चतुर किडम्या

दिवस मावळतीकडं झुकला. आम्ही पाठीवरील पिशवीच्या ओझ्यानीच वाकलो व्हतो. जंगलातून वाट काढीत किडम्या समद्यांच्यापुढे चालला व्हता. आम्ही त्याच्या मागं पण बऱ्याच अंतरांनी चालत व्हतो. एका मोठ्या सायरीच्या झाडाखाली किडम्या थांबला.
“इथं झुर्री हाय, बक्कळ पाणी मिळंल. रातच्याला इथंच थांबायचं.”
किडम्याचा आदेश होताच सगळ्यांनी काखेला मारलेल्या पिशव्या खाली टेकवून झुरीकडं हातपाय धुण्यासाठी मोर्चा वळवला.
किडम्या असला की, रानातली रात बिनधास्त जाती. त्यो हायेच मोठा चतुर. पण लई अबोल. रानातल्या साऱ्या वाटा त्याच्या पाठ, त्यो पुढं चालला की बिनधोक व्हऊन नुसतं चालत सुटायचं. इंचू – काट्याची भीती नाय.पुढं काय दिसलंच तर त्यो हात वर करून थांबायचा इशारा देतो, पण पुढचं काय ते त्योच बघतो. एखादं जनावर सपाट्यात आलं तरी त्याला त्यो इजा करीत नाय. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल त्याच्या मनात होलसेल दयाभाव दिसून येतो. पण एखादा पारवा एखादी लाव्हरी दिसली की गिलवरीच्या एका फटक्यात चीत व्हायचीच.
त्याची नजरबी लई बारीक. मधमाशी पळाली तरी किडम्या माग काढीत तिच्या मागंच कपारीत, खबदाडात हात घालून चारदोन मधाचं पोळं आणल्याबिगर रहायचा नाय. जंगलात मुक्कामाच्या ठिकाणी किडम्या रातभर सावध असतो. फाटे गोळा करून आगटी पेटवली की त्याचीच रात सुरू व्हती.आमच्यातला कुणीच त्याच्या सवयीच्या आड येत नाय. गुरवाचा मारत्या तर त्याला अख्खा इडीबंडल,नवी कोरी माचिस आन एक चण्याची पुडी दर खेपला देतो.
“आता फिराडू कवाशी व्हयाचं.”
असा किडम्याचा सवाल आला की समजायचं त्याला घराकडं जायचं.

advt-bhandare-computer-chinchwad
advt-bhandare-computer-chinchwad


दुसऱ्या दिवशी घराकडं जायाचं आसंल त्याच रातीला किडम्या गायब हतो. दर खेपंचा हाच अनुभव. तसा आजबी त्यानं पहाट बाल्या मारल्याच.
ढळढळीत उजाडलं तेव्हा आम्ही झुरीवर जाऊन तोंड धुतली.ती न दगडाची चूल करून चहाला आधाण ठिवलं. निवांतपणी सगळं आटपून मगच घरचा रस्ता धरला. मुंजाबाच्या टेकडीवरून उतरता उतरता रस्त्याकडं चाललेला किडम्या दिसला. त्याला गाठायचं म्हणून आम्हीबी पाऊल उचाललं. पण आमच्या आधीच फॉरेस्टच्या सायबांनी त्याला गाठला.
मोटार सायकल रस्त्यात उभी करून साहेबांनी त्याची हजेरी घ्यायला सुरवात केली. आम्ही गेलो, पण जाताच थबकलो. किडम्याच्या खांद्यावर पोतडी व्हती, त्यात दोन मोठे ससे त्यांनी धरून चालवले व्हते. आता हे लफडं आपल्याबी गळ्यात येणार म्हणून आम्ही सगळीच काळवंडलो.
सायबानी किडम्याला झापायला सुरवात केली.
“कायरे जंगलात घुसून चोरी करतो नाय का?”
तसा किडम्या बोलला, “नाय बा, कशाची चोरी, आन कशापायी चोरी करायची.”
किडम्याचं उत्तर ऐकून साहेब भडाकले ना!
“साल्या, पोतडीत ससे काय आपुआप येऊन बसले, तुला मुद्देमालासह पकडलाय? बोल, आत्तापर्यंत किती ससे नेले ते?”
पण किडम्याच्या चेहऱ्यावर थोडीबी भीती नव्हती. सहज बोलावं तसा किडम्या बोलला,
“साहेब काहीतरीच तुमचं,अहो हे ससं माझ पाळल्यालं हायेत, पिंजऱ्यात राहून कटाळत्यात म्हणून महिन्याभरानी एकदा जंगलात आणून सोडतो. इथं बघा कसं हिंडत्यात-फिरत्यात. घरी जायचा टाईम झाला की नुसत हुर्यो आ-हुर्यो आ-आसं म्हणलं की पळत येतात. पुन्हा घरला घेऊन जातो मी.”
किडम्याची सफाई ऐकून सायेब चिडलेच. मला शेंडी लावतो. बोलावल्यावर ससे परत येतात काय? बदमाश साला!”
सायबाचं बोलणं पुरं व्हायच्या आत किडम्यानी खुलासा केला.
“सायेब, खऱ्याला मराण नाय, तुम्ही डोळ्यानीच खात्री करा की!”
असं म्हणून किडम्यानी एका झटक्यात पोतडीचं तोंड सैल केलं. पोतडीचं तोंड मोकळ होताच ससे चौखुर उधळले आन बघता बघता जंगलात दिसेनासे झाले .
“बोलव आता परत,” साहेब बोलले.
किडम्याबी कमी नव्हता त्यो बोलला-
“ससे,कुणाचं ससे, आन कुणी आणलं?”
सायेब किडम्याला मारायचाच राहिला.
“अरे तुला मी मुद्देमालासह पकडलाय? ससे आण!”
किडम्या हसतच बोलला,
“कशाचा मुद्देमाल, आन कुणी पकडलाय. कुठाय! तुम्ही काय बोलताय? कुणाला बोलताय तेच मला कळाना?
तसे सायेब भांबावले. पाय आपटीत गाडीकडं जाऊन तावातावानी निघून गेले आन गुरवाचा सद्या किंचाळला,

“किडम्या, वारं वाघा”…!

सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे
.
9822999306

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: