माळावरची फुलं

दिनेश भाऊराव भोसले 

घंटा खणाणली. गावच्या वेशीपर्यंत आवाज घुमला. राजानं पाठीवर दप्तर टाकलं. अंगणातल्या बकरीला गोंजारलं अन् झप झप पावलं टाकत निघाला. तेवढ्यात त्याच्या मागनं धापा टाकत रोह्यत्या आला. राजाच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, 

“आज बी उशीर ?” 

राजानं मान वाकडी केली, म्हणाला, “मनच लागंना बघ या साळंत.” 

“अॅ हॅ … मंजी टकलू बोलत व्हता त्ये खरंच म्हणायचं काय ?” “काय म्हणत व्हतं रं त्ये बेनं ? कळत नाय ना काय नाय ..

कंड्या पिकवत हिंडतंय. मार खातंय बघ एकाद्या दिशी.”

“लागलं व्हय ?”दोघेही शाळेच्या गेटजवळ आले.

राष्ट्रगीत संपून प्रतिज्ञा सुरू झाली होती. गेटवर गायखे सर उभा होते. गायखे सरकडं बघून दोघेही जाग्यावर थांबले. खाली मातीकडं बघत राजा मनातल्या मनात बोलू लागला,  

‘काय रुबाब व्हता सरचा नविन आलं तवा. हातात फोक घिऊनच हितं उभा असायचं. आख्खी शाळा चळाचळा कापायची. पी.यस.आय. असल्यागत वावरायचं मैदानावर. आता … माझं बकरु बरं. मिशीचं आकडं मोडलं. हातातला फोक गळून पडला. तोंडातलं दात काढलेल्या वाघागत झालंय. ना शिट्टीत दम ना तोंडात दम.’ 

गालातल्या गालात त्याला हसू फुटलं. तसं सरचं लक्ष त्याच्याकडं गेलं. 

“का हसतो रे ? एकतर पंधरा मिनिट उशिरा आलास आन वर दात काढतोस काय ?” 

“न.. नाय सर.” “नाही काय? का उशीर?” “रानात गाय बांधाय गेलतो.”

“रानात ? काय माती दाखवायला नेली होय?”“काय करणार सर? तेवढंच वाळलं चिळलं चघळीत बसती.”

तसं आकाशाकडे बघत  उसासा सोडत सर उच्चारले, “जा आत.”

खाली मान घालून हसत दोघेही वर्गात गेले. पहिला तास सुरू झाला होता. सर वर्गात आले नव्हते. राजानं आपली जागा जवळ करत न राहून डावीकडे तिरप्या नजरेनं बघितलं. कानावर पडणार्या कलकलाटात त्याला आवडता आवाज ऐकू आला नाही. 

‘दोन दिवस झालं ती दिसतच नाही. कुठं गायब झालीय कुणाला ठाऊक?  करमतच नाही बघ तुझ्याशिवाय. हासतेस झ्याक, दिसतेस झ्याक. .. त्या इंग्रजी पुस्तकातल्या फाऊंटन कवितेतल्या फाऊंटनवानी ! तुला खरं सांगू का? आयुष्यात पह्यलांदा इंग्रजी कविता समजली. सर शिकवत होते आन् मी फाऊंटनच्या कडंला लावलेल्या लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या लाईटीच्या बल्बासारखा तुझ्या कडंनं थुई थुई नाचत होतो.’

तासामागून तास संपत होते. राजा वर्गात असून नसल्यासारखं वागत होता. रोह्यत्याच्या नजरेतून हे सुटत नव्हतं. शेवटचा तास संपत आला तसा राजा जास्तच चुळबुळ करायला लागला. जाधव सर गोष्ट सांगत होते. राजा बघत सरांकडे होता पण त्यांचा एकही शब्द त्याच्या कानातून आत झिरपत नव्हता. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा खणाणली. वर्गाबाहेर पडताना सरांनी राजाला टेबलवरच्या वह्या स्टाफ रूममध्ये आणायला सांगितलं. बिचारा. .. इच्छा नसताना वह्या उचलून निघाला. स्टाफ रूमजवळ पोहोचताच त्याच्या कानावर आतला संवाद ऐकू येऊ लागला.

“अवघड झालंय राव सगळं.”“काय अवघड झालंय थोरात सर ?”“काय करावं या विद्यार्थ्यांना समजत नाही. या आठवीपर्यंत पास नं मजाच घालवली.”

advt-bhandare-computer-chinchwad
advt-bhandare-computer-chinchwad

कांबळे सर कपाट बंद करत, “सब बढे, बिना पढे.  यांना शिक्षा नाही करायची, अपमानास्पद शब्द नाही वापरायचे. घरी लाड, इथेही धाक नाही.” “मग गुरकतात सरांनाच. बघा त्या गायखे वाघाकडं. वाघाची डायरेक्ट गायच झाली.” गायखे सरांकडे बोट दाखवत जाधव सर बोलले.

कारके मॅडम, रासे मॅडमच्या कानात कुजबुजल्या,

“यांना नसतात कामं. उगाच विषय चघळीत बसतात. चला.”सगळ्या उठल्या आणि मोठ्या लगबगीनं बाहेर पडल्या.

राजाला पाहताच सोने मॅडम बोलल्या, “इथे काय थांबलास? कोणी बोलावले? आत जा.”

“अं.. बरं बरं.”लगबगीनं राजा आत गेला.

जाधव सरांनी त्याच्याकडं बघितलं. आठवल्यासारखं करत म्हणाले, “अरे राजू, लक्षातच नाही तुला आत बोलवायचं. ठेव तिथं. जरा लक्ष देत जा शिकवण्याकडं. बाप तिकडं रानात रक्ताचं पाणी करतोय. जरा जाण ठेवा. जा.”

“हा सर, ठेवतो सर, करतो सर.”

“काय ठेवतो ? काय करतो ?”

“नाय. .. अं हे आपलं… जाणीव.” “हं .. पळा.”राजा पळतच बाहेर आला.

वर्गातलं दप्तर आणायचं विसरला होता. डोकं खाजवत वर्गाकडं निघाला. तर रोह्यत्या दप्तर घेऊन उभा. त्याच्याकडं हसून बघत दप्तर घेऊन दोघेही निघाले. 

“राजा, दोस्ता, बोल की खरं. ए ती नमी साळंत येत नाय म्हूण तुला करमत नाय. खरं ना ?”

“खरं सांगू का तुला? पर कुणाला सांगू नगंस.”

“नाय सांगत.”

“लय आवडती बघ.”

“नमीच ना?”

“हं.. नमीच. पुस्तक उघडलं तर प्रत्येक पानावर तीच दिसती. रानात जावं तर ढेकळात उभारल्यागत जाणवत राहती. ती माळावर पिवळी धम्मक फुलं जशी गोंडस दिसत्यात ना शेम तशी वाटती बघ.”

“राजा, चांगलाच गुरफटला की तिच्यात. ए आन् ती बी तुझ्याकडं बघत असती बरं का.”

तसा त्याचा हात धरत राजा जाम उत्सुकतेने, “खरं? उगं हरबाराच्या झाडावर चढवू नगंस.”

“बास का. उद्या बगा प्रार्थनेला कशी तुज्या आडव्या लाईनीत उभारती ती.”

“झ्याकच की. पर उद्या आली तर खरं.”

“इश्वास … इश्वास पायजे बग आपल्या प्रेमावर. जाधव सर म्हणत्यात ना ‘मनात जर जबरी इच्छा आसली ना तर ती खरी व्हणारंच’ तुला ती उद्या साळंत यावी आशी मनापासून जबर इच्छा आसंल ना तर ती शंभर नाय एकशे एक टक्का येणार मंजी येणारच.” 

रोह्यत्याचा हात जोरात दाबत राजा म्हणाला, “रोह्यत्या, जर ती उद्या आली ना तर तुला माजा आवडलेला नवा सदरा देतो बघ.”

गप्पा मारत मारत राजाचं घर कधी आलं ह्ये दोघांना बी समजलं नाही. एकमेकांचा निरोप घेत दोघं दोन्ही दिशेला गेले. रात्रभर राजाच्या डोळ्यासमोरची नमी आन् रोह्यत्याच्या डोळ्यासमोरचा राजाचा नवा सदरा हटला नाही. पहाटं झापाखालचं कोंबडं आरवायला आन् राजाला गाढ झोप लागायला गाठ पडली. सपनातली नमी त्याज्या आडव्या लाईनीत उभी राहून त्याच्याकडं बघत गालातल्या गालात मनभरून हासत होती. हासत हासत ती त्याच्या जवळ आली. कानाजवळ ओठ आणून कायतरी पुटपुटताना तिच्या भुरकट काळ्या केसांचा त्याच्या कानाला स्पर्श झाल्यामुळे त्याला गुदगुल्या झाल्या. तसा हातानं कान झटकत डोळं ऊघडून बघतो तर त्याचं बकरु त्याच्या कानाला चाटत होतं.

“तुला तर आता…” असं म्हणत रागानं उठून तो त्याच्यामागं पळाला. आईनं नाय बघितलं हे लक्षात येताच कोपर्यातलं टरमाळं उचलून तो परसाकडं पळाला. घंटा वाजायच्या आत साहेब पाठीवर दप्तर टाकून मैदानावर प्रार्थनेला हजर!

रोह्यत्या म्हणाल्यागत सारं घडत व्हतं. प्रार्थना झाल्यावर वर्गात जाताना त्यानं घाबरत घाबरत नमीच्या हातात चिठ्ठी कोंबली. पळतच वर्गात शिरला. नमी जाम घाबरली. तिला काय समजायच्या आत तिच्या मागच्या राधीनं ती हिसकावली. 

“अगं. .. अगं राधे,”

काय ऐकायच्या आत राधी स्टाफ रुमकडं पळाली. दहाच्या मिनिटात खरं खोटं करत राजा, रोह्यत्या, नमी खाली मान घालून उभा. तशा अवस्थेतदेखील फुसफुस करत रडणारी नमी, रडून लालबुंद झालेलं तिचं तोंड बघून राजा राधीवर जाम चिडला व्हता. चिठ्ठी टेबलवरुन सगळ्या सर, मॅडमपुढून फिरत व्हती. फिदीफिदी हसत… कधी चिडून सगळे बोलत होते. गायखे सरांनी हातात फोक घिऊन राजाला बडवायला सुरू केलं.

“शाळा नको शिकायला. हेच धंदे करत फिरा. घ्या ह्याच्या बापाला बोलवून.”

थोरात सर गायखे सरांना आडवत, 

“कशाला मारताय त्याला. हाकलून द्या.”

रासे मॅडम नमीकडं जात,

“गरीब गाय न् पोटात पाय. चांगलाच रंग दाखवलास.”

“मॅडम. .. मी..”

“एक शब्द बोलू नका. आत्ताच हे नखरे. पुढे काय होणार?”

तेवढ्यात राजाचा बाप आला. एक दोन शब्द ऐकताच खणकन राजाचा गाल सडकावत,

“दोन वर्षापासून पावसाचा थेंब नाय. रान उघडं पडलंय. मोठ्या मोठ्या भेगा पडल्यात. जनावरं तडफडून मरायला लागल्यात. खायला आन नाय. आजचीच पंचायत हाय. तुला असलं धंदं सुचत्यात व्हय? चल तुलाच जुपतो बैलाच्या जागंवर. चाबकानं फोडून काढतो. मग बघ काय काय सुचतंय त्ये.”असं म्हणत त्याला ढकलतच नेला.

नमीच्या आईनं तिच्या झिंज्या धरुन तिला घरी नेली. राधी फिदीफिदी हसत वर्गात पळाली. जाधव सरचं मन सैरभैर झालं. हताश होत खुर्चीवर बसत हळहळत बोलू लागले, 

“जरा जास्तच शिक्षा झाली दोघांनाही.”

थोरात सर, “जरा जास्त? काय बोलताय जाधव सर?”

“हं… आपण यांना समजून घ्यायला हवं होतं. आठवी म्हणजे काय हो? काळ बदलला मान्य. आपणही होतोच की आठवी, नववीला. समुपदेशनाची नितांत गरज आहे यांना. नाही तर हातची जातील हो ही लेकरं ..हातची जातील…”

One thought on “माळावरची फुलं

Add yours

  1. वा छान.
    चित्रच उभे राहिले नजरेसमोर
    उत्तम शब्दरचना आणि शाळेतील महत्त्वाचे विषय हाताळले गेले.

    Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: