एक वारी आशीही..

सकाळ पासून राधाक्का शुन्यातच वावरत होती. कृष्णा
न्याहारी करून शेतावर गेला, तो ही राधाक्काच्या पाठीवर हात फिरवूनच. कधी नाही ते या घरातल्यांची परंपरा मोडीत निघाली होती. तिच्या ६०वर्षाच्या आयुष्यात, आणि त्या आधीही आजीसासू कडून ऐकलेल्या घटनांत कुठेही वारी चुकलेली नव्हती. तिच्या मनात नाना शंका कुशंका होत्याच.आता ती विचार करत होती, ‘ही कोनती कोरोना नावाची महामारी समद्या पृथ्वीवर पसरली, हे पण म्या पयल्यांदाच ऐकते. हर एक रोगावर इलाज म्हणजे वैद्यांनी आवषिद द्यावं नाहीतर शहरच्या दाक्तरनं. फार तर आपरीशन व्हतेत, हे तोंडला मुंगसं बांधायचे, ते कशा पायी? ते तर बैलाच्या बांधतोत.. त्यांनी पिकाला

नासवूने म्हून. आता आपण बांधायचं म्हनजी आक्रीतच. आनं.. सारखे हात-पाय धुवाचे हे आवषिद. तसं गावाकडचं समदं ठिक हाय‌. कोनी शेरगावात जाऊन आलं तर चौदा दिस सुतकात ठेवल्यावनी ठेवत्यात. मग वारीला गेले असते तर चौदा दिस काय? म्या -हायले असते नवं तसं म्हैनाभर बी. पर हे म्हनतेत सरकार, पोलिस जाऊ दी ना गेलेत. विटूराया बघ बाबा तूच. वारी चुकल्याचा दोष दिऊ नगस म्हंजी झालं.
पण तरीही फक्त देवाला टाकणं टाकण्यासाठी, परंपरा म्हणून ती वारी ला नाही जायची. ते तीचं कैवल्य होतं. वर्ष भरांचे अगणित कामं, संकटं याच्या बळावर ती लिलया पेलायची.
आज एकादशी तीला आतून घुसळून काढत होती. तिला धडपणे कळतही नव्हतं तीला नक्की काय होतंय.
सूनबाई ‘सईबाई’ माहेरची व-हाडा कडली। तीला दशमी,एकादशी,व्दादशी गजानन महाराजांच्या पोथीच्या पारायणाचा नेम चुकू द्यायचा नव्हता. सासु वारीला न जाता आल्याने परेशान आहे, हे ही कळत होतं तीला. सासूकडून रीतसर परवानगी घेऊन बाकीच्यांच्या फराळ-पाण्याची सोय करून मगच ती पारायणाला बसली होती.
दुपार होत आली होती. राधाक्का फराळ घेऊन लेकराला कडेवर घेऊन शेताकडे निघाली. लक्ष कशातच नव्हतं. यंत्रवत ती सगळं करत होती. फराळाचा डबा बांधाजवळच्या खोपटात ठेऊन बारकीला टावेलाचं पटकूर टाकून बसवत, उकरी घेऊन उरल्यासुरल्या भुईमुगाच्या शेंगा शोधत होती. पाऊस पडणार, पेरणी साठी म्हणून कृष्णाबाबा नांगर होते. राधाक्काला पाहून बैल जुवातून सोडवून तिच्याकडे निघाले. त्यांचा लेक राघोबा मोटार काढून जरा दुरुस्ती आहे का? याचा शोध घेत होता. कृष्णाबाबा आला की राधाक्काने बैलांचा कासरा धरत त्यांना पाणी दाखवायला निघाली. कृष्णाबाबानी बारकीला उचलून घेत राघोबाला हळी दिली.
राधाक्का बैलांना तिथंच खुट्याला बांधून फराळाचा डबा उघडून बसली.
तिची यंत्रवत हालचाल पाहून कृष्णाबाबा बारकीला खेळवत,’कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ गायला लागला. फराळी झाल्यावर, जराश्या वेळाने राधक्काला म्हणाला बारकीला घिऊन म्होरं हो. पाऊसपाण्याचं तु बी बिगीनं जाय घरला.
ती घराकडं आली बारकीला,थोरल्याजवळ देत खेळा दोघं..म्हणत बाहेर आली. तांब्याभर पाणी घटाघटा पिऊन, बाजेवर पाठ टेकली. तीला विठ्ठलाच्या पायांची ओढ स्वस्थ बसू देईना. निदान लांबनं कळसाचं दर्शन तरी मिळायला हवं होतं. त्या विठ्ठल गजरात, टाळ चिपळ्या, मृदंग निनादात तीला चिंब भिजायचं होतं. मनात म्हणत.,’पर कळलं वो मला हिथंच इट्टल शोध म्हनताय. पण काय करू जीव राहिना माझा‌’. घळाघळा डोळ्यातून अश्रू ओघळले.
आकाशात काळे पांढरे ढग एकत्र होऊन वेगवेगळ्या आकाराचे दिसायला लागले. तेवढ्यात अनेक ढगोरे एकत्र येऊन त्यांच्यात विशाल आकारात, विठ्ठलाचे सावळे रुप राधाक्काला दिसायला लागले. कानावर सूनबाईचा आवाज पडत होता. ती गजानन विजयातल्या आठराव्या आध्यायातल्या ओव्या वाचत होती. बापुना काळ्या ला गजानन महाराज विठ्ठल रूप दाखवत होते. आणि राधाक्काला ढगांमध्ये सावळा विठ्ठल दिसत होता. तो गडद,अजून गडद होत गेला आणि राधाक्काच्या डोळ्यातल्या धारा सोबत स्वत: ही पाझरू लागला. काळ्याशार जमिनीत, शिवारभर.. विठ्ठल ओघळला, मुरत गेला. हात पसरत राधाक्का अनिमिष नजरेने भरभरून ते दृष्य डोळ्यातून पिऊ लागली, अकंठ.. उरभर.
तिकडून कृष्णाबाबा ,राघोबा सहीत परत आला तेंव्हा त्याला राधाक्का चिंब भिजताना दिसली ,अकंठ सावळ्या धारात तृप्त, हात जोडलेली. जशी विठ्ठल दर्शनाने तृप्त दिसायची तशीच. त्याला तिथेच विठ्ठल भेटला. तो आनंदात डोलायला लागला‌.
दोघांच्या स्मरणातला विठ्ठल घोष, तालनाद त्यांच्या रोमारोमात भिनत गेला.
तेच आषाढी तादात्म्य त्यांच्या घरात निनादत होतं.


शुभदा व्यास

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: