दु:स्वप्न

“दादा, ती बघ पाण्याची टाकी… आलं बघ आपलं गाव!” कुठूनतरी दुरून शब्द आल्यासारखे वाटले. कसेबसे महादूने राजाला खाली उतरवले; आणि जागेवरच तो कोसळला. दादा पडला पाहून राजा रडतच मदतीसाठी हाक मारायला पळाला. लोक गोळा झाले. त्यांनी लांबूनच पाणी शिंपडले. राजाने तोंडात पाणी टाकले. महादूने डोळे किलकिले केले. कोणीतरी त्याला उचलून एका खोलीत टाकले. अर्धवट शुद्ध असलेल्या महादूच्या डोळ्यांसमोर सगळा भूतकाळ फिरू लागला.       
एस.टी. स्टॅण्डवर  चहाच्या टपरीवर काम करणारा महादू खूप मेहनती होता. शहरापासून त्याचं गाव शंभर किलोमीटर अंतरावर होतं. बायको चार घरची धुणीभांडी करून घराला टेका लावत असे. त्याचा मुलगा राजा इयत्ता पहिलीमध्ये शिकायचा; आणि सोनी नुकतीच वर्षाची झाली होती. बरं चालू होतं. फुरसत मिळताच महादू जे मिळेल ते काम करायला तयार असे. त्याची बायको सुमन समाधानी होती. जसे असेल तसे गोड मानून घेत असे. राजावर ती चांगले संस्कार करत असे. गावी एक पडके घर होते.     
   
सगळे सुरळीत चालू असताना अचानक कोरोनाचा फैलाव सुरू झाला. किडामुंगीसारखे लोक मरू लागले. टीव्ही सारखा ओरडून सांगू लागला. जनमानसात भय पसरू लागले. ज्या मालकाकडे महादू पैसे जमा करत असे त्यालाच कोरोना झाला. महादूचा परिवार पण कॉरंटाइन‌ झाला. काम बंद झाले. सुमनचे कामही बंद झाले. माणूस माणसाला घाबरू लागला. प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाने पाहू लागला. कोरोना नावाचे भयानक भूत प्रत्येकाच्याच मानगुटीवर बसलेले होते.          

ज्यांचे हातावर पोट होते, त्यांचे हाल तर फारच वाईट झाले. दिवसभर काम करून पैसे जमा केले, की ज्यांच्या चुली पेटत होत्या ते हवालदिल झाले. बाजूला ठेवलेले वापरून झाले. उसनवार आणून झाले. सर्व बाजूंनी कोंडी होऊ लागली. लॉकडाउन‌‌ घोषित झाले. सर्व घरात बंदिस्त झालेले. महादूचा परिवार रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे घरी परतला. घरमालकाने त्याला लगेच घर खाली करायला सांगितले. शेजारीपाजारी टाळू लागले. महादूने कशीबशी मालकाकडे सवलत मागितली. सात-आठ दिवसांत घरातले किडूकमिडूक सर्व संपले. उसनवार देणे तर दूरच; पण आजूबाजूचे लोक राजामध्ये मुलांना खेळू देत नव्हते. सुमनला पाहून गप्पा मारायला बसलेल्या बायका घरात निघून जायच्या. सोनी आणि राजापुरते तरी शिजायला हवे म्हणून मालकाकडे मागायला जावे; तर ते अॅडमिट असलेले. सोनीचे रडणे ऐकून घरमालकीण गुपचूप पीठ देउन गेली. “शिळंपाकं पण चालेल ताई. दाराबाहेर ठेवून देत जा. पण लेकरांसाठी दया करा ताई.” सुमन धायमोकलून रडू लागली. डोळे पुसत मालकीण निघून गेली. दोन दिवस कसेबसे निघाले. नवरा-बायको पुन्हा चिंताग्रस्त झाले. तिसऱ्या दिवशी मालकाला कुणकुण लागली. तो म्हणाला,”दे थोडे धान्य; मात्र लांब रहा!” महादूने लांबूनच डोकं जमिनीवर टेकलं; पण हे असं किती दिवस पुरणार? असे दोन-तीन‌ दिवस गेले. त्यातच दैवाचा आघात झाला. ज्या टपरीवर तो काम करायचा तो मालक व त्याची बायको कोरोनाचे बळी ठरले. शेवटची आशा होती ती पण संपली. महादू हताश झाला.         
दुसऱ्या दिवशी पहाटेच महादू त्यांच्या गावच्या माणसाकडे गेला. “काळजी करू नकोस. आपल्या गावच्या रस्त्याने जाणारी एक गाडी आहे. आपण त्यात बायका पोरांना बसवून देऊ. आपण नंतर जाऊ.” तो म्हणाला.महादूने मान डोलावली. दोन दिवसांनी ती गाडी जाणार होती. महादूने संसाराचे बोचके बांधले. रात्री गाडी निघणार होती. तेवढ्यात राजाला सणकून ताप भरला. आता काय करावे असा यक्षप्रश्न उभा राहिला. शेवटी त्याने निर्णय घेतला. “सुमन, तू आणि सोनी सामानासकट निघा. राजाचा ताप उतरला की आम्ही निघतो.”  असे म्हणून सुमनला कसेबसे समजावून तो तयारीला लागला.           
रात्री गुपचूप तो सुमन आणि सोनीला घेऊन निघाला. राजा तापाच्या गुंगीमध्ये होता. का कोण जाणे सुमनला गाडीत बसवताना‌ त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; पण मोठी हिंमत धरून तिला गाडीत बसवून तो तडक घराकडे निघाला. राजा झोपला होता. महादू रात्रभर जागून मिठाच्या पाण्यात पट्ट्या बुडवून राजाच्या कपाळावर ठेवत बसला‌ होता. राजा जवळ बसला असतानाच त्याचा‌ डोळा लागला…         
दुसऱ्या दिवशी ‌दुपार झाली तरी सुमनकडून‌ काहीच फोन आला नाही. अंधार पडला तसा तो धावत गावच्या माणसाकडे गेला. तो पण खूप काळजी करत होता. रात्री तो महादूकडे मुक्कामी आला. भल़्या पहाटे राजाला घेऊन दोघेजण गुपचूप निघाले. गावाबाहेर पोहोचले तेव्हा चांगलेच उजाडले होते. एवढ्यात पोलीसगाडीचा आवाज ऐकू आला. दोघेही लपून बसले. त्यानंतर दुपार झाली तरी गाडी मिळाली नाही.                   
शेवटी राजाला खांद्यावर घेऊन तो आणि मित्र तसेच पायी निघाले.  पोटात अन्नाचा कण नव्हता. भीक मागून पोट भरता येत नव्हते. तसेच उन्हातान्हात ते पायांना ओढत होते. डोळ्यांसमोर निराशेचा अंधार होता.  कोरोनाचा धसका होता. भविष्य धूसर होते. उमेद संपली होती. मित्राने  गावाकडे फोन लावला तर, ‘तुम्ही गावाकडे येऊ नका. नाकाबंदी केली आहे.’ असा मेसेज आला अन् गावाकडे यांचा फोन घेणे बंद झाले. घरही पारखे झाले. तसेच उसने अवसान आणत लोकांच्या विनवण्या करत रेल्वे रुळाच्या कडेने अनेक लोक जात होते तसे ते पण चालू लागले.
रात्र       झाली तसे तेथेच थकले भागले जीव विसावले. पहाटे एकच गोंगाट झाला. मालगाडीने झोपलेल्या अवस्थेत असताना अचानक अनेकांना चिरडले. काहीजण रूळावर झोपून गेले होते. मृत्यू आपले भयानक तांडव करीत महादूच्या फार जवळून निघून गेला होता. तशाच भेदरलेल्या अवस्थेत महादू आणि त्याचा मित्र निघाले. राजा अर्धवट झोपेत होता.          
पुन्हा पोलीस बंदोबस्तापासून लपतछपत प्रवास सुरू झाला. काही ठिकाणी तरुणांनी पाणपोई व अन्नछत्र ठेवले होते. तेथे खाऊन, गाठीशी बांधून परत प्रवास सुरू झाला. अनेक अडचणींवर मात करत ते हवालदिल झाले होते. त्यात बायकापोरांचा पत्ता लागत नव्हता. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येत नव्हती. सगळाच चोरीचा मामला होता. तरी हिंमत करून महादूने तक्रार दाखल केली. त्यावर महादूला चार फटके खाऊन रात्रभर जेलमध्ये राहवे लागले; पण सुमनसाठी  सहन करावेच लागणार होते.         
पोलिसांच्या हातापाया पडून कसेबसे ते बाहेर पडले. मारामुळे अंग ठणकत होते. तसाच असाहाय्य अवस्थेत प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत करत त्यांच्या गावाच्याजवळ ते पोहोचले. महादूचे अंग तापले होते. कसंबसं तो स्वत:ला ओढत होता. तेवढ्यात राजा ओरडला,”दादा, ती बघ पाण्याची टाकी… आलं बघ आपलं गाव!”आणि महादूचे उसने अवसान गळून पडले. राजाला खाली उतरवले अन् तो कोसळला…         
” काहो उठताना..”सुमन हाक मारत होती.  आपण केव्हाचे झोपलोय ही जाणीव महादूला झाली.  सुमनला पाहून त्याला खूप धीर आला. “आमची  गाडी खराब झाली होती. मोबाईल कुठेतरी पडून गेला. गाडी कशीबशी दुरुस्त झाली. आम्ही कालच रात्री आलो. चहा आलाय. आपल्याला गावाबाहेर ठेवलंय. ही पहा सोनी.” सोनी लगेच त्याला बिलगली आणि महादू तिला जवळ घेऊन  हमसाहमशी रडू लागला.”गावावरच कमवू. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊ….”महादू रडत होता आणि बोलत होता…
     

 भावना मुळे        
९४२३४६८६१३

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: