आबामास्तरांचे प्रेमकाव्य

सकाळी सहा वाजताच आबा मास्तरांचा फोन आला. अरे तुमच्या त्या काव्यमैफलीला आलो अन् सगळा घोळ होऊन बसला. कुठून बुद्धी झाली. नको त्या संकटात अडकलो बघ. तू ताबडतोब मला देवळाच्या पारावर भेट. कालपासून मी घर सोडलंय.
मी मात्र विचारात पडलो. काव्य मैफलीचा आणि घर साडण्याचा काय संबंध, पण आबामास्तरांचा खोल गेलेला आवाज ऐकून मला त्यांची चिंता वाटू लागली.bघाईघाईत अटोपून घराबाहेर पडलो.bपाहतो तर आबामास्तर गुडग्यात डोकं खुपसून नुसतेच हुंदके देत होते. पाठीवर प्रेमाने हात फिरवून मी त्यांना धीर दिला. नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी बऱ्याच प्रयत्नाने मी त्यांना बोलत केलं.
तसं त्यांच नाव नारायण. आजोबा पोटाला आले या श्रद्धेने सगळे त्यांना आबा म्हणत. मास्तर झाल्यावर पहिली नेमणूक त्यांच्याच पठारवाडीत मिळाली अन् ते आबाऐवजी आबामास्तर झाले. कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसल्यामुळे पठारवाडीतून डोंगरवाडी आणि डोंगरवाडीतून पुन्हा पठारवाडी अशा दोन्ही वाड्यातच त्यांची पस्तीस वर्षे सही सलामत गेली. सेवानिवृत्त होऊन तीन-चार वर्षं त्याचं व्यवस्थित चाललं होतं. पण आजची त्यांची दशा पाहून माझ्याही पोटात कालवाकालव झाली.
मीच त्यांना काव्यमैफलीची निमंत्रण पत्रिका देवून आग्रहाने उपस्थित राहण्यासाठी विनवलं होतं. त्यांच्या तोंडून हकिगत ऐकून मीसुद्धा गंभीर झालो. झालेल्या परिस्थितीला त्यांचा स्वभावच कारणीभूत होता. नवीन काही पाहिलंकी लगेच ते आमलात आणायचे यात्रेमध्ये कुस्त्याचा आखाडा पाहिला की दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या जोरबैठका सुरू व्हायच्या. कधी चित्रप्रदर्शन पाहिले की घरात आल्याबरोबर ते चित्र रंगवायला बसत. कधीकाळी कीर्तन ऐकलं की काही दिवस ते नियमित पुजाअर्चा करायचे व दिवसभर एखादा अभंग गुणगुणत रहायचे.
त्याही दिवशी तसंच घडलं. त्यांनी काव्यमैफल ऐकली अन् त्यांच्यातला कवी जागा झाला. त्यानी प्रेमकाव्य करायला सुरुवात केली. घरातले सगळे झोपले की ते उठत. रात्रीच्या शांत वातावरणात त्यांची प्रतिभा प्रसवू लागायची. एकदोन ओळी लिहून झाल्या की ते त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचायचे. त्यांना आवडल्या नाही तर पान फाडीत अशी प्रत्येक रात्रीला दहाबारा पाने फाडली जावू लागली. दररोज रात्री दहा वाजता घोरणारे आबा एवढ्या रात्री काय लिहीत असावे? या कुतुहलापोटी त्यांच्या सुनांनी आबांवर पाळत ठेवली. त्यांनी फाडून फेकलेली पाने वाचून दोघींनाही धक्का बसला. त्या ओळी अशा होत्या,
“तुझ्या नवतीच्या झाडावर, मुख डाळींब पिकलं. आला रंगात गं राघू, त्यानं चोचीनं टोचलं.”
मग काय? आबांनी फेकलेले सगळे कागद त्यांनी गोळा करून सासूबाई पुढे सामुदायिक काव्य वाचनालाच सुरुवात केली. परिणाम व्हायचा तोच झाला. आबा मास्तरांच्या सौ. मात्र बिथरल्या. तेथूनपुढे आबा मास्तरांच्या दिनक्रमावर त्या तिघी सामुदायिक पाळत ठेवू लागल्या. अन् एके दिवशी भडका उडालाच. आबा मास्तरांच्या सौ.ने त्यांची डायरी व एक बंद लिफाफा आणून सर्वांसमोर त्यांच्यापुढे आपटला. तिच्या तोंडाची टकळी सुरू झाली. अन् बिचाऱ्या आबामास्तरांची मात्र वाचा बसली.
“काहो, आता तुमचं वय काय? ह्या वयात असं चाळं करणं तरी शोभतं का तुम्हाला. उभ्या आयुष्यात कधी वाकडा पाय पडू दिला नाय. अन् सत्तरीला पोहचल्यावर अशी थेरं सुचली व्हय. खरं सांगा मला, ही प्रगती कोण तुमचा अन् हिचा काय संबंध? तिला पत्र पाठवून काही लचांड गळ्यात आलं तर कोण निस्तरणार?” मग मुलाकडे पाहून त्या गरजल्या… “बघा, तुमच्या बापाचा पराक्रम. दात नाय मुखात अन् प्रेम चाललंय झोकात.”
हे बघा पत्र. प्रगती, बुधवार पेठ, पुणे. हद्द झाली आता. त्यांची दोन्ही मुलं हसत हसतच बाहेर निघून गेली. दोन्ही सुना हसू दावीत घरात घुसल्या.
बायकोला तोंड देण्याचं अवसानचं आबा मास्तरांत उरलं नाय. त्यांनी घर सोडलं अन् देवळाचा आसरा घेतला. जेव्हा बरंच समजून सांगितलं तेव्हा कुठे ते घरी यायला तयार झाले. त्यांना घेऊन घरी गेलो. अन् हलकेच विषयाला हात घातला,
“हे बघा, तुम्ही सर्वांनीच गैरसमज करून घेतलाय. तुम्ही समजता तसं मात्र काहीच नाही. काव्य मैफलीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी कविता केल्या एवढंच.”
तरीही आबा मास्तरांचा मी उगीचच कैवार घेतोय या समजुतीने त्यांच्या सौ. मारक्या म्हशीवानी माझ्याकडं बघत म्हणाल्या,
“मग ही बया कोण? तिला काय म्हणून पत्र लिहिलीय, ही कोण लागते यांची?”
मग मी दैनिक सकाळची प्रगती पुरवणी सर्वांसमोर ठेवून त्यांच्या मुलांकडे आशेने पाहू लागलो. तर मुले व सुना हसतच होत्या. मग त्यांचा मुलगाच म्हणाला,
“सर, आम्ही सकाळचे नियमित वाचक आहोत. प्रगती, मधुरा, गुदगुल्या आम्ही नेहमीच वाचतो. आम्ही हसलो म्हणजे आमचे आबा सत्तरीतही छान प्रेमकाव्य करतात म्हणून.”
मग माझ्याही मनावरचा ताण हलका झाला अन् मीही जोशात म्हटलो,
“प्रेम पवित्र पावन, देता येई ते फिरून । वाटा दुसऱ्याला तरी, मन रहातं भरून ।।
आबा मास्तरांबी मात्र यापुढे कविता करणार नाही असं जाहीर करून टाकलं. तेव्हा सगळेच हळहळ व्यक्त करू लागले. मग मीच आबा मास्तरांना म्हटलं,
“कविता बाकी झकास जमली बरं, कसं सुचलं सांगा ना?मग बायकोकडे पाहून आबा मास्तरांनी सांगायला सुरुवात केली,
“आमचं लग्न झालं तेव्हा ही अशी चवळीच्या शेंगेसारखी दिसायची. कित्येक वर्षापूर्वीचं तिचं ते रूप आठवलं अन् मनानं ठरवलं,
बस्स ! कविता करायची. मी तेव्हा तिच्यावरच ही कविता केली होती. आता फक्त आठवून आठवून लिहिली.”
सर्वांसमोर मी आबामास्तरांना पुन्हा विनंती केली,
“तुमचा निश्चय मागे घ्या. प्रतिभेला अशी कोंडून ठेवू नका. तिला मुक्तपणे वाहू द्या.”
इतका वेळ त्रागा करणाऱ्या आबामास्तरांच्या सौ.मध्येच लाजत लाजत म्हणाल्या,

“ही कविता लिहिली तशा अजूनही आठवून आठवून लिहा की, नसल प्रेमकविता करायची तर नका करू.पण आधारवडसाठी तरी लिहा की.”

सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: