मर्म जीवनाचे

काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने ‘तनिष्का हायटेक नर्सरी’ या नावाने नर्सरी सुरू केली, पण मी नोकरीनिमित्त रायगडला असल्याने बरेच दिवस नर्सरी पाहण्याचा योग आला नाही. उन्हाळ्याची मे महिन्याची सुटी लागली आणि मी गावाला आलो, एक दिवस आवर्जून नर्सरी पाहायला गेलो. मोठा भाऊ राहुल कार्यालयात कामात होता. मला पाहताच म्हटला,” प्रॉडक्शन मॅनेजर जरा कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. तेवढं थोडा वेळ कामगारांवर लक्ष ठेव.

मी कार्यालयाबाहेर आलो. नर्सरीत फेरफटका मारू लागलो. पॉलिहाऊसमध्ये ऊस, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी अशी वेगवेगळ्या प्रकारची रोपं होती. जवळजवळ हजार-दीड हजार कामगार कोणतीही गडबड, गोंधळ न करता आपापली कामे अतिशय शिस्तीत करत होते. मी थोडीफार इकडची तिकडची किरकोळ कामे एक-दोघांना सांगितली. मग त्यातल्या एकाने धिटाईने विचारले,

“साहेब, तुम्हाला किती पगार आहे? ” त्याने मला नर्सरीतलाच एक कर्मचारी समजले होते.

मी क्षणभर विचार केला. मग त्यालाच म्हटले, “तुला किती आहे?”
” दररोज दोनशे ” , तो उत्तरला. 

“मग तुझ्यापेक्षा थोडा जास्त आहे,” मी बोललो .                      

तेवढ्यात नर्सरीत आलेल्या टेम्पोने हॉर्न दिला. अन् चार – पाच कामगार तिकडं गेले. मीही त्यांच्या पाठोपाठ गेलो. उसाने भरलेले ट्रे क्रेटमध्ये ठेवून ते टेम्पोत एकावर एक रचू लागले. मला या सर्व गोष्टी नवीनच होत्या, त्यामुळे मी कुतूहलाने सगळं पाहत होतो. बघता बघता टेम्पो भरला, पण शेवटचे दोन क्रेट बसत नव्हते. ते बसविण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. क्रेट अलीकडे-पलीकडे सरकवले, वर-खाली केले, पण काही केल्या क्रेट त्यात बसेनात. मग मागून मीच बोललो, 

“दे कोंबून त्यात !”

“नको नको … क्रेट तुटतील, “त्यातला एक कामगार बोलला.
“तुटू दे , तुटले तर … कुठं आपलं काय जाणार आहे?” मी मुद्दामच हसून बोललो .                          

तेव्हा तो कामगार माझ्याकडे येऊन बोलला, “भाऊ,मालकाचं नुकसान कधी करायचं नाही. हे क्रेट नुसते क्रेट नाहीत. त्यांनी मालकाचंच नाय, आपलंही घर चालतं. एवढ्या लोकांचा प्रपंच जर हे क्रेट चालवत असतील, तर मग आपण याला मोडून कसं देऊ? उलट याला जिवापलीकडं जपू.  

‘खरंच ,त्या कामगारांचा प्रामाणिकपणा पाहून मी भारावून गेलो.आपण ज्यावर जगतो,पोट भरतो त्याचा आदर केला पाहिजे, मग ती गोष्ट निर्जीव का असेना. त्यांचे त्या निर्जीव वस्तूवरचेही असणारे प्रेम जीवनाचे मर्म सांगत होते. मी कार्यालयात आल्यावर मोठा भाऊ बोलला, “लगेच आलास ? तुला कामगारांवर लक्ष द्यायला सांगितलं होतं ना?” 

“त्याची काही गरज नाही. नर्सरीतले सर्व कामगार अगदी प्रामाणिक आहेत, “मी उत्तरलो.               

मग मी घडलेला किस्सा इत्थंभूत त्याला सांगितला, तेव्हा तो गालातच हसला.

सचिन बेंडभर 
शिरूर, पुणे. 9822999306

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: