वारी

आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. माझा रिपोर्ट आणायला, आम्ही डॉक्टर देशमुखांकडे गेलो होतो, मला पाहताच “अभिनंदन जयाताई, जिंकलात तुम्ही कॅन्सरला हरवलंत.. आता रॅण्डम चेकींग करायचं व आनंदी राहायचं.” हे ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. विठ्ठलाने एकादशीचा प्रसाद म्हणून मला बोनस आयुष्य दिलंय असं वाटलं.
“डाॅक्टर, तुम्ही मला जगण्याचं बळ दिलंत, मी खूप खूप आभारी आहे.” असं म्हणताच..
“मी नाही, त्या विठ्ठलाने.. तुम्ही सगळे भक्त नियमित औषधाची वारी करता आणि तो प्रसाद म्हणून तुम्हाला बोनस आयुष्य देतो.” असे नेहमीच डॉक्टरांचे सकारात्मक बोलणे.
“बरंका जया ताई, तुमच्या ‘ वारी ‘ गृपला माझा फुल सपोर्ट. कधीही हाक मारा, मी हजर असेन.” डॉक्टरांचे हे कौतुक ऐकून मी डोळे पुसत ” धन्यवाद डॉक्टर.. तुमच्या प्रेरणेनंच हे होतंयत “असं बोलून आम्ही रिपोर्ट घेऊन डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडलो..
हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफने, अभिनंदनाचा वर्षाव करत, प्रेमानं मला निरोप दिला.
सहजच, मी केमो रूममध्ये डोकावलं .. आत कोणीही नव्हतं, मला अतिशय आनंद झाला. हेच तर मला हवे होते. कोणालाही हा आजार होऊ नये हीच माझी इच्छा आहे.
कॅन्सर मुक्त झाल्याने माझ्या आनंदी मनाला,
मी हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरून, गाडीत कधी बसले हे कळलेच नाही .रस्त्याने जाताना प्रत्येक गोष्ट मला सुंदर दिसू लागली होती. मधेच यांनी गाडी थांबवली, हार-पेढे घेतले अन छानसं हसून माझ्याकडे दिले.. मी ही हसून प्रतिसाद दिला.
घरी पोहोचताच शुचिर्भूत होऊन, मनोभावे पांडुरंगाची पूजा करून त्याचे आभार मानले.. विठ्ठलाशी एकरूप होऊन, त्याच्या चरणी लीन झाले. डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.. आजार मुक्त झाल्याने, नकळत मनात आजाराचा इतिहास आठवला..
तो असा..
मागील वर्षी आम्ही दोघेही, आमची एकुलती एक मुलगी, जान्हवी हिच्याकडे, पंढरपूरला आठ दिवस रहाण्यासाठी गेलो होतो. लेक व जावई दोघंही डाॅक्टर त्यांच छोटसं हाॅस्पीटल.. अगदी मंदिराच्या समोरच्या लेनमध्ये… दोन दिवस देवदर्शन, गप्पा व आराम केल्यावर, जावईबापू म्हणाले, “आई-बाबा , अनायसे आलाच आहात तर, आपण तुम्हा दोघांचे, पूर्ण मेडिकल चेकअप करून घेऊयात, साठी नंतर काळजी घेतलेली बरी.” एवढं प्रेमाने म्हणताहेत व योग्य ही आहे, म्हणून आम्हीही होकार दिला. आमचं संपूर्ण मेडिकल चेकअप ठरलं. व्यवस्थित पार ही पडले .
डॉक्टरांना काही शंका आली म्हणून त्यांनी माझ्या अजून काही टेस्ट केल्या.. शेवटी निदान झालं ‘फर्स्ट स्टेज ब्रेस्ट कॅन्सर’… मला तर खरंच काही जाणवत नव्हतं. मी खूप घाबरून गेले. तो दिवस होता आषाढी एकादशीचा. विठ्ठलाने संकेत देऊन मला जणू बोलावून घेतलं होतं. परमेश्वर श्रध्देने मी सावरले. जान्हवीला देखिल वाईट वाटलं. आपल्याकडे आनंदाने आले व या निदानामुळे दुःखी झाले… पण तिच्यातील डॉक्टरने मोठ्या हिमतीने मला समजावून सांगितले. आम्ही पुण्याला रहात असल्याने व अद्ययावत उपचार पुण्यातच होतील. असे सर्वानुमते ठरल्याने, जान्हवी आमच्याबरोबर पुण्याला आली. डॉक्टर देशमुखांकडे घेऊन गेली. माझी ट्रीटमेंट प्लॅन करून सुरूही केली .थोडे दिवस आमच्या बरोबर राहिली.. पण तिलाही तिचा व्याप होताच म्हणून आम्हीच म्हणालो.. “तू जा, आम्ही घेऊ काळजी, फोन करत राहू ” तीने ट्रिटमेंटची तोंड ओळख करून दिली. आणि धीर देऊन परत गेली.
माझी ट्रीटमेंट म्हणजेच, केमो-मॅमो-सोनोमॅमो, पॅथलॅब टेस्ट अशा वाऱ्या सुरू झाल्या. दर 15 किंवा 21 दिवसाने केमो साठी हॉस्पिटलमध्ये जावं लागायचे सुरुवातीला खूप भीती वाटायची, हात-पाय लटपटायचे. हे किंवा माझी ताई बरोबर असायचेच. पण हळूहळू त्या वातावरणाची मला सवय झाली. तिथला प्रेमळ स्टाफ, प्रत्येकवेळी भेटणारे नेहमीचे पेशंट, तब्येतीची चौकशी करत काळजीही घेऊ लागले. गप्पा सुरु झाल्या.. फोन नंबर एक्सचेंज झाले. तिथेच मला, या आजारातल्या अनुभवी मैत्रिणी, स्नेहा, निशा, रंजना, नजमा आणि एकदम तरूण 25 वर्षाची पल्लवी ही भेटली. सर्वजणी सम-आजारी. आम्ही एकमेकींना वारकरी संबोधू लागलो कारण आमची वारी होती, कॅन्सर मुक्तीसाठीची.
ही वारी करताना, मोहमाया, आसक्ती प्रमाणेच सुंदर केस, जिभेचे चव, वजन, चेहऱ्याचे तेज सारं आपोआपच गळून पडले. स्त्रीत्वाचे शारिरीक सौंदर्यही नष्ट झालं. फक्त एकच ध्यास उरला, तो म्हणजे बरे होण्याचा.
याच काळात, आपलं आणि परकं याची पक्की ओळख पटली. हे, ताई, लेक-जावई, कामवली सखू व वारकरी मैत्रिणी यांनी मला सतत सकारात्मक विचारांचे डोस पाजले. आनंदाची फवारणी केली. त्याचाच परिणाम म्हणून की काय मीही इतरांना ते डोस पाजून आनंदी राहू लागले. औषधे व पथ्य-पाणी सांभाळत एकेक दिवस जात होता. कॅन्सरचे निदान ते मुक्त होणे या 1 वर्षाच्या कालावधीत, माझ्यातील लेखिकेने आमचा ‘वारी’ ( War Against Ravaging Illnesses ) नावाचा गृप तयार केला. मी ‘आजाराचे अनुभव’ लेख व कथा स्वरूपात लिहिले. स्नेहाने कविता केल्या. निशाने त्या सुरेल गायल्या, रंजनाने आणि नजमाने चित्रबद्ध केल्या. तरुण पल्लवीने त्यांची आकर्षक मांडणी करून ई पुस्तक प्रकाशित केले.
आमच्या गृपची, ‘आजाराविषयी जागृकता व प्रतिकार’ अशा अनुभव पर कार्यक्रमाची लिंक पल्लवीने युट्युब वर टाकली. त्यात डॉक्टर देशमुख ही सहभागी झाले. त्याला भरपूर लाईक्स मिळाले. त्याचा प्रत्यय असा आला.. बघता-बघता, आमच्या वारीला, प्रत्यक्ष कार्यक्रमाची बोलावणी येऊ लागली. आम्हीही त्यात नाविन्य आणून सादरीकरण करू लागलो. असा इतिहासाचा अश्व दौडत असतानाच.. फोनची रिंग वाजली. आणि इतिहास थांबला जान्हवीचा व्हिडिओ कॉल आला… मी खुषीत “हॅलो” म्हणत उचलला… तसं जान्हवीने “अभिनंदन आई, अरे वा छान, आज खूप फ्रेश दिसतेस हं, आता तुम्ही दोघंही माझ्याकडे निवांत राहायला या. हॉस्पिटलची वारी करून दमलात, तेवढाच बदलही मिळेल. मी आनंदाने “हो” म्हटलं. गप्पांच्या ओघात तिने खुबीने माझ्या आरोग्याची चौकशी केली. शेवटी विचारले “कधी येताय ? गाडी पाठवते” मी म्हणलं “नको गं, इकडे थोडं आवरा आवरी करतो. आमच्या गृपचे शेड्यूलही पाहते. कारण माझ्या सारख्या कितीतरी जणी कॅन्सरच्या वारकरी होतात. मुक्तीच्या प्रसादासाठी त्यांना आमचे अनुभव उपयोगी पडतात व बळही देतात. म्हणून हे व्रत सोडता येत नाही.” “आई ग, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय ! पण बदल म्हणून नक्की या, आम्ही वाट पाहतोय.” असं म्हणून जान्हवीने फोन ठेवला.

ह्यांनी माझा हात हातात घेऊन “अभिनंदन” केलं. तशी मी माझ्या जिवलग सख्याच्या खांद्यावर निश्चिंतपणे विसावले.. त्या जागी मला विठ्ठल स्पर्शाची अनुभूती आली…

जयश्री जयंत श्रीखंडे
चिंचवड, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: