हंबरडा

नवरा दारू पिऊन वारला होता. तीन लहान मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. ना धड शिक्षण ना कसलं कलाकौशल्य. ती आता धुण्या भांड्याची कामं करत असे. 

या पावसाळी हवेत थंडगार लादी पुसताना तिचं अंग भरुन येई आणि हातापायाला कळा मारत कारण तीन तीन बाळंतपणं व आयुष्यभर नवऱ्याच्या हातून  खाल्लेला बेदम मार आता तोंड वर काढत होता. पण बादल्या भरभरून धुणं आणि बेसिन ओसंडून वाहणारी खरकटी भांडी घासल्याशिवाय दुसरा पर्याय देखिल न्हवता. कारण मुलं मोठी होत होती तशी त्यांची भुक पण मोठी झाली होती. 
मागच्या महिन्यात लेकीच्या आजारपणामुळे आगाऊ घेतलेली उचल आणि पगार संपून गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून घरात खायला काहीही न्हवतं. तसेही ते नेहमी पोटभर मिळत होतं असं नाही पण गेले दोन दिवस तर अक्षरशः काहिच न्हवतं. पोटाला फडकं करकचून आवळून आणि मिसरीचा तोबरा भरून तीने स्वतःच्या भुकेला चकवा दिला होता. पण आज सकाळी कामाला निघताना धाकट्या लेकराने जेव्हा पायाला मिठी मारून “आई….भुक…..लागली ….. खायला ” असं म्हटलं तेव्हा तिला अक्षरशः गलबलून आलं होतं. ती तशीच कामावर पोहचली ……. ! आणि कामं उरकली. 
” बाई ….. थोडं काम होतं ” 
” हं बोल ” बाईनी टिव्ही वरुन नजर न ढळवता म्हटलं 
” जरा दोनशे रूपये पाहिजे होते ” ती खालमानेनं म्हटली 
आता मात्र बाईंनी टिव्ही वरील नजर हटवून हिच्याकडे पाहिलं तेव्हा त्या नजरेत राग काठोकाठ भरलेला होता. 
” मागच्याच महिन्यात उचल दिली होती ना, पैसे काय झाडाला लागतात ?” 
” तसं नाय व ताई , पण घरात खायला काय सुदीक नाय ….. तवा जरा …..” ती पायाच्या बोटांनी फरशीला खड्डा पाडण्याचा प्रयत्न करत म्हटली 
बाईंच्या तोंडावर बरेच अपशब्द आलेले पण डॉक्टरांनी वाढत्या रक्तदाबाकडे पाहून संताप टाळण्याचा दिलेला सल्ला आठवल्यामुळे त्यांनी स्वतःला कसेबसे आवरले 
” हे बघ असे सतत पैसे मागायचे असतील तर तु कामाला नाही आलीस तरी चालेल , हे शंभर रूपये घे पण पुढच्या महिन्या शिवाय आता काही मागु नकोस ” 
किराण्याच्या दुकानात जाईपर्यंत ती शंभर रूपयाची नोट तीने कितीतरी वेळा उलटून पालटून पाहिली. दुकानदाराकडून मसाला ,तेल आणि तांदूळ घेतल्यावर तीने अत्यंत अनिच्छेने त्याच्या हातात ती नोट दिली. सामानाची पिशवी छातीशी धरून ती लगबगीने घराकडं निघाली तेव्हा पावसाने देखिल जोर धरला होता.
“भडव्या तुला चार फोन केले तेव्हा एक उचललास. वर्षा विहाराला जायचं हे मागच्या आठ दिवसांपूर्वी आपलं ठरलं होतं ना ?”
“अरे हो पण माझा बाप तुम्हाला माहिती आहे ना , गाडी मिळवण्यासाठी त्याचं मन वळवता वळवता नाकी नऊ आले तेव्हा कुठे आज गाडी मिळाली” 
“चल जाऊ दे, घे एक सिप मार” बिअरची बाटली पुढे झाली 
त्याने गाडीच्या ऍक्सिलेटर वर पाय देत बाटली हातात घेतली आणि ती थंडगार बियर घशात ओतायला सुरुवात केली. पेय उत्तेजक होतं. त्याला बरं वाटलं.त्याने गाडीत मोठ्याने वाजत असलेल्या गाण्याच्या तालावर ऍक्सिलेटर आणखी जोरात पाय देत बाटली पुन्हा तोंडाला लावली. 
“अरे, अरे…….अरे समोर ती बाई बघ…… अरे ब्रेक दाब.. ब्रेक दाब…..” गाडीत एकच आवाज झाला 
तोपर्यंत उशीर झाला होता. पिशवी घेऊन निघालेली ती हाडकूळी बाई गाडीच्या एका धक्क्यात हवेत उडून बाजूच्या चिखलात जाऊन पडली होती. 
“काय करतोय…..आता गाडी थांबवू नकोस, पळ, पळ चल पटकन” कुणीतरी भेदरून ओरडत होतं. 
भांबावलेल्या अवस्थेतच त्याने ऍक्सिलेटर वर आणखी जोरात पाय देत गाडी तिथून सुसाट लोणावळ्याच्या दिशेने दामटली.
ती काही कळायच्या आत एका जोरदार धक्क्याने हवेत उडून पडली. “असहनीय वेदना” एवढीच जाणीव तीला होत होती. कुठलंतरी हाड मोडलेलं असावं.  रस्त्यावरील लोक पळत आले होते त्यातील कुणीतरी तरी तिला उठवून बसवलं. 
“कोण होते हरामखोर ?” 
“हि मोठ्या बापाची मुलं…….” 
“गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला…..” 
लोकांचा गलका सुरू होता. 
पण तीला मात्र काहीही ऐकू येत न्हवतं कारण तीची नजर काहीतरी शोधत होती……. आणि तिला ती दिसली……… 
पावसामुळे साठलेल्या रस्त्यावरच्या काळ्याशार पाण्यात ती प्लास्टिकची पिशवी अस्ताव्यस्त अवस्थेत उलथी पालथी होऊन पडली होती.
फाटून गेल्यामुळे तीच्या आतला तांदूळ त्या घाणेरड्या पाण्यात गडप झाला होता तर तेल त्या काळ्याशार पाण्यावर आपला तवंग उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतं. 
नेमकं काय झालं ते तीला समजायला काही क्षण जावे लागले आणि ते लक्षात येताच तीने एकच हंबरडा फोडला. 
आणि पाऊस पुन्हा पडायला सुरुवात झाली होती……….. ! 


तुषार दामगुडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: