एम्प्लॉयीं

आपण लिहीलेल्या मोडक्या तोडक्या कवितांवर भाळून कुणी चक्क आपल्याला भेटायला बोलावेल ही कल्पनाही जयंतीच्या मनात नव्हती. फेसबुकवर किती कमी फॉलोअर्स होते तिचे. खुद्द तिलाही माहीती होतं ज्याला सकस म्हणावं असं आपलं लिखाण नाही. साली उज्वला होती…तिला तो बरोबर सेन्स होता…कोणते शब्द कसे बसवायचे.. कोणत्या शब्दाने काव्य भारदस्त वाटेल… आपण तर काय करत होतो सरळ सरळ कॉपी. कुणाचंतरी वाचायचं..नी एक दोन शब्द बदलायचे आपलं नांव देऊन वॉलवर टाकायचं. ती कॉपी आहे हे उज्ज्वला ओळखायची. साली फार हुशार होती. मल्टी टैलंटेड. जयंती बिल्डर्स आपल्याच नांवावर  मिथीलेशनं चालू केलेली फर्म.. तुझ्यामुळे माझा उत्कर्ष झाला. पडत्या काळात तू फार साथ दिलीस मला…म्हणून तर या फर्मचं नांव तुझ्या नावाने ठेवतोय… किती आनंद झाला होता तेंव्हा जयंतीला!! मिथीलेश तिला नेहमी जय म्हणायचा. तिनं फार उत्साहाने ऑफीसमध्ये काम चालू केलं. माणसं नेमली. स्वतः ती ऑफीसमध्ये जायची. अशी काही फार हुशार नव्हती जयंती.ढीग चुका होत. पण ते मालकीण या सदराखाली लपून जायचं. मिथीलेशला हे माहीत होतंच. पण तिचा उत्साह पाहून त्याला तिचा हिरमोड नव्हता करायचा. बारीक सारीक चुकांचं दुसर्याच्या माथी खापर फोडून स्वतः नामानिराळं रहाण्याचं नी मिथीलेशच्या रागापासून वाचायचं कौशल्य तिनं लवकरच आत्मसात केलं. ती मालकीण आहे म्हणून कुणी बोलायलाही जात नसत.       जयंती बिल्डर्सचा व्याप हळूहळू वाढू लागला. स्टाफही पुरेना. मिथीलेशनं असिस्टंट घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला विश्राम केतकर नावाचा मुलगा जॉईन झाला. पण तिथलं एकंदरीत वातावरण, जयंतीचा वरचष्मा , मिथीलेशचा लहरी व तापट स्वभाव, शहानिशा न करता संतापानं वाकडं तिकडं बोलणं हे सारं पाहून विश्रामनं नोटीस पिरीयडचा पगारसुद्धा न घेता नोकरी सोडून दिली.  परत जयंतीला कामाचा ताण. पुन्हा जाहीरात देऊन इंटरव्ह्यू झाले. आणि उज्ज्वलाची निवड झाली.उज्जला  छान होती नुसतीच छान नव्हे तर हुशारही होती. सुंदर अक्षरांचा दागिना होता तिच्याकडं. टापटीप, कामाचा उरक, नवं ज्ञान शिकायची इच्छा नी शांत स्वभाव यामुळं ती मिथीलेशला आवडायला लागली. या सर्वांबरोबर तिचं वाचनही अफाट होतं. की काहीही विचारलं तर तिला सहसा माहीत नाही हे उत्तर मिळायचं नाही.  तिला माहीत नसलेल्या गोष्टी तिनं गुगलकडून माहीती करुन घेतल्या. त्यामुळं हळूहळू जयंतीला आपण दुर्लक्षीत होतो आहे असं वाटू लागलं. तशी उज्ज्वला अतिशय साधी सरळ नी डाऊन टू अर्थ होती. पण यांच्याकडं जॉईन झाल्यावर तिला राहणीमानात वेशभूषेत थोडा बदल करावा लागला आणि त्यामुळं ती जास्त खुलून दिसू लागली. जयंती सर्वांना सांगायची मी बदल केला हिच्यात. माझ्यामुळं ही बदलली. आणि आता माझी कॉपी करते जिकडं तिकडं. वास्तविक ते ते ड्रेसचे ट्रेंड येतात प्रत्येकजण त्यानुसारच राहतो पण जयंती ते मान्यच करत नव्हती. पुढं पुढं मिथीलेश सतत उज्जलाचं कौतूक करु लागला तसं तसं जयंतीला फार इनसिक्यूअर वाटू लागलं. तिच्या डोळ्यात उज्जला सलू लागली. जयंती तिला मुद्दाम चुकीचे निरोप द्यायचे, कामं बिघडवायची आणि तुझ्यामुळं मिथीलेश मला सतत धारेवर धरतो म्हणून उज्ज्वलाला ती बोलायची. मिथीलेशला कामाच्या वेळी गप्पा टप्पा केलेल्या आवडायच्या नाहीत. तर जयंती मुद्दाम येऊन उज्ज्वलासोबत गप्पा मारत बसायची. मिथीलेश काही सांगू लागला की मुद्दाम ती उज्ज्वलाचं लक्ष डायव्हर्ट करायची की मिथीलेश ओरडायचा. यात सगळा वाईटपणा मिथीलेशला किंवा उज्ज्वलाला यायचा. जयंतीला हसू यायचं. मग उज्ज्वला आपलं काम करायची. पण त्यात आधीसारखी मजा राहीली नाही. तोच एकदा उज्ज्वलाला कवितेच्या कार्यक्रमाला बोलावलं..तिथं तिचं खूप कौतूक झालं. पेपरलाही ती बातमी आली. मिथीलेशला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला,”जय, ही पोरगी हिरा आहे हिरा.मला काही त्या कवितातलं काही कळत नाही पण ग्रेटच हं! कोणताही  विषय हिला येत नाही असं नाहीय बघ” जयंतीला रागच आला.,”हो..मग का ओरडत असतोस तिच्या नावानं?”  ती फणकारली. जिकडे तिकडे हा उज्ज्वलाचं कौतूक करतो..याला आठवत तरी होतं का..काल रात्री यानं घट्ट मिठी मारली..दारुच्या नशेत होता..उज्ज्वला..तू फार आवडतेस मला. जयंती नसती तर लग्न केलं असतं तुझ्याशी असं म्हणाला होता. सकाळपासून ती फुगून होती त्याच्या लक्षातही आलं नव्हतं. आणि आता हे कौतूक. साईटवर जाताना नेहमी तिला घेऊन जातो. काय करतात बघायला असतो का आपण!!!”जय, तू आजकाल तिला फार पाण्यात पाहतेस असं वाटू लागलंय मला. डोंट बी सिली. ती केवळ नोकर आहे आपली. तिला तिच्या पायरीनं रहायचं कळतं. पण तू तुझी पायरी सोडून वागू नकोस” मिथीलेशनं फटकारलं तिला. जयंतीचा चरफडाट झाला नुसता. मग जयंतीनं हळूहळू फेसबुकवर कविता पहायला सुरुवात केली. नी मधून मधून लिहायलाही. पण तिच्या लिहीण्यात कॉपीच असायची.  एखादा शब्द बदलायची नी ओळीच्या ओळी उतरुन काढायची. उज्ज्वलाची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यादिवशी तिला फोन स्वीच ऑफ करायची वेळ आली इतके फोन येत होते. पुन्हा जयंतीचा चरफडाट!!! त्यापूर्वी एकदा जयंती म्हणाली होती, ” उज्ज्वला, तुझं पुस्तक आपण प्रकाशित करुया. कुणाचं कोण असतं त्यांना मी मदत करते तू तर आमची आहेस!” पण ही तिची प्रसिद्धी पाहून जयंतीनं तिच्याशी बोलणंच कमी केलं. मिथीलेश कडं वारंवार ती तक्रारी करायची उज्ज्वला ऑफीसमध्येही कविता लिहीते. तिला पुस्तक लिहायची ऑफर आलीय. त्यामुळं तिचं काम नीट होत नाही .  हलक्या कानाचा मिथीलेश त्यावरुनही  उज्ज्वलाला फटकारायचा. त्यादिवशी जयंतीनं मुद्दामच मिथीलेशनं सांगितलेल्या कामाचा निरोप तिला दिला नाही. वर अकांड तांडव केलं मी दिला होता निरोप. उज्ज्वलानं डायरी काढली. त्यात एकूण एक काम लिहायची सवय होती तिला. त्यात जयंतीनं दिलेली कामांची नोंद होती. पण जे फार महत्वाचं काम होतं टेंडर नोटीसचं ते नव्हतंच. झालं दोघंही सापडले. मिथीलेशला काहीच बोलता येईना. त्यानं उज्ज्वला समोर विषय बदलला. जाताना उज्ज्वलानं एक इनव्हीटेशन कार्ड दिल. बिल्डर्स लॉबी असोसिएशनचे अध्यक्ष नीलकांत दर्डांच्या ऑफीसमधून आमंत्रण द्यायला कुणीतरी कार्ड देऊन गेलंय असं सांगितलं.उद्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून तिला रजा हवी आहे म्हणून मंजूरीही घेतली.दुसर्या दिवशी संध्याकाळी जयंती व मिथीलेश हॉलवर पोचले… नी मिथीलेश हक्का बक्काच.. बिल्डर्स लॉबी असोसिएशनचे अध्यक्ष नीलकांत दर्डा  स्वतः त्याच्या स्वागताला आले. ,”मिथीलेश, वेलकम. मी तुझा फार फार आभारी आहे”मिथीलेशला काही समजेचना. तोच तिथं उज्ज्वला आली. “मिथीलेश, ही माझी सून उज्ज्वला.आज तु खास गेस्ट आहेस. माझ्या सुनेला तू फार मदत केलीस. तीन वर्षापूर्वी आमचा मुलगा अपघातात गेला. त्या धक्क्यातून ही बाहेरच पडायला तयार नाही. म्हणून तिला माहेरचं नांव घेऊन नोकरी करायला मी सांगितलं. तुझ्याकडं काम करुन ही फार तयार झालीय. ही थँक्स गिव्हींग पार्टी खास तुझ्यासाठी ठेवलीय. एनी वे.. आता आयुष्यात तुला काहीही मदत लागली तर मी तुला करेन. एंजॉय…..”जयंतीला तोंडात मारल्यासारखं झालं. ही इतकी श्रीमंत असून एक चकार शब्द बोलत नव्हती. नी आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालो. मिथीलेशची अवस्था त्याहून वेगळी नव्हती. उद्या उज्ज्वला ऑफीसला आली की आधी तिची माफी मागायची. पार्टी आवरली. डिसेंट मूडमध्ये परत आले ते. रिटर्न गिफ्ट म्हणून दर्डांनी चांदीच्या ग्लासचा सेट दिला. दोघं कानकोंडे झाले. दुसर्या दिवशी उज्ज्वला आली राजीनामा घेऊनच. मिथीलेशला काय बोलावं सुचेना. तिनं फार सहज सांगितलं, ” सर मी एंप्लॉयी होते. त्यामुळं तुम्ही बॉस म्हणून बरोबरच होता. फक्त आता कुणाला हे सगळं काम सोपवायचं ऑफीशियली सांगा. एक महीन्याची नोटीस आहे. तेवढ्या वेळात तुम्हाला दुसरी उज्ज्वला तयार करुन देते””मला दुसरं कुणीही नको आहे. १ लाख टक्के माझी बेस्ट एंप्लॉयी आहेस तू” मिथीलेश खिन्न होऊन म्हणाला.”मला तू इथूनच रिटायर व्हावंस असंच वाटायचं गं.”” पण जयंतीचं वागणं बघता ते कठीण आहे सर” शांतपणे उज्ज्वला म्हणाली. एक महीन्यात तिनं दुसरं माणूस जमेल तेवढं शिकवून तयार केलं. नंतर तिनं मिथीलेश नी जयंती सोबत कसलेही संबंध ठेवले नाहीत. जयंतीच्या कवितांमध्ये बदल सुचवायला, चुका सांगायला आता कुणीच नव्हतं. कधीतरी ती ऑफीसमध्ये दिक्षाला वाचून दाखवायची. पण एकदा तिनं स्वतः एेकलं दिक्षा फोनवर कुणाला तरी सांगत होती,” आमच्या  जयंती मॅमच्या चोरट्या नी कॉपीड कविता ऐकणं ही शिक्षा आहे मला”विचार करत जयंती त्या ऑफीसपाशी पोचली. तिला पाहताच प्यूननं आदबीनं तिला आत नेलं. भारी इंटेरीयर, ए.सी. लाऊंज बघूनच क्षणभर जयंती दबकली. आत केबिनमध्ये पाहीलं तर उज्ज्वला होती. तिनं खास चॅनल चालू केलं होतं महीलांसाठी. नी त्याच्याकरीता मुलाखत हवी म्हणून तिनं पहीली उद्योजिका म्हणून जयंतीला बोलावलं होत..

मुक्ता कुलकर्णी

जयसिंगपूर, कोल्हापूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: