विठ्या

सावित्री आज पहाटे पहाटेच उठली.स्नानसंध्या केली. अंगणात शेणसडा घातला. सुंदर रांगोळी काढली. नित्यनेमाची पूजा केली. तुळशीला पाणी घातले.सुवासिक अगरबत्ती लावली.आज सावित्री खुपच आनंदी अन उत्साही होती.काय कारण बरे या उत्साहाचे? वटपौर्णिमा होती आज. “जन्मोजन्मी हाच पति  लाभू दे रे देवा” हेच मागणे वडाच्या झाडाला फेऱ्या घालून मागायचं म्हणून तर तिची लगबग सुरू होती.नाकात नथ, गळ्यात डोरल, मंगळसूत्र,कानात टपोऱ्या कुड्या, हिरव नऊवारी लुगडं अन डोईवर भला मोठ्ठा पदर घेऊन ती आरशासमोर उभी राहिली.नामदेवबाबाही नेहमीप्रमाणे लवकर उठले.दारापुढल्या हौदावर जाऊन आंघोळ केली. सवयीप्रमाणे हरिपाठ वाचला.
हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा।पुण्याची गणना कोण करी ||मधुर आवाजाच्या नामदेवाच्या स्वरांनी घर कसं भक्तिमय झालं होतं.हरिपाठ वाचून झाला.नामदेवाने तो मस्तकी लावून देवापुढे ठेवला.अगं चहा देतेस ना? कुठे गेली ही.. चार हाका मारल्या नामदेवाने पण ‘ओ’ असा आवाज आला नाही म्हणून नामदेव दुसऱ्या खोलीत गेला.सावित्री आरशासमोर उभी.नव्या नवरीसारख्या नटलेल्या बायकोला पाहून सुखावला. तिच्या मागे येत म्हणाला. ‘सावित्री चहा देतेस ना? अगंबाई! हरिपाठ झाला वाटत तुमचा. मी विसरूनच गेले होते’सावित्री ..सावित्री.. लई भारी!  काय सुंदर दिसतेस तू या नथीमध्ये. अन इतक्या सकाळी सकाळी नटून थटून कुठे जायचंय गं तुला? अहो, आज वटपौर्णिमा आहे.माझ्या सर्व सखींसोबत मी जातेय.चला मी तुम्हाला चहा गरम करून देते.
नामदेव सारखा म्हणत होता. सावित्री तू रुखमाई सारखी दिसतेस.तू चल माझ्याबरोबर वारीला डोईवर तुळस घेऊन.  वटपौर्णिमा झाली की काही दिवसातच पंढरपूर पायी वारी निघते हे वर्षानुवर्षे सावित्रीला माहीत होते म्हणून ती दरवर्षी  वारीला जाण्यासाठी आवश्यक  बाडदान बिछाना,कानटोपी,छत्री,  औषध याची तयारी करून देत होती.वारीला चल तू हे ऐकूनही ती काही वारीला जात नव्हती. आजही ती वटपौर्णिमा पूजनाला जाताना   सांगूनच गेली. ग्रामपंचायतीत जा. वारकऱ्यांची रेनकोट द्या असे त्या माणसांना सांगा.विठ्ठल आवडी प्रेमभावो म्हणत नामदेव ग्रामपंचायतीतून  घराकडे निघतो अन ठेचाळतो. पाय मुरगळला की मोडला  हे त्याला कळत नाही.घराकडे येतो असह्य वेदना सहन करीत. सावित्री वडपूजन करून येते अन पाहते तो काय तिचा धनी वेदनेने व्याकुळ दारासमोर बसलेला.
काय झालं धनी.. ती आपल्या पतिकडे पहात म्हणते. सावित्री मी पडलो. माझा पाय दुखावला आहे. खुप वेदना होताहेत. पाय मोडला की काय काहीच कळत नाही मला. आता माझी पंढरीची वारी होते की नाही त्या विठ्ठलाला माहीत नामदेव सदगदित होऊन म्हणतो.
‘थांबा मी हळदमीठ गरम करून पायाला लावते सगळे काही ठीक होईल’ असे धीराचे शब्द सावित्री म्हणते. दारातच बसलेल्या नामदेवापुढे एक छोटा मुलगा घोंगडी घ्या घोंगडी म्हणत येतो.  साधारण दहा वर्षांचा असेल. रंगाने सावळा ,नाकी डोळी तरतरीत अर्धी चड्डी अन मळका सदरा घातलेला तो छोटा मुलगा  घोंगडी घ्या म्हणून आग्रह करतो. नामदेव वेदनेने  व्याकुळ झालेला असतो त्याच अवस्थेत तो म्हणतो ‘अरे पोरा, तुझी घोंगडी घेऊन मी काय करू ? माझा पाय ठणकतोय.’ यावर तो छोटा मुलगा म्या पाय चोळतु तुमचा म्हणतो. नामदेव विचार करतो की हा छोटा मुलगा काय करणार  पण त्याच्या अति आग्रहास्तव पाय पुढे करतो. त्या छोट्या मुलाचा स्पर्श होताच नामदेव सुखावतो. तुझ्या हातात जादू आहे असे सांगतो. त्या मुलाला त्याचे नाव गाव विचारतो.तोही सांगतो ‘माह नाव विठ्या हाय, माह्या घोंगडीला लई ऊब हाय मामा  पंढरीच्या वारीत अंगावर घ्यायाची बरं का…असह्य वेदनेने व्याकुळ झालेला नामदेव चिंतीत होऊन स्वतःशीच बोलता होतो आता माझी पंढरीची वारी होती की नाही ते त्या विठ्ठलाचं माहित. यावर आपल्या नाजुक हाताची बोटे  नामदेवाच्या पायावर फिरवीत विठ्या म्हणतो ‘मामा, वारी व्हणार तुमची.काय बी काळजी करू नकासा, आता असा पाय चोळतु की टणाटणा उड्या मारसाल पघा’ माझ्या मनातले या पोराने कसे ओळखले असा विचार नामदेवाच्या मनात येतो. दुखऱ्या वेदनेवर हा पोरगा मलम लावतोय असा भास नामदेवाला होतो.तुळशीच्या पानांचा घमघमाट आल्यासारखा नामदेवाला जाणवतो. “अरे विठ्या, तुळशीचा वास येतोय तुझ्या अंगाचा ‘ यावर विठ्या सांगतो आमच्या पाडावर लई तुलसी हायेती तिकूनच या जाया लागत म्हणून वास येत आसल’  नामदेव आता प्रेमाने त्याची घोंगडी मागतो. किती पैसे देऊ असे आग्रहाने म्हणतो. विठ्या मात्र घोंगडी राहू द्या , पैसं  पळून न्हाय जायचं म्होरल्या खेपला  न्हेईन  म्हणतो. 
अहो, कुणाशी इतकं बोलत होता धनी असा सावित्रीचा आवाज कानी पडतो. अन सहजपणे नामदेव म्हणतो अगं,  विठ्या आला होता किती मस्त पाय चोळला त्याने.सावित्री गरम हळद आणि मीठ नामदेवाच्या पायाला लावते.घराच्या वरांड्यातच पुरणपोळीचे ताट भरून नवऱ्याला घास भरवते.
विठ्याचा हात अन सावित्रीची साथ यामुळेच की काय नामदेवाचा पाय बरा झाला होता. हा पाड्यावरचा विठ्या कुठे राहतो या विचारांनी नामदेव अस्वस्थ झाला होता. त्याला शोधायचे या निर्धाराने  नामदेव पाडयाकडे गेला. तर विठ्या समोरच उभा. त्याला पाहून नामदेव गहिवरला. त्याची चौकशी केली. माहा बाप लई काम सांगतु तव्हा साळत म्या जात नाय हतच राहतोया समदी काम करतू  यावर नामदेव त्याला पंढरीला चल असे म्हणतो. माही इथंच पंढरी. मामा तुमि जावा आन माहा नमस्कार त्या  इठोबाला सांगासा. अस म्हणून विठ्या निघून गेला.
पंढरीच्या पायी वारीत यावेळी नामदेव अन सावित्री सहभागी झाले होते.भजन, कीर्तन, प्रवचन ,हरिपाठ यात रममाण झाले.अंतरीची सारी दुःखे विसरून विठ्ठल विठ्ठल म्हणत चालले. चैतन्य आणि चिंतनाच्या वारीतील शब्द न शब्द मनाच्या गाभ्यात साठवू लागले.गोड तुझे रूप। गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्वकाळ।।असे अभंग म्हणत एका ठिकाणी विसावतात. डोईवरची तुळस अलगद उतरवीत सावित्री नामदेवाच्या शेजारी येऊन बसते. पंढरी जवळ आली सावित्री आता. कधी त्या सावळ्या विठोबाचे दर्शन घेतो असे झालेय मला. धनी  तो हा सुखसोहळा काय वर्णू असेच ना.. असा संवाद दोघा पती पत्नीचा सुरू असताना नामदेवाला विठ्या दिसतो. एका अंध माणसाला रस्ता पार करायला मदत तो विठ्या करीत असतो. विठ्या ये विठ्या तू आलास पंढरीला.. सावित्री.. सावित्री..  विठ्या आलाय वारीत. आत्ता पाहिला मी त्याला. धनी तो विठ्या तर मला कुठंच दिसत नाही. तुम्हाला भास होतात.नामदेव गर्दीत घुसला. विठ्याला शोधायला. विठ्या दिसला नाही. अग सावित्री मी डोळ्याने पाहिला विठ्याला. धनी तुम्ही देवाच नाव घेऊन चालत रहा बरे आता नका विचार करू अस काहीसं सावित्री म्हणते.
लाखो भाविकांची वारी आता पंढरपूरी आली. श्रीहरी विठ्ठलाला भेटण्याची आस वैष्णवाना लागली होती. भेटीलागी जीवा लागलीसे आस अशीच ती अवस्था. नामदेव अन सावित्री आता चंद्रभागेत स्नानाला आले. नामदेवाने श्रीहरी विठ्ठल म्हणत पाण्यात एक डुबकी घेतली तर शेजारी विठ्या उभा. मामा आज म्या माज्या हातानी तुम्हांसनी आंघुळ घालतू आन पाठ बी चोळतु
अरे लेका विठ्या तू होतास कुठे ? तुझी किती आठवण काढू.मामा तुला आंघुळ घालाया माह्या हातानी पंढरीला आलोया.
तुझ्या अंगाचा वास तुळशीसारखा येतोय रे.. तुळशीपत्रांनी तू मला आंघोळ घालतोस का रे  यावर नामदेवाच्या अंगावर आपल्या ओंजळीने पाणी टाकीत विठ्या हसून म्हणाला ‘माय कुठय तिला बी आंघुळ घालतो’ अहो धनी, तुळशीचा वास किती छान येतोय या चंद्रभागेला अन माझ्या डोईवर तुम्ही पाणी घालताय ना? अगं विठ्या आलाय विठ्या आपला विठ्या..
ओल्या कपड्यानिशी पांडुरंगाच्या दर्शनाला नामदेव सावित्री जातात. नामघोष करीत. त्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी. नामदेव सावित्री मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतात. कंबरेवर हात ठेवलेल्या विठ्याला पाहून नामदेव थरथरतो.. विssठया  अरे तूच पांडुरंग. अरेरे तीनदा भेटलास देवा तू पण मी पामराने नाही ओळखले तुला रे..विठ्या ये विठ्या..
नामा सदगदित झाला होता.आसवे वहात होती. गर्दी त्यांना ढकलत होती. विटेवरचा विठ्या मात्र त्यांच्याकडे पाहून गालात हसत होता.मंदिराच्या बाहेर एक छोटासा मुलगा घोंगडी घेऊन उभा होता.मामा ,घोंगडी घिऊन जावा की पंढरीची..त्या छोट्या मुलाच्या पायाशी नामदेव सावित्री नतमस्तक झाले..बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल  ज्ञानदेव तुकारामपंढरीनाथ महाराज की जय।।

सुरेश कंक
पिंपळे गुरव, पुणे.

One thought on “विठ्या

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: