आळंदी देवाची

उठवं अर्चे…

थोड्या टाईम मा उजाडस आते…

तढलोंग आंग धुई ले व्हय…

उठ जल्दी.. बाईच्या जात नं इतला टाईम झोपाउ नी.

          अंदाजे सकाळचे चार वाजले असतील. राधाक्का नुकतीच अंघोळ करून आली होती. तंबूच्या ताडपत्रीकडे तोंड करून ती तिची कामं करत होती. तिने साडीचा पदर दोन्ही खांद्यावरून घेऊन दातात दाबून धरला होता. म्हणूनच तिचे शब्द काही अर्चीला कळले नसावेत. पोलक्याची गुंडी लाऊन झाल्यावर राधाक्का वळली.  अर्ची उठून बसली होती.. पण अद्याप तिची झोपेची गुंगी उतरलेली नव्हती. अर्चीच्या जवळ जात राधाक्का तिला उठवू लागली.. राधाक्काच्या हाताचा थंडगार स्पर्श तिच्या गालाला झाला. 

– ‘उठं व माय.. आते थोडा टाईम मा बठ्ठा लोके उठी जातिन…

मंग आंघोय काई हुवाव नी.. जल्दी-जल्दी उकाव…’

          अर्ची उठून बिछान्याच्या घड्या करु लागली. तोच राधाक्कानं ते काम तिच्या हाताला झटका देत हिसकावून घेतलं…

– ‘तू व्हय… आंग धुई ले.. मी आवरंस हाइ.’ असं म्हणत राधाक्का गोधडीची घडी करू लागली.

बाजूच्या गाठोड्यातून आपल्या गरजेच्या वस्तू.. जसं, परकर पोलकं काढून अर्चीनं तंबू सोडला.

          सासूनं आपल्या सुनेला एवढं प्रेमानं वागवणं हे खरचं नवल करण्यासारखं! अर्चना राधाक्काच्या लहान भावाची मुलगी. भावाचा शेवटचा शब्द म्हणून तिनं अर्चीला सून करून घेतलं होतं. राधाक्का साठी अर्ची तिच्या मुलीसारखीच होती.

          आळंदीत रस्त्याच्या कडेला लागलेल्या असंख्य त्रिकोणी घरांपैकी एका तंबूत हे संभाषण सुरू होतं. खानदेशातून निघालेली मुक्ताबाईची पालखी आळंदीत दाखल व्हायला अजून दोन दिवस बाकी होते. दरवर्षी राधाक्का मुक्ताईच्या पालखीसोबतच चालत असे. पण यावर्षी काहीतरी धंदापानी करु, थोडी कमाई होईल; या हेतूने आपलं छोटंसं बिढ्यार घेऊन लेकाच्या मालवाहू रिक्षातून तिने आळंदी गाठली होती.

– ‘निल्याव…

ओ निल्या..’ जीभाऊचा आवाज आला…

तंबूचा पडदा वर करुन राधाक्का तंबूच्या बाहेर येत म्हणाली. जीभाऊ.. यी गया का तू..!

– ‘आक्का निल्या शे का..?’

– ‘आमना निल्या मधमा जपेल शे अजून..’

– ‘आक्का.. असं चालावं नी. थांब मी उठाळस त्याले.’ म्हणत जीभाऊ तंबूत शिरला..

– ‘निल्याव… भाडखाऊ अजून कितला जपशी..?’ म्हणत तो त्याला उठवू लागला. दातून म्हणून जवळच्याच एका कडूलिंबाच्या झाडाची बारीक काडी त्यानं तोडून आणली होती. त्यानं सपकन त्या काडीनं निल्याला मारलं…

– ‘तुनी बय ना निल्या’

  ‘उठतू का… का आंखो ठी द्यू येक…’

– ‘इसSSSSSSS…’ करत निल्या उठून मांडी चोळू लागला..

– ‘बय ना जीभाऊ.. असं उठवतंस का..?’ निल्या म्हटला.

– ‘आरं येडा ****. इतला टाईम जपतंस का मंग…!!? हाइ ले, म्हणत जीभाऊ नं ती काडी निल्याच्या  हातात दिली.

– ‘तुमनं हुई गय का जीभाऊ..?’

– ‘मन्ह झायं.. तू तुन्ह देख. आन… जल्दी आवरी ले.. मी येस थोडा टाईम मा..’ म्हणत जीभाऊ तिथून निघून गेला..

          डोक्स फिरी गय का तुनं.. अर्चीचा हात धरून राधाक्कानं रागा-रागात तिला तंबूत आणलं.. आणि मोठ्याने बोलली.. आपलं काय चुकलंय हे अजून अर्चीला कळालं नव्हतं,  साडीच्या पदराच्या टोकाला बोटाभोवती गुंडाळत खाली मान घालून अर्ची बोलली.

– ‘आत्या… का…य झाssयं..?’

– ‘तुले कोन्ह सांगं डोक्स धुवाले..?’ आपल्या डोक्यावर लावलेला हात अर्चीकडे करतं राधाक्का म्हणाली. आता तिचा स्वर वाढला होता. आणि रागही…

– ‘जित्ला तुना लड कराउ.. तित्ली हिड्गापना करी रायनी तू आते… बठ्ठा लोके देखतंस… आते तुना हातना च्या-नाश्ता कोन खाई ..?’

– ‘आवं… मनी माय.. बाईच्या जात ना धरम रहास हाऊ… बठ्ठा लोकस ले मालूम शे… काई हुवाव नी.. तू कशापाहीन बोली रायनी…? दातून तोंडातून काढत न थुंकताच मान वर करुन निल्या बोलला. त्याच्या गुळगुळीत शब्दांची राधक्कला किळस वाटली. तसे भाव तिच्या चेहर्‍यावर दिसत होते.

– ‘हा.. भल्ता माय ले धरम शिकाळी रायना… आठे वारीले काई मोठा मोठा शेहरातले लोके नी येतस… आनी बठ्ठा लोके आपला आपला धरम पाळतस… तुले समजाउ नी… तू नादान शे बारे…’

– ‘काय समजाव नी मल्हे…’ तोंडातली थुंकी थुंकत निल्या बोलला.

– ‘तू नको मधमा चभर-चभर करु.. तुन्ह- तुन्ह देख… आंग धुई ले जाय… धरम रहास म्हने..’

– ‘बय ना तमासा सकाय सकाय.’ म्हणत आपली अंघोळीची कापडं घेऊन निल्या तंबूतून बाहेर पडला…

– ‘बाई… दोन चहा देती का..?’ समोरच्या खुर्चीवर डोक्यावरचं लहानसं तुळशी वृंदावन ठेऊन एक बाई बोलली. डोक्यावरुन तुळशीला असं खाली उतरवू नये.. अशाने पाप लागतं.. आणि तुळस अशी खाली ठेवल्याने काही पाप वगैरे लागत नाही यावर त्या दोघं बायकांची चर्चा सुरु होती. मधेच एकीचं लक्ष अर्ची कडे गेलं. आणि लगेच ती दुसऱ्या बाईच्या कानात काहितरी बोलली.

– ‘राहू दे बाई… आमाला पापात पाडती का काय..?’ म्हणत तिने खुर्चीवरची तुळस उचलून पुन्हा डोक्यावर घेतली. आणि त्या दोघही बायका पुढे निघून गेल्या.

          त्यांचं बोलणं ऐकून अर्चीचा चेहरा पडला. तिनं निल्याकडे पाहिलं. पण त्याचं इकडे लक्ष नव्हतं तो पोह्यांचं गिर्हाईक करण्यात व्यस्त होता. तोच अर्चीचं लक्ष राधाक्का कडे गेलं. ती हा सगळा प्रकार बघतच होती. खाली मान घालत कपात गाळलेला चहा अर्चीनं पुन्हा पातेल्यात ओतून दिला…

– ‘ताई…एक कटिंग द्या ना…’

समोरुन आवाज आला. अर्ची थबकली… चहाचा कप भरावा की नाही तिला काही कळेनासं झालं. 

– ‘आत्या… हाइ गिर्हाइक करशात का..?’ तिनं राधाक्काला आवाज दिला. 

राधाक्का पोह्यांची खरकटी भांडी धूत होती.

– ‘उनू..’ राधाक्का बोलली.

राधाक्का उठून येणार तोवर समोरचा माणूस म्हटला… ‘ताई… तुम्हीच द्या की… उगाच आजीबाईंना कशाला त्रास..!!’

त्याला काही कळावं म्हणून अर्चीनं ओल्या केसांना गुंडाळलेल्या रुमालाला हात लावला. 

त्या माणसाचे शब्द ऐकून राधाक्का परत खाली बसून अर्चीकडे सघत राहीली..

– ‘देताय ना…!?’ माणूस म्हटला.

अर्चीनं पुन्हा राधाक्का कडे पाहिलं. राधाक्कानं मान हलवत तिला चहा गाळ म्हणून इशारा केला.

अर्चीनं चहा गाळला.

– ‘एक गरम पण द्या.’ तो माणूस म्हणाला.

– ‘च्या गरमच आहे की.’

– ‘चहा नाही… गरम.. सिगरेट सिगरेट…’

– ‘न्हाई. आम्ही सिगरेट न्हाई ठेवत.’ असं बोलत अर्चीनं चहाचा कप त्याच्या हातात दिला. थोडा वेळ ती त्याच्या गळ्यातल्या कॅमेऱ्याकडे बघत राहिली.

          चहा पिऊन झाल्यावर त्या माणसानं सुटा पाचचा डॉलर समोरच असलेल्या बिस्कीटच्या बरणीवर ठेवला.. आणि पुढे काहीही न बोलतातसाच निघून गेला… त्याची पाठमोरी आकृती थोड्या वेळातच गर्दीचा भाग झाली.. पण अर्चीचं त्याकडे लक्ष नव्हतं.

तो ज्या रस्त्याने चालत इथवर आला होता. अर्ची त्या रस्त्याकडे बघत होती.

“हा माणूस ज्या गावाचा आहे. ते गाव जर माझं माहेर किंवा सासर असतं… तर किती बरं झालं असतं.” कदाचित् हाच विचार तिच्या मनात आला असावा….

भूषण अहीर, जळगांव.

सदर कथेला वारी या कथा स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: