शापित सौंदर्य

“सौंदर्य शापित असत ना रे माधवा..”
लांबसडक वेणी हातात घेऊन दुसरा हात दोरखंडाला पकडून जमिनीला पायाने झटका मारत झोका घेत मान वर करून मंजिरी विचारायची.. 
तिच्या कोवळ्या गुलाबी ओठांची हालचाल झाली की नजर ओठांवरच रेंगाळायची..मी आ करून बघत बसायचो फक्त..”माधवा SSS.” जरास ओरडूनच मंजिरी झोका थांबवायची आणि निघून जायची..तिने अजून चिडू नये म्हणून मी ही घाबरल्यासारख करत तिच्या मागे मागे गावभर फिरायला निघायचो..
दिवस तेव्हा असाच सरायचा..
हिरवाकंच परकर पोलका.. गोऱ्या गोऱ्या हातात लाल हिरव्या बांगड्या, कोरल्यागत भिवया, तपकिरी डोळे.. सरळसोट नाक.. लांबसडक केस.. कपाळावर येउन थांबणारी एकच बट..ओठ जणू गुलाबाच्या दोन पाकळ्या. आणि हिऱ्यावर सोन्याचा मुलामा म्हणजे शिरा दिसतील इतकी पातळ काया..
“देव देताना एखाद्याला इतक भरभरून कस काय देतो गं.. मला गरिबी..तूला देखण रुपड.. दोन्ही हातात काही न ठेवता बहाल केलय विठ्ठलानं..”
तिची नजर ओलसर व्हायची..
तिच्या आत्यावर गेलेली म्हणे ती.. अगदी तेच रूप मंजिरीच..आत्यान विष पिउन जीव दिला होता अस आई बोलायची..
सौंदर्य..शापित..मी पुटपुटायचो..काळजात धस्स व्हायच..
मग विठ्ठलाच नाव घ्यायचो..
तस विठ्ठल आणि मंजिरी मला लहानापासूनच आवडायचे..
विठ्ठलाचा नाद मला बापामुळं लागलेला..वारीचा पण..
“तुझ्याशिवाय करमत नाही ऱे माधवा..” अस मंजिरी बोलल्या वर्षापासून वारी बंद..
त्यादिवशी रस्त्यात चाराणे मिळाले..मळकटलेली पॅंट झाडत आईपाशी गेलो.. आईच्या हातात टेकले.. आई खूश होऊन “काय हव ते घे वाण्याकडून” अस बोलेलस वाटल..
पण… आई वासकन ओरडली..”हिरित फेक पयले..प्रेतावर फेकलेले असत्याल..”..”त्येच्या.. कधीच्याकाळी हातात आलेला पैसा पण मढ्यावरचा असावा इतक फाटक नशीब नाय दुसर जगात कुणाचं..वाण्याकडून मंजिरीला आवडणारी बोरकूट घेइन म्हणल पण कसल काय..”
मागच्या अंगाला जाऊन ते विहिरीत फेकले..
“ए म्हाद्या..”
आईची हाक आली..
कुठ ते गोड “माधवा” आणि कुठ हे “म्हाद्या..”
“श्या…नाव पण धडान घेत नाहीत लोक.. काय नशीब..”मी जरा चिडूनच..”आये मला म्हाद्या नको बोलू.. किती टायमाला सांगायलो मी.. काय आहे..”
“हे घे आठाने..”
“आयला.. आये.. कशान मेहेर्बान झाली ग आज..”
“तुझा पडलेला चेहरा बघवं नाय..जा वाण्याकड जाऊन काय हव ते खा..”
मी सुसाटलो.. थेट वाण्याकड..”दोन बोरकुट..”
तिथून थेट मंजिरीच्या अंगणात..
तिथ कळल मंजिरी वाण्याकड गेलेली.. तसाच थेट वाण्याकड सुसाट..
डोक्यात सनकल.. वाण्याकडून तिच्याकडे तिच्याकडून वाण्याकड..ही रस्त्यात भेटली कशी नाही…
नसलेल्या मेंदूला ताण देण्याआधीच कदमांच्या फाटकातून धावत बाहेर पडणारी मंजिरी नजरेस पडली.. मी थांबलो..
तिचा मात्र ओंजळीत गच्च भरलेली बकुळीची फुले न सांडवण्याचा प्रयत्न चालू होता..
“कार्टे…ऱोजचा धिंगाणा असतो.. तुझ्या बापान लावलय का झाड.. ये परत तंगडच तोडतो कि नई बघ..”
आतून कदमांच्या शिव्यांचा मारा..
ऐकायला मंजिरी होती कुठ..मी पण तिच्या पाठून धावत सुटलो..
दोघेपण झोक्यापाशी येउन थांबलो.. 
“एवढी गुणाची पोर तू.. शिव्या कशाला खाते ग..”
“माधवा.. ह्या बकुळीसाठी मी कायपण खाईन..” 
त्या दिवशीच मी बकुळीच झाड लावल मागच्या अंगणाला.. त्यानंतर सतत मागच अंगण भरभरून बकुळीन वासाळायच..
पण…पण काही महिन्यानी मंजिरीची ओंजळ नव्हती..सतत आजुबाजूला खळखळणारी तीच नव्हती..
मला तिच्याबद्दल जे वाटत होत ते तिला माझ्याबद्दल अजिबात वाटत नव्हत..तिची जात म्हणे वरचढ होती..इतक साध सोप्प गणित होत ते..
विनायक काका आणि घरातले तिला मुंबईला घेउन गेलेले.. परत आले तेव्हा मंजिरी नव्हती..
लग्न झाल तिच.. बंगला वगैरे आहे तिकडे.. अस कानावर आल..
कोसळलो..मग सावरलो..
वारीला जायला लागलो नेमाने..
झोक्याचं झाड तुटून तिथे झालेल्या भल्यामोठ्या इमारतीकडे बघण टाळू लागलो फक्त..
तोवर गावात भलत्याच चर्चाना उधाण आल होत..
मंजिरी विनायकाची नाही तर तिच्या आत्याची अनौरस मुलगी होती म्हणे.. तिला जन्म देउन लाजेखातर आयुष्य संपवल होत आईने…तिच्या विनायक मामाने बाप म्हणून सांभाळल होत वगैरेवगैरे..
सौंदर्य शापित असत ना रे माधवा.. हे विचारताना तेव्हा तो निरर्थक वाटणारा प्रश्न आज बरीचशी कोडी उलगडत होता..तिच्या डोळ्यांच्या कडेशी येणार पाणी हेच सांगायच का??तिला हे माहित होत का??
पुन्हा काही प्रश्न निरुत्तरीतच..
ती सुखी आहे ना आता बस्स..
बरीच वर्ष गेली मध्ये..सगळ सगळ विसरलो मी सुध्दा..आणि कामाच्या शोधात लागलो..
सावंताच्या प्रदिपचा फोन आला.. मुंबईत निघून ये..एका कंपनीत कामाला लागलो…आईच्या पसंतीने लग्न केल…संसारात रमलो..
सगळ निट झाल..
पण बकूळ..झोका..ओठ..काही केल्या पाठ सोडत नव्हते..
लगोलग असणाऱ्या इमारतीतूनही वाट काढत यायच्याच आठवणी पाठून..
एकदा मुसळधार पाऊस..ऱस्ता बंद झाल्याने माझी टॅक्सी दुसऱ्या रस्त्याने निघाली.. ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या टॅक्सीच्या काचेवर टकटक झाली..
काच खाली केली.. पावसात भिजलेला एक चेहरा नजरेस पडला..लालचुटूक ओठ किळसवाणी हालचाल करत पुटपुटले..
“ए..आता है क्या..पर हावर पाचसो..” मी भानावर आलो..
टॅक्सीवाला बोलला..”साहेब..विंडो उपर करो.. रेड लाईट एरिया है..चिपकने के लिए आयी होगी कोई.. शरिफ लोग नही आते यहाँ.. रास्ता बंद था तो आना पडा..”
मी घाईत काच वर करणार तोच पुढे शेड मध्ये लाल साडीत मला मंजिरी दिसली..
मी उडालोच..
थोडा वेळ तसाच गेला..
मग मात्र मी तिला जोरात हाक मारली. “मंजिरी..”
ती पोरगी बोलली.. “अबे..वो लैला है..””उसका पर हावर थाउझंड है.. तेरेको नही परवडेगा.. टॅक्सीमे फिरता है और ख्वाब मर्सिडिज के.. चल फुट..”
मी जोरात ओरडलो तिच्यावर..
“ती लैला नाही.. ती मंजिरी आहे माझी..”
मी परत पाहिल..ती मंजिरीच होती..
ती माझी मंजिरी होती..
ही इथे काय करतेय..
म्हणजे तिचा मामा…
कोणी डोक्यात जबरदस्त घाव घालत असल्यासारख वाटल क्षणभर..
बाहेर पडायच धाडस नाही झाल..
फक्त ती जवळ आल्याचा भास झाला..
ती कानात पुटपुटून गेली..
“माधवा..सौंदर्य शापित असत ना रे..”
                               

 दिप्ती जाधव
वांद्रे (पूर्व), मुंबई

One thought on “शापित सौंदर्य

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: