वारी

आज कित्येक वर्षांनंतर भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. भाऊंचा एकुलता एक मुलगा विलास आज आपल्या आईवडिलांना घेऊन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीला चालला होता. सोबत विलासची पत्नी आणि बहीण पूर्वा आणि तिची छोटी मुलगी स्वरा होती. चेन्नई मेलची तिकिटे अगोदरच काढलेली होती. मध्यरात्री दादर स्थानकातून गाडी पकडून सकाळी अक्कलकोटला उतरून, तिथून खाजगी गाडीने स्वामी समर्थ दर्शन घेऊन संध्याकाळी पुन्हा ट्रेन पकडून मुंबईत यायचं असा बेत ठरला होता. 
आदल्या रात्रीपासून भाऊंच्या सारख मनात येत होतं की उद्या आषाढी एकादशी आणि चंद्रभागेच्या तीरावर गोपाळाचा मेळा भरणार आहे. आपली कित्येक वर्षांपासूनची इच्छा आहे त्या विठुरायाच्या चरणावर मस्तक टेकवायची. त्यांनी तशी इच्छा विलासजवळ बोलूनही दाखवली परंतु विलासने तिथे गर्दी असणार अस कारण सांगून तिथे नको जाऊया असं सुचवलं.  नंतर कधीतरी जाऊ असं बोलून भाऊंची समजूत काढली. 
रात्री सगळे ट्रेनमध्ये बसले तेव्हाही भाऊ विशालला बोलले की आपण पहिले पंढरपूरला जाऊया आणि मग अक्कलकोटला जाऊया. विशालने त्यांना पुन्हा सांगितले की भाऊ गर्दी असेल तिथे उद्या, आपण नंतर जाऊ ना. काहीवेळातच सगळे झोपी गेले, पण भाऊंना झोप लागत नव्हती. सारखं त्या विठू माऊलीचं नामस्मरण चालू होतं आणि मनातल्या मनात मला दर्शनाला घेऊन जा असे आर्जव सुरू होते. रात्रभर स्वरा शांत झोपली होती परंतु सकाळी कसल्यातरी आवाजाने तिची झोपमोड झाली. मग काय ती गप्प राहायलाच तयार नाही. आजी आजोबा, विशाल, पुर्वा, तसेच विशालच्या बायकोने म्हणजे शर्मिलाने सुध्दा स्वराला नानाप्रकारे शांत करायचे प्रयत्न केले परंतु सारे व्यर्थ. गाडी एव्हाना मोहोळ स्थानकात पोहोचली होती आता पुढचे स्थानक होते सोलापूर आणि त्यानंतर एक स्थानक सोडून अक्कलकोट. अगदी सर्वांचे अथक परिश्रम चाललेले स्वराला गप्प करण्याचे. स्वरा गप्प राहायचे नाव घेईना तेव्हा गाडीतील इतर प्रवाशांनी ती गाडीत घाबरलीय तेव्हा सोलापूरला उतरून तिला शांत  करून नंतर सोलापूरवरून खाजगी गाडी करून अक्कलकोटला जायचं सुचविले. विशाल पण त्याचं ऐकून सोलापूरला उतरला. गाडीतुन उतरल्यावर काहीवेळातच स्वरा शांत झाली. सोलापूर स्थानकाबाहेरून एक खाजगी गाडी करून ते निघाले. काहीवेळातच ड्रायव्हरने गाडी एका ठिकाणी थांबवली आणि सगळ्यांना उतरा अशी विनंती केली. इथून काही अंतरावर मंदिर आहे, आज एकादशी आहे ना त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी गर्दी असणार आहे त्यामुळे गाडी इथेच थांबवावी लागेल. 
तेव्हा विशाल बोलला की एकादशीला अक्कलकोटला गर्दी कशी काय असते. तेव्हा तो ड्राइवर बोलला अहो दादा आपण आता पंढरपूरमध्ये पोचलोत, अक्कलकोटला नाही. ते बघा तिकडे समोर मंदिर दिसतेय. हे ऐकल्यावर तर विशालची झोपच उडाली. खरंतर चूक विशालचीच झाली होती, त्याने गाडीत बसताना त्या ड्राइव्हरला कुठे जायचे ते सांगितलंच नव्हतं. त्या गाड्या जिथे पार्क केलेल्या होत्या तिथे एक बोर्ड लावला होता अक्कलकोट आणि पंढरपूर साठी गाड्या इथे मिळतील. तो बोर्ड बघून विशाल आणि त्याचे कुटुंबीय पहिल्या नंबरच्या गाडीत जाऊन बसले. आज एकादशी असल्याने त्या ड्राइव्हरने सुद्धा कुठे जायचं ते न विचारताच थेट पंढरपूरला घेऊन आला. 
या सगळ्यात भाऊंची एक कित्येक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होत होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर उमटली. प्रत्यक्ष वारीत तर सहभागी नाही होता आलेलं पण तूझ्या दर्शनाची इच्छा तूच पूर्ण करून तुझ्या भक्ताला तुझ्या पायाजवळ घेऊन आलास. विशालला सगळ्यांना बोलला आता आलोच आहोत तर  इथून लांबूनच दर्शन घेऊ आणि मग अक्कलकोट साठी निघू. पण भाऊ बोलले की नाही, मी आता इथे अनायसे आलो आहे तर पांडुरंगाच्या पायावर माथे ठेकविल्याशिवाय नाही येणार. तुम्हाला जायचं असेल तर जा, मी माऊलीचे दर्शन घेऊन मग येईन तिकडे.अस म्हणत भाऊ दर्शनाच्या रांगेत जाऊन उभे राहिले. नाईलाजाने विशाल आणि बाकी सर्वजण पण त्यांच्या मागोमाग गेले. तब्बल सात-आठ तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना दर्शन मिळाले. त्या विठू माऊलीला भाऊंनी डोळे भरून बघून घेतले. आणि आपल्या वारीची सांगता केली. ही भाऊंची शेवटची वारी ठरली कारण या वारीनंतर काही दिवसातच भाऊ स्वर्गवासी झाले.

किसन रामचंद्र पेडणेकर
पालघर, मुंबई

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया