मोकळा श्वास

हसता खेळता, विनोदी, मस्तीखोर स्वभाव असणारी शालिनी लग्न झाल्यावर अगदीच शांत झाली. तिचा मोकळा स्वभाव अगदी बुजून गेला. चेहऱ्यावरचे हास्य मावळून गेले. पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा आईने विचारले,
” का ग, तुला काही त्रास तर नाही ना?” तिला भरून आले. पण पुढच्याच मिनिटात तिचे वडिल, दादा म्हणाले,
” अग, काय त्रास असणार आहे तिला? एवढा चांगला सासर मिळालय तिला. सगळे कमवतात, घरकामाला बाई आहे.सगळे घरातले उच्चशिक्षित, आणि त्यांना मुलगीही नाही, हिचे लाडच होत असणार” शालिनीने आवंढा गिळला. ती फक्त हसली.
तिच्या डोळ्यासमोरून सगळे एका चित्र येऊ लागले. एक वर्षच झाले होते लग्नाला. शालिनी आणि अक्षय दोघेही इंजिनीरिंग करून चांगल्या कंपनीत नोकरी करत होते. दोघांचे ठरवून झालेले लग्न. शालिनीच्या वडिलांना अक्षयची माहिती एका वधुवर सूचक मंडळात मिळाली. दोन्ही मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. शालिनीला एक भाऊ तर अक्षयला ही एक धाकटा भाऊ. बघण्याचा कार्यक्रम छान झाला. शालिनीला फार काही कोणी काही प्रश्न विचारलेच नाहीत. फक्त एक प्रश्न सासूबाईंनी विचारला की “स्वयंपाक येतो का?”
शालिनीने प्रांजळ पणे कबूल केले, “सगळे पदार्थ नाही जमत, पण वरणभात छान करता येतो” सगळे हसले.
शालिनीची आई शालिनीची बाजू मांडत म्हणाली, “अहो यांचं कॉलेज इतकं वेळ असायच, आजकालच्या मुलींना सगळं जमणं अवघडच आहे. जसं कॉलेज संपलं तसं नोकरीला सकाळीं गेल्या की रात्रीच येणार…पण शिकेल हो ती, तशी हुशार आहे खूप” सासूबाईंनी हसल्यासारखं केलं.
अक्षय तर खुश होता कारण दोघांना वाचायची खूप आवड होती आणि शालिनी तर लिहायची सुद्धा. त्याच्या मनाने कधीच होकार दिला होता. शालिनीला अक्षय मनापासून आवडला होता. पाहायचा कार्यक्रम झाला आणि आठवड्याभरात होकर आला. शालिनीचे दादा खूप खुश झाले. एकाच शहरात राहणार मुलगी, घरही अगदी चांगले आहे, सगळे शांत आणि समंजस वाटले.
आई शालिनीच्या मागे लागली ” स्वयंपाक शिकून घे बाई, तुझ्या सासूबाईंनी आवर्जून विचारले” शालिनी हसून आईला म्हणाली, ” आई चिल मार, येतं सगळं मला,आणि त्यांच्याकडे स्वयंपाकिण बाई आहे ना”.
तितक्यात शालिनीचा भाऊ म्हणाला, ” ताई, त्या बाईला काढून टाकतील तू गेल्यावर”
शालिनी चिडली, ” मी काय बाई म्हणून जाणार आहे का?” तो जोरजोरात हसू लागला.
लग्नाची तयारी सुरूच झाली, शालीनीच्या दादांनी लग्नाचा खर्च करायचा ठरला. वडील, भाऊ, काका, मामा सर्व मिळून लग्नाची तयारी करू लागले. आणि शालिनीला आदर्श सून कसे व्हायचे याची शिकवणी येणाऱ्या जाणाऱ्याकडून मिळू लागली. शालिनीला प्रश्न पडायचा मी लग्न करतेय का ? युद्धावर?
यथासांग लग्न पार पडले. असंख्य संसाराची स्वप्न आणि आकांक्षा मनात ठेवून शालिनीने अक्षयच्या घरात पाऊल टाकले. पूजा होईपर्यंत शालिनीची बहीण पाठराखण म्हणून होती. पण जशी ती गेली. शालिनीला खूप रडू आले. अक्षय ने तिला समजावले. तिला खूप आनंद झाला की इतका समजूतदार पती लाभलाय याचा. दोघेही हनिमून ला दोन दिवसात निघणार होते, तेव्हा तिला कळले की सासू, सासरे दिरही दुसऱ्या ठिकाणी फिरायला निघालेत. अक्षयला आणि शालिनीला आनंदच झाला, नवीन जोडप्याला एकांत मिळाला. हनिमूनचे गोडगुलाबी दिवस संपले आणि अक्षय, शालिनी घरी पोहोचले. घरचे अजून आले नव्हते ते त्या रात्रीच पोहोचणार होते. शालिनी ने लगेच आवरून सगळ्यांसाठी स्वयंपाक केला. घरी पोहोचल्यावर तिला वाटले छान गप्पा होतील, पण सासरचे येऊन भराभर आवरायला लागले, शालिनीला वाटले दमले असतील. तिने पानं करू का म्हणून विचारले. सासूबाई स्वयंपाकघरात जाऊन म्हणाल्या, बापरे, इतक्या जाड पोळ्या??, आणि हे काय इतकी साधी भाजी? कोण खाणार?” तिने अक्षयला लगेच हॉटेल मधून पार्सल आणायला फर्मावले आणि शालिनीचा स्वयंपाक तसाच पडून राहिला. आणि दुसऱ्या सकाळी कचरेवाल्याला दिला गेला. कोणी शालिनीला काही बोलले नाही. शालिनीला भीतीच वाटली.
पुढचे दोन दिवस सगळे घरातच होते. पण कोणी ट्रिप बद्दल काहीच बोलले नाही. शालिनीला विचारले ही नाही की ट्रिप कशी झाली. पहाटे सगळे उठायचे, चहा पाणी उरकल्यावर स्वयंपाकवली बाई यायची ती भराभर दोन वेळेचा स्वयंपाक उरकून निघून जायची, ज्यांना जशी वेळ मिळेल तसे जेवायचे. पंगत नाही ,बोलणे नाही. टीव्ही चा आवाज मात्र दिवसभर चालायचा. खाऊन झाले की झोपायचे. टीव्हीच्या आवाजाने शालिनीचे डोके दुखायला लागायचे, तिला कधी ऑफिस सुरु होईल असे झाले होते.
शालिनीचे ऑफिस लांब होते ती दोन बस बदलून ऑफिसला जायची. अक्षय त्याच्या बाईक वर जायचा. तर त्याचा भाऊ घराजवळच्या ऑफिसला स्कुटीवर जायचा जे चालण्याच्या 10 मिनीटावर होते. शालिनीला महिन्याभरात दमून गेली दोन बस गर्दीत बदलताना, परत ऑफिसात ही खूप काम असायचे. तिने एकदा सुचवले की जर तिला स्कुटी मिळाली तर तिला बरंच सोपं जाईल. पण कोणी काहीच बोलले नाही. आणि तिला स्कुटी ही दिली नाही. तीची बसची धडपड सुरू राहिली. एक दिवस संध्याकाळी तिला बसच मिळेना. खूप उशीर झाला. अक्षयला मोबाईल लागत नव्हता, ती वैतागली. शेवटी रिक्षा मिळाली आणि कशीबशी ती घरी पोहोचली. घरी आल्यावर तिला उशीर का झाला म्हणून कोणी काही विचारले नाही, ना कोणी काळजी केली. ती आली तेव्हा सर्व टीव्ही बघत होते अक्षय ही यायचा होता. ती तशीच आवरून झोपी गेली तिला खूप रडू आले. अक्षय आला तेव्हा सासूबाई म्हणाल्या,
” तुला तरी जेवायचे आहे का? जेवायचं नसेल तर आधी सांगत जा, मी बाईला कमी स्वयंपाक करायला सांगत जाईल” अक्षय निमूट जेवला व शालिनीला झोपलेले पाहून तो ही झोपी गेला.
असेच दिवस, महिने जात होते, शालिनी ला स्वयंपाकघरात चहा दूध सोडून काही करायला मिळायचे नाही.कारण बाई सगळं करून जायची सासूबाईना ही आवडायचे नाही. शालिनीला समजायचे नाही काय करायचं? कसं करायचं? कोणी काही चांगलं ही बोलायच नाही आणि वाईट ही बोलायचं नाही. कोंडी व्हायची तिची.अक्षय आला की थोड्या गप्पा व्हायच्या पण शालिनी तिची घुसमट त्याला सांगत नसे कारण त्या दोघांच्यात वाद नकोत, फार कमी वेळ मिळायचा दोघांना मग कशाला खराब करायचा म्हणून ती शांतच बसे.
शालिनीला स्वतःचा न्यूनगंड यायला लागला. घरी मी कोणालाच आवडत नाही का? काही चुकलंय का माझं? कोणी काही बोलत का नाही? ते हसत तर नसतील ना मला? मी गप्पा मारायला काही विषय काढला तर ते बोलायच्या मूड मध्ये नसतातच. कोणी घरी येत नाही ,जात नाही. शेजाऱ्यांशीही फार चांगले संबंध नाही कोणाचे. अख्ख कुटंब दिवसा ऑफिस आणि घरी आले की टीव्ही, किंवा पेपर, किंवा फक्त पडून राहायचे. भूक लागली की बाईने केलेला स्वयंपाक घेऊन स्वतः जेवण उरकून घ्यायचे. बाकी भांडी, झाडू, पुसायला, कपड्यांना ही बाई होतीच. कोणाचेही कोणावाचून अडायचे नाही. शालिनीला फार विचीत्र वाटे, सतत काही करताना दबाव असायचा, आपण काही चुकीचे तर नाही वागताना याचा तणाव.
शालिनीच्या मैत्रिणी किती दिवस मागे लागल्या होत्या. तुझ्या नवीन घरी बोलावं की आम्हाला. पण शालिनीला कळायचे नाही घरी आवडेल का? तिने धीर गोळा करून एकदा दिरालाच विचारलं तर तो म्हणाला आम्ही नेहमी मित्राला बाहेरच्या बाहेरच भेटतो, जेवायला हॉटेलला नेतो. आईला घरी पसारा आवडत नाही. शालिनीला जे उत्तर मिळायचे ते मिळाले. ती नेहमीप्रमाणे शांत झाली. अक्षयला कधी आडून आडून ती विचारायची की तुम्ही घरात एकमेकांशी।मोकळं बोलत का नाही? काम असल्याशिवाय तुमच्यात संवाद फारसा नसतोच. तर तो म्हणाला की सगळे शांत स्वभावाचे आहेत, होईल तुला सवय. शालिनी काय बोलणार मग ? शांत स्वभाव असा ? तिनेही स्वतःला शांत केले. शालिनी खूप बदलून गेली. मूळ स्वभाव असा नसल्याने तिच्या तब्येतीवरी परिणाम होऊ लागला. वर्षभरात वजन 8 किलोने कमी झाले. खायला प्यायला काही कमी नव्हते. सगळी कामे परस्पर होऊन जायची. तिला कधीही काही विचारले जायचे नाही.
पहिली दिवाळी आली, शेजारीपाजारी फराळाचा सुगंध येऊ लागला. शालिनीला वाटले निदान दिवाळी फराळ तरी एकत्र करूयात. मज्जा येईल. सगळ्यांना सुट्टीच आहे भरपूर वेळही आहे. ती सर्व सामान घेऊन आली. सोप्या शंकरपाळी पासून सुरुवात करावी हा विचार केला. सासूबाई बाहेर गेल्या होत्या, तर सासरे झोपले होते. शालिनी रेसिपी बघून शंकरपाळ्या करत होती. तिने तळायला ही घेतले. थोड्यावेळात सासूबाई आल्या, शालिनीचं काम बघून म्हणल्या, बापरे किती तेलाचा वास येतोय, स्वयंपाकवली आली की तिच्या हाताखाली कर ना तू तुला पाहीजे. तिला सगळे माहितेय. अशा शंकरपाळ्या फार आवडणार नाही कोणाला. मी आता आम्हाला आवडणाऱ्या फराळाची ऑर्डर देऊन आलीये. तू सांगायचस शंकरपाळी आवडते तुला मी अजून ऑर्डर केली असती.
” शालिनीचा उत्साह तिथल्यातिथे मावळला. तिला विचारलेच नव्हते की तुला कोणता फराळ आवडतो ? तिला अपेक्षा होती की घरातल्या दोघींनी मिळून छान फराळ करावा आणि सगळ्यांनी मिळून तो खावा. पण कसलं काय? ती परत शांत झाली. सगळ्यानी शंकरपाळ्या खाल्ल्या पण चांगल्या का, वाईट कोणी काहीच बोलले नाही, आता शालिनीनेही काही अपेक्षा ठेवली नाही. माहेरी आल्यावर आईचा फराळ तिने आवडीने खाल्ला. आई जेव्हा म्हणाली, तुला बरंय बाई, काही फराळाचे टेंशन नाही, सगळं सासूबाई ऑर्डरच करतात” तेव्हा तिला कसतरी झालं.
पहिल्यांदा कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका आली, तेव्हा अक्षय, शालिनी आणि सासूबाई यांनी जायचे ठरवले. एकत्र कुटंब कधी कोणाच्याही कार्यक्रमाला गेले नाही. ज्याने त्याने आपली माणसं बघायची हा अलिखित नियम. कोणी कोणाला आग्रह ही करायचे नाही. लग्नाला गेल्यावर शालिनी सर्वांच्या पाया पडली. कोणीतरी गमतीने सासूबाईंना म्हणले, सूनबाईंची ओळख करून द्या की? ” त्या अक्षयकडे बघून म्हणाल्या, “अक्षय तुझी बायको आहे ना? तू ओळख करून नको का द्यायला? दे ओळख करून सगळ्यांना.” अक्षयने ओळख करून दिली. शालिनीला वाटले, सून म्हणून ओळख करून देणे हे कमीपणाचे आहे काय? पण ती नेहमीप्रमाणे शांत झाली.
मन प्रचंड बंडखोरी करत होते, पण कोणाला काय सांगणार? कोणी मारत नाही, उपाशी नाही ठेवत, भांडत ही नाही. पण आपल्यातही मानत नाही. आज वर्ष होऊन गेले. जवळीकच नाही, संवाद नाही, आपुलकीने चौकशी नाही. इतका कोरडेपणा अलिप्तपणे सगळे वागत. तिने खूप प्रयत्न केला पण नेहमी दुर्लक्षित आणि डावलले गेले. काय जागा आपल्याला या घरात? तिला प्रचंड मानसिक ताण यायचा, तिची घुसमट कोणालाच कळली नाही किंवा तिला सांगताच यायची नाही. काही दिवसांनी शालिनीला त्रास होऊ लागला डॉक्टरकडे जाऊन आल्यावर कळलं की दिवस गेलेत, ती खूप आनंदली, अक्षय ही एकदम खुश झाला. घरी त्याने सांगितलं तेव्हा घरचेही खुश होऊन म्हणाले,
” चला आता बाळराजे येणार, आपल्या वंशाला दिवा, मुलगाच होईल बघ”. शालिनीला तिथेच चक्कर आली.

जागी झाल्यावर अक्षयला एकांतात म्हणाली, “अक्षय मुलगी झाली तर रे? ” अक्षय तिला समजावत म्हणाला “अग, आनंदच आहे मग, मगाच बोलणं मनावर घेऊ नको, सगळे खुश होणारच” शालिनीला फार पटलं नाही व ती शांत झाली. बाळासाठी आनंदात राहायचं अस तिने ठरवलं. ऑफिस बदलल्याने तिला घराजवळच जावे लागे. अक्षयही खूप काळजी घेई. शालिनी पहिल्यांदाच गरोदर असल्याने तिल खूप वाटे, की कोणी प्रेमाने दोन शब्द बोलावे निदान काही केलं नाही तरी.घरचे नेहमीसारखेच, काही बदल नाही. तिचा ताण वाढत होता. आणि एके दिवशी अघटित घडलं, शालिनीचे तिसऱ्या महिन्यात अबोरशन झाले. डॉक्टर म्हणाले ताणामुळेही होऊ शकतं. कोणालाच कळलं नाही शालिनी कसला ताण? शालिनी मात्र खूप रडली. पण तिने काही निर्धार केला आणि ती उठली. पूर्ण बरी झाल्यावर तिने जवळच एक भाड्याने फ्लॅट बघितला व स्वतःचे कपडे घेऊन शिफ्ट झाली. तिला कोणी काही विचारले नाही आणि थांबवले नाही. तिला हवा तसा फ्लॅट तिने सजवला. अक्षय ही आला त्याचे सामान घेऊन. दोघांचा संसार सुरू झाला.आज पहिल्यांदा शालिनी मोकळेपणाने जगत होती ताणमुक्त, तणावरहित, अगदी मोकळेपणाने. अक्षयनेही साथ दिली. समाजात ‘घरभेदी’ किंवा घर मोडणारी म्हणून ती हिणवली जाणार हे तिला माहीत होते. पण त्याही पेक्षा तिला महत्वाचा होता तो मोकळा श्वास….

शीतल दरंदळे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: