प्रारब्ध

“फक्त या सुमधुर क्षणासाठीच केंद्र सुरू झाले होते सारंगी!” सत्यमला‌ जवळ घेत समीर म्हणाला. त्याचे डोळे पाणावले होते. सारंगीने त्याचे डोळे पुसले.”आता आपल्या घरात हसरा तारा आलाय. चल जगून घेऊ‌ त्याच्यासवे!” असे म्हणत ती सत्यमला भरवू लागली. समीर मात्र स्मृतींची पाने चाळू लागला. समीर आणि सारंगी  अगदी सख्खे शेजारी,‌  बालपणापासूनचे सवंगडी. दोन्ही कुटुंबांचे स्नेहसंबंध जिव्हाळ्याचे होते. दोघांचे वडील एकाच ऑफिसमधे‌ होते. समीर आणि सारंगी एकाच शाळेत होते.  दोघांमध्ये गाढ मैत्री होती. दिवस भराभर जात होते. वर्गात दोघेही आघाडीवर होते. काही वर्षांनी समीरच्या वडिलांची बदली झाली; पण तरीही मैत्री अखंड होती. कधीकधी जमेल तसे दोन्ही कुटुंब‌ एकत्र येत. कुठेतरी सफरीवर जात. दिवस आनंदात जात होते. समीर आणि सारंगी तसा अनुरूप जोडा होता. दोघे एकत्र यावेत असे दोन्ही कुटुंबांना वाटायचे. कालांतराने दोघेही इंजिनिअर झाले. आता लग्नाचे विचार सुरू झाले. एके दिवशी समीरच्या वडिलांनी त्याला विचारले,”समीर, तुला सारंगी जीवनसाथी म्हणून आवडेल?” “बाबा, आमच्यात छानशी मैत्री आहे. मी अजून तसा विचार केला नाही; पण तिच्यासोबत जीवन घालवायला मला मनापासून आवडेल. तिचे काय आहे ते मला माहीत नाही. तिला विचारा; पण आग्रह नका धरू.”समीरकडून ग्रीन सिग्नल मिळाला हे पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. इकडे सारंगीपण त्याच्यात गुंतत चालली होती. दोन्ही कुटुंबांत आनंदाला उधाण आले. एका मंगल मुहूर्तावर दोघे विवाहबद्ध झाले. लवकरच सारंगीपण समीरच्या शहरात बदलून आली. आळीपाळीने दोघांच्या आया त्यांच्याकडे जाऊन संसार लावून आल्या. नवे नवलाईचे दिवस संपले तसे नातवंडाची वाट दोन्हीकडचे आजी-आजोबा पाहू लागले; पण आधी घर बांधायचे असे समीरचे म्हणणे होते.  आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे तीनच वर्षांत ते स्वत:च्या घरात गेले. आता त्यातच त्यांना बाळाची चाहूल लागली. सुखद लहरींच्या हिंदोळ्यावर ते झुलू लागले. अशातच तो वाईट दिवस उगवला. शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेलेली सारंगी लवकर घरी आलीच नाही. आला तो फोन अपघात झाल्याचा. समीर हवालदिल झाला. सारंगीचा गर्भपात झाला. त्यातून तिला सावरणे जडच  गेले. सगळेच निराश झाले. ती जरा बरी झाल्यावर तिला ट्रिटमेंट सुरू केली.  एक-दोन वर्ष गेले; पण कूस काही उजवेना. शेवटी एकदाचा उलगडा झाला. सारंगी आता आई बनू शकणार नव्हती, कधीच नव्हती. सगळी स्वप्नं भंगली होती. सारंगी पार खचून गेली. समीर वरकरणी जरी दाखवत नसला तरी तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता. त्याला बाळ हवे होते.  सारंगीला माहीत होते, की त्याला लहान मुले खूप आवडतात. आता समीर जास्त वेळ बाहेर राहू लागला. सारंगी मधूनमधून समीरच्या शोभाआत्याकडे जात असे. आत्यापासून या गोष्टी फार काळ लपून राहिल्या नाहीत. एक दिवस त्यांनी समीरला घरी बोलावून घेतले.”सारंगी अपघातातून वाचली नसती तर?”आत्या म्हणाली. समीर काय समजायचे ते समजला. लवकरच त्याने थंड हवेचे ठिकाण पाहून सारंगीला एक आठवडा फिरवून आणले. यामुळे ते मनाने पुन्हा जवळ आले. जे वास्तव आहे ते स्वीकारून ते पुन्हा कामात व्यस्त झाले. अशीच पाच वर्षे गेली. “आपण दोघे आहोत ना एकमेकांसाठी, शेवटपर्यंत सोबत करू या!” समीर नेहमी म्हणे. असा जोडीदार नशिबाने मिळतो म्हणून सारंगी देवाजवळ नतमस्तक होत असे. एके दिवशी शोभाआत्याकडे पूजा होती. दोघांचे आई-वडील आले. या दोघांना घेऊन फिरायला गेले. मोकळ्या हवेत मोकळ्या गप्पा झाल्या. समीरचे वडील म्हणाले,”तुम्ही दोघांनी काही निर्णय घ्यायला हवा. आम्ही आता  थकलो. ‌तुम्ही एखादे मूल‌ दत्तक घ्यावे असे मला वाटते.” समीर आणि सारंगी लगेच तयार झाले. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला.        साधारण चार ते पाच महिने गेले असतील. एक दिवस शोभाआत्या आली.म्हणाली,”शहरात एक अनाथाश्रम सुरू झाला आहे. एक वर्ष पूर्ण झाले आहे. तिथे एक बाळ आलेलं आहे. मला मनापासून वाटतं की ते सारंगीला खूप आवडेल. मी तुमचे नावपण नोंदवून आली आहे.” समीर आणि सारंगी लगेच आत्याला म्हणाले, “केव्हा जायचे आत्या?” “उद्याच निघू या आपण!”आत्या सारंगीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. रात्रभर जागून काढली सारंगीने. ती पुन्हा आई होणार होती. समीर डोळे मिटून पडला होता; पण तोही विचारात गुरफटलेला होता. भल्या पहाटेच ते दोघे तयार झाले.  आत्या तयारच होती. एका तासात ते आश्रमात पोहोचले. काही औपचारिक संभाषणानंतर ते बाळापर्यंत पोहोचले. अत्यंत गोजिरवाण्या बाळाकडे सारंगी डोळे भरून पाहत होत़ी. समीर बाळाजवळ आला. बाळाने त्याचे बोट पकडले. समीरच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.”आवडले  का बाळ तुम्हाला? तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी लागेल.”संचालक विचारत होते. समीरने सारंगीकडे पाहिले. ती तर कधीच त्या बाळाची आई होऊन गेली होती.           औपचारिकता आटोपल्यानंतर बाळ आई-बाबांसह घरी आले. पुढच्या आठवड्यातच थाटात बारसे झाले. ‘सत्यम’ मोठ्या कोडकौतुकात वाढू लागला. अन् एक दिवस पेपरला आले की तो अनाथाश्रम बंद करण्यात येणार आहे. त्यावर कोणीतरी केस केली होती. समीर आणि सारंगी पुन्हा तणावात आले. निरागस सत्यमकडे बघत सारंगी रडून देत असे. जवळजवळ पाच-सहा महिने केस चालली. संस्थेवर तात्पुरती बंदी आली; पण संस्थेत आलेले एकमेव बाळ अतिशय सुरक्षित हाती सोपवलेले पाहून सत्यमला समीर व सारंगी कडेच सोपविण्यात आले. जणू काही त्यांना आई-बाबा बनविण्याकरिताच ते बाळ त्यांचे प्रारब्ध होऊन आले होते. परमेश्वराचीच योजना होती ती…

भावना मुळे, जळगांव

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: