अंधार…

जन्मापासून मनाच्या कोपऱ्यात सोबतच होतो आम्ही..मला त्याचा त्रास व्हायचा अन् त्याला माझा. तो संधी मिळताच धावायचा अंधारबावडीकडे.. तळघरात..किंवा बळदात.. मला मात्र आवडायचा उबदार तांबूस उजेड. चुलीचा, समईचा, निरांजनाचा आणि छपरातून पाझरणाऱ्या कवडशाचा. तरिही आम्ही एकत्र होतो. जन्माने, नियतीने आणि मायेच्या धाग्याने बांधलेले. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू….

असाच एकेदिवशी मला खेचत बळदात घेऊन गेला तो. मी आपला पाय खेचत कसनुसा. उजेड असलो तरी जीव होताच की मलाही. बळदाच्या पहिल्याच पायरीवर थबकलो आणि जाणवलं की मी विरघळतोय हळूहळू एका दमट पिवळ्याशा निर्जीव चैतन्यहीन द्रावात..आणि माझ्या विरघळण्यासोबत तो होत चाललाय अजूनच गडद,दाट,खोल..खोल..
अंधेरा कायम आहे…

हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है..जिंदगी जबभी तेरी बज्ममें लाती है हमें..
मनातले विचार सैरभैर झालेले.. माझ्यातल्या प्रकाशाचा कण न कण रसरसत होता..
बळदाची दुसरी पायरी उतरताना किती आणि कसले कसले विचारांचे पिसारे फुलत होते. अस्तित्व क्षीण होतानाही स्वप्न शिल्लक रहावीत.. पुनर्जन्म होतो म्हणे. माझही स्वप्न होतं, सकाळ तिच्या कुशीत जोजवताना पिंपळाचं तांबूस इटूकलं पान उगवावं डोळ्यांत आणि पांघरावी त्याची मल्मली कोवळीक..पण आता त्याच पिंपळाची सांध्यसळसळ दाटत होती मनात. अन् त्याच्या ढोलीतल्या घुबडांचे घुत्कार शहारे फुलवत होते.

माझं विरघळणं चालूच होतं आणि त्याचे कुटील हास्यही. क्षणाक्षणाला गारठ्याचा शहारा मला वेढून घेत होता. बळदातला बुढ्ढा अंधार मला कवेत ओढत होता. त्याचे थरथरे बर्फाळ ओले हात मला पकडायला बघत होते. मी पायरीवर ओठंगून स्वतःला वाचवण्याच्या धडपडीत आणि तो बुढ्ढा अंधार आपला अजगरी जबडा वासून माझा घास घेण्याच्या प्रतिक्षेत..

मी मात्र प्रकाशाचा पाईक होवून मनात साठवत राहिलो उर्जेचे अवशेष..न जाणो कधी अचानक त्या अवशेषांचा विस्फोट होत चुरगळतील या अंधाराचे बर्फाळ हात आणि तो उर्जेचा लाव्हा प्रकाशत राहील अक्षय..मी बळदाच्या पायऱ्या उतरतोय त्याच उर्जेचं बोट धरून.आता मी प्रकाशमान झालोय आतून आणि पहिल्यांलाच अंधाराच्या डोळ्यांत भिती पाहिली मी. आता पायऱ्यांचे दंशील स्पर्श हळूहळू शांत होऊ लागले. मला मनातला प्रकाश अजूनच उमलल्याची जाणिव झाली. अचानक कानाला घासून एक वटवाघूळ उडाल्याची जाणीव झाली.त्याचा उग्र दर्प मला शहारून गेला..

बळदात गच्च ओला अंधार..न जाणो किती पिढ्यांचा होता. काहीतरी अमानवीय जाणवत होते. अंधारातच वेगवेगळ्या आकारांचे भास होत होते. अचानक माझे डोके गरम होवू लागले.जणू कोणीतरी रसरसलेली भट्टी डोक्यात पेटवली असावी…बुबुळं संत्र्याएवढी झालीत आणि ओठांच्या वरच्या बाजूने सळसळत बाहेर आलेले सुळे माझ्याच मानेत रुतत असलेले जाणवले. मी धडपडलो,किंचाळलो..मनातल्या उजेडाला जिवंत ठेवण्यासाठी धडपडलो..एवढ्यात मानेवर एक जोराचा दंश..बर्फाळ झुळूक आणि सारे शांत…

बाहेर सकाळीच्या कोवळ्या कुशीत मी तांबूस पिंपळ पांघरून निजलोय.. माझ्यातला अंधार मात्र बळदात..सुशेगाद आहे.. अंधेरा कायम रहे..

मानसी चिटणीस
चिंचवड, पुणे. 9881132407

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: