यायच्या आधी त्यांच्या टेबलवर ठेवत राहीली.
एक-दोनदा असं काही न देण्याबद्दल त्यांनी चंदीला सांगितलं. रागेही भरले. पण चंदीच वागणं काही बदलंल नाही. तिच्या मनात मास्तरांविषयी असणारी भावना त्यांना हतबल करत होती.-जे मास्तरांना नको होतं तेच घडत होतं. अल्लड न कळत्या वयातली चंदी मास्तरांकडे ओढली जात होती. आता शाळेतही चर्चा होवू लागली. मास्तर चंदीला टाळू लागले. तिच्याशी बोलेनासे झाले. मुख्याध्यापकांनी देखील एकदोनदा आडून आडून मास्तरांकडे चौकशी केली आणि मास्तर उखडले. मनाशी काहीतरी ठरवून त्यांनी तब्बल हप्ताभराची रजासुट्टी घेतली आणि तडक आपले गाव गाठले.

आठवडाभराने मास्तर परतले तेच बायको सोबत घेऊन. गावातच सावंतांच्या घरात त्यांनी वेगळे बिऱ्हाड केले. चंदीही आता शाळेत यायची बंद झाली होती. दोन महिने असेच गेले आणि एकदिवस पुन्हा अचानक चंदी वर्गाच्या दारात उभी होती. तिला टाळून निघालेल्या मास्तरांना, त्यांच्या मागे धावत जाऊन तिने हाकारले.. नाईजालाने मास्तर थांबले. पाठमोऱ्या मास्तरांकडे आपली ओंजळ उंचावून चंदी बोलत होती.. “मास्तर. चिच्चा हायती गाभुळलेल्या.. तुमच्या मास्तरीनबाईंसाठी आणल्यात.” “चंदे अगं कितीदा सांगितलं तुला मला असं काही देत जाऊ नको. रस्त्यात अडवत जाऊ नको. तुझं मन मी जाणतो पण ते काही नाही होवू शकत. मी शिक्षक आहे तुझा आणि तू माझी विद्यार्थिनी तेव्हा आता इथूनपुढे माझ्यामागं यायचं नाही. माझ्याशी शाळेबाहेर बोलायचं नाही. हे जग खूप वाईट असतं बाळ. काही थोडा जरी चुकीचा समज झाला तरी गाव तुला आणि तुझ्या आईला जगणं नको करेल. तेव्हा सोडून दे नको ते विचार.”असं म्हणून चंदीकडे एकदाही न बघता मास्तर निघून गेले. त्यानंतर चंदीही परत कधीच दिसली नाही.. जणूकाही आभाळातच हरवली असावी.

“अहो इकडे येवून तर पहा. चिंच उगवून आलीय दारात. “बायकोचं बोलणं ऐकून नकळत मास्तरांचे डोळे पाणावले. त्या चिंचेने चांगलाच जोर धरला आणि बघता बघता दोन एक वर्षांत फळाला आली. बायकोला गाभूळलेल्या चिंचांचे डोहाळे लागले अन् मास्तर शहारले. चंदीची आठवण येवून अस्वस्थ झाले. गावातल्या प्रत्येक पहिलटकरणीला मास्तरांच्या दारातली गाभूळलेली चिंच हवी असायची. चंदीला त्यादिवशी रागेजून परतताना दारात पडलेल्या चिंचा मास्तरांच्या नजरेसमोर यायच्या. चंदीचे हे मास्तरांवरचे अबोल प्रेमच जणू चिंंचेच्या रुपात मास्तरांच्या दारात रुजले, फुलले होते.. म्हणूनच त्या चिंचेची प्रत्येक चिंच मायेने ओथंबलेली वाटायची अन् छान गाभूळायची..

मानसी चिटणीस, पुणे

5 thoughts on “गाभुळ

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: