आंघोळ

सलग आठ दिवस मला एका निनावी नंबरवरून फोन येत होता. अशा निनावी फोनचा स्वीकार करणे हल्ली मी सोडून दिले होते. आज मात्र त्याच नंबरवरून मला पाच मिसकॉल आले. एकदाचं कोण बोलतेय ते पाहावे या विचाराने मी फोन केला.

“हैलो, कोण बोलतेय?”

तिकडून आवाज आला,

“मी…सुनीता बोलतेय! विनयची पत्नी!”

एका क्षणात मी नॉर्मल झालो.

“बोला ना वहिनी.”

तिकडून रडवेल्या स्वरात त्या म्हणाल्या,

“अहो, आठ दिवस झाले मी रोज फोन करतेय तुम्हाला; पण तुम्ही फोनच घेत नव्हता. तुमच्या मित्राला पॅरॅलिसिसचा अटॅक आलाय! हॉस्पिटलमध्ये होते. आजच घरी आणलंय. तुमची सारखी आठवण काढतात ते!”

असे म्हणत त्या रडू लागल्या. माझ्यासाठी हे सर्व शॉकिंग होते. मी सद्गदित होऊन म्हणालो,

“वहिनी, मी निघालोय… येतोय!”

असे म्हणत फोन ठेवला.
मी दम काढलाच नाही. आहे त्या कपड्यावर निघालो. ऍक्टिव्हा स्टार्ट केली. गाडी वेगाने धावत होती; पण त्याहून वेगाने माझे मन धावत होते.
जिवाभावाचा मित्र माझा विन्या. पन्नास वर्षांची दोस्ती. वयाच्या अकरा वर्षांपासूनची. किती किती आठवणी आमच्या. त्या काळात शाळेला बुट्टी मारून आम्ही सिनेमाला जायचो. सिनेमाच्या वेडाने आम्ही पुरते वेडावलो होतो. सिनेमा पाहायचा तर पैसे हवेत, मग थातूरमातूर सांगून आईकडून पैसे घ्यायचो. राजकपूर, देवानंद, दिलीपकुमार, शम्मी, जितेंद्र, राजेश, धर्मेंद्र यांचे चित्रपट सकाळच्या मॅटिनीला कमी तिकीट दरात पाहत होतो. रेल्वेने विदाऊट तिकीट प्रवास करायचो. पायी फिरायचो त्या सिनेमा वेडापायी. फेब्रुवारी महिना आला की जागे व्हायचो. मग फक्त अभ्यास. उत्तम मार्कांनी एस.एस.सी. झालो. वाडिया कॉलेजला गेलो. आणखी मित्र मिळाले. सिनेमाचा सिलसिला चालूच राहिला. घरची परिस्थिती आमच्या दोघांची बेताची. तशात विन्याला एका कंपनीत नोकरी मिळाली अन् त्याने कॉलेज सोडले. मीही कॉलेज सोडले अन् आय.टी.आय.ला गेलो. एन.सी.टी.व्ही.टी.ची परीक्षा दिली. मलाही नोकरी लागली. आधी त्याचे लग्न झाले नंतर वर्षभराने माझे. त्याला मुलगा झाला अन् मी आंगडे, टोपडे, पायातले घेऊन गेलो. त्यावेळचा तो शोलेतला डायलॉग त्याने मला ऐकवला होता. धर्मेंद्र अमिताभला म्हणतो,

“मेरे बच्चे तात्या तात्या कहके तुझे बुलाऐंगे…”

झालेही तसेच. त्याची छोटी मुले मला काकाच म्हणायची. मीही खूप प्रेम दिले त्याच्या मुलांना. काळ काय कोणासाठी थांबतो थोडाच. विन्याची नोकरी माझ्या आधीच गेली. तो काम करीत असलेले प्रॉडेक्शन बंद झाले; पण त्याने हार मानली नाही. आपल्या वडिलांचा मान राखत आपली नोकरीची सारी पुंजी घर बांधण्यात खर्च केली त्याने. त्या शहरी घराचे तीन हिस्से झाले पुढे. त्याचे दोन भाऊ विभक्त झाले. ते एक ना एक दिवस होणारच होते. दोन मुलींची लग्नं केली विन्याने. मुलाचे लग्न केले. एक नोकरी गेलेल्या माणसाने आणिक काय करावे?
एक दिवस आला पेढे घेऊन माझ्याकडे,

“सुऱ्या, नात झाली मला!”

मी म्हणालो,

“अरे, नात झाली अन् पेढे?”

यावर हसून म्हणाला,

“बेटी धनकी पेटी है…”

विन्या थांबला नाही. नोकरी करत राहिला. सिक्युरिटी गार्ड म्हणून कित्येक वर्षे काम करून संसाराला हातभार लावीत राहिला. या दरम्यान त्याला मधुमेह झाला. गोळ्या, औषधे खाऊन काम करायचा; पण काम सोडले नाही. मधुमेह बळावत राहिला. डोळे काम करेनासे झाले. मला तो यातले काही सांगत नव्हता कधीच. मी एकदा त्याला सलमान खानच्या पिक्चरला घेऊन गेलो. सिनेमा सुटल्यावर त्याला म्हणालो,

“लई भारी पिक्चर होता ना विन्या?”

यावर तो म्हणाला,

“सुरेश, अरे आता पहिले दिवस राहिले नाहीत… तुझी इच्छा मोडायची नाही म्हणून मी आलो सिनेमाला. मला तर चित्र अस्पष्ट दिसत होते!”

मी अवाक् झालो.

“काय??”

म्हणून ओरडलो.

“अरे, काही होतेय तर डॉक्टरकडे जा…”

म्हणालो.

“अरे, कुठून जाऊ डॉक्टरकडे? पोरगा अन् सून यांच्या स्वाधीन मी. प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. पेन्शन मिळतेय पाचशे रुपये. दवाखान्याचा खर्च करायचा तर त्यांचीच ओढाताण!”

त्याने मनातली गोष्ट सांगितली.

“अरे, मी करतो मदत!”

तर गालात हसत म्हणाला,

“चल मला घरी सोड!”

कधी मला विन्याचा मुलगा रमेश फोन करायचा. बापाच्या अन् आईच्या तक्रारी सांगायचा. कधी विन्या त्याची बाजू सांगायचा. खूप समजावले त्यांना पण व्हायचे तेच झाले…
अचानक एक दिवस विन्याचा फोन आला.

“सुरेश, अरे, माझा रमेश घर सोडून गेला…”

त्याचा सद्गदित आवाज ऐकून मन हेलावले. सुन्न झाले.
विचारांची माझी गाडी विन्याच्या घराजवळ येऊन थांबली. मी घरात गेलो. सगळं घर कसं अस्ताव्यस्त झालेलं. एका खाटेवर तो पडलेला. गोटीवाणी दिसणारा विन्या पार खारकेसारखा झालेला. दाढी वाढलेली, मधुमेहामुळे मुखातले दात पडलेले. माझ्याच वयाचा माझा मित्र अशा अवस्थेत पाहून नकळत माझे डोळे पाणावले.

“सुरेश, तुझी खूप आठवण काढली रे मी दवाखान्यात असताना! अरे, किती वेळा फोन केला हिने…”

खूप प्रेमाने माझ्यकडे तो पाहत होता. जणू युगानंतर भेट झाली असा.

“अरे, तुमच्या दोघांत एकच फोन आहे माहीत आहे मला पण नंबर बदलला वाटते तुमचा… त्यामुळे थोडा घोळ झाला.”

त्याच्या डोक्यावर हलकाच हात फिरवित मी म्हणालो.
वहिनी सांगत होत्या,

“अहो, पॅरॅलिसिस झाल्याने यांचा डावा हात हलत नाही, पाय हलत नाही. आमचा रमेश सकाळी एकदा येऊन जातो. यांचे शरीर जड झालेय, मला डायफर बदलता येत नाही. मुलगा वेगळा राहतो, चार पैसे देत नाही म्हणून हल्ली मी कामाला जात होते तेही यांच्या आजारपणामुळे बंद झाले.”

या कठीण प्रसंगातही वहिनींनी चहाचा कप माझ्या हाती देत भावुक होऊन सांगितले.

“अहो, मग इथेच राहणाऱ्या दिरांची मदत घ्यायची!”

मी म्हणालो.

“अहो, कोणी कोणाचे नाही. ते सर्व सकाळीच कामाला जातात. मलाच सगळे करावे लागते.”

वहिनी आपल्या नवऱ्याकडे पाहात म्हणाल्या.

“रमेश काय करतो मग?”

मी रागावून अन् न राहवून बोललो.
वहिनी रडून सांगत होत्या…

“सून नवऱ्याला सांगते. तिथे जास्त जाऊ नका. आत्ताच आपल्याला बाळ झालेय. त्याला इन्फेक्शन होईल…
तो येतो लांबून बोलतो, उपकार केल्याप्रमाणे गोळ्या आणून देतो अन् निघून जातो. जिथे घर घेऊन राहतो तिथे गेल्यावर सून माझ्या मुलाला बाहेरच आंघोळीला पाणी देते…”

बाप मरणासन्न अवस्थेत अन् पोरगा आधीपासून आंघोळ करतो हे ऐकून माझ्याच डोळ्यांनी मला आंघोळ घातली…
मी निघताना हजार रुपये वहिनींच्या हाती दिले. काहीतरी हरवलंय या भावनेने खूप खिन्न आणि सुन्न होऊन घरी आलो. दोन दिवसांनी पुन्हा वहिनींचा फोन आला. त्या सांगत होत्या,

“अहो, आज पंधरा दिवस झाले यांना आंघोळ घातली नाही म्हणून मी रमेशला फोन केला तर येतो म्हणाला. मी पाणी गरम करून ठेवले तर आलाच नाही.”

“वहिनी, उद्या सकाळी दहा वाजता मी येतो. पाणी गरम करून ठेवा!”

असे म्हणत मी फोन ठेवला.
मी साबण लावून माझ्या मित्राला आंघोळ घालीत होतो. माणूस गेल्यावर घरातले सारे शेवटची आंघोळ घालतात तेव्हा त्या देहाला काय कळते कोण काय करतेय ते. जिवंत माणसाला आंघोळ घालण्याचे आत्मिक समाधान मी अनुभवत होतो…

सुरेश मुरलीधर कंक
सांगवी, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: