एक वारी अशीही

शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही आकाश शाळेत आला नव्हता. तो शाळेत यायला तयारच नाही हे समजल्यावर प्रिया अस्वस्थ झाली होती. तिच्या जीवाची तगमग होत होती. शेवटी ती मुख्याध्यापकांच्या परवानगीने आकाशच्या घरी पोचली.ती दिसताच आकाश  घरात लपून बसला. गरीब, कष्टकरी आई-बापाच्या मुलाची शाळेविषयीची नावड तिला सहनच होईना. ती त्याच्या घरी पडवीतील खुर्चीवर बसली. आई बाबा त्याला बाहेर बोलावत होते. पण तो आला नाही.प्रियाला राहवेना. बाहेरूनच खूप वेळ त्याच्याशी संवाद साधूनही तो बधत नाही म्हटल्यावर ती उठलीच. 

“कुठे लपून बसलाय तो नेमका..?”  त्याच्या नावाने हाका मारत प्रिया पडवीतुन घरात शिरली. पडवीत बसलेली त्याची आजी लगबगीने तिच्या पाठोपाठ घरात गेली.      “बाइनो, येवा तुमि भायर. तकडे नको जाव. तो देवघरात लपलो आसा. हाणतय मिया त्येका. तुमी हडे पाटी येवा..”   देवघर हा शब्द ऐकताच प्रिया देवघराकडे वळली. देव्हाऱ्याच्या बाजूलाच लपलेला आकाश तिच्या नजरेला पडला. तो दिसावा म्हणून धडपडणाऱ्या प्रियाला मागून त्याच्या आजीने तिला काहीशा कठोर स्वरात मारलेल्या हाका तिच्या कानातून मेंदूपर्यंत पोचल्याच नव्हत्या. त्याच्याशी गोडीगुलाबीने बोलून चॉकलेट आणि बिस्कीट पूडा त्याच्या हातावर ठेवत प्रियाने त्याला बाहेर आणले.       

तो आपल्याजवळ आल्याच्या आनंदात तिला कशाचं भानच राहिलं नाही. “हे बघ आकाश, तू दररोज शाळेत आलास ना तर मी तुला खाऊ देईन. तू उद्या तयार रहा दहा वाजता. मी येते तुला न्यायला.  मग गाडीवरून जाऊ आपण शाळेत.  येशील ना रे तू ?” प्रियाच्या प्रेमळ शब्दांनी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. “मिया उद्यापासून येतय”     असं  पुटपुटत तो पुन्हा घरात पळाला. प्रिया आनंदात शाळेत परतली. दुसऱ्या दिवशी  ती मुख्याध्यापकांना आकाशबद्दल सांगण्यासाठी आनंदाने गेली खरी पण.” आमचो पोर शाळेत जायत नायतर नाय जायत. ह्येनका कित्या व्हयो उठाठेवी. त्या बाईक काय अक्काल आसा की नाय ? झोळग्यासारकी झोळीत सरळ आमच्या देवाच्या रुमात गेली. आज पर्यात कदी कोनची सावली नाय पडाक दिली आमी आमच्या देवार. यंदा वारीक  जावक नाय मिळाला म्हणान एकादशीची ईटोबाची पूजा हय घरातच बांदलेलय मिया. ह्या बाईन सगळो इटाळ केल्यान घरभर. चार बुका शिकली म्हनान लै मोटी झाली काय..?”        काल प्रिया आकाशच्या घरातून निघाल्यावर त्याच्या आजीने उधळलेली मुक्ताफळे  शाळेपर्यंत पोहोचली होती.  प्रिया मुख्याध्यापकांकडे गेल्यावर ती जशीच्या तशी तिच्या ओटीत घातली गेली. प्रिया क्षणात जमीनदोस्त झाली. तिच्यातील शिक्षिकाच नव्हे तर माणूसही अक्षरशः गोठून गेला…. ती  वर्गात परतली. नेहमीप्रमाणे लेकरं  तिच्याभोवती गोळा झाली. बाईंचा दुःखाने भरलेला रडवेला चेहरा पाहून  कावरीबावरी झाली. बाईंच्या डोळ्यांत न दिसणारी मूक आसवे मुलांच्या डोळ्यातून वाहू लागली पण त्यांना जवळ घेण्याची प्रियाला क्षणभर भीतीच वाटली..  आपल्या स्पर्शाने ही कोवळी लेकरं बाटली तर.?. भीती मनात फणा काढून विखारी दंश करू लागली. एकीकडे हमसून रडणारं मन दुसरीकडे मात्र संतापाने पेटून उठलं होतं. तिच्यातील समर्पित शिक्षिका त्यादिवशी पहिल्यांदाच खचली होती. जन्मासोबत चिकटलेली, कागदपत्रावर नोंद झालेली तिची जात तिच्याकडे पाहून दात विचकून हसत होती. मनातला संताप आणि दुःख आवरत ती उठली . तिने शिकवणं चालू केलं. अर्धा तास झाला असेल नसेल.     “बाइनो.. असा काय केलास.. ? इलास नाय ते ?” आकाशची आई प्रश्न विचारतच वर्गात येत होती.      प्रियाच्या मनात अपमानाचा संताप तुडुंब भरला होता.     ” का आलात तुम्ही ? माझ्या सावलीने तुमचा विठोबा विटाळतो मग तुमचा मुलगा बाटणार नाही का ?” अगदी अनपेक्षितपणे प्रियाकडून आलेल्या या जळजळीत प्रश्नाने आकाशची आई गोरींमोरी झाली. “बाइनो, ओ त्या म्हातारेचा काय तुमी मनावर घेतास..? तीका लागलो हा म्हातारचळ.. पन आमी खय काय म्हटलव तुमका..? बाइनो , पोर वाट बघता हा ओ तुमची. शाळेचा नाव काडला काय पिसाळल्या सारको करायचो तो. पन तुमि गाडी घेवन न्हेवक येतलास म्हणान सकाळ पासूनच नटान बसलो हा ओ. बाइनो, येकच्या येक झिल ओ माजो. शिकलो तर ऊब्या जन्मात तुमचे पांग मी इसराचय नाय.  चला ओ बाइनो.. पाया पडतय मी तुमच्या..”अपमानाने दग्ध झालेलं प्रियाचं मन तिच्या आसवांनी विरघळलं  नाही. “तुमचा मुलगा. कसा शिकवायचा ते तुमचं तुम्ही बघा. मी पुन्हा तुमच्या दारात पाऊल नाही ठेवणार..” असं निक्षून सांगत तिच्याकडे पाठ फिरवून प्रिया फळ्याकडे वळली. मधल्या सुट्टीत वर्तमानपत्र चाळताना पहिल्याच पानावर विठोबाच्या ओढीने पायी वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या सुंदर फोटोने तिचं लक्ष वेधून घेतलं. फोटो पाहून ती अस्वस्थ झाली. अनंत अडचणी, वेदना सोसत पायी वारी करण्याचे असिधारा व्रत घेतलेल्या पंढरीच्या वारकऱ्यांची वाट पाहणाऱ्या विठोबाच्या निर्व्याज रुपड्यात तिच्या नजरेसमोर क्षणभर आकाशचाच चेहरा झळकून गेला. या ज्ञानपंढरीकडे तिचं बोट पकडून चालावं म्हणून तो ही वाट पाहत होता ना तिची..!  गेली सोळा वर्ष सातत्याने न थांबता, न थकता असे अनेक आकाश प्रतिकुलतेवर मात करत तिच्या साथीने ही ज्ञानभक्तीची वारी पूर्ण करत होते. यावेळी तरी कशी बरं चुकवावी ही वारी..? अवघ्या काही क्षणांतच विचारांच्या नितळ चंद्रभागेत तिच्या मनातील  वेदना वाहून गेली.         स्वतःशी काहीतरी निग्रह करून प्रिया उठली. पुढच्या काही मिनिटांत तिची दुचाकी आकाशच्या घराकडे निघाली होती.     तिच्या ज्ञानदानाच्या वारीत आता खंड पडणार नव्हता.. कधीच !!

सरिता सदाशिव पवार,
कणकवली, सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: