शंकर

शंकर तसा चुणचुणीत मुलगा, जरा वयाने मोठा वाटणारा, थोराड असा. शंकर आणि त्याची बहीण खटी यांनी एकाच दिवशी एकाच वर्गात प्रवेश घेतला. मला जरा आश्चर्यच वाटलं. इयत्ता पहिलीमध्ये बसताना त्याला जरा अवघडच वाटत होते. सुरुवातीला दांडी मारणे, घरी राहणे, शेतात अथवा गावात भटकत राहणे हे उद्योग तो आरामात करीत असे. फारच कंटाळा आला तर जवळच्या गावात, शेतात, झाडांवरून चिंचा, बोरं असे खिशात भरून शाळेत येत असे. मी रागावले तर तर गाभुळलेली चिंच, टपोरी बोरं असे काहीतरी काढून दाखवत असे.
“मॅडम, तुमच्यासाठी तोडून आणले आहेत म्हणून वेळ लागला. एवढी चिंच खाऊन पहा मॅडम!”
असा आग्रह करून ओशाळवाणे हसत तो चिंच पुढे करत असे. एक-दोनदा रागावून मी चिंच नाकारली.
“हे असले काही आणायचे नाही. तुझ्या आईला घेऊन ये. मगच तुला वर्गात बसू देईल!”
असे खणकावल्यावर मात्र त्याचा चेहरा खूप उतरला होता. चिंच हातात धरून तो खाली मान घालून तसाच उभा राहिला. वर्ग एकदम शांत झाला. मलाही कसेसेच वाटले.
“काय छान चिंच आहे रे! दे बघू इकडे; आणि बस खाली.”
मी वातावरणात मोकळेपणा आणण्याचा प्रयत्न केला; पण त्या दिवशी ती दोघं भावंडे हसलीच नाहीत. काहीतरी खूपच बिनसले होते खास.
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेतून परवानगी घेऊन शंकर शेतात गेला. झालेला बदल पाहून मला समाधान वाटले. संध्याकाळी एस.टी.ची वाट पाहत मी बसले असताना शंकर पळतच आला. त्याला धाप लागली होती. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला तसा म्हणाला,
“मला वाटले तुमची गाडी येऊन गेली असणार म्हणून मी पळतच आलो. तुमच्या करता ही गोड बोरं आणली आहेत!”
त्याचा प्रेमळ रानमेवा मी नाकारू शकले नाही. त्या दिवशी माझी गाडी निघेपर्यंत शंकर थांबला होता. मला सारखे वाटत होते, की त्याला मला काही सांगायचे होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आलेल्या शंकरला मी मधल्या सुट्टीत थांबवून घेतले; पण शाळेच्या इतर कामात मला विचारायचा विसर पडला. तो जरा नाराजच वाटत होता. शाळा सुटल्यावर तो फाट्यावर माझ्यासोबत आला. त्यावेळी गावाकडून परत जाणारी मी एकटीच असे. गाडी आली की मुले माझी पर्स, छत्री, डबा घेऊन फाट्यावर जात. कधीकधी मला पळतच जाऊन गाडी पकडावी लागे. त्या निसर्गरम्य वातावरणात मन फुलण्याऐवजी अनामिक भयाने व्यापून जात असे; कारण तेव्हा शेतकऱ्यांची दारू पिण्याची वेळ झालेली असे; पण शाळेतील चिमुकल्यांनी मला कधीच एकटे पडू दिले नाही. जणू काही माझे मायबापच होते ते! त्या क्षणी ते माझ्या पालकाचीच भूमिका बजावत असत, हे त्यांच्या गावीही नसेल. फाट्यावरील टेकडीवजा खडकावर मी गावी जाणारी एकटी अन् सोबत दहा-वीस मुलं हा सगळ्यांचा मजेचा विषय होता. त्यांच्या ‘टाटा’ करण्याने तो शांत आसमंत दणाणून जात असे. आजही आठवले, की मन भरून येते. त्यांचे ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. तो जगन्नियंता कोणाच्या ना कोणाच्या रूपातून मदतीला धावत असतो हे मात्र खरे!आज शंकर काहीसा अबोल वाटत होता. त्याला बोलका करत मी त्याच्याशी गप्पा मारू लागले. तेव्हा तो मला म्हणाला,
“मॅडम, पुन्हा माझ्या आईला शाळेत बोलावू नका; कारण ती कधीच शाळेत येणार नाही!”
एवढे म्हणून तो रडू लागला. थोडा शांत झाल्यावर तो म्हणाला,
“मॅडम, माझ्या आईने दुसरा घरोबा केला आहे. आम्हाला फक्त वडीलच सांभाळतात. तेच भाकरी करतात. मी भांडी घासतो. खटी धुणे धुते. शेजारी वडिलांची काकू राहते. ती एखाद्या वेळी जेवण देते!”
तो काहीसा अबोल झाला. तेवढ्यात माझी गाडी आली.
काही दिवसांनी स्नेहसंमेलन आले. दोघा भावंडांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिवस भराभर जात होते. एके दिवशी पुन्हा एकदा न सांगता दोन्ही भावंडे गैरहजर राहिली. तपास केला तेव्हा गावी गेल्याचे कळले.
एक महिना लोटल्यानंतर शंकर शाळेत आला. मी काही बोलणार इतक्यात तोच म्हणाला,
“मॅडम, मी आता शाळा सोडून जाणार आहे. माझ्या वडिलांनी लग्न केले आहे. नवी आई आम्हाला वागवायचे नाही म्हणते. माझे वडील खूप मेहनत करतात. आम्हाला काकूंकडे सोडले आहे. तिला पैसे पाठवणार आहेत. काकूंनी मला एका घरी दिवसभर काम करायला ठेवले आहे. खटी काकूंसोबत धुणीभांडी करायला जाणार आहे.” असे म्हणत तो रडायला लागला. मी त्याच्या काकूला बोलावले. खूप समजावले.
काही दिवस तो शाळेत आला. एके दिवशी मधल्या सुट्टीत मुले म्हणाली,
“मॅडम, शंकरची भाकरी मांजर खाऊन गेली. त्याने आमच्या घरी जेवण केले.” ऐकून जरा विचित्र वाटले. मग मी डबा जास्त प्रमाणात आणायला लागले. काही दिवसांनी सुट्टी लागली. सुट्टी संपल्यावर शंकर शाळेत आलाच नाही. त्याची काकूसुद्धा गाव सोडून गेल्याचे कळाले. शंकर मात्र गावातील ज्या माणसाकडे कामाला होता त्याच्या बरोबर ऊस तोडणीच्या कामाला निघून गेला होता. आता कसली शाळा अन् कसले काय? आईवडील असतांनाही पोरक्या झालेल्या या भावंडांची शाळा कुठेच हरवून गेली होती. पुढे त्यांच्या नशिबात नियतीने कोणते ताट वाढले होते ते देवच जाणे. या सगळ्याकडे हताशपणे बघण्यापलीकडे माझ्या हाती काहीच राहिले नव्हते. अशा निरागस कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातात, मात्र हे दाहक वास्तव आहे.

भावना मुळे, जळगाव.
९४२३४६८६१३

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: