भूक…

त्यावेळी मी सतरा- अठरा वर्षांची असेन.  माझे वडील एस.टी.  ड्रायव्हर होते.  ते महिन्यातले 15-20 दिवस बाहेरच असायचे.  आमचे एका चाळीत दोन खोल्यांचे घर होते.  त्यात मी,माझा बाप, माझ्या दहा-बारा वर्षांच्या दोन छोटया बहिणी आणि स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असलेली मृत्यूशी झुंज देणारी आमची आई ..कसाबसा आम्हा मुलींचा सांभाळ करीत होती. जोपर्यंत मृत्यू तिला आपल्या कुशीत घेत नव्हता, तोपर्यंत ती आम्हा मुलींना कुशीत घेऊन शांत झोपायची.  आई जिवंत होती तोपर्यंत आमचा बाप, हो आमचा बापच !  आम्हा मुलींना काय हवं, नको, आमच्या पोटाची भूक, आमच्या सर्व गरजा व्यवस्थित भागवत होता.  पण शेवटी तो दिवस उगवला , ज्या दिवशी आमच्या आईने आम्हा मुलींचा आणि ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला. ज्या दिवशी आमच्या आईचा श्वासाचा धागा तुटला त्या दिवसापासून आमचा सुखाचा काळही संपला. 
 काही दिवसांनंतर मुलींची गैरसोय होते, त्यांची खाण्या-राहण्याची आबाळ होते हे कारण सांगून आमच्या बापानं दुसर लग्न केलं. घरात नवीन आई आली. आम्ही तिचा आई म्हणून स्विकारही केला. पण, तिच्यासाठी आम्ही सावत्र मुलींच होतो. तिने बापावर आपल्या श्रीमंतीची, सौंदर्याची, मादकतेची अशी काही जादू केली की आमचा बाप… बाप राहीला नाही.  कामावरुन परत आल्यावर मुलांना जवळ घेऊन जेवलात का ? अशी विचारपूस करणारा बाप पूर्णपणे त्या आईच्या नात्यात लपलेल्या, त्या बाईचा झाला होता.  मुलांच्या भूकेच्या आगीपेक्षा स्वत:च्या शरीरात लागलेली वासनेची भूक त्याला जास्त महत्त्वाची वाटत होती.  स्वत:च्याच घरात आम्ही पोरक्या होऊन नरक यातना भोगत होतो.  धुणं, भांडी, झाड-लोटं, लादी पुसणं अशी सगळी कामं ती बाई छडीच्या धाकावर करुन घ्यायची.  बरं, एवढं करुनही आम्हाला कधीच पुरेसं अन्न मिळालं नाही.  ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून मी कॉलेज सोडून एका हातरुमाल बनवणाऱ्या कंपनीत नोकरी पत्करली.  सावत्र आईने विरोध केला, पण मी तिच्या विरोधाला भिक न घालता नोकरी करत राहिले.  मी कामाला गेले की, माझ्या मागे माझ्या बहिणींचे हाल चालूच होते.  माझा महिन्याचा तुटपुंजा पगार देखील ती बाई हिसकावून घ्यायची.  हे आता नित्याचं झाल होतं. एक दिवस मी कामावरुन परत येतांना पावसामुळे एका शौचालयाच्या आडोशाला उभी राहिले, तेव्हा कसला तरी आवाज आला.  आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी डोकावून पाहिले तर माझ्या लहान बहिणी तिथे बसून एका भाकरीच्या तुकड्यासाठी आपसांत भांडत होत्या. मी त्यांना घरी घेऊन गेले.  त्यांना काही विचारणार तोच सर्वांत लहान बहिण म्हणाली,  ” ताई ज्योतीच्या आईने रात्रीच्या शिळ्या चपात्या कचऱ्यात टाकायला दिल्या होत्या, एवढया चपात्या कचऱ्यात टाकायच्या कशा? पोटात भूक, हातात चपात्या करायच काय ? भूक शमवण्यासाठी आम्ही त्या शिळया चपात्या शौचालयात बसून खात होतो.  ताई मला क्षमा कर.” भेदरलेल्या त्या लेकरांनी आगतिकपणे हात जोडले, दुनिया जिथे मूत्र विसर्जन करुन जाते, तिथे माझ्या बहिणी उदरभरण करतात, हे ऐकून काळजाचं पाणी झालं आणि मग मात्र हे नित्याच झाल.  लोकांनी दिलेलं अन्न आमच्यासाठी अमृत झालं.  जिथे आम्ही शिळ्या अन्नावरती पोटाची भूक भागवत होतो. तिथे आमचा बाप आपल्या शरीराची, वासनेची भूक भागवत होता. आमचं उकिरड्यावरचं खाणं सुरुच होतं. एक दिवस त्याच ज्योतीच्या आईने उंदीर मारण्यासाठी विषारी औषध कालवलेलं जेवण आम्हाला कचऱ्यात टाकायला दिलं. आणि नेहमीप्रमाणे माझ्या बहिणीने ते लपवून ठेवलं. मी कामावरुन घरी आल्यावर आम्ही तिघींनी घरातली सगळी कामे आटपली.  आईने दिलेलं अर्धवट जेवण जेवलो आणि पोटात लागलेली भूक पूर्णपणे शमविण्यासाठी आम्ही लपवून ठेवलेलं अन्न खाऊन या स्वार्थी जगाचा निरोप घेतला… खरच..काय दोष होता आमचा ? बाप असून देखील आम्ही पोरक्या होतो.. एक विचारु तुम्हाला ? पोटातल्या भूकेपेक्षा शरीराची, वासनेची भूक खरच इतकी मोठी असते का हो ?


दिवाकर मोहिते. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: