शिवापूरम्म्ं

प्रवास रात्रीचा करायचा नाही असे ठरलेले होते, पण वस्तीचे ठिकाण फक्त दीड तासाच्या अंतरावर होते म्हणून राज म्हणाले,
“पोहोचू लवकरच”
तसा सर्वांनी होकार दिला, पण त्यांच्या या निर्णयाने मी थोडी नाराज झाले, जेवण करून प्रवास सुरू झाला. राज स्वतः ड्राईव्ह करत होते, त्यांचे मित्र सागर भाऊजी, त्यांची पत्नी व मुलीसह मधल्या सीटवर बसले होते आणि निखिल भाऊ त्यांची पत्नी आणि दोन मुलं एकदम पाठीमागे बसली होती. आम्ही सारे बेंगलोर उटीला चाललो होतो, मला कन्नड वाचता येत होते. मी एक बोर्ड पाहिला, पुन्हा पुन्हा थोड्यावेळाने तोच बोर्ड दिसत होता…. दीड ते दोन तास झाले ..तीन तास झाले अजून काही ‘याडगी’ गाव येईना… शिवापुरम्म्ं असा बोर्ड मात्र पुन्हा पुन्हा दिसत होता. मी यांना म्हणाली,

“पुन्हा पुन्हा याच गावात येतोय आपण, तोच बोर्ड दिसतोय “

तसे हे म्हणाले,
“तुला झोप आलीय, तू मधल्या सीटवर जाऊन बस, मी सागरला पुढे बोलवतो,”

म्हणून त्यांनी सागरला पुढे बोलावले, सगळेच झोपेच्या आधीन, मी मात्र अस्वस्थ! मला काहीतरी विचित्र जाणवत होते! मनातल्या मनात ‘ओम नमः शिवाय’ म्हणत होते. अचानक साहेबांनी गाडी थांबवली, भयाण जंगल होते.. काहीच दिसत नव्हते…. साहेब गाडीतून खाली उतरले आणि तरातरा चालू लागले, मला काय वाटले कोणास ठाऊक? खांद्याला पर्स अडकवून मी त्यांच्या मागे जाता जाता सागर भाऊजींना आवाज दिला तसे ते माझ्यामागे आले,

” भाऊजी, तुम्हाला काही दिसतेय”

” नाही वहिनी!”

” मग हे कोठे चालले आहेत काही लक्षात येतेय का? काही जाणवतंय? ऐका, पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसा, मी ह्यांना घेऊन येते,”

म्हणतच मी त्यांच्या मागे धावले….. मध्यरात्रीची वेळ, मी हाका मारतेय पण ते काही वळून पाहत नव्हते. थोड्या वेळात ते थांबले,
मला म्हणाले,
” आलं पाहा, इथेच थांबायचं आहे आपल्याला !”

मी पहातच राहिली,

” इथे?”

” हो! इथेच राहायचे रात्रभर…….”

समोरचा फलक पाहीला,
‘ वैकुंठधाम’
आणि मी चक्रावलेच ….पायातलं बळच गेलं, एकही पाऊल पुढे टाकवेना…. पण हा क्षण खूप महत्त्वाचा होता. मी कसलाही विचार न करता …..धावत जाऊन यांना पकडले आणि अक्षरशः ओढून आणतात ना तसं अगदी तसं गाडीत बसवलं, सागर भाऊजी ना गाडी सुरू करण्यास सांगितली, छातीत धडधडत होतं…. पुन्हा तोच फलक समोर आला शिवापुरम्म्ं…… ह्यांना कसलंच भान नव्हतं. विचार करायची ही वेळच नव्हती आणि अचानक हे जिथे बसले होते तिथे त्या बाजूने खिडकीतून अचानक एक हात यांचा गळा दाबताना दिसला…… क्षणातच कसलाही विचार न करता सर्व शक्ती एकवटून मी तो हात अक्षरशः खिडकीतून बाहेर ढकलला…… सागर भाऊजींना काय घडलं काही कळलं नाही….. पण त्यांनी मला विचारलं,
” तुम्ही ठीक आहात ना !”
मी कसेबसे
“हो “
म्हणाली आणि डोळे गच्च मिटून घेतले. पहाटेचे पाच वाजत आले होते आणि आमची गाडी एकदाची हायवेला लागली… समोरच ‘याडगी’ गाव दिसलं…..मी एक सुस्कारा सोडला. तिथल्या गेस्टहाऊसवर सागरच्या मित्राने राहायची सोय केली होती, आत्ता हेही भानावर आले… गाडीत सगळेच गाढ झोपले होते काय घडलं हे मला आणि सागर भाऊजींना माहिती होतं.. आम्ही चकव्यात फसलो होतो……… आणि पुन्हा पुन्हा चार तास तिथेच घुटमळत होतोत… त्या वैकुंठधामपाशी ? …त्या वैकुंठ भूमी पाशी ?

‘काही म्हणा वहिनी, मानलं तुम्हाला ! त्या क्षणी तुम्ही राजना थांबवलं नसतं आणि तो हात बाहेर ढकलला नसतात तर खूप मोठा अनर्थ घडला असता वहिनी,”
असं म्हणत रात्री घडलेली घटना सागर भाऊजी सगळ्यांना सांगत होते तेव्हा त्यांच्या मित्र म्हणाला,
“नशीबवान आहात तुम्ही, या चकव्यातून सहीसलामत बाहेर पडलेले तुम्ही पहिलेच असाल…..? तिथे फसलेली माणसे कधीच परत येत नाहीत.”
“काय?”
सगळेच ओरडले……

” हो, आज पहिल्यांदा तसं घडलंय……..”

मला तर तो विचार ही नकोसा वाटला त्या क्षणी माझ्यात कोणती निर्णय क्षमता आली मला माहिती नाही ‘sixth sense’ म्हणतात ती हीच शक्ती असेल कदाचित… माझा देवावर असलेला प्रचंड विश्वास आणि माझ्या पर्स मध्ये असलेली हनुमान चालीसा यामुळे मला एक एक अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. रात्री जे पाहिलं ते कधीही न विसरता येण्यासारखं ? आत्ता तर नुसत्या आठवणीने अंगावर सरसरून काटा उभा राहतोय, खरंच दैव बलवत्तर होतं आमचं, अगाध शक्ती आमच्या सोबत होती आणि डोळ्यापुढे पुन्हापुन्हा तरळू लागलं ते शिवापुरम्म्ं गाव कुठेही अस्तित्वात नसलेलं…

डॉ शीतल शिवराज मालूसरे
महाड-रायगड
(लेखिका वीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज आहेत.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: