रम्याची गोष्ट

…पाचवा तास सुरु झाल्याचा टोल पडला अन् सावळ्या रंगाचे व हसऱ्या चेहऱ्याचे माने सर वर्गात आले. सारी मुलं उठून उभी राहिली अन् त्यांनी सरांना ‘ गुड मॉर्निंग ‘ केलं. सरांनीही ‘लगुड मॉर्निंग,सीट डाऊन’ म्हणताच सारी मुलं खाली बसली. सरांनी हातातलं पुस्तक टेबलावर ठेवलं अन् डाव्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या रम्याकडं बघितलं तर सावळ्या रंगाचा अन् थोडासा जाडया असलेला रम्याही त्यांच्याकडंच पाहत होता. सर शांतपणे मुलांच्या रांगेतून चालत त्याच्याजवळ आले अन् त्याला म्हणाले,

” रम्या,काल तू मन्याची वही सुन्याच्या दफ्तरात कशामुळं ठेवलीस ? “
रम्या सरांच्या प्रश्नानं गडबडलाच ! काही क्षण काय बोलावं, तेच त्याला समजलं नाही.पण नंतर गालावर हात ठेवून उभा राहत तो म्हणाला,
” मी नाही ठेवली,सर .. “
” खरं सांग अं.. तुला वही ठेवताना पाहिलेल्या ‘इ’ मधल्या मुलांना आणायचं का बोलावून.. सांग, काय खरंय ते “सर त्याच्याकडं रोखून बघत म्हणाले.
” मी नाही ठेवली, सर ..” पुन्हा तो थोडया मोठया आवाजात तेच म्हणाला. सरांनी त्याचे हात पकडले अन् त्याच्या पाठीत एक गुद्दा हाणून त्याला विचारलं,
” पुन्हा खोटं बोलत आहेस ना ? नालायका, आता यापुढं तुझी तक्रार येऊ दे, मग शिकवतो धडा तुला चांगला… हां .. आता बस खाली … “
सरांनी आदेश देताच अपमानित झालेला रम्या खाली मान घालून बसला. सरही त्याच्या जवळून फळयाजवळ आले अन् त्यांनी शिकवायला सुरुवात केली..
थोडया वेळानं पाच टोल पडले अन् मध्यंतर झाली. मानेसर पुस्तक घेऊन तडक वर्गाबाहेर पडले अन् स्टाफरूममध्ये आले. त्यांनी स्वतःच्या कपाटात पुस्तक ठेवलं. हात धुतले. पाणी प्यायलं आणि एका रिकाम्या खुर्चीवर ते निवांत बसले. स्टाफरुममध्ये कुठल्यातरी चर्चेला उधाण आलं होतं अन् जमलेले सारे शिक्षक गरम चहाचा आस्वाद घेत चर्चेचाही आनंद लुटत होते. सर स्वतःच्या मनालाच हसले अन् त्यांनी सेवकानं आणून दिलेल्या चहाचा आस्वाद घेतला. एवढ्यात पाच-सहा मुलांचा घोळका अगदी स्टाफरूम समोरच ‘मानेसर’ म्हणीत आला. सर पटकन उठून बाहेर आले. त्यांना आठवी ‘ड’ मधला दिनू रडत असलेला दिसला. त्यांनी काही विचारण्याआधीच रवि म्हणाला,
“सर, रम्यानं दिन्याला ढकलून दिलं अन् पळून गेला..”
“कुठंय आता तो ? कधी झालं हे ? आत्ता का ?” गोंधळलेल्या सरांनी विचारलं.
“आताच, सर ..आम्ही डब्बा खाऊन खाली येत असताना पायऱ्यावर त्यानं आम्हाला अडवलं अन् ‘सरांना का सांगितलंस ‘ म्हणून ह्याला ढकललं.. “रविनं माहिती दिली.
अखेर आपल्याला जी भिती मघा वाटत होती, तेच झालं.बेट्याकडं नीट बघावं लागेल… सरांनी ठरवलं अन् त्यांनी रडणाऱ्या दिनूला शांत केलं. त्याला कुठं लागलंय,ते पाहिलं.मग सरांनी विचारलं,
“तो पळून गेला का आत्ता ?”
“हो, सर.. आम्ही पाहिलं त्याला बाहेर पळून जाताना..” सोबत आलेले दोघं जण म्हणाले.
“ठीकाय, जा तुम्ही वर्गात आता.. बघतो मी काय करायचं ते ..” सर म्हणाले.
जमलेली सारी मुलं आपसात बडबड करीत आप- आपल्या वर्गांकडं गेली अन् सर स्टाफ रुममध्ये आले.खूर्चीवर बसले अन् रम्याचाच विचार करू लागले. एवढयात सहाव्या तासाचा टोल पडला. सर लगबगीनं उठले अन् त्यांनी कपाटामधून वर्गाची वही काढली. भराभर पानं चाळली अन् रम्याच्या वैयक्तिक माहितीचं पान काढलं… रमेश केरबा जाधव .. सरांनी त्याचं नांव वाचलं अन् त्याचा घरचा संपर्क क्रमांक पाहिला पण तिथं त्यांनी आडवी रेघ मारलेली होती …गरीब घरचा दिसतो बेटा अन् शिवाय वडीलही नाहीत त्याला, राहतोही झोपडपट्टीला; ‘आझादनगर’ ला.बहुतेक संगत नसावी चांगली त्याला अन् तिथलं वातावरणही… सरांनी निःश्वास सोडला अन् मनाशी काहीतरी योजून त्यांनी वही कपाटात ठेवली. मध्यंतर भरल्याचा टोल पडताच ते वर्गावर गेले…
…सव्वाबारा वाजता शाळेची घंटा झाली अन् शाळा सुटली. सर थोडावेळ स्टाफ रूममध्ये रेंगाळले. एक- दोन दैनिकं चाळली अन् अखेर स्कूटीवर घरी आले. हात-पाय धुऊन त्यांनी जेवण वगैरे केलं अन् रोजच्या सवयीनं जरासंक लवंडले. दोनच्या दरम्यान ते उठले. त्यांनी कपडे घातले. त्यांनी राधाला ‘आत्ता आलो लगेच’ म्हणून सांगितलं अन् ते स्कूटीवर ‘आझादनगर’ च्या झोपडपट्टीकडं निघाले…
गावाच्या पूर्व दिशेला गायरानात वसलेली वस्ती म्हणजे ‘ आझादनगर ‘ होतं. इथं मिश्र वस्ती होती अन् सारा कष्टकरी-गरीब- मजूरवर्ग इथं राहत होता. दाटीवाटीनं चिकटून सारी पत्र्यांची, कच्च्या विटांची घरं अन् काही झोपड्या होत्या. अरूंद वेडावाकडा रस्ता अन् त्यावरूनच वाहणारं सांडपाणी होतं. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या नालीतल्या घाणीत डुकरं फिरत होती अन् घाण वास येत होता. सरांना समोर किराणा दुकान दिसताच त्यांनी स्कूटी थांबवली अन् दुकानदाराकडं रम्यासंबंधी चौकशी केली. दुकानदारानं पुढच्या आझाद चौकात जायचं सांगताच सर चिखलाच्या रस्त्यातून स्कूटी चालवत पुढं आले. दोनेक मिनिटातच ते आझाद चौकात आले. इथं चार रस्ते फुटलेले होते अन् दाटीनं घरं, झोपडया दिसत होत्या. सरांनी भोवती पाहिलं. बाजूला किराणा दुकान दिसताच ते दुकानासमोर आले अन् त्यांनी विचारलं,
“रमेश जाधव कुठं राहतो इथं ?”
“तेव शाळात हाय तेव का ?” दुकानदारानं विचारलं.
‘हं, तोच .. मी शिक्षक आहे त्याचा.. त्याला भेटायचंय..’
“अरे शाम्या,/बग बरं घरी हाया का तेव.. ” दुकानदार टिव्ही बघत बसलेल्या मुलाला म्हणाला.
“दादा, देवळात असणार आता तेव, घरी कशाला असंन .. ” शाम्या मधूनच म्हणाला.
“बघ तरी ना जाऊन घरी हाये का?” दुकानदार म्हणाला.
सहावी – सातवीच्या वयाचा गोऱ्या रंगाचा शाम्या काउंटरबाहेर आला अन् म्हणाला,
“गाडी राहू द्या हितंच .. आपून पायी जाऊत..”
‘बरं’ म्हणीत सरांनी स्कूटी हॅण्डल लॉक केली अन् शाम्याच्या पाठोपाठ निघाले. तो दाटीवाटीनं घरं असलेल्या एका बोळकांडात शिरला अन् दारासमोर चार पत्र्यांचं छप्पर असलेल्या एका घरासमोर उभा राहून म्हणाला,
“सर, घरी नाही तेव, घराला कुलूपंय तेच्या बगा”
“त्याची आई कुठंय ?” सरांनी विचारलं.
“रानामधी कामाला जातीय ती”
“मघा तू म्हणालास ना, तो कुठं असंल ते.. ” सरांनी विचारलं.
“ते देवळ तिकंडय, सर .. पत्ते खेळतेतं तिथं.. “अगदी सहजतेनं तो म्हणाला.
“कोण खेळतं पत्ते ?” सरांनी एकदम घाबरुनच विचारलं.
“चला ना बगा आता सोता, मी कशाला सांगू तुमाला ?” तो म्हणाला.
त्याचं हे बोलणं ऐकून सरांना एकदम धक्काच बसला… अखेर आपल्या मनात आलं होतं, तसंच दिसतं आहे.. सर पुटपुटले अन् त्याच्या पाठोपाठ निघाले. अवघ्या दोन मिनिटात ते दोघं दुकानावर आले. सरांनी शाम्याला सोबत न्यायची त्याच्या वडिलांकडून परवानगी घेतली अन् दोघं स्कूटीवर देवळाकडं निघाले.
अवघ्या चार-पाच मिनिटातच गावाच्या जुन्या भागात ते आले. तिथं भोवती जुने अन् उंच चिरेबंदी वाडे होते. शाम्यानं एका पडक्या चिरेबंदी वाड्यासमोर थांबायला सांगितलं अन् सरांनी स्कूटी उभी केली. तिला लॉक लावलं अन् इकडं-तिकडं बघत त्याच्या मागं निघाले. त्या पडक्या वाड्याच्या चिरेबंदी प्रवेशव्दाराच्या पायऱ्या चढून ते आतमध्ये आले. समोर अंगणभर फरशी अंथरलेली होती अन् एका बाजूला छोटंसं महादेवाचं देऊळ होतं./त्याच्या बाजूलाच मोठं लिंबाचं झाड होतं अन् झाडाच्या दाट सावलीत पाच-सहा मुलं पत्ते खेळण्यात दंग झालेले होते./सर सावध झाले अन् त्यांना खाली मान घालून पत्ते टाकत असलेला सावळ्या रंगाचा रम्या दिसला. सर लगबगीनं पुढं झाले अन् त्यांनी रम्याचं मनगट पकडलं. त्याचे सोबती घाबरले अन् त्यांनी वाडयाबाहेर धूम ठोकली. रम्याला मात्र बहुधा कुणी मित्रानंच हात पकडल्याचं वाटलं असावं कारण तो हाताला हिसका देऊन उठण्याची धडपड करीत म्हणाला,
“कोणंय बे येडछाप ?”
घाबरुन त्यानं बाजूला पाहिलं अन् सरांना बघून त्याला धक्काच बसला. गर्भगळीत झालेल्या रम्याच्या तोंडून शब्दच फुटेना अन् तो अवाक् होऊन सरांकडं बघू लागला..
“मीच आहे रे, नालायका, शिव्या देतोस ना ? मायघाल्या किनई.. मुर्खा, हे धंदे चालतात ना तुझे? पत्ते खेळतोस ना एवढा लहान असून? दाखवतो तुला इंगा आत्ता बेशरमा, तुला चांगलाच धडा शिकवतो रे आत्ता..” सर म्हणाले.
पण रम्या काहीच बोलला नाही. नुसता तोंडासमोर उजवा हात आडवा धरून सरांकडं भेदरून बघत राहिला./आता तो थरथरुही लागला होता …
“अन् मघा दिन्याला ढकलून का पळून आलास शाळेतून तू ? काय नुकसान केलं होतं तुझं त्यानं, सांग ना ? तुझ्यामुळं त्याचा हात मोडलाय, माहितंय का तुला,/होय रे ? त्याच्या घरचे पोलीस केस करणारयंत.. बस मग बिनभाड्याच्या खोलीत जाऊन म्हंजे समजंन तुला, मुर्खा..”
सरांनी असा भितीचा डोस दिल्यावर तर तो अधिकंच थरथरू लागला अन् त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर त्याला दरडावत म्हणाले,
“रडू नको, बेट्या,अजून तर तुला काहीच केलं नाही,आं.. सांग ना, का ढकललंस दिन्याला ? काल तुझ्या हातून गुन्हा घडूनही मी तुला शिक्षा नाही केली, तर उलट समजून सांगितलं अन् आज पुन्हा हे केलंस. एवढा माज आहे ना तुला ? बघायचंय ना तुला ? तसं असंल तर सांग,/माझी तयारी आहे.. बोल पटकन, सांग का ढकललंस ते ?”
तरीही तो काहीच बोलला नाही. मग सरांनी त्याचं मनगट सोडलं अन् त्याला नीट मांडी घालून बसवलं.स्वतःही त्याच्या बाजूला बसले अन् त्याला म्हणाले,
“बेट्या,पाह्यजे तर तुला मी शिक्षा करु शकतो,पण मी शिक्षा करणार नाही.. ध्यानात ठेव.. बरं,/आता मी म्हणतो ते कर .. आधी खिशातले पैसे काढून टाक बरं फरशीवर.. “
रम्यानं गुपचूप खिशात हात घातला अन् खिशात कोंबून ठेवलेल्या नोटा फरशीवर टाकल्या.
“नोटा मोज रे या..” बाजूला उभ्या असलेल्या शामला सरांनी फर्मावलं. शाम खाली बसला अन् त्यानं पाच-दहा-वीसच्या नोटा व्यवस्थित मोजल्या.मग तो म्हणाला,
” सर, तीनशे तीस हाईत..”
सरांनी ते पैसे घेतले अन् स्वतःच्या खिशात ठेवत त्यांनी विचारलं,
“कुणी दिले होते तुला पैसे ?”
मात्र रम्या गप्पच झाला अन् मान खाली घालून बसून राहिला. सरांनी पुन्हा एकदा त्याला विचारलं, पण त्यानं तोंड उघडलं नाही..
“घरातले चोरलेस ना ? बोल,खरं खरं सांग हं.. ” सरांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत विचारलं.पण तो गप्पच राहिला.मग सरांनी त्याची खाली झुकलेली मान सरळ केली अन् म्हणाले,
“घरचेच पैसे चोरलेस तू हे माहितेय मला.. आत्ता हे पैसे तुझ्या आईजवळंच मी देणारंय.. आज रात्री नाही तर उद्या रात्री.. बरं, एक सांग,आई कुठं गेलीय तुझी ? आत्ता आम्ही घरी गेलो होतो, तर घरी नव्हती..”
“ती रानात जातीय कामाला..” रम्या म्हणाला.
” घरी शेतंय का तुमच्या ? ” सर.
” लोकाच्या रानात, सर.. ह्यांना शेत नाही..” मधेच शाम्यानं माहिती दिली.
“अच्छा, म्हणजे काम करायला नं ? म्हणजे तुझी आई ऊना- तानात राबते अन् पैसे मिळवते अन् तू पत्ते खेळतोस.. असंच ना, रम्या ? “सर उपरोधानं म्हणाले. मग मात्र त्यानं शरमेनं खाली मान घातली ; पण काहीच बोलला नाही. मग सरांनी त्याला मान वर करायला सांगितलं अन् म्हणाले,
“रम्या,तुझ्यासारख्या गरीब मुलानं तर अभ्यासाकडं किती लक्ष द्यायला पाहिजे. एक तर तुला वडील नाहीत. चांगलं घर नाही अन् घरीही काही नाही. एकटी तुझी आई कमावणार किती अन् काय ? बेटया, घरच्या गरिबीची जाणीव ठेवली पाहिजे रे.. या गरिबीतून ध्यान देऊन शिकलास तर मोठयापणी छोटी-मोठी नोकरी तरी लागंन तुला, नाहीतर मग असंच काही-बाही करीत बसावं लागंन आयुष्यभर.. ” बराच वेळ सर त्याला अभ्यास, शिक्षण, भविष्य इत्यादी विषयांवर बोलत राहिले. शेवटी सरच म्हणाले,
“पत्ते गोळा कर पडलेले अन् फाडून नालीत टाक.. चल, उठ आता.. “
आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा रम्या उठला. त्यानं फरशीवर पडलेले सारे पत्ते गोळा केले अन् फाडून नालीत टाकले.
“शाब्बास !” सरांनी त्याची पाठ थोपटली अन् पुढं म्हणाले, “उद्या सकाळी शाळेत यायचं. दिन्याला काय सांगायचंय ते सांगितलंय मी… पण तू कुणाची खोडी काढायची नाही अन् तुला कुणी काही म्हणालं तर मला येऊन सांगायचं, काय,/येणार ना शाळेत उद्या ?”
रम्यानं काही न बोलता हसऱ्या चेहऱ्यानं फक्त होकारार्थी मान हलवली. सर खुश झाले अन् पुन्हा त्याला म्हणाले,
“रम्या, आत्ताच्या त्या मोकार पोरांची संगत सोडायची बरं का… नाहीतर दुपारी तुला कुणाकडं ट्युशनला पाठवता येईल, म्हणजे त्यांचा संबंधच येत नाही.. “
सर असं म्हणताच रम्याचे डोळे चमकले अन् तो सरांकडं बघूच लागला…
“मग बेष्ट जमतंय,सर. त्या पोरांनी हयेला घरी अभ्यास नसता करु दिला. “शाम्याही खूश होऊन म्हणाला.
सर त्यांच्याकडं बघून हसले अन् म्हणाले,
“चला रे पोरांनो, येतो मी आत्ता.. रम्या,शाळेत ये बघ .. “
” येतो, सर.. ” रम्या म्हणाला.
सर काही न बोलता त्याच्याकडं बघून फक्त हसले अन् वाड्याबाहेर आले.त्यांनी स्कूटी सुरु केली.त्या दोघांकडं बघून हात हलवला अन् शीळ घालीत खुशीतंच घराकडं निघाले ….
… दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी माने सरांना रम्याची आठवण आली.ते आठवी ‘ ड ‘ च्या रांगेजवळ आले.त्यांनी रांग सरळ केली अन् उभी राहिलेली सर्व मुलं पाहिली ; पण रम्या काही त्यांना दिसला नाही. .. बेटा एवढं सांगूनही आला नाही. देखना पडेगा उसके तरफ .. सर मनाशी पुटपुटले ; पण त्यांच्या मनाला रुखरुख लागून राहिलीच ! ते उदास मनानं शिक्षकांच्या रांगेत राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. राष्ट्रगीत होताच मैदानावरील मुलं वर्गात गेली की शिक्षकांसोबत तेही स्टाफरुममध्ये आले. त्यांनी कपाटातून हजेरी घेतली अन् वर्गात आले.मुलांनी ‘ गुड मॉर्निंग ‘ म्हणून त्यांचं स्वागत करताच तेही ‘ गुड मॉर्निंग ‘ म्हणाले अन् ते खुर्चीवर बसले. त्यांनी मुलांना हातानंच खाली बसण्याचा इशारा केला अन् मुलं बसली. त्यांनी हजेरी उघडली अन् मुलांचे क्रमांक वाचायला सुरुवात केली. पाच – सहाजणांची हजेरी घेऊन झाली की,दारातल्या उशिरा आलेल्या त्या मुलानं ‘ मे आय कमिन, सर ‘ अशी हाक मारली.आवाज ओळखीचा वाटला म्हणून सरांनी चमकून दाराकडं पाहिलं.सरांचा अंदाज खरा ठरला.तो सावळया रंगाचा रम्याच होता ! सर अगदीच खुष झाले अन् एकदम उठून उभा राहिले.त्याच्याकडं पाहून म्हणाले ,” येस,यू मे कम. “
त्यांच्या या कृतीनं वर्गातली मुलं मात्र गोंधळात पडली अन् अवाक् होऊन सरांकडं फक्त बघतच राहिली …..


उमेश मोहिते,
माजलगाव जि.बीड.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: