आठवणीतले बालपण

“उठा रे दोघ, लवकर उठायचं जरा व्यायाम करायचा, सगळं आवरून अभ्यासाला बसायचं, सकाळी सकाळी अभ्यास चांगला लक्षात राहतो.”

दादांची हाक ऐकू आली. की आम्ही डोळे चोळत उठून बसायचो. माझे वडिल ‘नेव्ही’ मध्ये असल्याने कडक शिस्तीचे, कमालीची स्वच्छता ठेवणारे, कामे वेळेत झालीच पाहिजेत, कधीही आळसाने दादा झोपलेत असे आम्ही पाहिलेले आठवत नाही, कायम कामात असलेले. आपल्या वस्तूंची आपणच काळजी घेतली पाहिजे, उद्याच काम आज झालं पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. दादांचा रोज सकाळी न चुकता व्यायाम सुरू असायचा. रोज सकाळी चालून आल्यावर त्यांचे सुर्यनमस्कार, वेगवेगळी आसने, घरातच थोडेसे जॉगिंग, अनुलोमविलोम, प्राणायाम असा त्यांच्या कार्यक्रम असायचा.

“आरोग्यदायी शरीर हीच खरी संपत्ति” असं ते नेहमी म्हणत.

रोज ते आम्हालाही करायला सांगायचे पण आम्ही आधीच उशिरा उठायचो मग अभ्यास राहिलेला असायचा, त्यात आईने केलेल्या खरपूस गरम गरम पोळ्याच्या वास नाकात शिरल्यावर कधी एकदा तूप साखर पोळी खातोय आणि गरम गरम दूध पितोय अस व्हायचं.

“दादा उद्या सकाळी नक्की व्यायामाला लवकर उठू, आज घाई आहे” अस सांगून आम्ही मस्त नाश्ता करून अभ्यासात डोके खुपसायचो.

आईचीही सकाळ भल्या पहाटे व्हायची, उठल्या उठल्या स्टोव्ह पेटवणे हे एक मोठे कार्य असायचे, एकदा स्टोव्ह पटल्यावर मग आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी एक मोठे पातेले त्यावर ठेवायचे. तिची अंघोळ झाली की मग कणिक मळणे, भाजी चिरणे ही कामे सुरू व्हायची, गॅस ही होता घरात पण त्यावर मग भाजी, दूध तापवणे, भाजी फोडणीला टाकणे ही कामे व्हायची. स्टोव्ह वर मात्र रोजच्या पोळ्या आणि आंघोळीचे पाणी तापवले जायचे. अधून मधून आम्हा दोघांना, धाकटा भाऊ व मला हाक मारणे सुरू असायचं.

या सकाळच्या आवाजात अजून एक मंजुळ आवाज म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र, सातच्या बातम्या, यानंतर वाजणारी कधी नाट्यगीते, कधी भावगीते, जर मंगळवार असेल तर गणपतीची गाणी, गुरुवारी दत्ताची शनिवारी मारुतीचे गाणे हमखास वाजयचे आणि शेवटी जवळपास ठरलेलं नाट्यगीत कुमार गंधर्व यांचं ‘ऋणानुबंधच्या जिथुन पडल्या गाठी…’

त्यांनतर ओळीने होणारी मराठी,हिंदी व इंग्रजी बातम्या.. या बातम्या संपल्यावर आमचा रेडिओ बंद व्हायचा कारण त्यानंतर वडिलांच्या मते हिंदी माकडगीते म्हणजे बॉलीवूड गाणी लागाची. आम्हाला ती आवडायची पण वडिलांना घाबरायचो आम्ही मग बोलणार कोण?

रविवारी मात्र आम्हाला रंगोली पाहायला मिळे. त्यादिवशी आम्ही न सांगता, न हाक मारताही उठत असू. माझा न्हाण्याच्या कार्यक्रम असल्याने अजून लवकर उठायला लागे, शिकेकाईने आई घसघासा डोक घासून द्यायची, कधी केसात कोंडा, किंवा केस गेलेले मला आठवत नाहीत. माझे लांब दाट केस मैत्रिणींना खूप आवडायचे. नाश्त्याला इडली असायची,घरी दळून,आंबवून बनविलेल्या पिठापासून मऊ,हलक्या, पांढऱ्याशुभ्र हलक्या इडल्या व नारळ खोवून केलीली चटणी त्यामुळे रविवार सकाळ खासच असायची.

संध्याकाळी कोणी पाहुणे यायचेच, दादांचे मित्र किंवा मामा, मावशी अधूनमधून भेटायला यायचे.मग आमची गम्मत असायची. ते येताना बिस्किटं,खारी किंवा वाटीकेक आणायचे. ते मग आम्ही सर्वांना वाटून खायचो. रात्री झोपण्यापूर्वी एक तरी पुस्तक वाचले पाहिजे अशी आईची शिस्त होती, मग अनेक गोष्टींची पुस्तकं माझ्या कपाटात असायची, पण अभ्यास झाल्याशिवाय ती गोष्टीची पुस्तकं वाचायची नाहीत हे पक्के माहीत होते.

सुट्टीत मग आजोळी आजीकडे यायचो, मामा मामी आणि आजी, आई दोन दिवस राहायची मग घरी जायची, आम्ही मात्र 15,20 दिवस आजीकडेच राहायचो. तिथे शेजारी खूप सारे मित्र मैत्रिणी असायच्या. TV पाहायला ही कोणी नाही म्हणत नसे, त्यामुळे आमची धमाल असायची. आजी खूप गोष्टी सांगायची. मामा बागेत फिरायला न्यायचा,मामी आवडीचे पदार्थ आवडीने आमच्यासाठी बनवायची.आई, मावशी एकत्र आल्या की रात्रभर यांच्या गप्पा चालत. आम्ही झोपण्याचा नाटक करून त्या गप्पा ऐकायचो, गम्मत वाटायची आम्हाला जेव्हा आजी आईला म्हणायची, अगं किती बारीक झालीत ग ही पिल्ल, का सारखी शिस्त, शिस्त, जरा आराम करु देत की लेकरांना, अभ्यास करून थकतात बिचारी, आता या वेळेला चांगले काजू, बदाम घालून साजूक तुपातले रव्याचे लाडू पाठवते तुझ्यासोबत, दे त्यांना रोज, कशी ताकद येते बघ, बदाम ही भिजवतेस ना रोज? देत जा त्यांना” मामा मावशी आमचे कौतुक करी, आपले नाव बघ कशी मोठं करतील मुलं पुढे जाऊन. असं म्हणत आमच्या डोक्यावर मायेने हात फिरवायची.आम्हाला कौतुक ऐकून मग छान झोप लागायची..

निकालाच्या दिवशी आम्ही घरी यायचो, चांगले मिळाले की दादा कौतुक करायचे आणि आम्हाला त्यांच्या खास स्कुटर वरून फेरी मारायला मंदिरात न्यायचे. बर्फाचा गोळा खाऊ घालायचे. कपड्यावर न सांडता आम्ही अगदी वाकून तो खायचो आणि मग मित्र मैत्रिणींना लाल झालेली जीभ दाखवयचो.

आईदादा शिस्तीत रोज अभ्यास घायचे,अभ्यासात टाळाटाळ केली की फटके असायचे. आम्हाला कधी कधी खूप राग यायचा, सारखी काय शिस्त ? माझ्याकडे तेव्हा शाळेत जायला सायकल होती. तिला दर रविवारी दादा आम्हाला साफ करायला लावायचे, दादा महिन्यातून एकदा त्यांना तेलाने ग्रीसिंग करायचे. त्या तेलाने मग माझे आठवडाभर कपडे पायापाशी तेलकट व्हायचे. मग आईला धुताना मदत करावी लागे. भावाला रेशनच्या दुकानात रॉकेल, साखर आणण्यासाठी फेरी मारावी लागे. तो दुकानदार कधीच नीट सांगायचं नाही की कधी मिळेल म्हणून, 4 फेऱ्या मारल्यावर साखर मिळायची, रॉकेल मिळणे नंतर बंद झाले. दादांची ही सायकल होती, त्यांची सगळी कामे सायकल वरच व्हायची, अगदी वयाच्या 60,65 पर्यंत त्यांनी सायकल चालवली.

आमची स्कुटर फक्त रविवारी निघायची, लहान भाऊ पुढे उभा, मी आई दादाच्या मध्ये दोन्हीकडे पाय टाकून आणि आई मागे अशी आमची फेरी कधी बागेकडे तर कधी एखाद्या मंदिरात निघायची.दादा स्कुटर इतके हळू चालवायचे की एखादा सायकलस्वार आम्हाला हरवेल अस वाटायचं. बाकी इतर दिवशी स्कुटरला आराम असे. दर दिवाळीत आम्हाला नवीन कपडे घेतले जायचे, ते कपडे घेण्यासाठी आम्ही बसने लक्ष्मी रोडवर यायचो. अनेक दुकानात फिरल्यावर आमची पसंती व्हायची. आईला साडी, आम्हा दोघांना नवीन कपडे घेतले जायचे, दादा शर्ट पिस आणि पॅन्ट पिस घ्यायचे. त्यांचे रंगही ठरलेले असायचे, शर्टचा रंग पांढरा त्यावर उभ्या लाईन्स असायच्या तर कधी बारीक रंगाच्या चौकटी, पॅन्ट मात्र काळ्या किंवा राखाडी. मळखाऊ रंगाच्या. कपडे खरेदी झाल्यावर आम्ही शनिवार वाड्यापशी येउन एक भेळवाल्याकडे ओली भेळ खायचो.

हॉटेल ला कधी गेलेलो मला आठवत नाही, आईने बनविलेला निरनिराळे पदार्थ आम्हाला अत्यंत प्रिय होते. ती खरंच सुगरण होती,तिने बनविलेले उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, मांसवडी,केळ घालून केलेला शिरा,दिवाळीत बनविलेल्या करंज्या, शंकरपाळ्या, चकल्या, रवालाडू असे किती तरी पदार्थ तिची खासियत होती. अगदी मासे ही ती अतिशय चविष्ट बनवायची. ती सतत कामात असायची, शिवणकाम ही उत्तम करे, तिचे शिवलेले कितीतरी फ्रॉक मी घालायचे. आजीला खूप सुंदर बटवा तिने शिवून दिला होता, तिने तो अनेक वर्षे वापरला. मला कायम प्रश्न पडायचा आई थकत कशी नाही? ती आजारी पडलेली कधी मला आठवत नाही. किती ही पाहुणे येऊदे ती कायम हसतमुखाने त्यांच्यासाठी करायची.

आंब्याच्या मोसममध्ये दादा खास मंडईत जाऊन आंब्याची पेटी आणत. हापूस, पायरी, गोट्या, केशर कितीतरी प्रकार आम्ही खायचो, पायरी आंबा आम्हाला खूप आवडायचा चोखुन खायला.आई रस करायला बसली की आम्ही कोय चोखुन खाण्यासाठी बसायचो.आणि रस काढून झाला की तो आमच्या गोदरेज च्या निळ्या फ्रिज मध्ये ठेवायचो. आणि जेवताना थंडगार रसाबरोबर गरम गरम पोळ्या. आमचा एक।मित्र राहायला यायचा आमच्याकडे त्या वेळेला, आमची पैज लागायची की रसाबरोबर कोण किती पोळ्या खातय ते. कार्टून तेव्हा फक्त रविवारी लागायचे संध्याकाळी 5 वाजता. टी व्ही वर फार सीरिअल्स नसायच्या, रोज 7 च्या बातम्या पाहणं मात्र दादा चुकवायचे नाहीत.

आमचे घराचे दार कायम उघडे असायचे, शेजारी पाजारी गप्पा चालू असायच्या, कोणाकडे काय पदार्थ बनला आहे हे सगळ्यांना माहीत असायचं, आम्ही मुलं एकमेकांकडे ताटं घेऊन खूपदा जेवायला जायचो. मग काकू त्यांच्याकडचा एखादा गोड पदार्थ ताटात वाढायच्या. कोणी पाहुणे येणार असतील तर शेजारच्या काकू नेहमी आईच्या मदतीला यायच्या किंवा आईही मदतीला जायची. एकमेकांकडे येणे जाणे दार न वाजवता होतं होते.

काटकसरीची सवय ही आई दादांनी आम्हाला लावली.गरज नसलेल्या वस्तूचा हट्ट आम्ही कधी केला नाही. स्वावलंबी असणे किती गरजेचे आहे हे आता कळायला लागलेय. सरस्वतीची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न असतेच, असं दादा सांगत. त्यामुळे वाचायची खूप सवय लागली. सगळी वर्तमानपत्रे मी वाचून काढायची.लायब्ररीतली पुस्तके तर माझ्यासाठी पर्वणी असायची. दिवसाला एक अख्खं पुस्तकं माझं वाचून संपत असे. लायब्ररीवाले काका ही इतके ओळखीचे झाले होते की नवीन पुस्तक आले की ते माझ्यासाठी राखून ठेवत, कोणालाही द्यायच्या आधी मला ते पुस्तक वाचायला मिळे.

असे खूप लहान लहान आनंद घेत मी मोठे झाले.एका मध्यमवर्गीय कुटुंबातले बालपण कमी अधिक फरकाने अनेकांनी असेच जगले असावं. तेव्हा इतकी जाणीव नसायची ,कळत नसायचं. पण आज मागे वळून पाहताना आईदादांच्या शिस्तीमागचे प्रेम अगदी लख्ख दिसते. जेव्हा आम्ही आता त्यांच्या भूमिकेत आलो तेव्हा जाणवतं की छोट्या कृतीतूनही खूप संस्कार होत असतात, एकमेकांच्या सहवासातलं सुख सर्वोच्च आहे. काय आपण ही असेच सुख, आंनद ,सहवास,संस्कार पुढच्या पिढीला देऊ शकतो?असे क्षण नक्कीच देऊ शकतो. आज स्वतः आईवडील झाल्यावर जाणवतंय की आता मी माझ्या आई दादांना जास्त ओळखू शकले.
तुमचंही असं झालय का ?

शीतल दरंदळे,
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: