मुक्या

‘मुक्या’ असा फिरायला लागला की सारा गाव गोळा होई हमरस्त्यावर. दर चार पावलावर लोकं घोळका करीत अन् मग गावात गप्पांना ऊत येई.

हमरस्ता कसला न कसलं गाव. चांदबाच्या काळ्या कातळाखालची ही एक वाडी. शे-पाचशे उंबरा. कातळावरून पाणी पडे आनं मृग नक्षत्रात त्याचा झरा होई. पुजारीबुवांनी खण-नारळानं ओटी भरली की गावच्या शेतात हिरवं सोनं येई. गावाला सालभर पुरेल एव्हडं. कुणाचं पोट रिकाम राहाणार नाही आन पानात कुणाच्या उरणार नाही एव्हडंच.

तिथला हा मुक्या!!

जन्मला तेव्हा ह्यानं जोरात टाहो फोडला. इकडं ह्यानं पहिला स्वास घेतला आणि ह्याच्या बापानं शेवटचा. तेव्हापासनं आप्तेष्टांनी घर टाकलं. पुजारीबुवा मात्र नेहमी सांगत, “पोरं रडतं बाकी सुरात हो. वेळ चुकली ह्याची, बाकी त्याच्या बापाच्या घटका मोजून पाठवलेल्या श्रीहरीने.”

चांगला आठ-दहा वर्षाचा होईतो, मुक्या अभंग गाई. कुठलंस रस्त्यावरचं काहीतरी खायचं निमित्त झालं आन मुक्यानं भळाभळा रक्त ओकलं. आपल्याकडं धावणाऱ्या माईला बघून, हात हवेत झटकतं पोर ओरडलं. नुसतीच हवा आली आणि त्याच्या बरोबर लालभडकं रक्ताची शेवटची उमाळी. आवाज गेला तो कायमचा. वैद्य म्हणे स्वरयंत्र फाटलं ह्याचं. खरं तर त्या दिवशी नशिब फाटलं लेकराचं. मग सारं गाव त्याला मुक्या म्हणू लागलं. पुढं काहि वर्षानं लक्ष्मी पुजायच्या दिनी, ह्याची माय गेली. कातळारवचा झरा लाजेल एव्हडं रडलं लेकरू पण आवाज नाही. गावात सगळीकडे रोषणाई आणि ह्याच्या घरी दिवा विजला तो कायमचा.

गावात पडेल ते काम करून मुक्या वाढला. गावानेही आपलं लेकरू म्हणून वाढवला. पण ह्याची खरी लगबग चालू होई ती संक्रातीच्या आधी चार-पास दिवस. मुक्या वाढीव कामं करी. कुणाचं खळं सारव, कुणाचं छत सुधार, शेतातल्या बांधाला भर घालं. एक ना अनेक. वर्षानूवर्षाची घरं ठरलेली.

चारं पैसे जोडले की मुक्या पुजारीबुवांकडे जाई आणि ऐन उन्हाळयात त्यांना घेवून तालुक्याला. येताना दोनं पांढरे शुभ्र लेंगे आणि लांब संदरे घेवून येई. एरवी धुळीमातीनं मळलेल्या गुढग्यापर्यंतच्या धोतरावर तेव्हडीच मळकी बंडी घालणारा आपलासा वाटणारा मुक्या, ह्या अश्या स्वच्छ आवतारात फार परका गबाळा दिसे. पण मुक्याला त्याचं काही सोयर सुतकं नव्हतं.

काही दिवसं गावात मुक्या मग असाच फिरायचा. चांगले आठवडा-दोन आठवडे. हा असा फिरायला लागला की गावातलं सगळं वातावरणचं बदले.

तरुण पोरं मग तयारीला लागीत. गावात वर्गणी गोळा करत. गावच्या देवळाचं रंगकाम निघे. तुटलेल्या पायरीला भर पडे. चीरा बुजवल्या जात. दगडी खांब साफ होत. मुक्या नविन कापडं छान धुवून ठेवी. आणि एका रात्री गावकरी मु्क्याला हारतुरे देवून नविन चांगली शाल पांघरून त्याचा निरोप घेत. गावचं कुणीतरी मुक्याला वेशीपर्यंत सोडतसे आणि दरवर्षी मुक्या निघे. पंढरीला, पुन्हा त्याच्या माईला भेटायला.

वारीभर मुक्या नविन कापडात चाले. वारकऱ्यांच्या संगे नाचे, रिंगणामघ्ये माऊलींच्या अश्वामागे धावे. आणि येताना वारीच्या धुळीचा प्रसाद लागलेली नवी कापडं, शाल कोणा गरीबाला देवून पुन्हा गुढगाभर धोतरात-बंडीत गावात परते. गरिबाला नविन कापडं दिली की तो बुजतो पण माऊलीच्या प्रसादाला कोणी नाही म्हणतं नाही अशी श्रद्धा होती त्याची.

पण आता मुक्या थकला होता. कंठाखालच्या खड्यात बुक्का-अष्टगंध लावलं तरी हनुवटीपासूनचं कातडं सैल झालेलं लपत नव्हतं. अगदी वाकला नव्हता पण पडलेले खांदे आणि उतरलेली पाठ जाणवतं होती. एका दमात फर्लाँगभर जाणारा मुक्या आता विसाव्याला थांबायचा, स्वास घ्यायला.

मागल्या वर्षी मुक्यानं वारीचं सामान बांघलं पण धोतर-बंडी बरोबर घेतलीच नाही. माईची जुनी शाल मात्र जादाची घेतली होती. वारीची पताका नाही, तुळसं मात्र बरोबर होती. अष्टगंध मागचं सोडलं पण बुक्का थोडा जास्तीचा घेतला. अंधारलेल्या घराचं दार लावलं पण कोयंडा रिकामाचं ठेवला.

धुतलेली नविन गबाळी कापडं घालून मुक्या वारीला गेला तो परत आलाच नाही. ओठांवर ठेवायची तुळसं, मळवटाचा बुक्का आणि शेवटची पांघरायला माईची ऊब बरोबर घेवूनच तो गेला.

गावात शंभरीला टेकलेलं म्हातारं सांगत होतं, “पोरांनो त्याचं नाव मुक्या नाही रं. तुक्या आहे तुक्या”

बाकी गावमारी आणि रोगराई तुम्हा-आम्हाला. ह्यावर्षी वारी नाही पण तुक्याला त्याची गरजही नाही. भगवंतानं त्याची सोय मागल्या वर्षीच करून ठेवलेली, वैकुंठ वारीची!! पण गावच्या देवळाच्या पायरीला एक चीर पडली ती कायमची…..

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥

श्रीहरी!! श्रीहरी!! पांडुरंग!! पांडुरंग!!

अमित देशपांडे, पुणे.

सदर कथेला वारी या कथास्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: